विभाग नववा : ई-अंशुमान
अंबरीष - (१) एक ब्रम्हर्षि (३ अंगिरा शब्द पहा.) (२) (सू. वं.) वैवस्वत मनूचा नववा पुत्र नभग. त्याचा पौत्र व नाभाग राजाचा पुत्र हा, परमदानशूर व भगवद्भक्त असून, पराक्रमीहि इतका होता कीं, यानें भूमीचा जय सातां दिवसांत करून तिचें आधिपत्य संपादिलें होतें (भार. शांति. अ. १२४). यास विरूप, केतुमान, आणि शंभु असे तीन पुत्र होते व याला, क्वचित नाभाग असेंहि म्हटलेलें आहे (भार. द्रोण. अ. ६४).
एकदां यास कार्तिक मासांतील, देवत्रयांचें त्रिदिनात्मक (एकादशी) व्रत असतां द्वादशीच्या दिवशीं याच्या घरीं दुर्वासऋषि अतिथि प्राप्त झाला. त्याची यानें पूजा करून त्यास भोजनार्थ राहवून घेतलें. दुर्वासहि तथास्तु म्हणून उर्वरित आन्हिक करण्यास नदीतीरीं गेला; त्या दिवशीं द्वादशी थोडी होती हें दुर्वासास विदित नसून यानेंहि त्यास सुचवावें तेंहि सुचविलें नाहीं त्यामुळें दुर्वास आपलें आन्हिक सावकाशपणें आटोपून येत आहे तो द्वादशी आतिक्रांत होत आहे असें जाणून यानें देवास नैवेद्य समर्पण केला व व्रतभंग होऊं नये अशा उद्देशानें भोजन न करतां दाद्वशींत देवाचें तीर्थ प्राशन करून पारणें केलें. हें दुर्वासानें जाणून आपल्या जटेंतींल केंसापासून एक कृत्या निर्माण करून यावर सोडिली, इतक्यांत विष्णूच्या सुदर्शन चक्रानें येऊन त्या कृत्येचा नाश केला; व सुदर्शन दुर्वासावर धांवलें. परंतु त्याच्या तप:प्रभावानें त्याच्या अंगास स्पर्श करण्यास तें समर्थ झालें नाहीं. नंतर दुर्वांस तेथून निघाला असतां चक्रहि त्यामागें निघालें. तें पाहून तो विष्णूकडे गेला. तेव्हां विष्णूनें सांगितलें कीं तूं अंबरीषाकडेसच जा. तो तुजकरतां निराहारी राहिला आहे, त्याचें समाधान कर म्हणजे हें चक्र तुला सोडील यावरून दुर्वास अंबरीषाकडे परत आला. या गोष्टीस एक संवस्तर झाला असतांहि अंबरीषाने भोजन केलें नव्हतें. दुर्वासास पाहतांच त्यास परम हर्ष होऊन त्यानें सुदर्शनाची बहुत प्रकारें स्तुति केली. तेणेंकरून तें संतुष्ट होऊन स्वस्थळी जातांच यानें दुर्वासास उत्तम प्रकारचें यथेच्छ भोजन देऊन आपणहि भोजन केल्यावर दुर्वासास मार्गस्थ करून स्वस्थ राहिला. (भाग. नवम. अ. ४-६).
(३) (सू. वं.) इक्ष्वाकुकुलोत्पन्न मांधाता राजास बिंदुमती भार्येच्या ठायीं झालेल्या तीन पुत्रांतील दुसरा. यास धर्मसेन असें नामांतर असून पुत्र यौवनाश्व नांवाचा होता.
(४) (सू. वं.) इक्ष्वाकुकुलोत्पन्न त्रिशंकु राजा, त्याच्या दोन पुत्रांतील दुसरा. यास श्रीमती नामक कन्या होती. ती नारद आणि पर्वतऋषी यांच्या वादांत विष्णूस प्राप्त झाली. हा विष्णु द्वादशादित्यांतील असणें योग्य दिसतें. (वा. रा. अद्भुत्तोत्तर. स. अ. ३-४ ).
(५) (सू. वं) इक्ष्वाकुकुलोत्पन्न भगीरथ राजाचा पौत्र, व नाभ अ. नाभाग राजाचा पुत्र, याच्या पुत्राचें नांव सिंधुद्वीप असें होतें.