विभाग नववा : ई-अंशुमान
अण्डाशयछेदनक्रिया - (ओव्हरिओटोमी) ही शस्त्रक्रिया स्त्रियांच्या एक किंवा दोन्ही अंडाशयांस रोग झाला असतां करणें जरूर पडते. हे अवयव कटिरांतील पोकळीमध्यें असतात. म्हणून उदर चिरून तेथें होणार्या मोठाल्या गांठीं अगर अंडाशय कापून काढणें हें आधुनिक शस्त्रक्रियेच्या प्रगतीमुळें बरेंच सर्वसाधारण व शक्य झालें आहे. या प्रगतीचा पूर्वेतिहास मनोरंजक वाटल्यावरून तो येथें देत आहों. इ. स. १७०१ सालीं हौस्टन या शस्त्रवैद्यानें ही शस्त्रक्रिया अर्धामुर्धा इंद्रियाचा भाग काढण्यापुरती यशस्वी रीतीनें केली. पुढें १७८० मध्यें हंटर्स यानें याची प्रगति होण्याची खटपट केली. नंतर १८०९ सालीं एडिंबरो येथील जॉनबेल याच्या उत्तेजनामुळें त्याचा शिष्य याने कांहीं असल्या शस्त्रक्रिया केल्या; व त्यांतील बर्याच यशस्वी झाल्या. नंतर ही शस्त्रक्रिया अमेरिकेंत संयुक्तसंस्थानांतील डॉक्टर करूं लागले. पुढें एडिंबरो येथील लिझार्स नामक शस्त्रवैद्याच्या हातून यशस्वी रीतीनें कांहीं शस्त्रक्रिया पार न पडल्यामुळें लोकमत त्याविरुद्ध फार जोराचें झालें. क्ले, स्पेन्सर, बेकर, क्रौन व कीथ या चौघां गृहस्थांनीं या शस्त्रक्रियेची कृति पायाशुद्ध व शक्य कोटींत होईल व शस्त्रक्रियेवर कोणाकडून टपका न येईल अशा तर्हेची नियमबद्ध व नवीन शोध व सुधारणांनीं युक्त अशी केली. त्यामुळें पुष्कळ शस्त्रवैद्यांमध्यें या शस्त्रक्रिया करण्यामध्यें पुष्कळ अहमहमिका सुरू होऊन त्याचे सुपरिणाम लोकांनां दिसूं लागले. व फार थोडे रोगी दगावतात असें नजरेस येऊं लागलें. पुढें जंतुघ्न औषधांचा शोध लागल्यामुळें ही शस्त्रक्रिया मोठ्या शस्त्रक्रियांपैकीं व धोक्याची असूनहि यांतील मृत्युप्रमाण फार अल्प होऊं लागलें. पास्ट्यूरच्या चरित्राचें इंग्रजी भाषांतर आहे, त्यांतील पुढील उतारा मुद्दाम दिला आहे. त्यावरून एकोणिसाच्या शतकाच्या अखेरीस या शस्त्रक्रियेमुळें किती बाया दगावत याचें चित्र डोळ्यापुढें उभें रहातें :- ''या शस्त्रक्रियेंत बहुधा रोगी दगावतात याचें कारण रुग्णालयांतील बिघडलेली हवा असावी असा बळकट संशय आल्यामुळें वरील अधिकार्यांनीं पारिसनजीक उत्तम हवाशीर जागीं एक स्वच्छ घर एकीकडे निर्मळ जागीं असलेलें भाड्यानें घेऊन १८६३ सालीं एकी मागाहून दुसरी अशा दहा बायका तेथें रोग बरा व्हावा म्हणून शस्त्रक्रियेसाठीं पाठविल्या. शेजार्या पाजार्यांनीं त्यांनां आपल्या पायांनीं त्या घरांत जातांना पाहिलें सुद्धां; पण थोड्याच दिवसांनीं त्या सर्वांचीं प्रेतें शवपेटिकांत घातलेलीं त्या घरांतून पुरण्यासाठीं स्मशानाकडे नेलेलीं त्यांच्या नजरेस पडलीं; पण पुढें प्रत्येक शस्त्रवैद्याच्या हातून दगावल्याशिवाय पुष्कळ रोगी बरे होऊं लागले व त्यांच्या याविषयींच्या आंकड्यांत उत्तरोत्तर सुधारणा दिसूं लागली. ती इतकी कीं हल्लीं शेंकडा ५, ७, किंवा ९ यांपेक्षां अधिक रोगी दगावत नाहींत. स्पेन्सर वेल्स यानें या कामीं फार मेहनतीनें व शोधक बुद्धीनें या क्रियेस सोयीवार अशीं कांहीं हत्यारें व शस्त्रें शोधून काढलीं, व त्या त्या शस्त्रास त्याचेंच नांव दिलें आहे.
