विभाग नववा : ई-अंशुमान
अन्टीगोनस गोनाटस - (ख्रि. पू. ३१९- ख्रि. पू. २३९). हा मॅसेडोनियाचा राजा, अन्टीगोनस सायक्लॉप्सचा नातू व डेमेट्रियसचा मुलगा होता. थेसलीमधील गोन्नी येथें त्याचा जन्म झाल्यामुळें त्याला गोनाटस असें आडनांव प्राप्त झालें असें काहींचें मत आहे. ख्रि. पू. २८३ मध्यें डे मेट्रियस मरण पावल्यानंतर अन्टीगोनसनें 'मॅसेडोनियाचा राजा' ही पदवी घेतली. पण मॅसेडोनियाचें राज्य अद्यापि दुसर्यांच्याच ताब्यांत होतें. पुढें सात वर्षांनंतर म्हणजे, ख्रि. पू. २७६ सालीं तें राज्य त्याच्या ताब्यांत आलें. राज्यारूढ होतांच त्यानें गॉल लोकांची स्वारी परतविली व एकदोन वर्षें मॅसेडोनियावर अंमल गाजविला. पण पिर्हस हा इटलींतून परत येतांच त्यानें अन्टीगोनसच्या ताब्यांतील बहुतेक सर्व मुलूख बळकावून घेतला. पुढें पिर्हस हा पिलापोनेसस प्रांतांत स्वारी करण्यासाठीं गेला असतां, ती संधि साधून अन्टीगोनसनें पुन्हां मॅसेडोनियाचें राज्य बळकावलें. पण पिर्हसचा मुलगा अलेक्झांडर यानें अन्टीगोनसपासून पुन्हां तें राज्य हिरावून घेतलें. अन्टीगोनसनें धीर न सोडतां पुन्हां एकदां निर्वाणीचा प्रयत्न करून, अलेक्झांडरपासून मॅसेडोनियाचें राज्य पुन्हां परत मिळवलें. त्यानंतर मात्र त्याची कारकीर्द शांततेंत गेली. अन्टिगोनस हा सज्जन व विद्यासंपन्न असल्यामुळें, तो फार लोकप्रिय राजा झाला. त्याच्या दरबारीं नामांकित इतिहासकार, उत्कृष्ट कवि व प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते, व त्यांनां त्यानें शक्य तें उत्तेजन दिलें. तो आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी मरण पावला. [थर्लवाल-हिस्टरी ऑफ ग्रीस.]