विभाग नववा : ई-अंशुमान
अंबा - काशीराजाची वडील मुलगी. हिच्या बहिणी अंबिका व अंबालिका यांच्या समवेत हिचें स्वयंवर चालू असतां भीष्मानें विचित्रंवीर्याकरितां या तिघींनांहि हरण केलें. हिचें मन शाल्वराजावर बसलें असल्याकारणानें हिला सोडून देऊन अंबिका-अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्याशीं लावून दिला. शाल्वानें अंबेला पत्करिली नाहीं म्हणून ती पुन्हां भीष्माकडे येऊन स्वत:शी लग्न करण्याचा आग्रह धरून बसली. भीष्म ऐकेना तेव्हां परशुरामाला मध्यस्थी घातलें. या बाबतींत भीष्म परशुरामाचें युद्धहि झालें. शेवटीं अंबेनें रुद्राची घोर तपश्चर्या करून भीष्माचा सूड घेण्यासाठीं दु्पदाच्या पोटीं शिखंडीचा अवतार घेतला व भीष्माला मारिलें [महाभारत, उद्योगपर्व अ. १७३-१८७ पहा.].