विभाग नववा : ई-अंशुमान
अंबालिका - काशीराजाच्या तीन कन्यांतील कनिष्ठ. ही अंबेची भगिनी असून विचित्रवीर्य (भीष्माचा सापत्न भ्राता), याची कनिष्ठ स्त्री होती. ही अनपत्य असतांच हिचा पति मरण पावला. तेव्हां सत्यवतीनें (भीष्माच्या सापत्न मातेनें), हिच्या ठायीं संतति उत्पन्न करण्यास त्यास सांगितलें. परंतु त्यानें तें आपल्या प्रतिज्ञेस्तव मान्य केलें नाहीं. ह्यावरून तिनें आपणांस कौमारदशेंत झालेल्या कृष्णद्वैपायन पुत्राचें स्मरण केलें. त्या कालीं तो तेथें तत्काळ प्रगट झाला. त्यास पाहून तीनें विचित्रवीर्याच्या मरणाचा व तो अनपत्य असल्याचा वृत्तांत सांगितला. आणि हिच्या ठायीं पुत्र निर्माण करण्याची आज्ञा केली. तीवरून त्यानें हिच्या ठायीं गर्भ स्थापन केला. कालेंवरून पांडवांचा पिता जो पंडु राजा त्याप्रत ही प्रसवली. (भार. आदि. अ. १०५-१०६.)