विभाग नववा : ई-अंशुमान
अंबर उदी - स्पर्मव्हेल नांवाच्या माशाच्या आंतड्यांत बनणारा हा पदार्थ आहे. हिंदुस्थान, आफ्रिका व ब्राझिल येथील समुद्रकिनार्याला अंबर कधीं कधीं (जलपृष्ठावर) तरंगतांना आढळतो; व हिंदुस्थानच्या बाजारांत अंबर-ई-अंबर, अनबर अथवा अरब या नांवानें विकला जातो.
गु ण ध र्म व गै रे - हा पदार्थ वजनानें अगदीं हलका व अतिशय ज्वालाग्राही असून त्याला एक प्रकारचा सुगंध असतो व उष्णता लावल्यास (तापविल्यास) तो बहुतेक उडून जातो. याचा औषधाकरितां उपयोग करितात. व्यापारीदृष्ट्या हल्लीं याला फारशी किंमत नाहीं; परंतु एके काळीं तो फार महत्त्वाचा समजला जात असे. ग्रीक व रोमन लोकांनां याची मुळींच माहिती नव्हती; यूरोपला या पदार्थाविषयीं माहिती अरब लोकांकडून झाली. मालदीव बेटांत समुद्रकिनार्याला सांपडणार्या उदी अंबरावर राजाची सत्ता असे, असें फ्रान्सिस पिरार्ड यानें १६०१ सालीं लिहिलें आहे. आपलें सिंहासन सुगंधित करण्याकरितां या पदार्थाचा कसा उपयोग करीत, याचें वर्णन जहांगीर बादशहानें आपल्या आत्मचरित्रांत दिलें आहे. कांहीं काळापूर्वी यूरोपांत अन्नाला एक प्रकारचा स्वाद आणण्याकरितां या पदार्थाचा उपयोग करीत.