विभाग नववा : ई-अंशुमान

अंबत्तन - दक्षिण त्रावणकोरमधील नापितांच्या जातीला अंबत्तन असें म्हणतात व मध्य व उत्तर त्रावणकोरमध्यें त्यांनां क्षौरकन असें म्हणतात. या जातीचे आणखी तीन विभाग आहेत ते:- (१) जे मल्याळम् भाषा बोलतात व ज्यांनां मक्कथयम वारस कायदा संमत आहे असे. (२) मल्याळम् भाषाच बोलणारे पण त्यांनां मरुमक्कथयम वारस कायदा संमत आहे असे. (३) तामिळ भाषा बोलणारे. यांचे सण, पोषाख, दागिने वगैरे मल्याळ शूद्रांप्रमाणें असतात.

यांनां हजामतीखेरीज वैद्यकी अवगत असते. यांच्या बायका सुईणीचीं कामे करितात. मनुस्मृतींतील अंबष्ठींशीं आपला संबंध जोडून हे आपल्या जातीची श्रेष्ठता दर्शवितात. यांच्या लग्नांतून ब्राह्मण भिक्षुकी करितात. सालेम जिल्ह्यांतील कोंग वेल्लाळांमध्यें अंबत्तन हे लग्नें चालवितात. यांच्यांत विधवाविवाह मुळींच होत नाहींत. मृतांनां जाळण्यांत येतें; फक्त लहान मृत मुलांनां पुरतात. र्औध्वदैहिक संस्कार ब्राह्मणच करितात.

यांच्यांत शैव व वैष्णव दोन्ही आहेत. वैष्णव मद्यमांस सेवीत नाहींत. एकमेकांत लग्नें होतात. हे कोमट्यांच्या पंक्तीला बसत नाहींत, त्यांच्या हजामती मात्र करितात.

हल्लीं अंबत्तन मद्रास इलाख्यांतील सबंध तामिळ प्रदेशांतून दिसतात. दर गांवीं एक पेरिथमक्कारन म्हणून मुख्य असतो. तो तंटे वगैरे तोडतो. लग्नांवर कर बसवून त्या पैशांतून छत्रें चालवितात. दर गांवीं अंबत्तनानां इनामी जमीनी असतात.