विभाग नववा : ई-अंशुमान
अंगोरा शहर - प्राचीन अंकिरा (आधुनिक अंगोरा) हें आशियामायनरमधील गॅलेशियांतील इराणी राजमार्गावर वसलेले एक मोठें व भरभराटीचें प्राचीन शहर होते. त्यामुळें इ. स. २३२ व्या वर्षी गॅलेशियांत कायम वस्ती केलेल्या तीन गॉल जातींपैकीं टेफ्टोसेजस या जातीनें आपलें मुख्य ठिकाण केलें. इ. स. पूर्वीं १८९ व्या वर्षीं मॅनलिअस व्हल्सो यानें आपलें सैन्याचें मुख्य ठाणें केलें. इ. स. पूर्वीं ६३ वर्षीं पांपेनें येथें एक अंमलदार नेमला. इ. स. पूर्वीं २५ त हें शहर गॅलेशिया या रोमन प्रांताची राजधानी झाली. येथें ख्रिस्ती धर्माचा प्रसार बहुतकरून १ ल्या शतकांत झाला असावा कॉन्स्टन्टीनोपल जेव्हांपासून रोमन साम्राज्याचें मुख्य शहर झालें तेव्हांपासून अंगोरा शहराची खरी भरभराट सुरू झाली.
अ र्वा ची न - हल्लीं अंगोरा हें आशियांतील तुर्कस्तानाच्या अंगोरा विलायतचें मुख्य ठिकाण आहे. हें एका टेंकडीवर वसलें असून त्याची रचना चांगली दिसत नाही. रस्ते फार अरूंद व घरें कच्च्या विटांचीं आहेत.
आधुनिक अंकिरा शहरांत रोमन व बायझंटाईन अंमलांतील कांहीं अवशेष आहेत. ऑगस्टुम नांवाचें 'रोम व ऑगस्टस' यांच्या नांवानें उभारलेलें एक देऊळ फार महत्त्वाचें आहे. हें देऊळ बादशहा आगस्टन जिवंत असतांना गॅलेशियन लोकांच्या मंडळानें उभारलें असून याच्या भिंतीवर ग्रीक व लॅटिन भाषेत एक लेख कोरलेला आहे. या लेखांत बादशहाचें चरित्र व त्यानें केलेलीं मुख्य कामें यांचें वर्णन आहे.
ग्रीको- रोमन व बायझंटाईन शिल्पकामांचे काहीं अवशेष अजून सांपडतात. सर्वांत सुंदर असें रोम आणि आगस्टस यांचें देवालय आहे. बायझंटाईन कालामध्यें हे एक महत्त्वाचें ठिकाण होतें. नंतर तें इराणी व अरब लोकांच्या ताब्यांत गेलें. सेलजुक तुर्कोनीं तें सर केलें. व १८ वर्षेपर्यंत धर्मयुद्धात भाग घेणार्या लॅटिन संघाच्या तें ताब्यांत होतें. १३६० सालीं ओटोमन तुर्कांनीं अंगोरा शहर घेतलें. इ. स. १४०२ मध्यें तैमूरनें तुर्की सुलतान बयाझीद याचा पराभव करून अंगोराजवळ त्याला कैद केलें. पहिल्या महंमदानें १४१५ सालीं पुन्हां तार्तर लोकांपासून अंगोरा परत घेतलें. तेव्हांपासून ओटोमन साम्राज्याचा हें शहर भाग होऊन राहिलें आहे. १८३२ सालीं इब्राहिमपाशाच्या अधिपत्याखालीं इजिप्शियन लोकांनीं हें शहर घेतलें होतें. अंगोरा कान्स्टान्टिनोपलशीं रेल्वेनें जोडलें आहे.
अंगोरा मध व फळें याबद्दल प्रसिद्ध आहे. सध्यां येथें ब्रिटिश वकील असतो. येथील लोकसंख्या सुमारें २८००० आहे. अंगोरा विलायतचें क्षेत्रफळ २७,३७० चौरस मैल असून लोकसंख्या ९,३२,८०० आहे. अंगोराबकरीं लोंकरीकरितां प्रसिद्ध आहेत. या विलायतेंत मोहेर लोंकरीखेरीज सतरंज्या व गालिच्यांचा मोठा व्यापार चालतो.