विभाग नववा : ई-अंशुमान
अंबेहळद - या झाडास आम्रनिशा, अंबाहळद, कस्तुरी, मंजल इत्यादि नांवें आहेत. हीं झाडें रानांत सांपडतात. तीं हळदीसारखीं दिसतात. फांदीच्या बुडख्यांशीं गांठीं असून त्यांस दर्प फार असतो. ही हळद बागायती साध्या हळदीप्रमाणें मसाल्याच्या उपयोगी पडत नाहीं. परंतु इंचें लोणचें घालतात. हिचे गुणधर्म साध्या हळदीपेक्षां जास्त महत्त्वाचे आहेत. ही रक्तविकारनाशक व रक्तप्रसारक आहे. उगाळून अंगास लावण्यानें कंडू वगैरे असल्यास ती शमन करणें व रक्त शुद्ध करणें हे मुख्य गुण या हळदीचे आहेत.
कंडू व खरूज यांवर अंबेहळद व कडू जिरें यांचें बारीक चूर्ण करून तुपांत खलून खरजेस लावावें. ठेंच लागून किंवा कोणताहि अपघात होऊन रक्त सांखळल्यास अंबेहळद व रक्त्या बोळ हीं पाण्यांत उगाळून ऊन करून दुखर्या भागास त्याचा लेप द्यावा म्हणजे त्वरित गुण येतो.
जंतावर अंबेहळद व सैंधव एकत्र वाटून मुलाच्या वयाच्या मानानें व शक्तीप्रमाणें द्यावें. अथवा सागरगोट्याच्या पाल्याच्या रसांत अंबेहळद उगाळून पोटांत द्यावी.