विभाग नववा : ई-अंशुमान
अंजार - मुंबई इलाखा कच्छच्या संस्थानांतील एक गांव. हें उत्तर अक्षांश २३० ६' व पूर्व रेखांश ७०० १०' वर आहे. लो. सं. (१९२१) १३५१०. इ. स. १९०३-४ सालीं म्युनसिपालिटीचें उत्पन्न ४१४९ रुपये होतें.
गांवाबाहेर अजमीरचा चव्हाण वंशाच्या संस्थानिकाचा भाऊ अजयपाल याचे घोड्यावर बसलेल्या मूर्तीचें एक देऊळ आहे. या अजयपालास नवव्या शतकांत अजमीरच्या हद्दीबाहेर हांकून दिलें होतें म्हणून त्यानें आपलें राहण्याचें हें ठिकाण केलें होतें. या देवळास कांहीं जमीन इनाम असून येथें पुष्कळ साधू येऊन राहिले आहेत. यांच्यांतील मुख्यास पीर अशी संज्ञा आहे. इ. स. १८१६ सालीं कच्छच्या रावानें अंजार गांव व जिल्हा कंपनी सरकारास दिला होता. परंतु इ. स. १८२२ सालीं नवीन तह होऊन त्या अन्वयें हा भाग पुन्हां कच्छच्या रावाच्या ताब्यांत आला. १८१९ मध्यें येथें एक धरणीकंपाचा धक्का बसून बरेंच नुकसान झालें. येथें बरींच देवळें आहेत.
आक्टोबर १९२२ मध्यें येथें 'कच्छकेळवणीफंड' म्हणून ३ लाख रुपयांचा शिक्षणाकरितां एक फंड जमा करण्यांत आला. यांतून शाळा, तालीमखाना वगैरे इमारती बांधून शेतकी, बागाईत, फळझाडांची लागवड करणें वगैरे गोष्टी शिकवावयाच्या आहेत.