विभाग नववा : ई-अंशुमान
अँटोनियस (मार्कस) - मार्क अँटनी- (ख्रि. पू. ८३-ख्रि. पू. ३०) मार्कस अँटोनियस उर्फ मार्क अँटनी हा प्रसिद्ध वक्ता अँटोनियस याचा नातू असून अँटोनियस क्रेटीकस याचा मुलगा होय. याचें ज्यूलियस सीझरशीं आईच्या बाजूनें जवळचें नातें होतें. त्याचा सावत्र बाप कॉर्नोलियस लेंटयूलस सूरा याची त्याच्यावर बरीच छाप असल्यानें त्याच्या सहवासांत अँटनीनें आपला तारुण्याचा काळ ख्यालीखुशालींत घालविला. त्यामुळें थोडक्याच दिवसांत तो कर्जबाजारी बनला व सावकाराच्या तडाख्यांतून जीव बचावण्यासाठीं त्यानें ग्रीसला पलायन केलें. अथेन्स येथें असतांना त्यानें तेथील नामांकित तत्त्ववेत्त्यांची व्याख्यानें ऐकिलीं, पण थोड्याच दिवसांत त्याला सीरियाचा सुभेदार औलस गॅबीनियस यानें पॅलेस्टाइनमध्यें अॅरिस्टोल्यूलस याच्यावरील स्वारींत भाग घेण्यास बोलावल्यावरून तो तिकडे गेला. ख्रि. पू. ५४ मध्यें तो सीझरबरोबर गॉलच्या स्वारींत हजर होता. सीझरची त्याच्यावर मर्जी बसल्यामुळें त्याला क्वेस्टार, ऑगर, ट्रायब्यून इत्यादि अधिकाराच्या जागा मिळाल्या, या जागांवर काम करीत असतांना त्यानें सीझरची इमानेइतबारें सेवा केली. स्पेनवर स्वारी करण्याकरितां सीझर गेला असतां त्याच्या गैरहजरींत अँटनी हा इटलीचा नायब सुभेदार (डेप्यूटी गव्हर्नर) झाला. फॅरसॅलसच्या लढाईंत दुय्यम सेनाध्यक्षाची जागा त्याला देण्यांत आली. पुढें सीझर हा आफ्रिकेमधील मोहिमेवर असतांना पुन्हां अँन्टनी हा इटलीचा नायब सुभेदार (डेप्युटी गव्हर्नर) नेमला गेला. अर्थात सीझरच्या खालोखाल इटलीवर त्याचीच सत्ता होती व त्या सत्तेच्या जोरावर त्यानें अनन्वित कृत्यें केलीं. ख्रि. पू. ४४ मध्यें लुपरकॅलियाच्या उत्सवाच्या दिवशीं सीझरच्या डोक्यावर त्यानें स्वत:च्या हातानें राजमुकुट ठेवला. पुढें सीझरच्या वधानंतर त्यानें सीझरचा खून करणार्या लोकांविरुद्ध वत्तकृत्वपूर्ण भाषण केलें. त्यामुळें लोक याच्या पक्षाचे झाल्यामुळें बंडखोरांनां पळ काढावा लागला. पुढें सीझरच्या शरीररक्षकांच्या सहाय्यानें त्यानें सीनेटमध्यें जाऊन गॉल प्रांत आपल्या ताब्यांत देण्याविषयीं सीनेटच्या सभासदांनां धमक्या दिल्या; पण त्या प्रांताचा सुभेदार डेसीमस ब्रुटस यानें तो प्रांत ताब्यांत देण्याचें नाकारलें. त्यामुळें चिडून जाऊन तो ब्रूटसवर स्वारी करण्याकरितां निघाला. इतक्यांत सीझरनें मुलगा म्हणून मानलेला ऑक्टेव्हियन हा रोममध्यें आला व त्यानें सीझरच्या पश्चात् त्याच्या जागीं आपला हक्क प्रस्थापित केला. सीनेटनें व सिसरो यानें त्याचा हक्क कबूल केल्यामुळें त्याच्या पक्षाला पुष्कळच लोक मिळाले. इकडे ब्रूटसच्या सैन्याला अँटनीनें वेढा दिला होता. त्या जागी ऑक्टोव्हियन हा अँटनीवर चाल करून गेला. म्युटिना येथे त्यानें अँटनीचा पूर्णपणें पराभव केला. पुढें ऑक्टव्हियनविषयीं सीनेटच्या मनांत संशय उत्पन्न झाल्यामुळें ऑक्टेव्हियनला राग येऊन तो आपल्या सैन्यानिशीं रोममध्यें गेला व त्यानें आपल्याला कॉन्सल नेमण्याविषयीं सीनेटला धमकी दिली. सीनेटनें त्याला कॉन्सल नेमलें. इकडे अँटनी हा गॉलमध्यें पळून गेला होता. तेथें