विभाग नववा : ई-अंशुमान
अंटिओक (१) - अँटिओक या नांवाची सोळा शहरें हेलेनिस्टिक रांजांनीं स्थापिलीं. या सर्वांत प्रसिद्ध शहर आरोंटेस नदीच्या पश्चिम तीरावर आहे. इ. स. पूर्वी ३०० सेल्युकस निकेटरनें हे शहर स्थापिलें. अलेक्झांडरनें येथें तळ दिला होता. सेल्युकसनें हें शहर आलेक्झांडियाच्या पद्धतीवर बांधलें होतें. ह्याचे चार भाग वेगवेगळ्या राजांनीं बांधिले. ह्याची लोकसंख्या ४ थ्या शतकांत २,००,००० असावी असें क्रिसोस्टोमच्या म्हणण्यावरून कळतें. अँटिओकच्या पश्चिमेला ४ मैलांवर डॅफनीचें नंदनवन आहे. यांत पहिल्या सेल्युकसनें पीथियन अॅपोलोच्या नांवानें बांधलेलें एक मोठें देवालय आहे.
अँटीओक हें पश्चिम सेल्युसिद साम्राज्याच्या राजधानीचें शहर पहिल्या अंटायोकसच्या वेळेस झालें. अंकिराचे लढाईपासून (इ. स. पूर्वी २४०) याचें महत्त्व फार वाढलें. पुढें येथील लोकांनीं सेल्युसिद घराण्याविरुद्ध बंड केलें व बराच त्रास दिला. येथील लोकांनीं अर्ज केल्यावरून इ. स. पूर्वी ६४ त रोमन प्रजासत्ताक राज्यांत याचा समावेश झाला. रोमन सम्राटांची या शहरावर फार बहाल मर्जी असे. सीझर इ. स. पूर्वीं ४७ त अँटिओक येथें आला व त्या शहराचें स्वातंत्र्य कायम केलें. रोमच्या पद्धतीवर येथें एक चौक करण्यांत आला. रोमन अमलाखालीं असतांना या शहराला भूकंपाचे फार धक्के बसले. इ. स. १९ त अँटिओक येथें जर्मेनिकस मरण पावला व त्याच्या प्रेताचें दहन चौकांत (फोरम) झालें. कोमोडसनें येथें आलिंपिक खेळ सुरू केले होते. ५२६ त भूकंपानें बरेंच नुकसान झालें व त्याला पुरवणी म्हणून इराणी खुश्रूनें बारा वर्षांनी राहिलेल्या इमारतींचा नाश केला.
पिटर व विशेषत: बार्नाबस व साल यांनीं येथें शुभवर्तमान सांगीतलें व येथील धर्मांतर केलेल्या लोकांनां ख्रिस्ती ही संज्ञा प्रथम प्राप्त झाली. धर्मपुस्तकाचें शब्दश: भाषांतर करणार्यांनां व ख्रिस्ताला मानवी नियमच लागू आहेत असें म्हणणार्या ख्रिस्तानुयायांनां अँन्टिओक असें म्हणतात.
इ. स. ६३५ त हेरॉक्लिअसच्या कारकीर्दीत अँन्टिओक सारासन लोकांच्या हातीं गेलें. ९६९ त मायकेल बुर्झा व पीटर दि यूनक यांनीं याचा बायझॅन्शियम राज्यांत समावेश केला. १०८४ त हें सेल्जुक तुर्कांनीं घेतलें व चवदा वर्षांनंतर टारेन्टमचा राजा बोहेमंद यानें तें धर्मयुद्धांत सर केले. नंतर दोन शतकें हे लॅटिन संस्थान राहिलें, शेवटीं १२६८ त हें ईजिप्शिअन लोकांच्या हातांत गेलें. त्यावेळेस येथें बरीच कत्तल व नाश झाला. ह्यानंतर अँन्टिओक पुन्हां ऊर्जित दशेस आलें नाहीं.
अँन्टाकिया आधुनिक शहर हें अझून महत्त्वाचें आहे. लोकसंख्या सुमारें २५,००० आहे. अलेप्पोनें जरी आघाडी मारली तरी अँटाकिया हें जिल्ह्याचें व्यापारी केन्द्र आहे. येथें तंबाखू, मका, कापूस हे जिन्नस उत्पन्न होतात. भूकंपानें याचें बरेंच नुकसान झालें. या ठिकाणीं ब्रिटिश दुय्यम प्रतिनिधि (व्हाइस कॉन्सल) राहतो.
(२) (पिसिडियांतील शहर) हें एक प्राचिन शहर आहे. या शहराचे विशेषत: देवळांचे, नाटकगृहाचे वगैरे अवशेष आधुनिक थलोव्हाक शहरानजीक अॅरुंडेल यास १८३३ त सांपडले. हें आशियामायनरमधील कोनिया जिल्ह्यांतल्या सुलतान दाघ पर्वताच्या दक्षिण उतारावर होतें. इ. स. पूर्वी २८० त सेल्यूकस निकेटरनें हें शहर एका फ्रिजियन देवस्थानाच्या जागेवर वसविलें असावें. रोमन लोकांनीं इ. स. पूर्वीं १८९ त याला स्वतंत्र शहर केलें असावें. हें ग्रीक शहरच बनलें होतें. इ. स. पूर्वी ६ त आगस्टसनें सीझरिया या नांवाने येथें एक वसाहत केली, आणि मुलकी व लष्करी कारभाराचें हें केन्द्र झालें. १०९७ त धर्मयोध्यांनां या शहरांत आश्रय मिळाला होता. येथील अवशेष मजेदार असून ग्रीक व रोमन शिबंदीची मजबुती यावरून कळते.