विभाग नववा : ई-अंशुमान
अंदमान बेटें - हीं बेटें बंगालच्या उपसागरांत असून त्यांवर अंदमान आणि निकोबार बेटें यांवर नेमलेल्या चीफ कमिशनरचा ताबा चालतो. या द्वीपसमूहांत पांच मुख्य बेटें असून तीं एकमेकांच्या जवळ जवळ असून त्या सर्वांमिळून एकच बेट असावें अशी बरेच दिवस कल्पना होती व म्हणूनच या पांच मोठ्या बेटांस 'मोठें अंदमान' असें नांव मिळालें आहें. या पांच बेटांची नांवें येणेंप्रमाणें (उत्तरेकडून दक्षिणेकडे) उत्तरअंदमान, मध्यअंदमान, दक्षिणअंदमान, बरतंग, रटलंड बेट. या पांच बेटांमध्यें चार सामुद्रधुन्या असून त्यांचीं नांवें येणें प्रमाणें आहेत:- ऑस्टेन सामुद्रधुनी, होंफ्रे सामुद्रधुनी, मध्य अथवा अंदमान सामुद्रधुनी, मॅक्फर्सन सामुद्रधुनी. या मुख्य बेटांव्यतिरिक्त परंतु या द्वीपसमूहांत मोडणारीं इतर बेटें म्हणजे-उत्तारेकडे लँडफॉल बेटें, पश्चिमेस इंटरव्ह्यू बेट; नैऋत्येस लेबिरिंथ बेटें व पूर्वेस रिची अथवा अंदमान आर्चिपेलगो हीं होत. यास छोटें अंदमान अशी संज्ञा आहे. या व्यतिरिक्त मोठ्या अंदमानाच्या किनार्यावर लहान लहान २०४ बेटें आहेत असें म्हणतात. या द्वीपसमूहाची सर्वांत जास्त लांबी २१९ मैल असून सर्वांत जास्त रुंदी ३२ मैल आहे व एकंदर जमिनीचें क्षेत्रफळ २५०८ चौरस मैल आहे.
या द्वीपसमूहाचें नांव फार प्राचींन काळापासून अंदमान किंवा याच नांवासारखें एखादें नांव आहे. हनुमान याचा मलाया देशांतील उच्चार हंदुमान असा असून हंदुमान या शब्दापासून अंदमान झालें असावें असें वाटतें व पुराणांतरीं वर्णिलेल्या माकडांचें म्हणजे आर्यांच्या वसाहतींस त्रास देणारे वन्य जातीचें वसतीस्थान असावें असा या बेटांच्या नांवावरून बोध होतो. असा एक तर्क आहे.
मोठें अंदमान डोंगराळ असून सर्व भागांत दाट जंगल आहे. पूर्वकिनार्यावर मुख्यत्वेंकरून डोंगर जास्त उंच आहेत. सर्वांत उंच डोंगर २४०० फूट उंच आहे. छोट्या अंदमानांत थोडा उत्तरेंकडचा प्रदेश वगळला तर बहुतेक प्रदेश सपाट आहे. या बेटांत नद्या मुळींच नसून बाराहि महिने पाणी असणारे कांहीं ओढे आहेत.
अंदमानाच्या किनार्याजवळील समुद्र पुष्कळ ठिकाणीं खोल असून पुष्कळ ठिकाणें बंदरायोग्य आहेत. पोर्ट ब्लेअर हें दक्षिण अंदमानांतील मुख्य बंदर आहे. याच्या उत्तरेकडे कांहीं बंदरें पुष्कळ विस्तृत असून तीं बहुतेक पूर्वकिनार्यावर आहेत. त्यांपैकीं पोर्ट मेडोज, कोलब्रुक पॅसेज, एल्फिन्स्टन हार्बर, स्टेवर्ट साउंड, पोर्ट कॉर्नवालिस हीं बंदरें पूर्वकिनार्यावर असून पश्चिमकिनार्यावर टेंपल साउंड, इंटरव्ह्यू पॅसेज, पोर्ट अॅन्सन, पोर्ट कॅंबेल, पोर्ट मौअट आणि मॅकफर्सन स्ट्रेट हीं बंदरें आहेत या बेटांवरील वनश्रीचा देखावा रमणीय असून पुष्कळ ठिकाणीं असलेल्या पोंवळ्यांचे ताटवे फार रम्य दिसतात.
