विभाग नववा : ई-अंशुमान
अंबष्ठ - (आंबष्ठ) एक राष्ट्र. एरियनचे अंबष्टी हेच असावेत असें कर्नल विल्फोर्डचें म्हणणें आहे. (एशियाटिक रिसर्चेस, पु. ८ पा. ३४४ व ३४६). पंजाबच्या मध्यभागीं हें राष्ट्र असून येथील लोक लढवय्ये असत असें दिसतें. ऐतरेय ब्राह्मणांतील आंबाष्ठय राजा यांच्यापैकींच असावा असें गोल्डस्टकर (संस्कृत डिक्शनरी पा. ४०१) म्हणतो. बृहत्संहितेंत अंबष्ठ लोकांचा उल्लेख आहे (१४, ७ ; १४ १७.१६.२२ इत्यादि). हे पूर्व व नैर्ऋत्य या भागांतील लोक असावेत असें या उल्लेखांवरून दिसतें. महाभारतांत पांडवदिग्विजयांत आलेल्या अनेक देशांत अंबष्ठ हा पश्चिमेकडील देश गणलेला आहे. मरुद्टद्ध हें अंबष्ठ देशाचें मुख्य शहर असून तें उ. अ. ३० व पू. रे. ७१ यांवर वसलेलें आहे. असें अर्वाचीन कोशकार समजतात. ब्राह्मण पुरुष व वैश्य स्त्री यांच्या संबंधापासून झालेल्या संततीस अंबष्ठ म्हणतात. तेव्हां हे अंबष्ठलोक अशा संकरापासून झालेले असावेत असा कांहींचा समज आहे.