विभाग नववा : ई-अंशुमान
अंजनगांव बारी - उमरावती तालुका. घरें ७८१, लोकसंख्या २९७९. हें बडनेरापासून सुमारें चार मैलांवर असून रेल्वे स्टेशन आहे. येथील बहुतेक लोक बारी जातीचे असून गांव बागाईत आहे. विड्याचीं पानें व केळीं येथें फार होतात. बडनेराप्रमाणें हें गांव पेशव्यांच्या जहागिरींत होतें, व येथें आसपास लढाया होत असाव्यात याची साक्ष येथील अगदीं मोडकळीस आलेला मातीचा किल्ला देतो. येथें एक रामगीरबाबा नांवाच्या साधूची समाधि असून त्याठिकाणीं दरवर्षीं डिसेंबर महिन्यांत लहानशी जत्रा भरते. अंजनगांवाहून तीन मैलांवर असलेल्या चादूर उमरावती डोंगरावर एक तळें इ. स. १८९८-९९ सालीं पडलेल्या दुष्काळांत बांधण्यांत आलें.