विभाग नववा : ई-अंशुमान
अंजू - हा फ्रेंचांच्या ताब्यांतील एक जुना परगणा होय. या परगण्याची हद्द उत्तरेस मेनपरगण्यापर्यंत, पूर्वेस टूरेन परगण्यापर्यंत, दक्षिणेस पॉइटीयर्सच्या व पश्चिमेस नँटिसच्या परगण्यापर्यंत पसरलेली होती. हल्लीं या परगण्याचें स्वतंत्र अस्तित्व नाहींसे होऊन 'मेन एट लॉयर' या फ्रान्सच्या विभागांत त्याचा समावेश केला गेला आहे.
नवव्या शतकाच्या उत्तरार्धांत, ब्रिटनी व नॉरमंडी या देशांच्या ड्यूकांनीं अंजू परगण्याच्या सरहद्दीचे लचके तोडण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीं चार्लस दि बाल्ड या राजानें रॉबर्ट स्ट्रांग याच्या हवालीं तो परगणा करून त्याचें रक्षण करण्यास सांगितलें. ८६६ मध्यें बिसार्थे येथें नार्मन लोकाशीं लढत असतां तो धारातीर्थी पतन पावला, त्यामुळें त्याच्या पश्चात ह्यू दि अॅबट हा त्या परगण्याचा मुख्य झाला. त्याच्या मरणानंतर रॉबर्टचा मुलगा ओडो व ओडोच्या मागून फुल्क दि रेड हा त्या परगण्याचा मालक झाला. या परगण्याचें आधिपत्य फुल्क दि रेडच्या वंशजाकडे सतत तीन शतकें होतें. ९८७ मध्यें फुल्कचा नातू पहिला जीऑफ्रे हा या परगण्याचा स्वामी झाला. त्यानें अंजूचा जो प्रदेश इतरांनीं बळकावला होता तो मिळविण्याचा निश्चय केला. त्यानें नँटिसच्या काउंटचा पराभव करून त्याला आपला मांडलिक बनविलें, व त्याच्या ताब्यांतील अंजूचा मुलूख हिसकावून घेतला. नार्मन लोकांच्या विरुद्ध लोथेर राजानें ज्या स्वार्या केल्या त्यांत त्यानें प्रामुख्यानें भाग घेऊन नार्मन लोकांनां सळो कां पळों करून टाकिलें. जीऑफ्रेच्या मरणानंतर, त्याचा मुलगा तिसरा फुल्क हा अंजूचा काउंट झाला. त्यानें आपल्या
ताब्यांत अधिकार घेतला नाहीं, तोंच त्याला ब्लॉइसचा काऊंट पहिला ओडो व रेन्नेचा काउंट पहिला कोनन यांनां तोंड द्यावें लागलें. कोनन यानें अंजूच्या ताब्यांतील नँटिसचा परगणा बळकाविला होता. त्याच्या विरुद्ध फुल्कनें स्वारी करून त्याचा काँक्वरुल या ठिकाणीं पुरा पराभव केला व नँटीसचा प्रांत पुन्हां मिळविला. नंतर त्यानें ओडोचाहि पराभव करून लांग्वाचा किल्ला आपल्या ताब्यांत घेतला.
फुल्कच्या मागून त्याचा मुलगा जीऑफ्रे मार्टेल हा १०४० मध्यें अंजूचा काउंट झाला. यानें आपल्या बापाचेंच धोरण चालू ठेवून, टोरेन, मेन इत्यादि परगणे आपल्या ताब्यांत आणले. त्याला संतति नसल्याकारणानें आपल्या मागें, अंजूचें स्वामित्व आपला पुतण्या तिसरा जीऑफ्रे यास द्यावयाचें त्यानें ठरविलें होतें. पण त्याच्या मरणानंतर तिसरा जीऑफ्रे व त्याचा भाऊ रेचिन यांच्यामध्यें तंटे उपस्थित होऊन रेचिन यानें जीऑफ्रेला तुरुंगांत टाकलें. पण लवकरच त्याची सुटका करणें रेचिन याला भाग पडलें. जीऑफ्रे हा नालायक असल्यामुळें रेचिननें पुष्कळ संधानें बांधून, आपल्याला अंजूचें स्वामित्व प्राप्त करून घेतलें. एलियास याला सहाय्य करून त्याला मेन परगण्याचें स्वामित्व त्यानें मिळवून दिलें व त्याची मुलगीं आपला मुलगा फुल्क यास करून घेतली.