श स्त्र क्रि या क र ण्या चे प्र सं ग : - (१) स्त्रियांचे अंडाशयांत मोठी पोकळी होऊन पोट अगोदर स्त्रीप्रमाणे किंवा उदर झाल्याप्रमाणें मोठें होतें; किंवा त्यांत अन्य रोगांची वृद्धि होते. (२) गर्भाशयांत तंतुमय रचनेची रोगग्रंथि वृद्धिंगत होते; अशा वेळींहि शस्त्रक्रिया केल्यानें स्त्रीचे पुढील आयुष्यांत प्रतिमासीं रजस्वला होणें बंद होतें. परंतु ती रोगग्रंथि लहान होते व पीडा करीत नाही. (३) वेदनायुक्त विटाळशूळांत रोग्यास जीव नकोसा करून सोडीत असेल व इतर सर्व उपाय थकल्यावर. (४) दुसर्या भागांतील कांहीं विवक्षित रोग हे अंडाशय काढून टाकल्यानें बरे होतात. हा शोध रॉबर्ट ब्याटी यानें लाविला. याचे अन्य परिणाम पुढें त्या स्त्रीमध्यें विषयासंबंधीं विरक्ति कदाचित होणें व तिच्या अंगांतील स्त्रीजातिविशिष्ट मार्दव कमी होणें हे असतात म्हणून रोग्यास व तिच्या आप्तास या आपत्तीची संभवनीयता अगोदर कळवून ठेवून त्यांची संमति मिळविलेली चांगली. यानें रोगमुक्तता होते, परंतु कदाचित वरील प्रकार घडण्याचा संभव असतो. (५) स्तनांमध्यें असाध्य अशा कॅन्सर रोगाच्या ग्रंथि वाढतात. या रोगाची प्रगति थांबविण्याच्या आशेनें ही शस्त्रक्रिया कोणी करतात. पण ती अशाच वेळीं करतात कीं स्तनांतील कॅंन्सर ग्रंथि शस्त्रक्रियेनें कापून काढण्याचे स्थितींत नसते.
श स्त्र क्रि ये चें सं क्षि प्त व र्ण न.- ही करण्याच्या अगोदर रोग्याचा कोठा साफ ठेवून लघवी शक्य तितक्या सुस्थितींत आणली पाहिजे. शस्त्रक्रियेच्या वेळीं स्त्रीरोग्याच्या पायांत गरम मोजे चढवावे. लघवी शलाकेनें काढून अत्यंत स्वच्छ केलेल्या उदरावर मधोमध दीर्घ वर्तुळाकृति मोठें भोंक कातरलेलें मेणकापड बांधतात. नंतर जंतुघ्न औषधांनीं छेद करावयाची जागा पुन: शुद्ध करतात व तीन इंच लांबीचा छेद मधोमध करतात. आंतील रचना जी छेदावयाची तिचें सूक्ष्म वर्णन न करतां एवढेंच सांगतां येईल की तो मोठा विकृत अंडाशय भोंवतालच्या भागांत रुतून बसलेला असतो. तो मोठ्या चिकाटीनें, मेहनतीनें व शांत चित्तानें सोडवून त्याचा विकृत जलानें फुगलेला आकार त्यांतील जल स्पेन्सर्स वेल्स याच्या यंत्रानें बाहेर काढून टाकून लहान करण्यांत येतो व ती रोगाची गांठ जखमेंत ओढून धरतात. एका मोठ्या दाभणांत रेशमी बळकट दोरा ओंवून त्यानें त्या गांठीचें मधोमध विद्ध करून बळकट बांधून दाभण काढून घेतात व तें रोगाच्या मुळांतील अथवा देठांत ओंवलेल्या दोर्याच्या योगानें तें रोगाचें मूळ बद्ध होईल असें बांधून टाकतात; व नंतर या दाभणानें बांधलेल्या रोगाच्या गांठीचा गठ्ठा कापून काढतात; पण त्यांतील विकृत पू, रक्त, पाणी उदरांत न पडेल अशी दक्षता बाळगतात. या छेदनानंतर रक्तस्त्राव कोठें होत असेल तो शोधून बंद करतात. व नंतर त्या अंडाशयाचें छिन्न मूळ उदरांत पुन: जागच्या जागीं ठेवतांना दुसरें अंडाशय निरोगी आहे किंवा नाहीं हें पहातात. व रोगट असल्यास तेंहि काढून टाकतात. गांठ रुतलेली सोडवतांना आंतड्यांनां इजा बिलकुल होऊं देतां उपयोगी नाहीं.
हें आटोपल्यावर जखम व तींतील खोल भाग धुवून शुद्ध करणें तें जपून तींतून लाल पाणी येत नाहीं असें होईपर्यंत करावें लागतें. तें टिपून घेण्याकरितां लिंटचे बोळे मोजून उदराच्या पोकळींत बसवितात. मासांचे भाग व कातडी शिवण्यास नंतर आरंभ होऊन तें संपण्याच्या अगोदर बोळे काढून घेऊन त्यांची व सर्व हत्यारांची-त्यापैकीं एखादें पोटांत चुकून राहूं नये म्हणून-गणती करतात. नंतर चामडी नीट जुळून दिसेल असे टांके मारणें झाल्यावर त्या जखमेवर जंतुघ्न पट्ट्या व कापसाचे थरावर थर बांधतात. पण जर विकृत घाण उदरांत सांडली असा संशय येऊन उदरांत विकृत जल सांचेल अशी शंका आल्यास त्याचें उत्सर्जन होण्यासाठीं रबराच्या तुकड्यास मधोमध भोंक पाडून त्यांत कांचेचीं छिद्रें असलेली नळीं जखमेंत बसवितात. ही नळी खोल भागापर्यंत पोंचते. हींतून निघणारी घाण शोषून घेण्यासाठीं तिच्यावर शोषक पट्ट्या ठेवतात व जखम वेळोवेळीं पहातांना बारीक नळीच्या योगें आंतील जमलेलें घाण जल काढून टाकतात व नव्या पट्ट्या बसवतात. हें पाणी कमी सांचू लागलें म्हणजे मग नळी काढून घेतात. हें होत असतांना रोग्यास निजवून झोंपेसाठीं औषध, वेळोवेळीं शलाकेनें लघवी काढणें, वांति झाल्यास ती शमविणें, सबंध एक दिवस अन्न व दूध न देणें, पोटफुगी न होऊं देणें, दुसर्या दिवसापासून गुदमार्गे पातळ अन्न; नंतर तीन दिवसांनीं दूध वगैरे पातळ पदार्थ देणें व तीन ते सात दिवसांत टांके तोडणें असें कडक पथ्य व जपणूक करावी लागते.