विभाग नववा : ई-अंशुमान
अंजीर - अंजीर दोन जातीचे आहेत पांढरा व जांभळा. पैकीं जांभळ्या जातीचीं फळें जास्त स्वादिष्ट असतात. दक्षिण अरबस्तान हें अंजिराचें मूलस्थान होय. त्या देशात अद्याप क्याप्रिफिग अथवा नर अंजिराचीं झाडें जंगलांत सांपडतात. तेथूनच अंजीर दुसर्या देशांत गेला असावा. ग्रीस व रोम या राज्यांच्या पूर्वी हजारों वर्षे अंजिराची लागवड होत असे, असें पुराणवस्तुसंशोधकांच्या शोधानें सिद्ध झालें आहे. इसवी सनापूर्वी सातशें वर्षांच्या ग्रंथांत अंजिराच्या अस्तित्वाचा खात्रीलायक पुरावा सांपडतो. अरबस्तानांतूनच ग्रीस, रोम, आशियामायनर, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, खोरासान, हिरात, अफगाणिस्तान, चीन वगैरे देशांत अंजिराचा प्रसार झाला. हिंदुस्थानांत रानटी अंजीर पुष्कळ आहेत; तरी खाण्याचा अंजीर १४ व्या शतकापर्यंत माहीत नव्हता. चीन, अमेरिका वगैरे देशांत अंजिराची लागवड बर्याच प्रमाणांत होते. वाळलेले अंजीर आशियामायनरमधील स्मरना बंदरांतून आपल्या देशांत येतात. त्या प्रांतांत अंजिराला 'इंगीर' असें नांव आहे. त्याचाच अपभ्रंश अंजीर हा असावा.
स्म र ना ये थी ल ला ग व ड.- स्मरना येथील अंजीर जगप्रसिद्ध आहेत, तरी खुद्द स्मरना येथें अंजीर मुळींच पिकत नाहींत. स्मरनापासून पूर्वेकडे शेंदीडशें मैलांच्या टापूंत मिआंडर नदीच्या खोर्यांत अंजीर पिकतात. स्मरना बंदरांतून मनुका व आलिव्ह यांचीच निर्गत फार होते. त्या मानानें वाळलेल्या अंजिराची निर्गत फारच कमी होते. मिआंडर नदीच्या खोर्यांतील जमीन अतिशय सुपीक व खोल असून तिच्यांत अभ्रक व सेन्द्रिय पदार्थ फार आहेत. जमीनीच्या अंगीं पुष्कळ दिवसपर्यंत ओलावा धरून ठेवण्याची शक्ति असल्यामुळें अंजिराच्या बागेला पाणी मुळींच द्यावें लागत नाहीं. तेथील हवा उष्ण व कोरडी आहे. उन्हाळ्यांत उष्णमान ९०० व हिवाळ्यांत २०० फारेनहीटपर्यंत असतें. थंडीच्या दिवसांतच पाऊस पडतो, व त्याचें मान २५ इंचपर्यंत असतो कधीं कधीं थंडीचा कडाकाहि पडतो, त्यावेळीं नुकसान फार होतें.
