विभाग नववा : ई-अंशुमान
अंबलवासि (अंतरल्ल) - यांची वस्ती मद्रास इलाखा, कोचीन व त्रावणकोर संस्थान यांतून आहे लोकसंख्या (१९११) ३३४०६. या लोकांनां देवळांत नोकरी करण्याचा जन्मसिद्ध हक्क असतो. यांच्यांत १२ भेद आहेत. या बारा जातींपैकीं बहुतेक विदुर आहेत. त्यांच्यांत यज्ञोपवीत धारण करणारे व यज्ञोपवीत धारण न करणारे असा भेद आहे. पहिल्या भेदांत अदिकल (अतिकल) चाक्कियार, नावियार, नबिस्सन अथवा पुश्यकन, पुप्पल्लि, नत्तुपत्तन अथवा पत्तरुन्नि, थियत्तुन्नि व पित्तन्मार या जाती येतात. चाक्कियार नांबियार, पिषरोति, वारियन, पुधुवाल व मारार या जाती दुसर्या भेदांत येतात.
अदिकल जातीचे लोक मूळचें ब्राह्मण होते. परंतु भद्रकाली देवालयांत पुजार्याचें काम केल्यामुळें समाजांत त्यांचा मान कमी झाला. यांच्यांत उपनयन होतें; व हे गायत्री पाठ करतात. त्यांच्यांत मातृकन्यापरंपरेचा वारसाचा कायदा चालू आहे.
अंबलवासि जातीचा दुसरा पोटभेद चाक्कियार हा आहे. व्यभिचाराबद्दल जातीबाहेर टाकलेल्या नम्बुद्रि लोकांच्या पुत्रपौत्राच्या जातीला हें नांव आहे. एखादी नंबुद्रि जातीची स्त्री व्यभिचारी आहे असें जातिसभेनें ठरविलें तर तिच्या उपनयन झालेल्या मुलांनां चाक्कियार जातींत टाकतात. व उपनयन न झालेल्यांनां नांबियार जातींत टाकतात. चक्कियार लोक पुराण व इतिहास यांचा अभ्यास करतात, व त्यांवर व्याख्यानें देतात. हे लोक यज्ञोपवीत धारण करतात व गायत्री पठण करतात. रामायण, महाभारत व भागवतपुराण यांतील कथा सांगण्याचा यांचा धंदा आहे.
नांम्बिया, नाम्बिस्सन अथवा पुष्पकन हा अम्बलवासि जातीचा पोटभेद आहे. एका ब्राह्मणाला आपली स्त्री व्यभिचारी आहे असा संशय तिच्या गरोदरपणांत आल्यामुळें त्यानें तिला टाकलें. तिला झालेल्या मुलीपासून जी संतति झाली तिच्यापासून या जातीची उत्पत्ति आहे असें म्हणतात. या जातींतील बहुतेक लोक उपनयान करतात. हे लोक यज्ञोपवीत धारण करून गायत्री पठण करतात. त्यांचा धंदा देवळांत नोकरी करण्याचा आहे.
धियत्तु अथवा घियत्तुन्नि हाहि अंबलवासी जातीचा पोटभेद आहे. व हे लोक धर्मभ्रष्ट ब्राह्मण आहेत असें सांगतात. भद्रकालीची पूजा हें त्यांच्या धर्मभ्रष्टतवाचें कारण आहे. त्यांच्यांत उपनयनाची चाल आहे ब्राह्मण लोक या जातीच्या कुमारिकेशीं लग्न करूं शकतात.
नत्तुपत्तन अथवा पत्तरुन्नि हा अंबलवासि जातीचा पोटभेद आहे. याच जातींतील लोक या जातीचें उपाध्यायाचें काम करतात. हे यज्ञोपवीत धारण करतात व गायत्री पठण करतात. कालीच्या देवळांत पूजा करणें हा यांचा धंदा आहे.
पितरन्मार हा अंबलवासि जातीचा पोटभेद आहे. व हे लोक हलक्या दर्जाचे अदिकल जातीचे आहेत.
कुरुक्कल हे त्रावणकोरचे अंबलवासि आहेत. हे लोक अंबल वासी जातीच्या इतर पोटभेदांपेक्षां आपण श्रेष्ठ आहों असें म्हणतात. यांच्यांत उपनयन व गायत्री पाठ करण्याची चाल आहे.
यज्ञोपवीत धारण न करणार्या अंबलवासि जातीचा बारियर नांवाचा पोटभेद आहे. या जातींतील लोक शूद्र स्त्रींशीं विवाह केलेल्या ब्राह्मणांचे वंशज आहेत असें सांगतात. यांच्या चालीरीती नायर लोकांप्रमाणें आहेत.
यज्ञोपवीत धारण न करणार्या अंबलवासि जातीचा नांबियार नांवाचा एक पोटभेद आहे. या लोकांची उत्पत्ति जातीबाहेर टाकलेल्या नंबुद्रि स्त्रीच्या उपनयन न झालेल्या मुलापासून आहे. यांचा धंदा चाक्कियार जातीला मदत करणें हा आहे.
यज्ञोपवीत धारण न करणार्या अंबलवासि जातीचा पुटुवाल नांवाचा पोटभेद आहे. त्यांचा धंदा देवळांवर पहारा करण्याचा व कारभार्याचें काम करण्याचा असतो.
मारार हा यज्ञोपवीत धारण करणार्या अंबलवासिजातीचा पोटभेद आहे. देवळांत गायनवादनाचा व कोठीवाल्याचा धंदा हे करतात. हे मूळचे शूद्र होते. परंतु कांहीं अवश्यक कारणामुळें त्यांनां देवळांत घ्यावें लागलें.
अंबलवासि जातीमध्यें घटस्फोटाची चाल असून नंबुद्री ब्राह्मणास द्वितीय पति म्हणून वरण्यास कोणत्याहि प्रकारची हरकत नसते. यांची अंतर्व्यवस्था नंबुद्री ब्राह्मणांप्रमाणेंच असते. सर्वसाधारण विधींसाठीं ते आपल्यांतूनच भटजी निवडतात. कांहीं विधि ब्राह्मणांकडून करवितात. सुतक किंवा वृद्धि हीं १० दिवस पाळतात. सार्वजनिक जेवणावळींत हे निवळ शाकाहार घेतात. त्यांच्या बायका स्वजातीयांशीं किंवा ब्राह्मणक्षत्रियांशीं संबंध करितात. ब्राह्मण, क्षत्रिय किंवा नंबिडी हे यांच्या हातचें पाणी घेत नाहींत.
[संदर्भ ग्रंथ- इं. अँ. पु. ३७ (सुब्बाराय अय्यर यांचा 'दि अंतरालाज ऑफ मलबार' हा लेख). थर्स्टन-कास्ट्स अँड ट्राईब्स इन सदर्न इंडिया. सेन्सस रिपोर्ट १९११. त्रावणकोर व कोचीन.]