विभाग नववा : ई-अंशुमान
अँन्टीपेटर - (ख्रि. पू. ३९८-३१९) निश्चित नाहीं) हा मॅसेडोनियन लोकांचा प्रसिद्ध सेनापति होता. याच्या बालपणची माहिती मुळींच उपलब्ध नाहीं. मॅसिडोनियाचा राजा फिलिप यानें ख्रि. पू. ३४६ मध्यें त्याला अथेन्स येथें आपल्यातर्फे वकील म्हणून नेमिलें होतें. केरोनाच्या लढाईनंतर (ख्रि. पू. ३३८) अथेन्स व मॅसिडोनिया यांच्यामध्यें जो तह झाला त्यांत अँटीपेटरनें महत्त्वाचा भाग घेतला होता. जगज्जेता अलेक्झांडर हा ज्यावेळीं पूर्वेकडे आपल्या सैन्यानिशीं निघाला त्यावेळीं मॅसिडोनियाचा राज्यकारभार त्यानें अन्टीपेटरकडे सोंपविला. ख्रि. पू. ३३२ मध्यें थ्रेसनें मॅसेडोनियाविरुद्ध बंड उभारलें तेव्हां त्याच्याविरुद्ध अँन्टिपेटरनें स्वारी केली. पण थ्रेसचा पुरा मोड व्हावयाच्या पूर्वीच स्पार्टानें मॅसेडोनियाविरुद्ध बंड केल्यामुळें त्याला परत फिरावें लागलें. मेगॅपोलिस येथें त्यानें स्पार्टन लोकांचा पूर्णपणें पराभव केला. अलेक्झांडरची आई आलिंपियास हीं फार उतावळी व हट्टी स्त्री होती. ती अँन्टीपेटरच्या कारभारांत सारखी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करीत असे. हें अन्टिपेटरला मुळींच खपेनासें होऊन त्यानें आपल्या जागेचा राजीनामा दिला व अलेक्झांडरनें त्याच्या जागीं क्रेटरस याची नेमणूक केली. ख्रि. पू. ३२३ मध्यें अलेक्झांडर हा मरण पावला. त्याच्या पश्चात त्यानें कमावलेल्या साम्राज्याची विभागणी होऊन, अँन्टिपेटर हा मॅसेडोनियाचा गव्हर्नर झाला. अलेक्झांडर वारल्यामुळें ग्रीक लोकांनीं स्वातंत्र्य मिळविण्याचा पुन्हां एकवार प्रयत्न केला, पण क्रेनन येथील लढाईंत अँन्टीपेटर यानें ग्रीकांचा पराभव करून तो प्रयत्न फसविला. नंतर अँन्टीपेटरनें क्रेटरसच्या साहाय्यानें आशियांत आपलें सैन्य उतरविलें. सीरियामध्यें असतांना त्याला अशी बातमी लागली कीं, पर्डिकास याला त्याच्याच सैनिकांनीं ठार मारिलें. त्यानंतर त्यानें यूमेनीसवर स्वारी करून त्याचा पराभव केला. या लढाईंत क्रेटरस हा मारला गेला. अर्थात अँन्टीपेटरला आतां कोणीच प्रबल शत्रु उरला नाहीं. त्यामुळें अलेक्झांडरच्या सर्व साम्राज्याचीं सूत्रें त्यानें आपल्या ताब्यांत घेतलीं. पर्डिकासचे जे पक्षपाती होते, त्यांचा मोड करण्याकरतां त्यानें अँन्टीगोनस यास नेमलें व तो मॅसिडोनिया येथें परत आला. येथें आल्यावर थोड्याच दिवसांत त्याला आजारानें पछाडले. आपल्या पश्चात राज्याची व्यवस्था पहाण्याकरितां त्यानें आपल्या मुलाला न नेमतां, पॉलीपरचान यास नेमलें. त्यामुळें त्याच्याविरुद्ध बरेंच काहूर माजलें. तो ख्रि. पू. ३१९ मध्यें मरण पावला.