विभाग नववा : ई-अंशुमान
अँटिग्वा - अँटिग्वा हे ब्रिटिश वेस्ट इंडीजपैकीं एक बेट असून बरबुडा व रेडोंडा यांसह हें लीवर्ड बेटांच्या वसाहतींतील पांच इलाख्यांपैकीं एक इलाखा आहे. हें १७० ६' उत्तर अक्षांश व ६१० ४५' पश्चिम रेखांशांत आहे. याचा परिघ ५४ मैल व क्षे. फ. १०८ चौ. मैल आहे. नदी व झरे यांच्या अभावामुळे व जंगल कमी झाल्यामुळें ह्या बेटांत अवर्षण पडण्याचा जास्त संभव असतो. पाऊस सरासरी ४५.६ इंच पडतो. अंतर्भागांतील जमीन सुपीक आहे. साखर, अननस वगैरे मालाची निर्गत होते. रताळीं, कोनफळ, मका, व गिनीधान्य पिकतें. लीवर्ड बेटांचा गव्हर्नर अँटिग्वा येथें राहतो. याशिवाय सर्वसाधारण कायदेकौन्सिल व सरकारी व निमसरकारी अशा १६ सभासदांचें स्थानिक कायदे कौन्सिल यांच्या बैठकी येथें होतात. १८९८ पर्यंत ही बादशाही वसाहत होती व कायदेकौन्सिलांत निवडलेले व नेमलेले सभासद असत. प्राथमिक शिक्षण सक्तीचें असून शेतकी शिक्षण सरकारच्या ताब्यांत आहे. ग्रेटब्रिटन, संयुक्त संस्थानें व कॅनडा यांच्यांशीं आगबोटीनें अँग्टिग्वाचें दळण वळण आहे. सेंट जॉन, फालमाऊथ व परहॅम हीं तीन शहरें मुख्य आहेत. राजधानी सेंट जॉन (लोकसंख्या १०००) हें फार प्रेक्षणीय शहर आहे. बहुतेक व्यापार संयुक्त संस्थानांशीं चालतो. साखर, गूळ, चिंच, समुद्रकांसव व अननस हे जिन्नस परदेशांत जातात. अँटिग्वाची लोकसंख्या (१९०१) ३४,१७८ व इलाख्याची ३५,०७३ होती.
अँटिग्वा हें बेट कोलंबसानें १४९३ त शोधून काढिलें; व त्याला सेव्हील येथील एका चर्चचें नांव दिलें. १६३२ पासून येथें लोकवस्ती होऊं लागली.