विभाग नववा : ई-अंशुमान
अंबाजी इंगळे - शिंद्यांचा एक सरदार. याच्या बापाचें नांव त्रिंबकजी. इ. स. १७८४ सालीं महादजी पातशाहीचा बंदोबस्त करण्यासाठीं दिल्लींकडे आला तेव्हां हा उत्तर हिंदुस्थानांत त्याजबरोबर होता. या प्रसंगी त्याच्या हातून कित्येक जबाबदारीचीं कामें घडलीं. उदाहरणार्थ याच सालच्या जुलै- आगस्ट महिन्यांत अंबाजी इंगळे व शीख सरदार याचा तह झाला; व पुढे ता. २ नोव्हेंबर रोजीं अफरासियावखानाचा खून झाला तेव्हां यास फौजेसुद्धां मुसुलमानी लष्करांत ठेवलें होतें. पण अंबाजीकडे केवळ लष्कराचा कारभारच सोंपविण्यांत येत होता असें नाहीं. १७८७ च्या आक्टोबर नोव्हेंबर (आश्विन) महिन्यांत महादजीनें खोडी पाटोडीहून गुलाम कादराच्या पारिपत्यास येऊं काय म्हणून पातशहास विचारण्यासाठी अंबाजीची वकील म्हणून नेमणूक केली होती.
थोड्याच वर्षांनीं अंबाजीस याहून जास्त स्वतंत्रतेनें कारभार करण्याची संधि मिळाली. इ. स. १७९१ च्या सुमारास महादजीनें अंबाजीस उदेपूरच्या राण्याच्या विनंतीवरून त्याच्या राज्यांतील चोंडावत सरदारांचें बंड मोडण्यासाठीं कांहीं पलटणी देऊन पाठविलें. तेव्हां अंबाजीनें चोंडावतांचा मुख्य जो साळुंब्रा त्यास राण्याची माफी मागावायास लावून त्याजकडून राण्यास वीस लक्ष रुपये दंड देवविला; व राण्याची सत्ता प्रस्थापित करून बंडखोर सरदारांकडून त्याच्या जमिनी सोडविल्या. शिवाय त्यानें तोतया राण्यास कमलमीरांतून हांकून लावण्याचीहि राण्याची दुसरी एक कामगिरी बजाविलीत्र एवढ्या गोष्टी करावयास अंबाजीस दोन वर्षें लागलीं. याशिवाय मेवाडच्या राण्यास अंबाजीकडून आणखीहि कांहीं कामगिर्या करून घ्यावयाच्या होत्या. शिवाय मेवाडच्या राण्यास चोंडावत सरदारांचेंहि भय वाटत होतेंच. म्हणून त्यानें अंबाजीच्या सैन्याच्या खर्चाकरितां सालीना आठ लाख रूपये उत्पन्नाचा मुलूख तोडून देऊन त्यास मेवाडांत ठेवून घेतलें. अशा रीतीनें मेवाडच्या कारभाराचीं सर्व सूत्रें अंबाजीच्या हातीं येऊन तो आपणास मेवाडचा सुभेदार म्हणवूं लागला.
इ. स. १७९५ सालच्या सुमारास अंबाजीची शिंद्यांचा प्रतिनिधि म्हणून उत्तरहिंदुस्थानांत नेमणूक झाली. तेव्हां अंबाजी गणेशपंत नामक आपल्या एका अधिकार्याकडे मेवाडचें काम सोंपवून उत्तरहिंदुस्थानांत गेला. अंबाजीचा धनी दौलतराव हा यावेळीं वयांत आलेला नसल्यामुळें प्रथम प्रथम अंबाजीच्या हातीं उत्तरहिंदुस्थानांत 'कर्तुमकर्तुं' सत्ता आली. पण लवकरच त्यास लखबादादा हा प्रतिस्पर्धी उत्पन्न झाला. अंबाजीचा अधिकारी गणेशपंत हा मेवाडांत आपल्या वर्तनानें लोकांस अगोदरच अप्रिय झाला होता. ही संधि साधून लखबादादानें राण्यास अंबाजीचें वर्चस्व झुगारून देण्याविषयीं गुप्तपणें उत्तेजन दिलें व स्वत: त्यास गणेशपंताविरूद्ध मदत करण्यासाठीं पुढें आला. अंबाजीच्या पक्षाच्या व राण्याच्या पक्षाच्या लोकांत कित्येक चकमकी होऊन त्यांपैकीं बहुतेकांत अंबाजीच्या पक्षाच्या लोकांचा पराजय होत गेला. अशा स्थितींत इ. स. १८०० च्या सुमारास हिंदुस्थानचा कारभार अंबाजीकडून काढून तो लखबाकडे सोंपविल्याचा शिंद्याचा हुकूम आला व त्यामुळें गणेशपंतास मेवाडमध्यें लखबाच्या ताब्यांत जे काय किल्ले व शहरें होतीं ती लखबाच्या स्वाधीन करून निघून यावें लागलें [भीमसिंह, उदेपूरचा राणा पहा.].
