विभाग नववा : ई-अंशुमान
अँड्रोमेडा - ग्रीक पुराणांमध्यें हिची आख्यायिका खालीलप्रमाणें आहे. अँड्रोमेडा ही एथियोपियन लोकांचा राजा सेफीयस व त्याची बायको कॅसिओपे यांची मुलगी होती. अँड्रोमेडा हिला आपण पोसीडॉनची बायको नेरीड्स इच्याइतके सुंदर आहों असा गर्व झाला. त्यामुळें पोसीडॉन याला राग येऊन त्यानें तिचा सूड घेण्याचें ठरविलें; व माणसें व पशू यांचा संहार करणारा समुद्र-राक्षस पृथ्वीवर पाठवून दिला. त्यामुळें सर्व पृथ्वी जलमय होते कीं काय असें वाटू लागलें. पृथ्वीवरील लोक भयभीत झाले. त्यांनीं अॅमॉन येथील देवतेला कौल लावला. त्यावरून त्यांनां असें समजलें कीं जोंपर्यंत सेफीयस राजा आपल्या मुलीला त्या समुद्रराक्षसाच्या ताब्यांत देणार नाहीं तोंपर्यंत हें अरिष्टं टळणार नाहीं. हें वर्तमान कळतांच, राजानें त्याप्रमाणें कबूल केलें व अँड्रोमेडा हिला समुद्रकिनार्यावरील एका खडकाला घट्ट बांधण्यांत आलें. अशा असहाय्य स्थितींत ती गॉर्गनला मारून परत येणार्या पर्सीयसला आढळली. तेव्हां त्यानें समुद्रराक्षसाचा वध करून, तिची मुक्तता केली व तिच्याशीं लग्न केलें. अँड्रोमेडा हिचें फीनेअस याच्याशीं लग्न होण्याचें पूर्वीपासून ठरलें होतें. फीनेअसला ही बातमी लागतांच त्याला फार क्रोध आला. लग्नसमारंभाच्या वेळीं पर्सीयन व फीनेअस या दोघांमध्यें भांडण होऊन पर्सीयसनें आपल्या हातांतील गॉर्गलच्या कवटीच्या प्रभावानें फीनेअसला दगड बनविलें. अँड्रोमेडाला घेऊन पर्सीयस हा अर्गासमधील टीरिन्स नामक आपल्या गांवीं गेला. अँड्रोमेडाच्या मरणानंतर अथेना देवीनें तिची पर्सीयस व कॅसिओपिया यांच्या नक्षत्राशेजारीं स्थापना केली.' ही दंतकथा आधारभूत धरून त्यावर सोफोक्लीज व युरिपीडीज यांनीं व इतर ग्रंथकारांनीं शोकपर्यवसायी कथानकें रचिलीं आहेत.
अँड्रोमेडा या तारकापुंजावर ग्रीक लोकांनीं ही दंतकथा रचिली आहे असें दिसतें. या अँड्रोमेडा नक्षत्राला, लॅटिनमध्यें 'पर्सीया' (शृंखलाबद्ध स्त्री) असें नांव आहे. विल्हेल्म शीकर्ड (१५९२-१६३५) यानें या नक्षत्राला 'अविगेल' हें नांव दिलें आहे. ज्यूलियस शिलरनें हें नक्षत्र कबरेच्या आकृतीचें आहे असें कल्पून त्याला 'पवित्र कबर' असें नांव दिलें.
अँड्रोमेडाच्या तारकापुंजामध्यें टॉलेमी व टायकोब्राहे यांच्या मतें २३ तारका आहेत तर हेबेलियसच्या मतें ४७ आहेत. त्यांतल्या त्यांत 'आल्फा अँड्रोमेडा' व 'वीट अँड्रोमेडा' या तारका मोठ्या व तेज:पुंज आहेत. शास्त्रीयदृष्ट्या या तारकपुंजासंबंधीं पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या तारकापुंजामधींल तेजोमेघ फारच सुंदर आहे. 'गॅमा अँड्रोमेडा' हा तारा, चकाकणारा तारा व नीलवर्ण तारा या दोहोंच्या संयोगामुळें बनलेलें तारकायुग्म (बायनरीस्टार) आहे. 'गॅमा अँड्रोमेडा' हा नियमानें परिवर्तन करणारा तारा आहे. हार्टविग यानें आणखी एक नवीन तारा या तारकापुंजामध्यें शोधून काढून त्याला 'नोव्हा अँड्रोमेडा' असें नांव दिलें आहे. अँड्रोमेडीड्स नांवाच्या उल्कासमूहाचा उल्कासंपातबिंदु (रेडिअंट) या तारकापुंजांत आहे.