भूस्तरशास्त्रदृष्ट्या हीं बेटें म्हणजे ब्रह्मदेशांतील आराकान योमा नांवाच्या डोंगरांच्या ओळींपैकीं आहेत. त्या डोंगरांत आणि येथील भागांत पुष्कळ साम्य आढळतें.
अंदमान बेटांतील वनस्पती उष्णकटिबंधांत ज्या सांपडतात त्याच आहेत. या ठिकाणीं विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे येथें नारळाचीं झाडें नाहींत. जंगलांत इमारतीच्या उपयोगी झाडें विपूल आहेत व तीं या बेटांत एक उत्पन्नाची बाब आहे (पोर्ट ब्लेअर लेख पहा).
या बेटांत कांहीं झाडें बाहेरून आणून लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचीं नांवें:- चहा, लायबेरियन, कॉफी, कोको, मॅनिला हेंप, सागवान आणि नारळ.
येथें मुख्यत्वेंकरून भात, कडदणाचीं धान्यें, मका, ऊंस, आणि हळद हीं पिकें काढतात.
येथें वन्य व रानटी प्राणी मुळींच नाहींत. विषारी सर्पाच्या येथें पुष्कळ जाती सांपडतात.
पोंवळ्याच्या बनलेल्या दगडापासून उत्तम चुनखडी तयार होते. कांहीं पक्ष्यांचीं घरटीं व समुद्रकांकड्या चिनी बाजारांत पुष्कळ खपतात; मेण, मध व चित्रविचित्र शिंपा व रंगबेरंगी पक्षी येथें पुष्कळ असून आसपासच्या देशांत यांचा पुष्कळ खप आहे.
सर्वसाधारणपणें येथील हवा उष्णकटिबंधांतील हवेप्रमाणें असते. बहुतेक नेहमीं गरमच असते परंतु उन्हाळ्यांत विशेष उन्हाळा भासतो. मलेरिया व अमांशाचा विकार येथें जास्त दिसतो. कारण बॅ. सावरकर यांचें वजन या रोगामुळें एका वर्षांत चार पांच पौंड कमी झाल्याचें त्यांनीं आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रावरून दिसतें (अॅन एको फ्रॉम अंदमान्स, पा. ७८). पावसाळ्याचें प्रमाण नियमित नाहीं. नैर्ऋत्येकडील पाऊसच वरबहुतेक या भागा पडतो; परंतु ईशान्येकडील पाऊस मुळींच पडत नाहीं असें नाहीं. येथें पाऊस व वारा जरी पुष्कळ असतो तरी वादळें क्वचितच होतात. वादळांचें स्वरूप वेग व दिशा यांविषयींची जी माहिती उपलब्ध होते ती माहिती हिंदुस्थानच्या पूर्व व उत्तर किनार्यावर फार उपयोगी असते. पावसाची सरासरी ११६ इंच (पोर्ट ब्लेअर येथील) आहे.
पोर्ट ब्लेअर कमी पावसाच्या भागांत वसलें आहे. इतर ठिकाणांच्या पावसाचें प्रमाण पाहतां पाऊस दर वर्षी सरासरी १४० इंच पडतो. वादळें इ. स. १७९२ च्या डिसेंबर महिन्यांत पोर्ट कॉर्मवालिस येथें, व इ. स. १८६४ व १८९१ सालीं पोर्ट ब्लेअर येथें झालीं होतीं असें आढळतें.
धरणीकंपरेषेलगत जरी हीं बेटें स्वभावत: वसलेलीं आहेत तरी मोठे धरणीकंप या भागांत मुळींच झालेले नाहींत. इ. स. १८६८, १८८०, १८८१, १८८२, १८८३, १८८६, १८९४, १८९९ सालीं लहान लहान धरणीकंपाचे धक्के बसले होते.
