विभाग नववा : ई-अंशुमान
अँटनान-रिव्हो - हें मादागास्करच्या राजधानीचें शहर आहे. टमाटेव्ह बंदराच्या नैर्ऋत्येस १३५ मैलांवर हें शहर आहे. या शहरापासून टमाटेव्हपर्यंत कांहीं अंतर रेल्वेनें व कांहीं अंतर जलमार्गानें जावें लागतें. एका लांबच लांब पण अरुंद अशी टेंकडीवर हें वसलें असल्याकरणानें, आसपासचा बर्याच अंतरावरचा मुलूख येथून न्याहाळतां येतो. अशा रीतीनें हें नाकेबंदीचें ठिकाण बनलेलें आहे. पुष्कळ काळपर्यंत हें होवा जातीच्या लोकांच्या वस्तीचें ठिकाण असून त्याची विशेष प्रसिद्धि नव्हती. पण या जातीच्या मुख्यांनीं ज्यावेळीं मादागास्करचा बराचसा मुलूख जिंकून ताब्यांत आणला त्यावेळीं या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झालें व पुष्कळ लोक या ठिकाणीं येऊन आपली कायमची वस्ती करूं लागलें. १८६९ च्या सुमारास या शहराची लोकसंख्या जवळजवळ ८०,००० होती. १८६९ पर्यंत या शहरांतील घरें साध्या लांकडांचीं अगर गवताचीं असत पण त्यानंतर विटांची व दगडी घरें बांधण्यास सुरवात झाली; व त्यामुळें लवकरच शहरामध्यें मोठमोठे राजवाडे, प्रधानाचे वाडे, प्रार्थनामंदिरें, शाळा, दवाखाने इत्यादि मोठमोठ्या इमारती झळकूं लागल्या. १८९५ मध्यें फ्रेंचांनीं हे शहर जिंकून घेतलें. त्यानंतर फ्रेंचांच्या अमदानींत या शहरांत मोठमोठे रस्ते बांधण्यांत आले. निरनिराळीं उपवनें व बागा अस्तित्वांत आल्या व शहराला रमणीय स्वरूप प्राप्त झालें. टेंकडीच्या पायथ्याशीं जे पाण्याचे झरे आहेत त्यांपासून या शहराला पाण्याचा पुरवठा होतो. इकोपा नदीपासून पाणी आणण्याची योजना लवकरच अमलांत यावयाची आहे. १९०७ च्या खानेसुमारींत, या शहरची लोकसंख्या ६९,००० होती, या शहराच्या पूर्वेस व आग्नेयीस दोन किल्ले असून त्यामुळें या शहराचें रक्षण चांगल्या प्रकारें होतें. या शहरांत एकंदर पांच ख्रिस्ती उपासनामंदिरें असून एक मुसुलमानांची मशीद आहे.