विभाग नववा : ई-अंशुमान
अंबलक्कारन् - ग्रामरक्षकाचा किंवा शेतकीचा धंदा करणारी एक तामिळ जात. हे लोक मुख्यत्वेंकरून त्रिचनापल्लींत आढळतात. पणांत आल्याखेरीज यांच्यांत मुलींचीं लग्नें करीत नाहींत. विधवाविवाहाला आडकाठी नाहीं. पण वाटेल तेव्हां घटस्फोट करतां येत नाहीं. मद्यमांसाशनाला हरकत नसते. ही जात कल्लनांत धरितात. पण तें यांस मान्य नाहीं. केवळ आपल्याच पोटजातींत विवाह करणारे यांच्यांत कांहीं वर्ग आहेत. कांहीं ब्राह्मणांनां पुरोहित नेमतात, व औध्वंदैहिक आणि श्राद्धप्रसंगीं जानवें घालतात. यांचा नेहमींचा धंदा शेतकीचा आहे. पण कांहीं लहानसहान व्यापारांत पडतात. यांच्यांत गांवपंचायती आहेत.