म शा ग त.- जमीन बरेच वेळां नांगरून उंटाच्या लिदीचें तीस खत देतात. लागण मार्च महिन्यांत होते. झाडें ६ फुटांवर लावतात. प्रत्येक खाड्यांत दोन दोन झाडें (फांटे) एकमेकांस तिरपीं अशीं लावितात. फांटे जमीनीच्या वर दोन इंच ठेवून बाकीचा भाग जमीनींत पुरून टाकतात व वरच्या भागावरहि माती लोटतात. त्यामुळें ऊन व वारा यांपासून फांट्यांचा बचाव होतो. प्रथम कांहीं दिवसपर्यंत फांट्यांना हातपाणी देतात; परंतु पुढें कधींच पाणी द्यावें लागत नाहीं, अशा रीतीनें फांटे लावल्यानें झाडांनां खालपासून फांद्या फुटतात व त्यामुळें तीं वार्यानें मोडत नाहींत. स्त्रीझाडाच्या फांद्या बाहेरच्या बाजूला असतात त्यांनां फळें चांगलीं येतात; परंतु आंतील फळें पानांनीं झांकलीं गेल्यामुळें चांगलीं पिकत नाहींत. परंतु नर, अंजिराची मात्र तशी स्थिति नाहीं. पानांच्या दाट छायेंत वाढलेले नर-अंजीर हे फलधारणेच्या कामीं फार चांगले समजले जातात, तसे बाहेरचे अंजीर समजले जात नाहींत. त्या देशांत छाटणी वगैरे कधींच करीत नाहींत. ज्या फांद्या एकमेकींत गुंतून जातील तेवढ्याच फक्त कापून काढतात. लहान झाडांपासून वाळलेले अंजीर ५० पौंड होतात, मध्यम झाडांपासून १५० व मोठ्या झाडांपासून ३०० पौंड वाळलेले अंजीर मिळतात. अंजीर पिकण्यासाठीं पांच सहा नरअंजिरांच्या माळा करून त्या मादी झाडांवर टांगून ठेवितात. नरअंजिराचें पीक जर कांहीं कारणानें बुडालें तर ग्रीसनजीकच्या बेटांतून मोठ्या खर्चानें अंजीर आणून ते झाडांवर टांगून ठेवितात; असें न केलें तर अंजीर मुळींच पिकणार नाहींत हें तिकडील लोकांनां पक्कें माहीत आहे. यावरून नर अंजिराचें महत्त्व तिकडे किती आहे हें दिसून येईल. अंजीर पिकावयास लागले म्हणजे झाडाखालील सर्व जमीन खणूनखुरपून व ढेकळें फोडून मऊ भुसभुशीत करितात. त्याच्या योगानें पिकलेले अंजीर खालीं पडले म्हणजे त्यांस इजा होत नाहीं. बीं पेरण्यासाठीं इकडे जसे वाफे करितात तसेच नऊ इंच उंच, आठ फूट रुंद व ५० ते १०० फूट लांब असे उघड्यावर वाफे करून त्यांवर देवनळाच्या (बांबूच्या) कामट्या टाकून त्यावर अंजीर वाळवितात. झाडावरून तोडलेला अंजीर वाळविण्यासाठीं केव्हांहि उपयोगीं पडत नाहीं. तो पूर्णपणें पिकून झाडाखालीं गळून पडला म्हणजेच वाळविण्यालायक झाला असें समजावें. अंजीर जुलैअखेर पिकावयास लागतात. ते वाळून फार कडक होतां कामा नये, त्यांची बाहेरची साल मात्र वाळावी व आंतील भाग मऊ असावा. अंजीर तीन चार दिवसांत वाळून तयार होतात.
म हा रा ष्ट्रां त अं जि रा ची ला ग व ड - हीं पुणें जिल्ह्यांपैकीं पुरंधर तालुक्यांत बरीच होते. तेथील बागा उंच पठारावर असून सर्व बाजूनें उघड्या असतात व जमीन साधारणपणें हलक्यापैकीं असून दोन फूट खोलीवर शाडू असतो. जमीन सर्व शाडवट असली तरी हरकत नाहीं, परंतु तिच्यांतून निचरा चांगला होत असला पाहिजे. सासवड येथें पावसाच मान सरासरी वीस इंच असतें.
