विभाग नववा : ई-अंशुमान
अंबा भवानी - महिकांठ्यांतील(मुं.इ.) सरस्वती नदीच्या उगमाजवळील यात्रेचें ठिकाण. येथें देवीचें प्रसिद्ध देऊळ आहे. हें देऊळ फार प्राचीन काळीं म्हणजे ७४६ च्या सुमारास सुद्धां आतांप्रमाणेंच प्रसिद्ध होतें. येथें बहुतेक यात्रेकरू नाहीं असें कधींच होत नाहीं. तरी पण खरी मोठी जत्रा सप्टेंबरमध्यें भरते. देऊळ संगमरवरी दगडाचें असून खांबावर १६ व्या शतकांतील खासगी देणग्यांबद्दल कांहीं अंकित लेख आहेत. येथून जवळच ४ मैलांवर कोटेश्वर महादेवाचें देऊळ आहे. यात्रेला आलेला प्रत्येक मनुष्य परत जाण्यापूर्वीं कोटेश्वराच्या दर्शनाला जातोच.