विभाग नववा : ई-अंशुमान
अँन्टीगोनस सायक्लॉप्स - (ख्रि. पू. ३८२ ते ख्रि. पू. ३०१) हा मॅसिडोनियाचा राजा फिलिप याचा मुलगा व अलेक्झांडर बादशहाचा भाऊ होता. अलेक्झांडरच्या स्वारींत याला एका तुकडीचें आधिपत्य दिले गलें होते. ख्रि. पू. ३३३ मध्यें अलेक्झांडरनें त्याला फ्रीजियाचा गव्हर्नर नेमलें. त्याच्या मरणानंतर त्याच्याकडे पँफीलिया व लीशिया या प्रांतांचें स्वामित्व आलें. यूमेनिसच्या वांट्याला जे प्रांत आले होते ते त्याच्या ताब्यांत आणण्याकरितां त्याला मदत करण्याची पर्डिकासनें अँन्टीगोनस याला विनंति केली. पण ती विनंति अँन्टीगोनस यानें अमान्य केल्यामुळें त्याच्यामध्यें व पर्डिकासमध्यें बेबनाव उत्पन्न झाला. पर्डिकासच्या भयानें अँन्टीगोनस हा आपल्या मुलासह पळून जाऊन, मॅसिडोनिया येथें अँन्टीपेटरच्या आश्रयासाठीं आला. पुढें पर्डिकास मरण पावल्यानंतर, अँन्टीपेटरनें यूमेनीसवर स्वारी करण्याकरितां अँन्टीगोनस याला पाठविलें. अँन्टीगोनस यानें यूमेनीसचा पराभव करून त्याला कॅपॅडोशिया येथें हांकलून लावलें. अँन्टीपेटरच्या मृत्यूनंतर अँन्टीपेटरच्या मुलाला राज्य न मिळतां पॉलिचरचान हा राज्यावर बसला. तेव्हां ऍन्टीपेटरचा मुलगा कॅसँडर याच्या मदतीनें आशियाचें स्वामित्व मिळविण्याची अँन्टीगोनसनें महत्वाकांक्षा धरिली; व पॉलिपरचान याचें मांडलिकत्व त्यानें झुगारून दिलें. पॉलिपरचान यानें यूमेनीसशीं सख्य केलें व त्यास अँन्टीगोनस याचा मोड करण्यास पाठविलें. पण यूमेनीस हा विश्वासघातानें अँन्टीगोनस याच्या हातांत पडून मारला गेला. त्यामुळें अँन्टीगोनसला अधिक उत्साह येऊन त्यानें सुसा येथील खजिना लुटला व बाबिलोनमध्यें प्रवेश केला. बाबिलोनियाचा गव्हर्नर सेल्यूकस हा त्याच्या भयानें टॉलेमीच्या राज्यांत पळून गेला. नंतर सेल्यूकस, टॉलेमी, कॅसॅन्डर या सर्वांनीं मिळून, अँन्टीगोनसचा पाडाव करण्यासाठीं कंबर बांधली. ख्रि. पू. ३१५-३११ याच्या दरम्यान पुष्कळ ठिकाणीं उभयपक्षांत झटापटी होऊन शेवटीं तात्पुरता समेट झाला. या समेटान्वयें आशियामायनर व सीरिया हे प्रांत अँन्टीगोनसच्या ताब्यांत राहिले. पुढें थोड्याच दिवसांत या समेटाची इतिश्री होऊन टॉलेमी, कॅसॅन्डर प्रभृतींनीं अँन्टीगोनसविरुद्ध युद्धाचें निशान भारलें. अँन्टीगोनसचा मुलगा डेमेट्रियस यानें कॅसॅन्डरचा पराभव करून ग्रीसचा कांहीं मुलूख जिंकून घेतला. टॉलेमी हा आशियामायनरवर चाल करून गेला. त्याची व डेमेट्रियसची सॅलॅमीसनजीक गांठ पडून टॉलेमीचा डेमेट्रियसनें पराभव केला. अशा रीतीनें युद्धांत विजयी झाल्यामुळें अँन्टीगोनसनें आपल्यास राजा ही पदवी लावून घेतली. इकडे सेल्यूकस, लिसिमॅकस, कॅसॅन्डर यानीं संगनमत करून अँन्टीगोनसचा नक्षा उतरविण्यासाठीं पुन: तयारी चालविली. इप्सस येथें उभय सैन्याची गांठ पडून मोठी लढाई झाली. तींत अँन्टीगोनस हा मारला गेला. मरणसमयीं त्याचें वय ८१ वर्षांचें होतें.