इ ति हा स.- व्यापारी जलमार्गावर हीं बेटें असल्यामुळें त्यांचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून लोकांस माहीत आहे. सातव्या शतकापासून पुढें तर या बेटांचा उल्लेख पुष्कळ प्रवाशांनीं केलेला आहे. या बेटांत राहणार्या वन्य जातींपासून संकटांत सांपडलेले खलाशी वगैरे लोकांस अत्यंत त्रास होत असल्यामुळें इ. स. १७८८ सालीं आर्चिबाल्ड ब्लेअर यास कंपनीसरकारनें या बेटांची पहाणी करून वसाहत करण्याकरितां पाठविलें. नंतर कैदी लोकांची त्या बेटांत काम करण्याकरतां मजूर म्हणून रवानगी करण्यांत येऊं लागली. इ. स. १७८९ सालीं आर्चिबाल्ड ब्लेअर यानें पोर्टेब्लेअर येथें आपलें वसाहतीचें ठिकाण केलें. परंतु इ. स. १७९२ मध्यें लष्करीदृष्ट्या विचार करून पोर्ट कॉर्नवालिस हें मुख्य ठिकाण करण्यांत आलें. परंतु या ठिकाणीं हवा रोगट असल्यामुळें व हवेचा अनुभव असल्यामुळें वसाहतवाल्यांचे अत्यंत हाल झाले. यावेळीं कर्नल किड नांवाचा मनुष्य अधिकारी होता. ब्लेअर आणि किड यांनीं केलेले रिपोर्ट इंडियन अँटिक्वरी पुस्तक २८ व पुढील पुस्तकांत प्रसिद्ध झाले आहेत. पुढें चांचेगिरी व खून पुन्हां वारंवार होऊं लागल्यामुळें इ. स. १८५६ सालीं पुन्हां या बेटांचा ताबा घेण्यांत आला. इ. स. १८५७ च्या बंडांनंतर ब्रिटिश सरकारच्या ताब्यांत पुष्कळ बंडवाले व इतर कैदी सांपडले होते व त्यांची हिंदुस्थानांत व्यवस्था ठेवणें जरा जड जाऊं लागलें. म्हणून त्याच सालच्या नवंबर महिन्यांत या सर्वांची रवानगी या बेटांत करण्यांत यावी असें ठरविण्यांत आलें व इ. स. १८५८ पासून या प्रयोगास सुरवात करण्यांत आली. इ. स. १८७२ सालीं अंदमान आणि निकोबार या बेटांवर एक चीफ कमिशनर नेमण्यांत आला. याच सालीं हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो हे या वसाहतीची पाहणी करण्यास आले असतांना एका कैद्यानें त्याचा खून केला. काळ्या पाण्यावरील वसाहतींची इतर माहिती 'पोर्ट ब्लेअर' यावरील लेखांत पहावी.
इ. स. १९०१ सालीं अंदमानी लोकांची संख्या १८८२ होती. यापूर्वी त्या लोकांची खानेसुमारी कोणी केलेली नाहीं. तथापि त्यांचीं संख्या फार झपाट्यानें कमी होत आहे असें दिसतें. याचें कारण या लोकांत नवीन नवीन रोग शिरूं लागले आहेत.
यांचे तीन जातिसमूह असून त्यांत बारा जाती आहेत. पैकीं येरवा जातिसमूहांत कारि, कोरा, टबो, येरे, केडे, या पांच व बोजिगिंजी जातिसमूहांत बी, बलवा, बोजिग्याब, जुबई, कोल, या पांच असून ओंजेंजरवा जातिसमूहांत ओंजे, व जरवा, या दोन आहेत. यांपैकीं बहुतेक थोरल्या अंदमानांत आहेत. प्रत्येक जातींत कांहींना कांहीं वैशिष्ट्य आढळतें. त्यांची राहण्याची झोंपडी, तीरकमठा,
डागडागीने, स्त्रियांचे पोषाख, केसांची बांधणी, भांडी, भाषा वगैरे गोष्टी साधारणपणें जरी सारख्याच असतात तरी बारकाईनें निरीक्षण करणारास कांहीं वैशिष्ट्य आढळतें. याप्रमाणें कांहीं जाती समुद्रकिनार्यावर वस्ती करून असतात व कांहीं आंत जंगलांत असतात. त्याचप्रमाणें एकच जाति
किनार्यावर व जंगलांत देखील आढळते.
