विभाग नववा : ई-अंशुमान
अंदमान आणि निकोबार बेटें - बंगालच्या उपसागरांतील एक द्वीपसमूह. भूगोलदृष्ट्या ब्रह्मदेश सरकारच्या अमलाखालील प्रिपेरिस आणि कोको बेटें याच द्वीपसमूहांत येतात. ब्रह्मदेशांतील आराकान योमा पर्वतापासून सरळ रेषा बंगालच्या उपसागरांत काढली म्हणजे हा द्वीपसमूह त्या रेषेंत येतो. म्हणून आराकान योमा पर्वताच्या पाण्याखालीं दडलेल्या पर्वताचीं हीं शिखरें आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. अंदमानाचें अगदीं उत्तरेकडील टोंक १३० ३४' ३'' उत्तर अक्षांशांत असून निकोबार बेटांचें अगदीं दक्षिणेकडील टोंक ६० ४५' उत्तर अक्षांशांत आहे. ही पाण्याखालील पर्वताची ओळ ७०० मैल लांब आहे. यांच्या पूर्वेस अंदमानचा समुद्र व पलीकडे ब्रह्मदेशचा किनारा, मलाया द्वीपकल्प आणि सुमात्रा बेट हीं आहेत.
अंदमानचा समुद्र हा बंगालच्या उपसागरास सात रुंद सामुद्रधुन्यांनीं जोडलेला आहे. यांपैकीं सर्वांत रुंद सामुद्रधुनी ९१ मैल लांबीची असून दोन सामुद्रधुन्या ५६६ पुरुष व ७९८ (पुरुष) फॅदमखोल आहेत. बाकीच्या १०० पुरुष खोलीच्या आंतच आहेत. पश्चिमेस ३० मैल बंगालच्या उपसागरांत गेलें किंवा पूर्वेस अंदमान समुद्रांत शंभर मैल शिरलें म्हणजे समुद्राची खोली २००० पुरुषपर्यंत आहे. कांहीं ठिकाणीं सामुद्रधुन्या फार उथळ असल्यामुळें त्या बाजूस प्रवास करणें अत्यंत धोक्याचें आहे हें प्राचीन काळापासून दयावर्दी लोकांस माहीत आहे.
नरकोंदम आणि ''ओसाड बेंटे'' (बॅरन आयलंड्स) हीं वास्तविक सुंदा समूहांतील ज्वालामुखी आहेत व तीं बेंटें व निकोबार बेटें हीं भूपृष्ठभागावरील जो कांहीं कमजोर भाग आहे त्या भागापैकीं एका भागावर वसलीं आहेत. अंदमान बेटें ही थोडीं वरच्या बाजूस सरकलीं असल्यामुळें यांच्याप्रमाणें त्या (अंदमान) बेटांवर धरणीकंपाचें धक्के बसत नाहींत. पुष्कळ अंशीं हीं बेटें जपानच्या बेटांप्रमाणेंच आहेत. एखाद्या भूमध्यसमुद्राच्या एका किनार्यावर पुष्कळ लांबलचक व उंच पर्वतांची ओळ असून व ती ओळ समुद्रांत बुडून जाऊन त्याचीं कांहीं शिखरें लहान लहान बेटांप्रमाणें दिसत आहेत असें या बेटांसंबंधीं वाटतें.
राज्यकारभाराचें मुख्य ठिकाण पोर्ट ब्लेअर असून तें कलकत्त्यापासून ७८० मैल, मद्रासहून ७४० मैल व रंगूनहून ३६० मैल आहे.
बेटांचें फक्त जमीनीचें क्षेत्रफळ ३१४३ चौरस मैल आहे. पैकीं अंदमान बेटांचें क्षेत्रफळ २५०८ चौरस मैल व निकोबार बेटांचें क्षेत्रफळ ६३५ चौरस मैल आहे. लोकसंख्या (१९११) २६४५९. पैकीं अंदमानी लोक १३१७ निकोबारी ८८१८ व काळ्यापाण्यावरील वसाहत (पोर्टब्लेअर) १६३२४.
