विभाग नववा : ई-अंशुमान
अंबुशी - बारीक पानांची भुईसरपट आपोआप येणारी ही एक वनस्पति असून ती बागांतून आपोआप उगवते. ह्या वनस्पतीच्या अंगीं जे आंबट धर्म आहेत ते तिच्यांत अॅसिड ऑगझलेट ऑफ पोटॅशियम असल्यामुळेंच आहेत. त्यामुळेंच तिच्या अंगीं कापडावरील शाईचे डाग व लोहाचे डाग काढून टाकण्याचे धर्म आहेत. पानांच्या अंगीं शीतल व रक्त शुद्ध करण्याचे धर्म आहेत. घट्टे, चामखीळ इत्यादिकांवर अंबुशी चोळल्यानें ते बरे होतात. दाहाच्या जागीं पानें वांटून पोटिसाप्रमाणें लाविल्यानें त्या जागेचा ठणका व इतर लक्षणें दूर होतात. अंबुशीचें सार, चटणी वगैरे खाल्ल्यानें क्षुधा वाढून पचनक्रियाहि सुधारते. याकरितां अग्निमांद्याच्या रोग्यास ती प्रशस्त आहे. धोतर्यापासून आलेला अंमल अंबुशीचा ताजा रस दिला असतां दूर होतो व तो डोळ्यांत घातल्यास सारा जातो असें म्हणतात. ज्वर, अमांश, हिरड्यांतून रक्त जाणें ह्यांवर अंबूशी इतर औषधांशीं मिश्र करून देतात. [भि. वि. पु. १८ पृ. १२८].