ब्रिटिश लोक येथें येण्यापूर्वी या जातींच्या अगदीं शेजारीं असल्याशिवाय आपआपसांत दळणवळण होत नसावें असें म्हणतात. इतर बेटांत ज्या ठिकाणीं अशा वन्य जातींचीं वस्ती आहे त्या जातींत साधारणपणें दर वीस मैलांस भाषा बदलते. त्याचप्रमाणें याहि बेटांत असावें असा समज आहे.
जातींत परस्पर मित्रभाव असतो; इतर अंदमानी लोकांची माहिती असल्यास त्या जातीचें त्यांच्याशीं वर्तन सभ्यपणाचें असतें. परंतु ज्यांस कधीं पाहिलें नाहीं, मग तो अंदमानी असो किंवा बाहेरील असो, त्यांच्याशीं त्यांचें वर्तन शत्रुत्वाचें असतें. एका जातींत एकाचीं मुलें दुसर्यानें पाळावीं असें या जातींत फार होत असल्याकारणानें जातींतील निरनिराळ्या कुटुंबांनां एकत्र राहण्यास मोठीच मदत झाली आहे. साधारणपणें सहा सात वर्षापर्यंतच मुलें आपल्या आईबापापाशीं असतात.
अंदमानी लोक लढाई खेळण्यास लायक नाहींत, व स्वत:चा जय होईल अशी खात्री असल्याशिवाय हल्ला करीत नाहींत. लढाई करीत असतांना स्वत:च्या रक्षणाची त्यांनां मुळींच फिकीर नसते. जरवा आणि ओंजे लोक त्यांच्याव्यतिरिक्त कोणीहि मनुष्य आला कीं त्यास ठार मारण्यास उद्युक्त होतात. या जाती वगळल्या तर इतर जाती बर्याच माणसाळल्या असून संकटांत सांपडलेल्या खलाशास प्रसंगीं मदत देखील करतात.
या लोकांच्या भाषेंत कोणत्याहि इतर भाषेची भेसळ न झाल्यामुळें शास्त्रीय दृष्ट्या मोठ्या महत्त्वाच्या आहेत.
यांचा धर्म वन्य असून जंगल, समुद्र, रोग व पूर्वज यांच्या भुतांस ते भितात. पुलुगा या दैवतानें हें सर्व जग केलें आहे अशी त्यांची कल्पना आहे. पुलुगा दैवत नेहमीं आकाशांत वास करितें. पूर्वीं तें या बेटांतील सर्वांत उंच डोंगर सॅडलपीकवर रहात असे अशी यांची समजूत आहे. मृत्यूनंतर आत्मा एका वायुरूपी पुलाच्या सहायानें जमीनींत जातो अशी यांची भावना आहे. परंतु पापपुण्याची कल्पना किंवा स्वर्ग व नरक एतद्विषयक कल्पना या लोकांत नाहींत. यांचा स्वप्नावर फार विश्वास असून प्रसंगीं त्यांचें पुढील अचरण स्वप्नाप्रमाणें बदलतें. शपथा, दिव्य करणें, किंवा अशाच प्रकारें एखाद्या दिव्य शक्तीजवळ दाद मागणें वगैरे कल्पना या लोकांत नाहींत.
पुलुगा या शब्दाचें 'ईश्वर' या शब्दानें भाषांतर केलें तर वावगें होणार नाहीं. यास एक पत्नी, एक पुत्र व पुष्कळ मुली आहेत. हा आपल्या पुत्राकडून आपल्या मुलीस आपल्या आज्ञा कळवितो. भुतांवर याचा अधिकार चालत नाहीं. फक्त आपल्याविरुद्ध अगळीक करणारास दाखवून देण्यांतच हा समाधान मानतो. जंगलांतील एरमचौग व समुद्रांतील जुरुविन नांवाचीं भुतें हीं फार त्रासदायक होत अशी समजूत आहे. सूर्य चंद्राची पत्नी असून तारा त्यांचीं मुलें आहेत, व हें सर्व पुलुगाजवळ राहतात. तथापि सूर्यपूजेची कल्पना यांच्यांत यत्किंचितहि नाहीं. चंद्रग्रहणांत ते चंद्राकडे बाण मारून आपली करमणूक करतात. परंतु सूर्यग्रहणांत भीतीमुळें ते स्वस्थ असतात.
