विभाग नववा : ई-अंशुमान
अंगुळ जि ल्हा - बिहार ओरिसाप्रांत ओरिसा भागाच्या नैऋत्येकडे असलेल्या मांडलीक संस्थानात वसलेला असून याचे अंगुळ व खोंडमाळ असे दोन भाग करतां येतात. उ. अ. २०० १३' ते २१० १०' व पू. रे.८३० ५०' ते ८५० ४३'. क्षेत्रफळ १६८१ चौरस मैल. अंगुळ भागाच्या उत्तरेस रायराखोल आणि वामरा संस्थानें, पूर्वेस तालचेर, धेनकानाल आणि हिंदोल; दक्षिणेस दसपल्ला आणि नरसिंगपुर; पश्चिमेस अथमल्लिक संस्थान. खोंडमाळ अथवा कंधमाळ भाग डोंगराळ असून अंगूळच्या नैऋत्येस आहे व त्यांत खोंड अथवा कंध जातींची वस्ती आहे. उत्तरेस, पूर्वेस, आणि पश्चिमेस बौद संस्थान असून दक्षिणेस मद्रास इलाख्यांतील गंजम जिल्ह्याची सरहद्द आहे.
अंगुळ विभागाचा दक्षिणेकडील भाग डोंगराळ असून त्यांतून पुष्कळ नद्या पावसाळ्यांत वहात असतात. परंतु सर्व नद्यांनां उन्हाळ्यांत पाणी नसतें. डोंगरांची ओळ नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरली असून तिच्या दक्षिणेकडे महानदी वहात असून उत्तरेकडे ब्राह्मणी नदी वहात आहे. डोंगरांतील वनश्री प्रेक्षणीय आहे. खोंडमाळ हें एक १७०० फूट उंचीचें पठार असून मधून मधून डोंगरहि त्यांत आहेत. या भागांत अद्यापि दाट जंगल आहे.
डोंगरात व खोर्यांत दाट जंगल आहे; या जंगलात सर्व प्रकारचे वन्य प्राणी सांपडतात. उदाहरणार्थ हत्ती, गवे, वाघ, चित्ते, हरीण, डुक्कर, रानटीं कुत्रीं, अस्वलें इत्यादि. या भागांत रानटी प्राणी फार असल्यामुळें त्यांपासून होणरी वार्षिक मनुष्यहानि व पिकांचें नुकसान हीं फार जबर आहेत.
ह्या रोगट असून हिंवतापाची सांथ नेहमीं असतें. पावसाळा अनिश्चत असतो. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५३ इंच असून पाऊसकाळ जून ते आक्टोबरपर्यंत असतो.
इ ति हा स - ओरिसांतील इतर डोंगराळ प्रदेशांत व अंगुळ येथेंहि प्राचीन काळीं खोंड या वन्य जातीची वस्ती होती. या प्रदेशावर हिंदु लोकांच्या वारंवार स्वार्या होऊन त्यांनीं या वन्य लोकांस डोंगरामध्यें हांकलून देऊन आपण त्या प्रदेशाचे मालक झाले. लवकरच रजपुतांच्या हातांत ओरिसांतील हा डोंगराळ प्रदेश गेला व त्या भागांत छोटी छोटीं संस्थानें उत्पन्न झालीं. ही संस्थानें आपसांत कांहीं तरी कारण काढून नेहमीं भांडत असत. या वेळचा संगतवार इतिहास उपलब्ध नाहीं. अंगुळ संस्थान देखील आपल्या शेजार्यांशीं याचप्रमाणें भांडत असे. त्यांतल्या त्यांत हे सर्व संस्थानिक पुरीच्या राजाचे मांडलिक म्हणून वागत असत हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. ज्या वेळीं कंपनी सरकारनें ओरिसा जिंकल्या त्या वेळीं या सर्व संस्थानिकास सनदा देण्यांत आल्या. त्याप्रमाणें अंगुळच्या संस्थानिकास सनद मिळाली. ब्रिटिश सरकारास खंडणी रू. १६०० ठरली होती. इ. स. १८४६ सालीं सोमनाथ नांवाचा संस्थानिक आपल्या राज्यांतील लोकांवर फार जुलूम करूं लागला व इ. स.१८४६-१८४७ मध्यें खोंडमाळमध्यें उद्भवलेल्या खोंड लोकांच्या बंडास त्यानें उत्तेजन दिलें. पुढल्या वर्षी अंगुळच्या लोकांनीं महानदीपार होऊन दसपल्ला संस्थानांतील दोन खेड्यांचा नाश केला. याबद्दल ब्रिटिश सरकारनें राजास कटक येथें खुलासा करण्यास पाचारण केलें. परंतु राजानें जाण्याचें नाकारलें. त्यावरून ब्रिटिश सरकारनें अंगुळ खालसा केल्याबद्दलचा जाहिरनामा काढला व संस्थान काबीज करण्याकरितां सैन्य पाठविलें. गोळीबार करण्याची जरूर पडली नाहीं. संस्थानिकास हाजीरबाग येथे जन्मभर कैदेत टाकलें. इ. स. १८९१ पर्यंत अंगुळचा कारभार ओरिसामधील मांडलिक संस्थानांचा (ओरिसा फ्यूडेटरी स्टेट्स) सुपरिटेडंट याच्या हाताखालीं तहशिलदार पहात असे. पण त्या सालीं त्यास खोंडमाळ जोडून त्याचा निराळा जिल्हा बनविण्यांत आला.