अंजिराची लागवड फांटे लावून करितात. जुन्या झाडांचे शेड्याकडचे फांटे ५।६ इंच लांबीचें घेतात. जून फांद्याचे किंवा नवीन झाडांचें फांटे लावण्यासाठीं घेत नाहींत. फांटे पावसाळ्याच्या आरंभीं वाफ्यांत लावून एक वर्षानंतर दोन अडीच फूट वाढल्यावर कायम जागीं ज्येष्ठ महिन्यांत लावतात. खड्डे १५-१५ फुटांवर घेतात. अंजिराच्या झाडाला खालपासूनच फांद्या फुटतात व केव्हां केव्हां जमीनींतूनहि नवीन कोंब येतात व ते सर्व तसेच वाढूं देतात. झाडें लहान आहेत तोंपर्यंत त्यांत घेवडा, वाटाणा वगैरे पिकें काढतात. परंतु बाजरी-ज्वारीसारखीं पिकें घेत नाहींत. झाडें तीन वर्षांचीं झालीं म्हणजे त्यांनां तुरळक पीक येऊं लागतें. चवथ्या वर्षी श्रावण (आगष्ट) महिन्यांत सर्व बागेची खणणी करतात व त्याच वेळी खोडाजवळचा जाखा काढून टाकतात, व मालकाच्या ऐपतीप्रमाणें ४ ते ६ टोपल्या कुजलेलें गांवखत देतात. पाणी हस्तनक्षत्राच्या सुमारास देतात. तीन दिवसांनीं आंबवणी देतात. व चार दिवसांनीं चिंबवणी देतात. फळ शेंड्याकडे कोंवळ्या फांदीवर अगर खालीं जून फांदीवर कोठेंहि येतें. प्रत्येक कांड्यावर फळ एकदां केव्हांना केव्हां तरी येतेंच. एकाच कांड्यावर फळ दोनदां येत नाहीं. फळ मोठें होऊं लागलें म्हणजे पाण्याची हयगय होतां कामा नये. कोठें कोठें जानेवारी महिन्यांतच फळ पिकण्यास सुरुवात होते; परंतु खरा मोसम एप्रिल व मे महिन्यांत असतो; कांहीं फळें जुलै महिन्यांत देखील तयार होत असतात; पण शक्य असेल तर सर्व बहार पाऊस पडण्यापूर्वींच उतरून घेणें बरें; कारण पाऊस पडल्यावर फळ अगदीं बेचव लागतें व त्यामुळें त्यास भावहि येत नाहीं. फळ होऊं लागतेवेळीं झाडांनां वरचेवर चाळणी देणें जरूर असतें. दर झाडाला पंधरा शेर (३० पौंड) अंजीर येतात. या बहाराला मिठाबहार असें म्हणतात. या बहाराशिवाय पावसाळ्यांतहि झाडांनां एक बहार येतो, पण तो चांगला नसतो, म्हणून त्यास खाटा बहार म्हणतात. या बहाराचीं फळें फक्त भाजीच्याच उपयोगीं पडतात. अंजिराचीं झाडें १५ वर्षेपर्यंत टिकतात.
अंजिराचा मुख्य शत्रू म्हटला म्हणजे पक्षी होत. यांपासून पिकाचें फार नुकसान होतें; यासाठीं फळ पिकण्याच्या सुमारास चिंधी बांधून तें झांकून ठेवतात व उंच माच करून त्यावर पांखरें हांकण्यासाठीं माणसें ठेवतात. अंजिराच्या पानांवर एक प्रकारचा तांबेरा नांवाचा रोग पडतो, पण त्यापासून झाडाचें म्हणण्यासारखें नुकसान होत नाहीं.
दुष्काळाच्या वर्षी विहिरीचें पाणी आटल्यावर पीक हातास लागणें फार कठीण असतें. जेवढें पाणी मिळेल तेवढ्यावर शक्य असेल तेवढें पीक वांचवावें. पीक अजिबात बुडालें तरी झाडें मरत नाहींत.
परदेशांतून अंजिराच्या कांहीं जाती इकडे आणल्या आहेत, परंतु त्यांचीं फळें योग्य कीटकांच्या अभावीं धरत नाहींत, म्हणून परदेशांतल्या जातींचा अद्यापपावेतों इकडे कांहींच उपयोग झाला नाहीं.
येथील अंजीरहि सुकवून त्यांवर गंधकक्रिया करून टिकाऊ करतां येतात. याबद्दल शेतकी खात्यानें प्रयोग करून असे सुकविलेले अंजीर पुणें येथील १९२४ सालीं भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनांत ठेवले होते.