अंदमानी लोकांची आत्म्याविषयींची कल्पना स्वत:ची सावली पाहून उत्पन्न झाली नसून पाण्यांतील प्रतिबिंब पाहून उत्पन्न झाली आहे. स्वत:चें प्रतिबिंब हेंच स्वत:चें भूत व मृत्यूनंतर हें निराळ्या जगांत वास करण्यास जातें व एका जगडव्याळ नारळाच्या वृक्षानें ते जग तोलून धरलें आहे अशी त्यांचीं कल्पना आहे. पुनर्जन्माची कल्पना या लोकांत आहे.
एरमचौग जंगलांतील भूत अग्नीस भिते असा यांचा समज असल्यामुळें हे अग्नी नेहमीं बरोबर बाळगितात. निजून उठल्यावर चंद्रसूर्याचा अपमान होऊं नये म्हणून ते स्तब्ध बसतात. वादळांत पुलुगा आपलें स्वरूप प्रकट करतो व धरणीकंप हे आपल्या पूर्वजांचे खेळ आहेत. शकुन, अपशकुन, मंत्र, वगैरे यांच्यांत थोडेफार आहेत. पक्षी व प्राणी यांनां माणसाप्रमाणेंच समजण्यांत येतें. जरवानी ठार मारलेल्या लोकांच्या प्रेतावर दगडांचा ढीग रचलेला असतो व ज्या रस्त्यावरून हे लोक गेले त्या रस्त्यावर दगड ठेवलेले असतात. अमुक ठिकाणीं या लोकांनीं खून केला ही बातमी पक्ष्यांनीं इग्लिशांस देऊं नये म्हणून अशी व्यवस्था केली असते असें प्रत्येक अंदमान्यासं ठाऊक असतें.
यांच्या कथा वगैरे सव्र पुलुगासंबंधानेंच आहेत. अंदमान्यांस माहीत असलेले प्राणी हे सर्व आपले पूर्वज या रूपांत वावरत आहेत असें त्यांस वाटतें. यांमध्यें सण समारंभ फार थोडे असून धार्मिक विधी कांहींच नाहींत. पुरुष व स्त्री यांच्या संबंधाविषयीं कांहीं निर्बंध आहेत. माती, तेल अंगाला निरनिराळ्या व विविक्षित तर्हेनें फांसून हे लोक आजारीपणा, दु:ख, आनंद व अविवाहित स्थिति दाखवितात.
कोणी मरण पावलें असतां त्याची आप्तमंडळी मुक्तकंठानें रोदन करतात. लहान मुलें मरण पावल्यास त्यांस त्यांच्या आईबापांच्या झोंपडींत पुरण्यांत येतें. कुणी मोठे मरण पावल्यास त्यांस पुरण्यांत येतें किंवा त्याची मोट बांधून त्यास एखाद्या झाडाच्या खांदींत व्यवस्थेशीर ठेवण्यांत येतें व असें ठेवणें मानाचें समजतात. ज्या ठिकाणीं असें प्रेत ठेवलें असेल त्या जागेसभोंवतीं वेताच्या पानांच्या माळा लावून त्या जागेकडे सुमारें तीन महिने कुणी जात नाहीं. स्मशानाची जागा निराळीच ठरलेली असते. सुतकांत भुरी माती डोक्यास फांसतात व त्या दिवसांत ते नाचांत भाग घेत नाहींत. कांहीं महिन्यांनंतर त्या मेलेल्या माणसाचीं हाडें धुवून त्याचे तुकडे करण्यांत येतात व त्याचे निरनिराळे दागिने करून त्या मृताचें स्मरण म्हणून अंगावर वापरण्यांत येतात; तसेंच रोग झालेल्या भागावर या हाडांचा स्पर्श केल्यास त्या जागचें दु:ख थांबतें व रोग बरा होतो अशी देखील एक समजूत आहे. कवटीची माळ करून ती मानेवरून पाठीकडे टाकलेली असते. ही कवटी विधवा अगर विधुर अगर अत्यंत जवळच्या आप्तानेंच वापरावयाची असते. ती भुरी माती काढल्यानंतर व एक औपचारिक नाच झाल्यावर सुतकाची मुदत संपते. मृतांची व्यवस्था लावणें हें कांहीं विशिष्ट पद्धतीनेंच होत असतें.
