विभाग नववा : ई-अंशुमान
अंडोरा - फ्रान्स आणि स्पेन यांच्या सरहद्दीवर आणि पूर्व पीरिनीज पर्वताच्या द्वीपकल्पाकडील भागांत हें एक लहानसें, तटस्थ, स्वयंशासित आणि अर्धस्वतंत्र (सेमी इंडिपेन्डन्ट) असें राज्य आहे. याचें क्षेत्रफळ १७५ चौरस मैल असून लोकसंख्या सरासरी (१९००) ५५०० आहे. याच्या सभोंवार डोंगर आहेत व मध्यें एक खोरें आहे. एकदां येथें दाट अरण्य होतें व मूर लोक दाट अरण्याला 'अलडर्रा' असें म्हणतात. त्यामुळेंच त्याचें नांव अंडोरा हें पडलें.
सामान्यता: येथील हवा थंड आहे; पण थंडीच्या दिवसांत ती अतिशय कडक असते. बहुतेक जमीन कुरणांनीं व्यापलेली आहे. कांहीं भागांत धान्य, बटाटे, फळें आणि तंबाखू यांची लागवड होते. दूध, लोणी, कच्ची चामडीं, डुकराचें मांस आणि लोंकर यांची मुख्यत्वेंकरून फ्रान्स देशांत निर्गत होते. स्थानिक धंदे फार जुन्या पद्धतीचे आहेत. डोंगरांत लोखंडाच्या आणि शिशाच्या खाणी आहेत. पण द्रव्य, कोळसा आणि नेआण करण्यास चांगले रस्ते नसल्यामुळें लोक खाणी खणण्याच्या भरीस पडत नाहींत १९०४ सालीं फ्रान्स आणि स्पेन यांनीं एक्सपासून रिपोलपर्यंत आगगाडी बांधण्याचें ठरविलें.
येथील लोक सशक्त आणि बांधेसूद असून स्वतंत्र बाण्याचे, साधे आणि वागणुकींत फार कडक असे आहेत. हे सर्व रोमन कॅथोलिक पंथाचे आहेत. बहुतेक लोक स्पॅनिश भाषेची कॅटालन पोटभाषा बोलतात. येथील चालीरीति व संस्था अद्यापि जुन्याच (मध्ययुगीन) आहेत. सर्व कारभार चालविणारी २४ सभासदांचीं एक कौन्सिल जनरल नांवाची सभा आहे. तींतील सभासदांची निवडणूक सर्व कुटुंबातील मुख्य पुरूष करतात. फ्रान्सनें नेमलेला एक आणि उरगेल येथील बिशपनें नेमलेला एक असे दोन अर्धवट लष्करी अधिकारी (व्हिगिएर नांवाचे) सरंजामी फौजेची व्यवस्था पाहतात. यांच्याकडेच फौजदारी न्यायाचें काम असतें. दिवाणी खटले चालविण्याचें काम यांनीं नेमलेल्या लवादांकडे (आल्डरमेन) असतें. इतर अधिकारी निवडलेले असतात.
१२७८ त येथील मुख्य सत्ता उरगेलचे बिशप आणि फॉइस्क येथील कौंट यांच्यामध्यें सारखी वाटून देण्यांत आली होती. हल्लीं ती फ्रेंच सरकार आणि उरगलेचा बिशप या दोघांच्याकडे गेली आहे. यांच्यामधील चुरशीमुळें या संस्थानाची स्वतंत्रता अद्याप टिकली आहे. या संस्थानास फ्रान्स व स्पेन या दोन्ही देशांसहि वर्षांस ४० पौंड खंडणी द्यावी लागते.