खोंडमाळ हा भाग पूर्वी बौद संस्थानांत मोडत असे; परंतु खोंड लोक अगदीं स्वतंत्र असल्याप्रमाणें वागत असून बौद संस्थानिकास त्यांस ताब्यांत ठेवणें अशक्य झालें होतें. खोंडामध्यें नरबली देण्याची जी चाल होती ती मोडण्याचा ब्रिटिश सरकारनें निश्चय केला. इ. स. १८३५ सालीं बौद संस्थानिकानें हा भाग ब्रिटिशांनीं आपल्या ताब्यांत घ्यावा म्हणून परवानगी दिली. त्यावेळीं हा भाग मद्रास सरकारनें ताब्यांत घेतला. कारण त्या सरकारनें गंजम जिल्ह्याच्या सरहद्दीवरील खोंड लोकांतील नरबलीची चाल मोडण्याकरितां विशेष उपाय योजले होते. या भागांतील ही चाल समूळ नाहींशी करण्यास ब्रिटिश सरकारास फार त्रास पडले; व इ. स.१८४७ सालीं तर मोठें बंड झालें. त्याची स्थिर स्थावर झाल्यावर इ. स. १८५५ सालीं कटक जिल्ह्यास हा भाग जोडण्यांत आला. पुढें इ. स. १८९१ सालीं अंगुळ जिल्ह्याचा हा एक विभाग करण्यांत आला. लोकसंख्या (१९२१) १८२५७४.
यांत ४८००० लोक खोंड जातीचे आहेत. यांची वस्ती खोंडमाळांत असून त्यांचा इतिहास, त्यांचा धर्म, त्यांची भाषा, त्यांचा कायदा, त्यांचा जमीन जुमला व त्यांचें राष्ट्रीयत्व ही सर्व अगदीं भिन्न आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं त्यांच्यात जी नरबळीची चाल होती त्यामुळें यांस महत्त्व आलें होतें. ते चांगलें पीक येण्याकरितां नरबली भुदेवीस अर्पण करीत व त्या बलींचे मांस शेतांत पुरीत. हे बली पान नांवाच्या अर्धवट वन्य जातींतून विकत घेण्याची त्यांची वहिवाट असे. हे पान लोंक प्रत्येक खोंड खेड्यांत असत. ही चाल समूळ नाहींशी करण्यास ब्रिटिश सरकारांस बराच त्रास पडला हें वर आलें आहे.
अंगूळ विभाग बराच सपाट असून पाण्याची देखील सोय बरी आहे. परंतु खोंडमाळ उंच पाठारावर असून सपाट जमीन फार कमी आहे. पुष्कळ खोंड लोक उचली शेती करतात. या भागांतील मुख्य पीक भाताचें आहे. खोंड लोक हळदीची लागवड घरीच करतात. गुरचरण पुष्कळ आहे. तथापि गुरांची अवलाद कमी प्रतीची आहे. इ. स. १९०३-४ मध्यें जंगल खात्याचें उत्पन्न ५००० रूपये असून खर्च १७००० रूपये होता.
दगडी कोळशाचे खडक कुठें कुठें पृष्ठभागावर आलेले दिसतात परंतु त्यांतून कोणी अद्यापि दगडी कोळसा बाहेर काढलेला नाहीं; लोखंडाचे दगड पुष्कळ खेड्यांत सांपडतात.
उद्योग धंदे.- हातमागावरील सुती कापड, टोपल्या व चट्या करणें, लोखंडाचें काम, पितळ व पंचरशी धातूचें काम करणें. या भागांतील व्यापार मुख्यत्वेंकरून कटकशीं होत असून कांहीं पुरी व गंजम संस्थानाशीं देखील होतो. अंगुळ शंखपूर आणि बागडिया हीं या जिल्ह्यांतील मुख्य व्यापाराची ठिकाणें आहेत.
इ. स. १८८९ सालीं अनावृष्टीमुळें या भागांत दुष्काळ पडला होता. जिल्ह्याचा अधिकारी डेप्युटी कमिशनर असतो. अंगुळ विभागाची प्रथम पाहणी इ. स. १८५५ सालीं झाली. जमीन महसूल (१९-३-४) ८७ हजार, एकंदर उत्पन्न १२५ हजार होतें.
वि भा ग.- अंगुळ जिल्ह्याचा विभाग. उ. अ. २०० ३२' ते २१० १०' पू.रे.श ८४० १८' आणि ८५० ४३' क्षेत्रफळ ८८१ चौ. मै. लोक संख्या (१९११) १२५२३३ या विभागांत ४६८ खेडीं आहेत. अंगुळ हें मुख्य ठिकाण होय.
गांव - बंगाल. अंगुळ जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश.२०० ४८' व पूर्व रेखांश. ८४० ५९' लोकसंख्या (१९०१)६९३. येथें अवश्य सरकारी कचेर्या असून तुरूंगांत ११० कैद्याची सोय आहे.