विभाग नववा : ई-अंशुमान
अंबाजी पुरंधरे - हा मूळचा सासवडचा कुळकुर्णी व देशपांडा होता. बाळाजी विश्वनाथ पेशवा जंजिर्याच्या सिद्दीच्या त्रासानें कोंकणांतून देशावर आला तेव्हां सातारला जाण्यापूर्वी सासवडास या पुरंधर्याकडे राहिला होता असें बखरकार सांगतात (शाहू महाराज बखर, पा. ४८). बाळाजी विश्वनाथाबरोबर अंबाजीहि धनाजी जाधवाच्या पदरीं राहिला. पुढें दोघेहि शाहूच्या तैनातींत आले. बाळाजी पेशवा झाला तेव्हां त्यानें अंबाजीस आपली मुतालकी दिली. इ. स. १७१४ त दमाजी थोरातानें या दोघांस कपटानें बंदींत घातलें व त्यांच्या सुटकेसाठीं मोठी खंडणी मागूं लागला. त्यावेळीं अंबाजीनें बाळाजीच्या जिवास जीव देऊन त्याची सुटका केली. अंबाजी सातार्यास शाहूजवळ राहून पेशव्यांचें अगस्त ठेवीत असे. बाजीराव पेशवेपद पावल्यानंतर अंबाजी त्यांच्या बरोबर स्वारींत असे. इ. स. १७३३ त श्रीनिवास प्रतिनिधीनें कोंकणवर जी मोहिम केली त्या मोहिमेंत अंबाजी असून युद्धाचें वर्तमान बाजीराव यास तो कळवी (त्याचें एक पत्र म. रि. मध्य विभाग १ पा. २७७ मध्यें छापिले आहे). इ. स. १७३५ त अंबाजी काशीयात्रेस गेला तेव्हां त्यानें आपला मोठा पुतण्या मल्हार तुकदेव यास शाहूकडून मुतालिकी देवविली. काशीयात्रा आटेपून बाजारावाच्या हिंदुस्थानच्या स्वारींत तो दाखल झाला. तिकडून परत आल्यावर लवकरच वारला (१७३५). पुरंधरे व पेशवे यांचा संबंध फार जुना व जिव्हाळ्याचा असे. नानासाहेब पेशवा लहानपणीं अंबांजीच्या हाताखालीं कामकाजास होता. अंबाजाचा मुलगा महादोबा व पुतण्या नाना हेहि त्याला सर्व बाहेरच्या गोष्टी समाजावून देत. शाहूजवळहि अंबाजीचें चांगले वजन असे. बाजीराव किंवा चिमणाजी यांचा वरचढपणा जेव्हां शाहूच्या दृष्टोत्पत्तीस येई तेव्हां पुरंधर्यांकडून त्यांची तो कानउघाडणी करी. [मराठी रियासत, मध्यविभाग. कैफीयती, इत्यादि].