अंदमानी लोकांची संख्या उत्तरोत्तर एकसारखी कमी होत आहे. एका पिढीच्या पूर्वी ती कमींत कमी ५००० असावी असा अजमास आहे. यापैकीं मुलांची संख्या फक्त शेंकडा २५ आहे. ही लोकवस्ती कमी होण्याचें मुख्य कारण म्हणजे सुधारलेल्या लोकांशीं वारंवार संबंध येऊं लागल्यामुळें त्यांच्यांत असलेले संसर्गजन्य व इतर रोग या लोकांमध्येंहि पसरत चालले असून त्याचा परिणाम लोकसंख्येवर होत आहे.
निकोबारी लोकसंख्येंत फारसा बदल झालेला दिसत नाहीं. इ. स. १८८३ सालीं त्यांची लोकसंख्या ५९४२ असून इ. स. १९०१ सालीं ५९६२ होती.
मानववंशशास्त्रज्ञांनां अंदमानी लोक म्हणजे एक कोडेंच होऊन बसलें आहे. अंदमानी लोकांच्या निरनिराळ्या जाती म्हणजे निग्रिटो मानववंश होय.
ते एका मूळ भाषेच्या पोटभाषा बोलतात. आज जवळ जवळ अनादि काळापासून कोणत्याहि प्रकारची सरभेसळ न होतां अत्यंत पवित्र राहिलेला हा फार प्राचीन अशा एका मानववंशाचा नमुना आहे. हल्लीं ज्या ठिकाणीं अंदमानी लोक राहात आहेत त्याच ठिकाणीं ते प्राचीन काळापासून रहात आहेत असें म्हणण्यास त्यांचें स्वयंपाकघराबाहेरील खड्डे (जागा) हा एकच आधार आहे. हे खड्डे सुमारें १२.१५ फूट असून कांहींच्या तळाशीं शिंपांचे प्रस्तरावशेष (फॉसिल) बनलेले सांपडतात. अंदमानी लोक शिंपांतील प्राणी खातात. त्यावरून हीं शिंपांतील प्राणी खाण्याची चाल अगदीं पुरातन असावी व ते त्याच जागीं रहात असावे हें स्पष्ट आहे.
निकोबारी लोकांची हकीकत इतकी आधारभूत व साकल्यानें देणें शक्य नाहीं. यांच्यांत जी गुंतागुंतीची सुधारणा झाली आहे तिचा अद्यापि पुरतेपणीं अभ्यास झाला नाहीं. तथापि यांच्यांतील स्थानिक दिसणारी भिन्नता बाजूला ठेवली असतां ते सर्व एक लोक असून त्यांचा संबंध हिंदुस्थानांतील लोकांशीं न येतां अगदीं पूर्वेकडील लोकांकडे आहे असें म्हणता येईल. तेनासरीम किनार्याकडून आपण आलों असा त्या लोकांचा समज आहे. यांचा उगम इंडो चिनी लोकांपासून असावा असें आजपर्यंत झालेल्या शोधांवरून वाटतें.
रा ज्य का र भा र.- बेटांतील रानटी लोकांपासून कर वसूल करण्याची तेथील सरकारची वहिवाट नाहीं. करवसूल करणें इत्यादि गोष्टी काळ्या पाण्याच्या वसाहतीस फक्त लागू आहेत. तेथें देखील कैद्यांची व्यवस्था व शिस्त यांकडेच उत्पन्नापेक्षां अधिक लक्ष दिलें जातें.
इ. स. १९०४-०५ सालीं उत्पन्न ९.८ लाख व खर्च १८.३ लाख होता. कैद्यांनीं केलेल्या कामाचें उत्पन्न हीच उत्पन्नाची मुख्य बाब होय.
अंदमान आणि निकोबार बेटांवर एक चीफ कमिशनर नेमलेला असतो. हा व इतर अधिकारी काळ्यापाण्यावरील वसाहतींत राहतात.
अंदमान व इतर बेटें यांची संपूर्ण पाहणी इ. स. १८८३-८६ सालीं झाली आहे. या बेटांतील लोकांसंबंधीं कांहीं माहिती हिंदुस्थान आणि जग या विभागांत (पृ. २६५) दिली आहे. याशिवाय अधिक माहितीसाठीं अंदमान, निकोबार व पोर्टब्लेअर हे तीन लेख पहा.