पुरुषांचीं लग्नें सुमारें २६ वर्षाच्या सुमारास व स्त्रियांचीं लग्नें १८ वर्षाच्या सुमारास होतात. गर्भधारण साधारणपणें १६ ते ३५ वर्षांपर्यंत असते. हे लोक अगदीं नागवे असतात. फक्त स्त्रिया गुह्येंद्रियासमोर एकदोन पानें व मागील बाजूस कांहीं पानें येतील अशीं एक माळ करून कमरेभोंवती गुंडाळतात. हवेंतील उष्णतेची यांना फिकीर वाटत नाहीं. परंतु थंडी त्यांस आवडत नाहीं. तहानभूक, जाग्रण, श्रम इत्यादि शारीरिक बाबतींत ते अत्यंत सोशिक असतात. त्यांच्या अंगाची कातडी गुळगुळीत, तेलकट व काळी कुळकुळीत असते. केंस काळे असून कुरळे असतात; तोंड मोठें असून डोळे काळें व पाणीदार असतात. दांत पांढरे स्वच्छ असून निरोगी असतात.
हे लोक दिसण्यांत धट्टे कट्टे दिसतात. परंतु रोगास फार लवकर बळी पडतात. त्याचप्रमाणें एखादा रोगी बरा झाल्यास पूर्ववत धट्टा कट्टा होण्यास अवधि फार थोडा लागतो. शरीराचा कोणताहि भाग गोंदून घेण्याची यांच्यांत रीति नाहीं. अलीकडे हिंवतापाच्या साथीनें या लोकांतील प्राणहानि फार होत आहे.
बालपणीं अंदमानी मनुष्य बुद्धिवान दिसतो. परंतु लवकरच ही स्थिति कळसास पोंचते व अंदमानी वयांत आलेल्या मनुष्याची ग्रहणशक्ति सुधारलेल्या राष्ट्रांतील दहा बारा वर्षांच्या मुलाच्या इतकीच असते असें म्हणण्यास हरकत नाहीं. यांनीं शेतकी कधीं केली नाहीं, कोणतेहि प्राणी यांनीं कधीं पाळले नाहींत व मासे मारण्याचेंहि काम यानीं कधीं केलें नाहीं. आंकड्यांचें ज्ञान यांस नसतें. एखादा नकाशा काढून त्यांस काहीं समजून देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांस ती गोष्ट समजते. एखाद्या बालकाप्रमाणें यांचीं स्मरणशक्ति चांगली असते व फारच थोडावेळ ती असते. हा मनुष्य परकी लोकांविषयीं संशयी परंतु त्यांचा पाहुणचार करतो. हा बहुधा अनुदार असतो; सदा आनंदी व त्यांच्यांत मानलेल्या शकुनापशुनाविषयीं निष्काळजी; स्वत:वर संकट येईल व त्या संकटाचा परिणाम वाईट होईल ही कल्पनाच त्यास नसल्यामुळें तो स्वत:विषयीं बेपर्वा असतो. आपमतलबी हा असतोच तथापि थोडा फार उदारपणाहि याच्यांत दिसतो व मानापमानाचीहि कल्पना यास असते. अंदमानी लोक आपसांत फार प्रेमभावानें वागतात; त्याचप्रमाणें वयोवृद्ध, अशक्त व निराश्रित यांची ते काळजी वाहतात. आपल्या मुलांविषयीं त्यांस फार अभिमान वाटत असतो. परंतु राग आला असतां ते अत्यंत निष्ठूर, संशयी, अविश्वास व सूड घेण्यास तत्पर असे असतात. हे लोक स्वभावत: स्वतंत्र वृत्तीचे आहेत. विश्वास ठेवण्याच्या लायकीचे हे लोक नाहींत; व कितीहि शिक्षण दिलें तरी यांच्यात सुधारणा होणें अशक्य आहे.