इ. स. १८०३ च्या सप्टेंबर महिन्याच्या सुमारास अंबाजीनें आपल्या कारस्थानांनीं पेरॉन यास हुसकून लावून त्याची जहागीर व शिंद्याच्या सैन्याचें आधिपत्य मिळविलें. याच सुमारास शिंद्याची लखबादादावर खप्पा मर्जी होऊन लखबादादाच्या ऐवजीं अंबाजीचा भाऊ बाळाराव हा मेवाडांत गेला. तेथें बाळारावानें मेवाडच्या चोंडावत सरदारांकडून पैसा वसूल करण्याच्या कामीं इतका बेसुमार जुलूम केला कीं चोंडावतांनीं उलटून बाळारावास कैद केलें. तेव्हां बाळारावास कोट्याच्या जालीमसिंहाची दोस्ती कामीं पडलीं. अंबाजीच्या बापानें जालिमसिंह हा पूर्वी एकदां उज्जनीच्या लढाईंत जखमी होऊन मराठ्यांच्या हातीं लागला असतां त्याचा जीव वांचवून त्याची मुक्तता केली होती. हे उपकार आठवून या प्रंसगीं तो उदेपुरावर चाल करून आला व राण्याच्या सैन्याचा पराभव करून त्यानें बाळारावास बंधुमुक्त केले.
इ. स. १८०३ मध्येंच शिंद्यांचें इंग्रजांशीं युद्ध झालें. यावेळीं अंबाजी इंगळे हा गोहद प्रांताचा मामलतदार होता. त्या युद्धांत इंग्रज उत्तर हिंदुस्थानांतील शिंद्यांचा मुलूख भराभर काबीज करीत चालले आहेत असें पाहून अंबाजी इंगळे हा शिंद्याविरुद्ध बंड केल्याचें मीष करून इंग्रजांस जाऊन मिळाला. व त्याच्यांशीं तह करून त्यानें गोदहच्या राण्याच्या मुलुखांतील कांहीं मुलूख स्वत:करितां मिळविला. पण शिंदे व इंग्रज यांच्या दरम्यान तह होतांच अंबाजी पुन्हां शिंद्याकडे गेला; व आपण आपल्या धन्याचा कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें कांहीं मुलूख बचावण्याकरितांच केवळ इंग्रजांनां जाऊन मिळालों होतों असें सांगून त्यानें शिंद्याकडून आपल्या समयोचित वर्तणुकीबद्दल शाबासकी मिळविली. महादजीनें सन १७८४ सालीं गोहदच्या राण्यापासून त्याचा मुलूख जिंकून घेतला असल्यामुळें त्याला ग्वालेरचा किल्ला इंग्रजांस देण्याचा कांहींच हक्क नाहीं, हा मुद्दा स्वत: अंबाजीनेंच उकरून काढला होता असें ग्रांटडफ, अंबाजीच्या जांवयानें त्याला तोंडीं सांगितलेल्या माहितीवरून लिहितो. पुढील सालीं होळकर व इंग्रज यांच्यामध्यें युद्ध उपस्थित झालें. तेव्हां अंबाजीनें होळकराला मिळण्याविषयीं शिंद्यास सल्ला दिला होता असें म्हणतात.
यानंतर शिंद्याची अंबाजीवर पुन्हां इतराजी झाली; व शिंद्याच्या अर्धवट संमतीनें यशवंतराव होळकरानें अंबाजीस (इ. स. १८०५ सालीं) कैद केलें. पण मागून होळकरानें आपल्या फौजेस देण्याकरितां अंबाजीपासून बराच पैसा घेऊन त्यास बंधमुक्त केलें. व सर्जेराव घाटग्यास काढून शिंद्याकडून त्यास दिवाणगिरी देवविली. अंबाजी हुषार असल्यामुळें आपल्या कार्यांत त्याजपासून कांहीं मदत होईल अशी होळकरास आशा वाटत होती परंतु अंबाजी हा होळकर व इंग्रज या दोघांसहि खूष ठेवूं इच्छित असल्यामुळें त्याचें वर्तन एकंदरींत धरसोडीचें राहिलें. अंबाजी हा इ. स. १८०९ च्या सुमारास मरण पावला. असें दिसतें (टॉड व ग्रांटडफ).