रेचिन उर्फ चौथा फुल्क वारल्यानंतर त्याचा मुलगा पांचवा फुल्क हा अंजूचा अधिपति झाला. मेन परगण्याचा अधीप एलियास हा निपुत्रिक मरण पावल्यामुळें मेनचें स्वामित्वहि फुल्कलाच मिळालें. अशा रीतीनें अंजू प्रदेशाचा विस्तार झालेला पाहून इंग्लंडचा राजा पहिला हेन्री याच्या डोळ्यांत
ही गोष्ट सलूं लागली. पुढें थोडक्याच दिवसांत हेन्री व फुल्क यांजमध्यें युद्ध उपस्थित होऊन फुल्क याचा हेन्रीनें पराभव केला व मेन परगणा आपल्या ताब्यांत आणला. पण संधी साधून, १११३ मध्यें फुल्कनें अलेनशान येथें हेन्रीच्या सैन्याचा धुव्वा उडवून हेन्रीला तह करण्यास भाग पाडलें. हा तह चिरस्थायी करण्याच्या उद्देशानें त्यानें आपली मुलगी मॅटिल्डा ही हेन्रीचा वडील मुलगा विल्यम एथलिंग यास देऊं केली. या तहान्वयें मेन परगणा फुल्कच्या ताब्यांत आला. पुढें ११२३ मध्यें फुल्कनें आपली दुसरी मुलगी सिबील हिचा विवाह नार्मंडीच्या राज्याचा भावी वारस विल्यम क्लिटो याच्याशीं करून मेनप्रांत त्याला लग्नापीत्यर्थ आंदण दिला. ११२९ मध्यें हेन्रीनें आपली मुलगी मॅटिल्डा ही फुल्कचा मुलगा जीऑफ्रे दि हॅन्डसम याला दिली.
फुल्कच्या मरणानंतर जीऑफ्रे (११२९-११५१) हा अंजूचा काउंट झाला. हेन्रीच्या मरणानंतर त्यानें नार्मेंडीवर अनेक स्वार्या करून तो प्रांत आपल्या ताब्यांत आणला. पण अंजूमध्यें त्याच्या गैरहजेरींत त्याच्या सरदारांनीं बंड केल्यामुळें त्याला परत येणें भाग पडलें. ११३७ मध्यें त्यानें पुन्हां आपल्या मोहिमेस सुरुवात केली. ११३८ मध्यें बाये, केन इत्यादि शहरें त्यानें जिंकून घेतलीं. ११४१ मध्यें त्यानें पुन्हां नॉर्मेडीमध्यें जाऊन तो सर्व प्रांत चार पांच वर्षांत पूर्णपणें आपल्या ताब्यांत आणिला. ११४९ सालीं त्यानें नार्मेडीचा प्रांत आपला मुलगा हेन्री याच्या ताब्यांत दिला.
अशा रीतीनें आपल्या जहागिरीचा विस्तार करण्यांत जीऑफ्रे गुंतला होता, तरी पण त्यानें आपल्या जहागिरीची व्यवस्थाहि चांगल्या प्रकारें राखण्याची खबरदारी घेतली होती. आपल्या जहागिरींत जी अंतस्थ बंडाळी माजली होती तिचा पूर्ण नायनाट करून त्यानें आपल्या जहागिरींत शांतता प्रस्थापित केली. अशा रीतीनें आपल्या कारकीर्दीत जीऑफ्रे यानें आपल्या राज्याचा खूप विस्तार केला व राज्याला चिरस्थायित्व प्राप्त करून दिलें.
