विभाग नववा : ई-अंशुमान
अंधक (१) - एक असुर. कश्यप् व दितीच्या या पुत्राला हजार हात व डोकीं, दोन हजार डोळे व पाय होते. दृष्टि असूनहि हा आंधळ्याप्रमाणें चाले, म्हणून याला अंधक नाव पडलें. स्वर्गांतून पारिजातक वृक्ष नेण्याचा प्रयत्न करीत असतां शिवानें याला मारिलें. या कृत्यावरून शिवाला अंधकरिपु असें संबोधितात. हा एकदा महादेव व पार्वती यांच्यासहित क्रिडा करीत असता तिचें हरण करण्यास उद्युक्त झाला. त्यावरून महादेवाचें व याचें अवंती देशातील महाकाल नामक वनांत मोठे घोर युद्ध झालें. त्यात याच्या रक्तापासून अनेक अंधक उत्पन्न होऊं लागले. असें पाहून महादेवानें याचें रक्त वरल्यावरच नाहींसें करण्यासाठीं मातृगण उत्पन्न केला तथापि ते नि:शेष होईना, म्हणून विष्णूनें शुष्करेवती नामक देवता उत्पन्न करून तिजकडून तें अगदीं नि:शेष करविलें. तेणेंकरून इतर अंधक नाश पावून एकच मूळचा अवशेष राहिला. नंतर त्यास मारावें इतक्यांत त्यानें महादेवाचें अतिशय करुणस्वरानें स्तवन केलें. त्यावरून महादेव प्रसन्न होऊन त्यांनीं यास आपलें गणत्व दिलें (मत्स्य. अ. १७९). याचा पुत्र आडी असुर.
(२) महिषासुराच्या सेनेंतील एक प्रमुख असुर.
(३) (सो. वं.) नहुषपुत्र ययाति राजा, त्याच्या क्रोष्टा ना.
यदुपुत्राच्या वंशांत जन्मलेला सात्वत राजा. त्याच्या सात पुत्रांतील साहवा. यास कुकुर, भजमान, शुचि आणि कंबलबर्हिष असे चार पुत्र होते. या अंधकाचें कुल यदुवंशांत मोठें प्रसिद्ध होतें.
(४) लोक. यांचा उल्लेख महाभारतांत अनेक ठिकाणीं आलेला आहे. कुकुर व वृष्णि लोकांप्रमाणें अंधकांनींहि जरासंधाशीं न लढण्याचें ठरविलें होतें. (म. भा. २. १९). महारण्यांत अंधक पांडवांनां भेटले (३. १२). वृष्णीबरोबर या लोकांचा पुष्कळ वेळां उल्लेख आलेला आहे. यांच्या (यदुकुलाच्या) नाशाची कथा भागवत व विष्णुपुराण यांतून सांपडते.
एकदां यादव भैरेयक नांवाचें मद्य पिऊन धुंद झाले व एकमेकांत कलह करूं लागले. त्याचा परिणाम घनघोर युद्धांत झाला. दाशार्ह, वृष्णि, अंधक, भोज, सात्वत, मधु, विसर्जन कुक्कुर व कुंती या यादववंशांतील वीर अर्बुद, माथुर, शूरसेन इत्यादि देशांतील वीराशीं लढूं लागले. आप्तेष्ट कोण यांचीहि शुद्ध राहिली नाहीं. शेवटीं कृष्ण व बलराम यांखेरीज सर्वांचा नाश झाला.
(५) (सो. वं.) वरील अंधकाच्या कुलांत जन्मलेल्या अनुराजाचा पुत्र दुंदुभी नामक पुत्र होता.