यांचे खाणें मासे, पोर्क, टर्टल, रानमांजर, शेलफिश, कांहीं किडे, नानाप्रकारचीं फहें, कंदमुळें, मध वगैरे असून त्यांचा कधीं त्यांनां तोटा पडत नाहीं. अन्न नेहमीं शिजवून व बहुश: ऊन असतांनाच खातात.
लहान अंदमान व जरबा लोक वगळले तर बाकीचे लोक एकाच ठिकाणीं फार दिवस रहात नाहींत. तरी आपला प्रदेश सोडून फार लांबवर ते राहण्यास जात नाहींत.
हे नाचाचे फार शोकी आहेत. दर दिवशीं संध्याकाळीं नाचापुरती मंडळी एकत्र जमली असली तर त्यांचा नाच व्हावयाचाच. कधीं कधीं तर नाच सर्व रात्रभर चालू असतो.
संसारांत स्त्रीपुरुषाचीं कामें बहुतेक वांटलेलीं असतात, व स्त्रियांचा सामाजिक दर्जा पुरुषांपेक्षां कमी प्रतीचा मानला जातो. तथापि स्त्रियांचें समाजावर वजन नसतें असें मात्र नाहीं. म्हातारपणांत तर स्त्रियांनां मानानें वागविण्यांत येतें.
या लोकांत लग्नानंतर घटस्फोट क्वचितच होतो व मूल झाल्यानंतर तर कधींच होत नाहीं. त्याचप्रमाणें बहुपतीत्व व बहुभार्यात्व या चाली यांच्यांत नाहींत. लग्नानंतर वाईट चालीचे कोणी निघाल्यास दोघांहि दोषी माणसांचा शक्य असल्यास खून करण्यांत येतोच असा प्रकार नाहीं. लग्न-विधि जरी धार्मिक नसला तरी त्यावेळीं विशेष समारंभ होतो. जोडप्यापैकीं कोणी मरण पावल्यास पुनर्विवाह बहुतेक होतो. लग्नें जमविणें हें आईबापांचें कर्तव्य मानलें जातें व केवळ
आईबापांनीं लग्न ठरविलें कीं लग्न झालें असें मानण्यांत येतें. जात्याभिमान या लोकांत फारसा नाहीं व दुसर्या सोयी जमल्या तर या लोकांचा निराळ्या जातींतहि लग्नव्यवहार होतो.
रोजच्या व्यवहारांतहि कांहीं निर्बंध पाळले जातात. नवराबायकोच फक्त एकत्र भोजन करूं शकतात. विधवा, विधुर, अविवाहित तरुण व कुमारिका यांचें भोजन त्यांच्या त्यांच्यांत होतें. कोणीहि पुरुष आपल्यापेक्षां तरुण व विवाहित स्त्रिशीं सहसा भाषण करीत नाहीं. त्याचप्रमाणें आपल्या बायकोच्या बहिणींस किंवा आपल्यापेक्षां लहान असलेल्या नातेवाइकाच्या बायकोस तो स्पर्श करीत
नाहीं.
शब्दांचा भरणा त्यांच्या भाषेंत कमी असल्यामुळें निरनिराळे विकार त्यांनां भाषेनें सांगतां येत नाहींत. उदाहरणार्थ परस्परांची भेट झाली असताना ते फक्त एकमेकांकडे टवकारून बराच वेळ पहात असतात. नंतर त्यांच्या गोष्टी सुरू होतात.
प्रत्येक मुलाचें नांव आई ठेवते. मुलांची नांवे निराळीं व मुलींचीं निराळीं असा प्रकार यांच्यांत नसल्यामुळें गर्भारपणाचीं चिन्हें दिसूं लागताच नांव ठेवण्यांत येतें. नंतर प्रसंगानुसार त्या मुलास टोपणनांवहि मिळतें. त्यांच्यांत ठरलेल्या वीस नांवांपैकीं कोणतें तरी एक नांव आई ठेवते. त्याचप्रमाणें मुली वयांत आल्या कीं त्यांस ठरलेल्या सोळा फुलांपैकीं एक नांव प्राप्त होतें. ती ज्या वेळीं वयांत आली असेल त्यावेळीं फुलत असलेल्या फुलाचें नांव तिजला मिळतें.
