विभाग नववा : ई-अंशुमान
अंजनवेल - हें रत्नागिरी जिल्ह्यांतील एक प्रसिद्ध गांव. उ. अ. १७० ३१' व पू. रे. ७०० १५' वर आहे. हें गांव वासिष्ठी उर्फ दाभोळ नदीवर असून तेथें एक जुना किल्ला आहे. मराठी अमदानींत हें जिल्ह्याचें ठिकाण होतें. पण १८१९ मध्यें गुहागर हें पेट्याचें ठाणें झाल्यामुळें अंजनवेलचें महत्त्व कमी झालें. ह्याच्या नजीक ३०० फूट उंच टेंकडीवर तालकेश्वराचें प्राचीन देवालय आहे. या बंदरांत दीपगृह, कस्टम कचेरी व धर्मशाळा आहे. येथें विणकामाचा धंदा चालतो. अंजनवेलच्या किल्ल्यालाच गोपाळगड म्हणतात. तो अंजनवेल बंदरापासून अर्ध्या मैलावर असून तीन
बाजूंनीं समुद्रवेष्टित आहे व चवथ्या बाजूस खंदक आहे. भोंवतालचा तट जाड दगड व चुन्याचा असून २० फूट उंच, ८ फूट रुंद व चांगला भक्कम आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. किल्ल्यांत पूर्वीं बरीच घरें होतीं; हल्लीं कांहीं घरें असून तीन विहिरी पाण्यानें भरपूर भरलेल्या आहेत. १८६२ पर्यंत तेथें रक्षणार्थ २०० शिपाई व दोन अधिकारी होते. अलीकडे तेथें मुळींच शिपाई नाहींत. फक्त जुन्या रद्दी तोफा पडलेल्या आहेत.
इ ति हा स - १५ व्या शतकापूर्वी अंजनवेल येथें किल्ला नव्हता, पण मोजे गुढे तर्फ वलंबे येथें पवार उपनामक कोणी मराठा पुरुष गढी बांधून या भागावर अंमल चालवित होता असें इ. स. १८२४ च्या सुमारास नकलल्या गेलेल्या अंजनवेलची माहिती देणार्या एका चोपड्यावरून दिसतें. इ. स. १५०२ च्या (शके १७२४) सुमारास विजापूरच्या मुस्तफाखान नामक सरदारानें सदरहू पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभेम (दाभोळ) येथें सुभा स्थापन केला. दाभोळ जिल्हा विजापूरकराकडे सुमारें १४९ वर्षें होता व इ. स. १६५१ (शके १५७४) च्या सुमारास शिवाजीनें दाभोळ सुभा काबीज केला तेव्हां त्याबरोबरच अंजनवेल हा तालुका शिवाजीकडे आला. शिवाजीच्या ताब्यांत अंजनवेल गांव आला तेव्हां तेथें किल्ला अगोदरच बांधलेला होता. पण शिवाजीनें तो पुन्हां बांधून काढून त्याची मजबुती केली व त्या ठिकाणीं आपलीं एक गोदीहि स्थापन केली. शके १६२० (१६२२?) मध्यें म्हणजे इ. स. १६९८ च्या सुमारास अंबरनाथ हबशी यानें मराठ्यांपासून अंजनवेल किल्ला काबीज केला व तो पुढें ४६ वर्षें म्हणजे इ. स. १७४४ (शके १६६५) पर्यंत त्याच्याकडेसच होता. शके १६६६ मध्यें (माघ शु. ४ बुधवार रोजीं) तो तुळाजीं आंग्र्यानें शिद्दयापासून काबीज केला व पुढे ११ वर्षानंतर म्हणजे इ. स. १७५६ त (शके १६७७ पौष शु. १४ रोजीं) तो पेशव्यांनीं रामाजी महादेव बिवलकर यास पाठवून आंग्र्यांपासून जिंकून घेतला. यानंतर मात्र हा किल्ला ५३ वर्षें म्हणजे पेशवाईच्या अखेरपर्यंत पेशव्यांकडेच होता.
(संदर्भ ग्रंथ-भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त शके १८३५; इतिहाससंग्रह, पु ४, अं, ७, ८, ९; बाँबे गॅझेटियर व्हाँ. १, भा. २)