विभाग नववा : ई-अंशुमान
अँटियम - या नांवाचें व्हॅलसियन लोकांचे प्राचीन शहर, इटालीमध्यें लॅटिअमच्या किनार्यावर रोमच्या दक्षिणेस सुमारें ३३ मैलांवर आहे. ख्रिस्ती शकाच्या पूर्वी ४ थ्या शतकांत अँटियम आणि रोम यांमध्यें बरींच युद्धें झालीं. ख्रिस्तपूर्व ३४८ सालीं कार्थेजशीं झालेल्या तहाप्रमाणें हें रोमच्या ताब्यांत होतें. ख्रि. पू. ३४१ सालीं रोमच्या विरुद्ध केलेल्या बंडांत या शहरचें स्वातंत्र्य गेलें. प्रजासत्ताक काळाच्या शेवटीं रोमचे श्रीमंत लोक येथें येऊन राहिलें. कॅलिगुला आणि नेरो नांवाच्या बादशहांचा येथेंच जन्म झाला. नेरोनें येथें वसाहत करून नवीन बंदर बांधलें. मध्ययुगांत येथील वस्ती नेट्यूनो येथें गेली. रोमन वाड्याचे अवशेष येथें आहेत. येथे असलेल्या लक्ष्मीच्या प्रसिद्ध देवळाचे अवशेष मात्र काहीं शिलक नाहींत. पण बरेच कलाकौशल्याचे अवशेष सांपडतात. संरक्षणाकरितां या शहराच्या भोंवतीं एक खंदक खोदलेला होता व तटहि होता, त्यांचे अवशेष दिसतात. हल्लीं हें उन्हाळ्यांत हवा खाण्याचें ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. याचें हल्लींचें नांव अँझिओ असें आहे.