विभाग नववा : ई-अंशुमान
अंताजी (उर्फ बाबुराव) मल्हारराव बर्वे - याची आत्या हीं बाळाजी विश्वनाथ पेशवे याची बायको (राधाबाई) होती. कोठुरची रहाणार. याची बायको पिंगळे (पेशवे) घराण्यांतील होतीं. देशस्थ कोंकणस्थ विवाह यावेळीं सुरू झाले. हा निजामाकडे व दिल्लीस मोंगलाकडे पेशव्यांचा वकील होता. हा मुत्सद्दी म्हणून नांवाजला होता. नादिरशहाच्या स्वारीच्या वेळीं हा दिल्लीसच होता. त्यावेळचें साग्र वर्णन याच्या पत्रांत आढळतें. याला पेशव्यांनीं रांजणगांव इनाम दिलें होतें. नादिरशहाच्या स्वारीच्या वेळीं हिंगणे व दीक्षीत यांच्या मदतीनें यानें उत्तरहिंदुस्थानांत जाट, बुंदेले वगैरे सर्व लहान मोठे हिंदुसंस्थानिक एकत्र करून मुसुलमानांविरुद्ध एक जंगी कारस्थान उभारलें होतें, परंतु तें शेवटास गेलें नाहीं. सदाशिवरावभाऊसाहेबांचें व याचें पुढें न पटल्यानें दिल्लीहून हा परत सातार्यास आला. हा कोठुर येथें १७४९ त मेला (म. रि. म. वि.).