जीऑफ्रे याच्या निधनानंतर त्याचा मुलगा हेन्री हा अंजूच्या राज्यावर बसला. इंग्लंडचा राजा स्टीफन हा ११५४ मध्यें वारल्यानंतर त्याच्या मागून हेन्री हाच इंग्लंडच्या राज्याचा वारस ठरला. त्याप्रमाणें हेन्री हा दुसरा हेन्री या नांवांनें इंग्लंडच्या राज्यावर बसला. अर्थांतच अंजूचें राज्य त्याचा धाकटा भाऊ जीऑफ्रे याला मिळणें स्वाभाविक होतें. पण हेन्रीला हें आवडलें नाहीं. जीऑफ्रे हा अंजूचें राज्य बळकावील या भीतीनें त्यानें जीऑफ्रे याच्यावर स्वारी करून त्याला पराभूत केलें व त्याच्या ताब्यांतील सर्व मुलूख जिंकून घेतला. हेन्रीनें अंजूचें राज्य आपला मुलगा हेन्री याला दिलें. पुढे हेन्री वारल्यानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र पहिला रिचर्ड हा इंग्लंडच्या गादीवर बसला. रिचर्डच्या मरणानंतर हेन्रीचा चवथा मुलगा जीऑफ्रे यालाच राज्य मिळवायाचें; पण जीऑफ्रे याचा मुलगा आर्थर यानें आपल्या बापाविरुद्ध बंड करून इंग्लंडचें राज्य आपल्याला मिळविण्याचा घाट घातला. पण तो साधला नाहीं. पण ऑर्थरनें अंजूचें राज्य बळकावून फ्रान्सच्या राजाचें मांडलिकत्व पत्करलें. जीऑफ्रे उर्फ जॉन यानें तें राज्य फ्रान्सच्या ताब्यांतून मिळविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांत त्याला यश आलें नाहीं.
अशा रीतीनें फ्रान्सच्या ताब्यांत हें राज्य आलें. फ्रान्सचा राजा नववा लुई यानें आपला मुलगा चार्लस याला अंजूची जहागिरी देऊन टाकली; हा चार्लस नेपल्सच्या गादीवर बसला त्यावेळीं अंजू हें नेपल्सच्या सत्तोखालीं गेलें. चार्लसचा मुलगा दुसरा चार्लस हा राज्यावर येतांच त्यानें आपला जामात व्हेलायचा चार्लस याला तें आंदण म्हणून देऊन टाकलें. या चार्लसच्या मरणानंतर त्याचा मुलगा फिलिप याला अंजूची जहागिरी मिळाली. पुढें याच फिलिपला फ्रान्सचें राज्य मिळालें. त्यामुळें हा अंजूचा प्रांत आपोआप पुन्हां फ्रान्सच्या राज्यांत समाविष्ट झाला.
फिलिप राजानें १३३२ त आपला मुलगा जॉन यास तो प्रांत जहागीर म्हणून दिला. पुढें जॉन हा राजा झाल्यानंतर त्याचा मुलगा पहिला लुई याच्या ताब्यांत तो प्रांत आला. लुई हा नेपल्सचाहि राजा झाला. त्याच्या मरणानंतर दुसर्या लुईच्या ताब्यांत हा प्रांत गेला. त्यानें तो प्रांत आपल्या बायकोच्या देखरेखेखालीं सोंपविला. पुढें लुईच्या मागून तो प्रांत त्याचा दुसरा मुलगा रेने याला मिळाला.
रेनेनें तो प्रांत १४४३ पासून आपल्या ताब्यांत घेतल्यानंतर आपलें निवासस्थान त्यानें तेथेंच केलें. पण १४७० मध्यें त्याचा मुलगा जॉन हा वारल्यामुळें त्याला अतिशय दु:ख होऊन त्यानें अंजू येथील आपलें निवासस्थान बदललें, त्याच्या मरणानंतर त्याचा नातू दुसरा रेने याच्या ताब्यांत तो प्रांत आला. रेनेच्या मरणानंतर तो प्रांत फ्रान्सचा राजा अकरावा लुई याच्या ताब्यांत गेला.
१५१५ सालीं फ्रान्सचा राजा फ्रान्सिस यानें आपल्या आईला तो प्रांत बक्षीस देऊन टाकिला. पुढें १५५२ सालीं फ्रान्सच्या दुसर्या हेन्रीनें तो आपल्या मुलाला दिला. पुढें तिसरा हेन्री राज्यावर आल्यानंतर त्याने आपला भाऊ फ्रान्सिस याला तो देऊन टाकिला पण तो थोड्याच काळांत वारल्यामुळें पुन्हां हा प्रांत फ्रान्सच्या राज्यांतच अंतर्भूत झाला. फ्रान्समधील राज्यक्रांतीच्या वेळीं अंजूच्या प्रांतांत अँबर्स, ब्यूजे, सौमूर चाट्यू इत्यादि जिल्हे मोडत असत. पुढें १७९० सालीं अंजू हा प्रांत मेनएट लोंयर या विभागांत सामील केला गेला.