विभाग नववा : ई-अंशुमान
अँडिया डेल सार्टो - (१४८७-१५३१.) हा प्रसिद्ध चित्रकार फ्लॉरेन्समधील ग्वालफोंडा या गांवीं जन्मास आला. त्याचा बाप शिंप्याचा धंदा करीत असे म्हणून त्याला सार्टो हें आडनांव पडलें. आपल्या वयाच्या सातव्या वर्षीच तो सोनारकाम शिकूं लागला. पण त्याला त्यांत विशेष गोडी लागली नाहीं. त्याला चित्रकलेचा अतिशय नाद असल्यानें सोनारकीचा धंदा सोडून त्यानें गियन बॅरीले या एका साधारण चित्रकाराच्या हाताखालीं नोकरी धरली. बॅरीले याला अँड्रियाचे अंगीं विशेष गुण निदर्शनास आल्यामुळें त्यानें पीरो द कोसिमो याच्याजवळ त्याची शिफारस करून त्याच्या हाताखालीं अँड्रियाला नोकरी लावून दिली. पीरोपाशीं असतांना लीओनार्डो द व्हिन्सी व मिचेलअँजेला यांच्या नक्षीकामांची व चित्रांची त्याला पूर्ण माहिती मिळाली. नंतर आपला व्यवसायबंधु फ्रान्सिया बिजियो याच्या सहाय्यानें त्यानें स्वतंत्र धंदा सुरू केला. कांहीं काळपर्यंत त्यांनीं अशा रीतीनें धंदा सुरू केल्यावर पुढें त्यांचें एकमेकांशीं पटेनासें होऊन अँड्रिया हा त्याच्यापासून वेगळा झाला. पुढें 'सर्व्हाईटिस ब्रदरहुड' नांवाच्या एका संस्थेनें फिलिप्पो बेनिझो नांवाच्या एका सर्व्हाईट साधूच्या चरित्रांतील महत्त्वाच्या गोष्टींचीं निदर्शक अशीं तीन गिलाव्यांतील चित्रें काढण्यासाठीं अँड्रियाला सांगितलें. अँड्रियानें हीं तीन्ही चित्रें सात आठ महिन्यांत काढून टाकलीं. फिलिप्पो साधू एका रक्तपीति झालेल्या माणसाला आश्रय देतो आहे असें चित्र, द्युत खेळणार्यांनां तो झिडकारतो आहे असें एक चित्र व भुतानें पछाडलेल्या एका मुलीला तो भुतापासून सोडवितो आहे हें चित्र अशीं तीं तीन चित्रें होतीं. ह्यांपैकीं शेवटचीं दोन्हीं चित्रें फारच चांगलीं साधलीं आहेत. याशिवाय या साधूच्या चरित्रांतील गोष्टींचीं निदर्शक अशीं आणखी दोन चित्रें त्यानें काढलीं. यामुळें त्याची प्रसिद्धि झाली. रफायलच्या खालोखाल त्याच्या इतका दुसरा चित्रकार नाहीं अशी त्याची मध्यइटलीमध्यें ख्याति झाली. यावेळीं त्याचें वय अवघें तेवीस वर्षांचे होतें. एकदां रंगिवलेल्या चित्रावर पुन्हां हात मारून त्यांत फरक करणें त्याला आवडत नसे व तसा प्रसंग येऊं नये म्हणून तो फार खबरदारी घेत असे. त्याचीं चित्रें अगदीं साधीं पण सुरेख असत. यामुळें सर्व्हाईट संस्थेनें त्याच्याकडे आणखी दोन चित्रांचें काम सोंपविलें. हीं दोन चित्रें 'नेटिव्हिटी ऑफ व्हर्जिन' व 'प्रोसेशन ऑफ मगी' हीं होत. या चित्रांची जितकी वाहवा झाली तितकी त्याच्या इतर कोणत्याहि चित्रांची झाली नाहीं. याशिवाय सुळावर चढलेल्या ख्रिस्ताचें डोकें, बॅप्टिस्ट हा अरण्यामध्यें उपदेश करतो आहे असा प्रसंग इत्यादि चित्रेंहि त्यानें याच सुमारास काढलीं. १५१६ मध्यें 'पायेटा 'व' मॅडोना' हीं दोन चित्रें त्यानें फ्रेंचांच्या दरबारीं पाठवून दिलीं व तेथें त्यांची फारच प्रशंसा झाली. फ्रान्सचा राजा फ्रान्सिस हा कलेचा शोकी असल्याकारणानें त्यानें अँड्रियाला फ्रान्सला बोलावलें, व त्याला चांगलें वेतन देण्याचें कबूल केलें. पॅरिसमध्यें तो कांहीं काळ होता पण त्याच्या बायकोची त्याला इटलीस येण्याबद्दल निकड लागल्यानें त्याला पॅरिसहून परत यावें लागलें. राजानें त्याला पुन्हां थोड्या दिवसांत परत पॅरिसला येण्याच्या अटीवर जाऊं दिलें व जातांना इटलींतील सुंदर चित्रें खरेदी करण्यासाठीं त्याच्यापाशीं पुष्कळ पैसे दिले. पण पैसे हातांत पडल्यावर तो पॅरिसला परत न येतां त्यानें त्या पैशांवर आपलें स्वत:चें घर फ्लॉरेन्समध्यें बांधविलें. हे कळतांच फ्रान्सिसला फार राग आला, पण त्याला शासन करण्याच्या भानगडींत तो पडला नाहीं.