त्यानें लेपीडसच्या साहाय्यानें मोठें सैन्य जमविलें व तो रोमवरच चाल करून निघाला. ही बातमी ऑक्टेव्हियनला समजतांच सीनेटच्या इच्छेविरुद्ध त्यानें अँटनी व लेपीडस यांजबरोबर सामोपचाराचें बोलणें सुरू केलें. त्या तिघांमध्यें वाटाघाट होऊन तिघांनीं मिळून इटलीचा राज्यकारभार करावयाचा असें ठरविलें. त्याप्रमाणें गॉलची व्यवस्था पाहण्याचें काम अँटनीकडे आलें. स्पेन लेपीडसच्या ताब्यांत गेलें व आफ्रिका, सार्डिनीया, सिसिली हे प्रांत अँक्टेव्हियनकडे राहिले. या त्रिकूटाच्या अमदानींत जुलूमजबरदस्ती यांनां ऊत येऊन सुलतानशाही नांदूं लागली. प्रसिद्ध माणसांचा छळ होऊं लागला. सिसरोसारखा कसलेला मुत्सद्दी व सुप्रसिद्ध वक्ता अँटनीच्या रोषाला बळी पडला. ख्रि. पू. ४२ व्या वर्षीं अँटनी व ऑक्टेव्हियन यांनीं बंडवाल्यांवर स्वारी केली व फिलिपी येथील दोन लढायांत ब्रुटस व कॅशस यांचा पराभव केला. नंतर अँटनी हा आशियामायनरकडे पूर्वेकडील प्रांत जिंकण्यासाठीं निघाला. सायलेशिया येथें त्याचा मुक्काम असतां, क्लिओपाट्रा नांवाच्या एका सुंदर तरुणीनें त्याचें मन आकर्षण करून घेतलें. त्यामुळें तिच्या सहवासांत त्यानें चार पांच महिनें व्यर्थ घालविले. इतक्यांत पार्थियन लोकांनीं सीरियावर स्वारी केल्यामुळें त्याला हालचाल करणें भाग पडलें. पण याच सुमारास ऑक्टोव्हियन व त्याची बायको फुल्विया यांच्यामध्यें खटका उडून लढाईपर्यंत पाळी आल्याचें वर्तमान त्याला समजलें. त्यामुळें त्याला घाईघाईनें इटलीला परत यावें लागलें. तेथें येतो तोंच ऑक्टेव्हियन हा विजयी झाल्याचें वर्तमान त्याला समजलें. पुढें थोड्याच दिवसांत फुल्विया मरण पावली. त्यामुळें वादाचें कारण नाहीसें होऊन ऑक्टेव्हियन व अँटनी यांच्यामध्यें पुन्हां समेट झाला. व ऑक्टेव्हियननें आपली बहीण ऑक्टेव्हिया अँटनीला देऊन तोसमेट पक्का केला.
रोमन साम्राज्याची पुन्हां वांटणी होऊन अँटनीकडे पूर्वेकडील मुलुखाच्या व्यवस्थेचें काम आलें. त्याप्रमाणें अँटनी हा आशियामायनरमध्यें आला. पार्थियन लोकांचा पराभव करण्याचा त्यानें पुष्कळदां प्रयत्न केला; पण त्यांत त्याला यश आलें नाहीं. ख्रि. पू. ३९ मध्यें तो अथेन्स येथें आला. तेथें असतांना त्यानें 'आपण देव आहों' असें लोकांनां भासविण्यास सुरवात केली. सीरियामध्यें असतांना त्यानें क्लिओपाट्राशीं आपला पूर्वीप्रमाणेंच संबंध चालू ठेवला. अँटनीचें हें वर्तन पसंत न पडून सीनेटनें त्याला पदभ्रष्ट केलें, व त्याच्या व क्लिओपाट्राविरुद्ध युद्ध पुकारलें. अँक्टियममध्यें जी लढाई झाली त्यांत अँटनीचा पराभव झाला. त्याच्या अगोदरच क्लिओपाट्रा ही ईजिप्तमध्यें पळून गेली होती. तिच्याकडेच जाण्याकरतां अँटनी हा निघाला. त्याच्यामागून शत्रुसैन्य पाठलाग करीतच होतें. आपल्याप्रमाणेंच क्लिओपाट्राच्या पाठीस सैन्य लागलें असेल व क्लिओपाट्रानें जीव दिला असेल अशा समजुतीनें त्यानेहि वाटेंत आत्महत्या करून घेतली. अँटनीला तीन चार बायका असून त्यांच्यापासून त्याला पुष्कळ मुलें झालीं होतीं.
[प्लुटार्क-लाइव्हज ऑफ अँटनी, ब्रूटस, सिसरो, सीझर; सिसरो-लेटर्स; फिलिपिकस; डिक्वेन्सी-एसे ऑन सीझर्स.].