विभाग नववा : ई-अंशुमान
अंताजी रघुनाथ - आडनांव कावळे, मालाड (ठाणें जिल्हा) चा सरदेसाई व इनामदार. हा मोठा शूर व हिंदुधर्माचा कट्टा अभिमानी होता. साष्टी प्रांतांत हिंदूंनीं आपलीं धर्मकृत्यें प्रसिद्धपणें करूं नयेत असा फिरंग्यांनीं हुकूम काढला होता. अंताजीपंतानीं आपल्या प्रांतांत हा हुकूम अंमलांत आणला नाहीं आणि इतरांनांहि तो तोडण्यास उत्तेजन दिलें व पेशव्यांकडे याबद्दल फिर्याद केली. तेव्हां फिरंग्यांनीं पंतांचें इनाम जप्त केलें व त्यांनां पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पंत पळून पुण्यास गेले. त्यांच्या सांगण्यावरून पेशव्यांनीं साष्टीवर हल्ला केला (१७३१); व त्यांच्या सांगण्यावरूनच अर्नाळा किल्ला घेतला आणि ठाणें किल्ला व बहुतेक साष्टी प्रांतहि (१७३७ पर्यंत) काबीज केला. याला मराठ्यांच्या पदरीं पुढें तैनात मिळाली. (म. रि. म. वि.)