विभाग नववा : ई-अंशुमान
अंशुमान - इक्ष्वाकु कुलांतील सगर राजाचा पौत्र व असमंजाचा पुत्र. यानें सगराचा अश्वमेधीय अश्व परत आणिला व त्याचे (सगराचे) साठ हजार पुत्र कपिलशापानें भस्म झाले होते त्यांचा उद्धार करण्यासाठीं गंगा पृथ्वीवर आणण्याची खटपट केली ['सगर' पहा.]. परंतु त्यांत त्याला यश आलें नाहीं. त्याचा पुत्र दिलीप रघुवंशीय प्रख्यात राजा होऊन गेला. दिलीपपुत्र भगिरथ यानें गंगा पृथ्वीवर आणून अंशुमानाची इच्छा पूर्ण केली [महा भा. वनपर्व अ. १०७; वा. रामायण, बालकांड सर्ग ४१-४२].