विभाग नववा : ई-अंशुमान
अँटानिनस पायस - (८६-१६१). हा रोमचा बादशहा रोमचा कॉन्सल (एक मॅजिस्ट्रेट) औरेलियस फल्वसचा मुलगा असून तो लॅनुव्हियमनजीक एका शहरांत जन्मास आला. बापाच्या मरणानंतर त्याचा आजा अँरियस अँटानिनस यानें त्याचें संगोपन केलें. अँरियस हा अत्यंत सचोटीचा व बहुश्रुत असल्याकारणानें अँटोनिनस याला चांगले शिक्षण मिळालें. पुढें मोठा झाल्यावर त्याला क्वेस्टॉर (एक अधिकाराची जागा) करण्यात आलें. कांहीं काळानंतर तो प्रीटरच्या हुद्यापर्यंत चढला. या दोन्हीं जागांवर असतांना त्यानें आपलें काम चोख बजावल्यामुळें त्याला १२० सालीं कॉन्सलची जागा देण्यांत आली. या अधिकारावर असतांनाहि त्यानें आपली कामगिरी उत्कृष्ट रीतीनें पार पाडल्यामुळें त्याला आशियाचा गव्हर्नर (प्राकॉन्सल) नेमण्यांत आलें. हॅड्रियन बादशहाची त्याच्यावर बहाल मर्जी असे. त्यामुळें आपल्या एकुलत्या एका मुलाच्या मरणानंतर त्यानें १३८ मध्यें अँटानिनस याला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या पश्चात् त्याला राज्यपद देण्याचें ठरविलें. अँटिनिनसनें त्याच्या पश्चात् आपल्या मेहुण्याचा मुलगा व आपला नातु यांनां दत्तक घ्यावें अशी हॅड्रियननें अट मात्र घातली होती. हॅड्रीयनच्या मरणानंतर ठरल्याप्रमाणें अँटोनिनस हा गादीवर आला. तो उदार, मनमिळाऊ, अनुभवी, बुद्धिमान व साध्या रहाणीचा असल्यामुळें लोकांनीं त्याचें अभिनंदन केलें. अँटोनिनसनें रोमचा राज्यकारभार फार चांगल्या तर्हेनें चालविला. आपल्या खासगा खर्चांत शक्य तितकी काटकसर करून गरीब गांजलेल्या लोकांनां तो सढळ हातानें मदत करीत असे. त्याच्या कारकीर्दींत त्याच्या विरुद्ध बारीकसारीक कट झाले. पण त्या कटांच्या पुढार्यानां जबर शिक्षा न करतां त्यांच्यावर दया करून त्यानें त्यांनां सोडून दिलें. ख्रिश्चन लोकांचा छळ न करतां उलट त्यानें त्यांचें संरक्षणच केलें. त्याच्या कारकीर्दीत मोठमोठ्या कायदेपंडितांनां राजाश्रय मिळाल्यामुळें कायदेशास्त्रावर चांगलीं चांगलीं पुस्तकें प्रसिद्ध झालीं. तसेंच त्यानें स्वत: चांगले कायदे पास करून पुष्कळ सुधारणा घडवून आणल्या. त्यानें मोठमोठीं देवळें, नाटकगृहें, थडगीं बांधवून कलाकौशल्याला चांगलें उत्तेजन दिलें. साहित्यशास्त्रांत व तत्त्वज्ञानशास्त्रांत पारंगत असलेल्या विद्वानांनां त्यानें देणग्या व पदव्या दिल्या. आपल्या बापाला-हॅड्रियनला-देवत्वाचा मान देण्याबद्दल त्यानें 'सीनेट' (राजसभा) मधील लोकांचीं मनें वळविलीं व आपल्या बापाला देवत्वाचा मान देऊं केला. या त्याच्या पितृभक्तीबद्दल त्याला 'पायस' ही बहुमानाची पदवी प्राप्त झाली. त्याच्या कारकीर्दीत मूर, ज्यू, ब्रिगँटीस इत्यादि लोकांनीं बंडें केलीं पण त्यांचा त्यानें सहज मोड केला.
कौटुम्बिक बाबतींत मात्र तो विशेष सुखी नव्हता. त्याची बायको फॉस्टीन ही जहांबाज बायको होती व ती त्याला फार त्रास देत असे. पण त्याची मात्र तिच्यावर मरेतों प्रीती होती. तिच्या मरणोत्तर तिच्या स्मरणार्थ त्यानें 'अनाथबालिका' गृह स्थापिलें. त्याला फॉस्टिनापासून एकंदर चार अपत्यें झालीं; पण एका मुलीखेरीज सर्व लहानपणीच मृत्युमुखीं पडलीं. तो १६१ मध्यें लोरियम येथें मरण पावला.
[संदर्भ ग्रंथ- ब्रायंट-दि रेन ऑफ अँटोनिने (केंब्रिज हिस्टॉरिकल ऐसेज १८९५). वॅटसन- मार्कस ऑरेलियस अँटिनिनिस प्रकरण २ रें (लंडन १८८४)].