विभाग नववा : ई-अंशुमान
अंतर्झान - प्रत्यक्ष किंवा चटकन् होणारा जो बोध किंवा ज्ञान त्याला ही संज्ञा तत्त्ववेत्त्यांकडून दिली जाते. भूमितींत एखाद्या सिद्धांताची सत्यता अनेक पुरावे देऊन प्रस्थापित करावी लागते; पण अंतर्ज्ञानवाद्यांच्या मतें सार्वत्रिक तत्त्वांचा बोध करून देण्यास अशा खटपटीची जरूरीच नसते; कारण तीं जातींचींच सत्यें असतात. सर्व प्रकारचें ज्ञान, बौद्धिक क्रियांवर किंवा वैचारिक निर्णयांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असतें हें म्हणणें अंतर्ज्ञान मानणारांनां कबूल नाहीं. या अंतर्ज्ञानवाद्यांचे धार्मिक किंवा नैतिक सत्याचा मूळ उगम ते कोठून मानतात त्यावरून पांच सहा वर्ग पाडले आहेत. १५ व्या, १६ व्या शतकापासून जेव्हां भौतिक शास्त्रांचा उगम होऊन ईश्वराची मध्यस्थी एखाद्या गोष्टीची उपपत्तिा लावण्याच्या कामीं न मानण्याचा प्रघात पडला तेव्हां अर्थातच अंतर्ज्ञानसिद्धांतावर पुष्कळांचा विश्वास बसेनासा झाला. पण मुळींच अंतर्ज्ञान नाहीं असें मात्र कोणीहि तत्त्वज्ञानीं म्हणत नाहीं. ज्ञानाचे उगम अनेक असतात, त्यांपैकीं हा एक होय. आयुष्याला चांगली ठाकठिकी आणण्याला अंतर्ज्ञान हें नेहमीं कमीअधिक प्रमाणांत उपयोगी पडतें. अंतर्ज्ञानाचें आस्तित्व आपणाला पुष्कळ गोष्टींवरून सिद्ध करतां येतें. गर्भशास्त्र, तौलनिक-शारीर विच्छेदन आणि जन्मविषयक मनोविज्ञान यांवरून पाहतां असें स्पष्ट होतें कीं बौद्धिक क्रियांनां जीवविकासांत आद्य स्थान नाहीं तर तो 'मागाहूनचा विचार' असून मुख्य जीं हालचाल ती एका विशिष्ठ पद्धतीनें करविण्याकरितां या क्रिया असतात. सर्वमान्य अशा जेम्सलेंजच्या मनोविकारांच्या सिद्धांताप्रमाणें ज्ञानात्मक प्रतिक्रियांपूर्वी बहुधां नेहमीं सेंद्रिय प्रतिसंवेदना होत असतात. शिवाय सहजक्रियेमध्यें शहाणपणा दिसून येत असतो. प्राण्यांची हालचाल बारकाईनें पहातां त्याचें शहाणपण बुद्धीपेक्षां अंतर्ज्ञानाधिष्ठच असावें असें वाटतें. नवीन नवीन शोध कसे लागतात याचें नीट विवरण करीत गेल्यास अंतर्ज्ञानाकडे यशाचा बराचसा वांटा येईल. आपण नेहेमीं व्यवहारांत आपल्या अक्कलहुषारीनें चोख निकाल देत असतों ते बुद्धीला पटणार्या पुराव्यापेक्षां मनाला पटणार्या पुराव्यांवरून बनविलेले असतात यांत शंका नाहीं. तेव्हां ज्ञानाचा एक उगम अंतर्ज्ञानांत आहे हें वरील उदाहरणावरून दिसून येणार आहे. अंतर्ज्ञानवाद्यांचे प्रतिपक्षी असें म्हणतात कीं ज्यांनां आपण तात्काल व सहजोत्पन्न निर्णय असें समजतों ते तसे नसून सदसद्विवेकबुद्धीच्या स्मृतींतून गेलेल्या क्रियांवरून निघालेले असतात, म्हणजे अनुभवजन्य असतात. तसेंच कांहीं रानटीं जातींत बरेंवाईट ओळखण्याचें अंतर्ज्ञान आढळून येत नाहीं. शिवाय अंतर्ज्ञानाचें अस्तित्व असतें तर निरनिराळ्या देशांत व निरनिराळ्या काळांत नैतिक पद्धतींमध्यें जे मोठमोठे भेद दृष्टीस पडतात ते पडले नसते. हे विरोधी पुरावे मननीय आहेत हें कोणासहि कबूल करावें लागेल.
[सं द र्भ ग्रं थ. - कांट-दि क्रिटिक ऑफ प्युअर रीझन. हॉबहाऊस-मॉरल इन एव्होल्यूशन.मार्शल-इन्ंस्टिक्ट अँड रीझन. सदर्लंड-दि ऑरिजिन अँड ग्रोथ ऑफ दि मॉरल इन्ंस्टिक्ट. मेयर -इन्ंस्टिक्ट अँड इंटेलिजन्स (ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॉलॉजी. पु. ४). बर्गसन-क्रिएटिव्ह एव्होल्यूशन. जे. मॅक्कॉश-दि इन्टुइशन्स ऑफ दि माईंड.रायीस-सोर्सेस ऑफ रिलिजिअस इन्साईट.]