विभाग नववा : ई-अंशुमान
अंजनेरी - मुंबई. नाशीक जिल्हा. त्रिंबकेश्वराच्या डोंगरापासून अलग अशी दक्षिणोत्तर टेंकड्यांची रांग आहे. ही नाशिक तालुक्यामध्यें त्रिंबकेश्वर गांवापासून ४ मैल व नाशिक शहरापासून १४ मैलांवर आहे. टेंकडीच्या पायथ्याशीं अंजनेरी याच नांवाचें खेडें आहे. अंजनेरी टेंकडीच्या तिन्ही बाजूस कडे असून दक्षिणेकडील बाजूस थोडासा उतार असून त्या बाजूनें गुरें व क्वचित घोडेहि वर चढू शकतात.
या टेकड्यांवर एकहि पक्षी आढळत नसे. पण अलीकडे कांहीं पक्षी तेथील रहिवाश्यांनीं मुद्दाम आणून वाढविलेले आहेत. येथे मधून मधून वाघ आढळतो.
या टेंकडीस किल्ला असें म्हणतात. माथ्यावर एक देवीचें देऊळ आहे. टेंकडीवर जाण्यास अंजनेरी गांवाजवळून रस्ता आहे. अर्धा मैल चढून गेल्यावर एका तुटलेल्या काड्यांतून बिकट रस्ता आहे त्यास दरवाजा असें म्हणतात. याच्या पुढें अर्ध्या रस्त्यावर डाव्या हातास एका गुहेंत देऊळ (खडकांत खोदलेलें) असून एक विहीर आहे. यास वानरगुहा (मंकी केव्ह) म्हणतात. माथ्यावर ईशान्य बाजूस तीन बंगले आहेत. येथें एक जांभळीच्या झाडांनीं तीन बांजूनीं वेष्टित असें टांकें आहे व चवथ्या उघड्या बाजूवरून खालील देखावा अत्यंत रमणीय दिसतो. टांक्याचें पाणी रोगट असल्यामुळें एक विहीर खोदली आहे. याखेरीज या टेंकडीवर दोन टांकीं असून कांहीं झरेहि आहेत.
हा भाग समुद्रसपाटीपासून ३७०० फूट उंच असून सर्वांत जास्त उंची ४३०० फूट आहे. येथें उन्हाळ्यांत राहण्याकरितां नाशिकचे पुष्कळ लोक येतात.
जरी या टेकडीस किल्ला असें म्हणतात तरी येथें केव्हांहि तटबंदी केल्याचें आढळत नाहीं. राघोबादादा आनंदवल्ली येथें रहात असतां उन्हाळ्यांत येथें राहण्यास येत असे. त्यावेळचे अवशेष म्हणजे फैलखाना व हत्तीतलाव आणि ब्राह्मणतळें हीं दोन टाक्यांस मिळालेलीं नांवें होत. राजवाड्याचे अवशेष कांहीं दरवाज्याच्या पायर्यांत गेले व भिंती एका बंगल्यांत गेल्या. मुख्य टांक्याजवळ एक ध्यानमंदिर आहे. येथें राघोबादादा ध्यान करीत असे. या मंदिराच्या पश्चिमेकडे भिंतींत असलेल्या एका खिडकींतून समोर त्र्यंबकेश्वर किल्ल्याच्या कड्यास एक मुद्दाम पाडलेली फट दिसते. ही राघोबादादानें सूर्यास्त पहाण्याकरितां मुद्दाम पाडविलेली होती असें सांगतात. सर्वांत मोठ्या बंगल्याच्या पाठीमागच्या कड्यामध्यें एक खोदलेलें देऊळ आहे. यांत मूर्ति नाहीं. याच्या थोडेसे खालीं खडकामध्यें अर्धवर्तुळाकृति पायर्या खोदलेल्या आहेत, व समोर जांभळीच्या झाडाखाली एक खुंट पुरलेला आहे. येथें मिशनरी प्रार्थना करितात.
अंजनेरीच्या पायथ्याशीं मोठ्या सुंदर देवळांचे अवशेष आहेत. हीं देवळें गवळी राजे, देवगिरीचे यादव (११५०-१३०८ ) यांच्या वेळचीं आहे असें म्हणतात. प्रत्येक देवळाच्या दरवाजाच्या वरच्या बाजूवर एक तीर्थकराची मूर्ति आहे. एका देवळांत आसन घातलेल्या तीर्थकराची मूर्ति आहे. पुष्कळ मूर्ति खालीं पडल्या आहेत व फुटल्या आहेत. येथें एक गणपतीची मूर्ति व एक लिंगहि आढळतें. एका जैन देवालयांत शके १०६३ (इ. स. ११४०) सालांतील एक संस्कृत शिलालेख आहे. त्यांत सेउणदेव (तिसरा) या यादव राजाच्या एका वाणी प्रधानानें कांहीं दुकानांचें उत्पन्न या देवालयास दिल्याचा उल्लेख आहे.