विभाग नववा : ई-अंशुमान
अंजिदिव - पश्चिम हिंदुस्थानांतील पोर्तुगीज वसाहतीपैकीं एक बेट उत्तर अक्षांश १४० ४५' व पूर्व रेखांश ७४० १०'. उत्तर कानडा जिल्ह्यांतील कारवारच्या नैर्ऋत्येस पांच मैलावर हें बेट असून क्षेत्रफळ अर्धा चौ. मैल आहे. लोकसंख्या १८७२ सालीं ५२७ होती. हवा रोगट असल्यामुळें बेट जवळ जवळ ओसाडच पडलें आहे.
इ. स. १५० च्या सुमारास आइजीदिओई म्हणून टॉलेमीनें ज्याचा उल्लेख केला आहे तें हेंच बेट असावें असें दिसतें. इ. स. १३४२ सालीं इब्रबतूता हा या बेटावर उतरला होता. पंधराव्या शतकांत अरब व्यापार्यांनीं विजयानगरच्या राजापासून हें बेट बळकावलें होतें असें दिसतें. १४९८ पासून पोर्तुगीज लोकांचा या बेटाशीं संबंध आहे. त्या सालीं वास्को दिगामा या बेटावर आला होता. इ. स. १५०६ सालीं पोर्तुगीज लोकांनीं कांहीं वेळ या बेटाचा ताबा सोडला होता. पण पुन्हां तो त्यांनीं लवकरच घेतला व त्या वेळेपासून आजतागायत तें बेट त्यांजकडेच आहे.
इ. स. १६८२ सालीं येथील किल्ला बांधण्यांत आला. मराठ्यांच्या स्वार्या यावर झाल्या असतां पोर्तुगीजांनीं हा किल्ला लढविला होता. हल्लीं या बेटाचा उपयोग गोव्याचें 'काळे पाणी' म्हणून करण्यांत येत असतो.