अँड्रिया हा एक चैनी माणूस होता. फ्लॉरेन्समध्यें असतांना त्यानें रस्ट्रिसीप्रभृति आपल्या व्यवसायबंधूंची चांगली ओळख करून घेतली व त्यांनीं स्थापन केलेल्या 'कंपनी ऑफ दि केटल' व ट्रोवेल या क्लबांत आपलें नांव दाखल केलें. ल्युक्रेझिया नांवाच्या एका तरुणीवर त्याचें प्रेम बसलें होतें व त्याप्रमाणें तिच्याशीं १५१२ मध्यें त्यानें लग्न केलें. ही तरुणी फारच सुंदर होती. तिच्या चेहर्यावरून त्यानें मॅडोना वगैरेंचीं चित्रें काढलीं. तिच्यावर त्याचें फार प्रेम असे, पण ती फार द्राष्ट होती असें विसारी व अँड्रियाचे इतर चरित्रलेखक म्हणतात.
१५२० मध्यें त्यानें फ्लॉरेन्स येथें आपला धंदा पुन्हां सुरू केला. स्कॅल्सोच्या मठांत त्यानें 'फेथ' (श्रद्धा) व 'चॅरिटी' (परोपकार) हीं दोन चित्रें काढलीं. त्यानंतर, हेरोडियसच्या मुलीचा नाच, बॅप्टिस्टचा शिरच्छेद, इत्यादि चित्रें त्यानें तयार केलीं. १५२५ मध्यें सर्व्हाईटिसांच्या मठांत त्यानें 'मॅडोना डेल सॅको' हें उत्कृष्ट चित्र काढलें. त्याच्या सर्व चित्रांत हें चित्र फारच नांवाजण्यांत येतें. १५२६ मध्यें स्कल्सोच्या मठांत 'बॅप्टिस्टचा जन्म' हें चित्र त्यानें तयार केलें. त्यानंतर १५२७ मध्यें त्यानें सॅल्व्ही येथें 'अंत्यप्रभुभोजन' हें चित्र काढलें. हेहि चित्र फार सुरेख साधलेलें आहे. हेंच त्याचें शेवटचें चित्र होय. १५३१ मध्यें फ्लॉरेन्समध्यें सांसर्गिक रोगाची सांथ आली. त्यांत अँड्रिया सांपडल्यामुळें त्याचा अंत झाला. त्याचें वय अवघें ४३ वर्षांचें होतें. त्याला सर्व्हाइटिसच्या उपासनामंदिरांत पुरण्यांत आलें.
अँड्रियानें वर उल्लेख केलेल्या चित्रांशिवाय पुष्कळच चित्रें काढलीं. व तीं चित्रें निरनिराळ्या देशांतील अजबखान्यांत ठेवण्यांत आलीं आहेत. अँड्रियाच्या अंगीं कल्पकतेचा गुण नव्हता, पण एखादें चित्र तूं अशा प्रकारें काढ असें सांगितलें असतां, मग मात्र तें चित्र तो अत्यंत कुशलतेनें व हुबेहुब काढीत असे. चित्रांतील सर्व भाग प्रमाणबद्ध व सुशोभित रीतीनें वठविण्यांत त्याचा हातखंडा असे. त्याच्या चित्रांत उच्च विचारांनां अगर धार्मिक मनोवृत्तींनां पोषक असे फारसे गुण आढळून येत नाहींत, पण त्याची काम करण्याची हातोटी मात्र विलक्षण होती. मिचेल अँजलो हा रफायल नांवाच्या प्रसिद्ध चित्रकाराला नेहमीं विनोदानें म्हणत असें कीं, जर अँड्रिया हा मनांत आणील तर तुला तो केव्हांच हटवील. मिचेलअँजेलो याचें अँड्रियाच्या चित्रकलेसंबधांत फार चांगलें मत होतें, एवढीच गोष्ट अँड्रियाच्या चित्रनैपुण्याची निदर्शक आहे असें म्हटलें असतां वावगें होणार नाहीं. अँड्रियाचे शिष्य पुष्कळ होते. त्यांपैकीं पोंटार्मो व डोमेनिको पुलिगो हे प्रमुख होत.
[बियाडी, समाँट, बौमन इत्यादि लेखकांनीं अँड्रिया डेल सार्टोची' चरित्रें लिहिलीं आहेत.].