विभाग नववा : ई-अंशुमान
अंबर (धातु) - उत्तर ब्रह्मदेशांतील जुन्या खाणींत अद्यापहि अंबर सापडतो; परंतु बाल्टिक अंबरची आयातहि हिंदुस्थानांत व ब्रह्मदेशांत बरीच आहे. देशी औषधांत याचा उपयोग करितात. यूरोपांत अंबर जवसाच्या किंवा शिरसाच्या तेलांत उकळून तो पारदर्शक व नरम झाल्यावर त्याचे मणी, स्त्रियांच्या केशकलापांत घालावयाच्या सळ्या वगैरे जिन्नस करतात. ब्रह्मदेशांत श्रीमंतांच्या बायका अंबरचे दागिने कानांत घालतात. ब्रह्मी अंबर इतर अंबरपेक्षां कठिण व चिंवट असल्यामुळें कातकाम व खोदकाम करण्याला तो अधिक चांगला असतो.