यांचा आयुष्यक्रम म्हटला म्हणजे भक्ष्याकरितां शिकार करणें व रात्रीं नाचणें हेंच होय. आपलीं शस्त्रें, तिरकमठा, भाले वगैरे ते स्वत:च तयार करतात.
राजाची कल्पना यांच्यांत नाहीं. तथापि प्रत्येक जातींत कुणीतरी मुख्य माणूस असतोच. यास थोडा फार मान देखील असतो. या मुख्य माणसाची बायको ही बायकांत प्रमुख असते; व तो मुख्य मनुष्य मरण पावला व त्याची बायको तरुण नसून मातृपदास पोचलेली असली तर तीस त्याच्या मागून पूर्ववत मान मिळतो. खून, चोरी, खोडी किंवा बाहेरख्यालीपणा वगैरेंबद्दल ज्याचें नुकसान झालें असेल तोच पुढील परिणामाची दिक्कत न बाळगतां आगळीक करणारावर सूड उगवितो. कधीं खूनहि होतात. खून झाल्यास मृताच्या आप्तांनीं आपणांवर सूड उगवूं नये म्हणून खुनी कांहीं दिवस नाहींसा होतो. या लोकांचीं स्मरणशक्ति कमी असल्यामुळें यांनां कोणत्याहि गोष्टीचा लवकरच विसर पडतो व कांहीं दिवसांनीं तो खुनी मनुष्य पुन्हां परत आल्यावर त्यास बिनधोक राहतां येतें. कारण त्यानें केलेल्या कृत्याची कोणास आठवणच रहात नाहीं.
मालमत्ता सर्व जातीची आहे असें मानण्यांत येतें. अंदमानी मनुष्य आपले दागिने कोणी मागेल त्यास खुषीनें देईल. अतिशय जरूरीच्या वस्तू कोणी नेल्याखेरीज कोणी कांहीं चोरी करतो असें या लोकांस वाटत नाहीं.
इ. स. १८५८ सालीं पोर्ट ब्लेअर येथें काळ्या पाण्याची वसाहत वसविल्यापासून या लोकांकरितां एक वसतिगृह बांधण्यांत आलें आहे. कोणाहि अंदमान्यानें वाटेल तितके दिवस येथें रहावें व वाटेल तेव्हां निघून जावें. त्यास कोणी मनाई करीत नाहीं. जोंपर्यंत तो तेथें असतो तोंपर्यंत त्याची योग्य रितीनें अन्न पाणी वगैरेंची काळजी घेण्यांत येते. या वसतिगृहांतून त्यानें कांहीं अवश्यक गोष्टी जातांना बरोबर नेल्या तरी त्यास कोणी हरकत करीत नाहीं. याच्या मोबदला पळून गेलेले कैदी शोधून काढण्यांत व जंगलांतील कांहीं उपयुक्त वस्तू गोळा करण्याकडे यांचा उपयोग करून घेण्यांत येतो. यांनां पैशाची कल्पनाच नाहीं. यांस पैसे न देण्याविषयीं सक्त नियम आहेत. कारण यांस पैसे दिले कीं दारू पिण्यांत ते पैसे खर्च करून टाकतात.
ब्लेअर व किड (१७८०-९६) यांच्या काळांत या जाती परकी लोकांशीं वैरभावानें वागत असत. परंतु ती स्थिति आतां पालटली आहे.
अन्दमान येथें आतां राजकीय कैदी मुळींच नाहींत. ज्यांच्या शिक्षेची मुदत संपली नव्हती त्यांनां १९२१ सालच्या जुलै महिन्यांत इकडे आणण्यांत आलें आहे. पुढें १९२१ च्या फेब्रुवारी महिन्यांत सरकारनें राजकीय कैद्यांनां यापुढें अंदमानावर पाठवूं नये असें ठरविलें आहे.
१९२३ मध्यें अंदमान बेटांत आंग्लोइंडियन लोकांची वसाहत करण्याचें ठरलें व तेथील हवा एकंदरींत रोगट नाहीं असें मत पुढें करण्यांत आलें. नोव्हेंबर १९२३ मध्यें लष्करी नोकरींतून सुटलेल्या १३ शिपायांनां निवड-मंडळानें अंदमान बेटांत प्रथम वसाहत करण्यास पाठवावें असें ठरविलें.