विभाग नववा : ई-अंशुमान
अंबरनाथ अथवा अमरनाथ - मुंबई इलाखा. ठाणें जिल्हा. कल्याण तालुक्यांतील जी. आय. पी. रेलवेच्या अंबरनाथ स्टेशनच्या पश्चिमेस सुमारें एक मैलावर असलेलें खेडें. उ. अ. १९० १२' व पू. रे. ७३० १०' लो. सं. (१९०१) ४८५. मुंबई वाढविण्याच्या योजनेंत अंबरनाथाचा समावेश होत असून त्या भागांत नवीन औद्योगिक शहर वसविण्याची खटपट चालू आहे. अनेक कारखाने काढण्याकरितां स्टेशनाजवळच्या जी. आय. पी. रेलवेच्या आग्नेय शाखेलगतची १८ लाख चौरस यार्ड जागा अडकविण्यांत येणार आहे. उल्हासनदीचा पाणीपुरवठ्याच्या कामीं उपयोग करण्यांत येईल.
अ म र ना थ दे वा ल य - या गांवाच्या पूर्वेस सुमारें १ मैलावर व कल्याणच्या आग्नेयीस साडेचार मैलांवर बालधान (वढवाण) नांवाच्या लहान नदीकांठीं एका सुंदर दरींत आहे. येथील देखावा फारच नयनमनोहर आहे.
हें देवालय बरेंच मोडकळीस आलेलें आहे. येथें त्रिमूर्तीची (शंकराची) स्थापना केली आहे. हें देवालय पश्चिमाभिमुख असून सभामंडपास एक दक्षिणेस व एक उत्तरेस असे दोन दरवाजेहि आहेत. तीनहि दरवाजांसमोर कमानी आहेत; व त्या कमानींनां प्रत्येकी चार चार सुबक खांब आहेत.
पश्चिमद्वारीं एक भग्न नदी आहे. यावरून तें शिवाचेंच देवालय आहे हें सिद्ध होतें. या देवालयाचें खोदीव नक्षीकाम इतकें अप्रतिम व सुबक आहे कीं त्याचें वर्णन करणेंच अशक्य आहे. भिंती, छत व स्तंभ वगैरे ठिकाणीं कालीदेवी, त्रिमूर्ती गणेश वगैरे देवादिकांचीं चित्रे व इतर चित्रविचित्र आकृती खोदून काढल्या आहेत. त्या खरोखरच प्रशंसनीय आहेत. सर्व काम दगडी आहे.
८६० सालीं बांधलेल्या देवालयाचीच सामुग्री घेऊन हें देवालय पुढें केव्हां तरी पुन्हां बांधलें असावें. सभामंडपाच्या उत्तराद्वारावर पुढील लेख खोदलेला आहे. तो बंदिस्त जागा असतांहि बराच जीर्ण झाला आहे. यावरून या देवालयास पूर्वी एकदां जीर्णावस्था प्राप्त झाली होती हें उघड दिसतें.
'शक संवत् ७८२ ज्येष्ठ शुद्ध ९ रोज शुक्रवार ते दिवशीं हें देवालय महामंडलेश्वर श्री महाबनिराज यानें बांधलें.' [इं. गॅ. इं. अँ. ३ पा. ३१६-२०].