प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

ईजिप्त – हा देश आफ्रिकेच्या ईशान्यकोपर्‍यांत वसला आहे. याची माहिती (१) प्राचीन ईजिप्त, (२) आधुनिक ईजिप्त व (३) ईजिप्तचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या अनुक्रमानें पुढें दिली आहे.

प्रा ची न ई जि प्त
याविषयीं पुराणवस्तुसंशोधन चांगलें होत आहे. आणि सध्यां एकसारखे नवे शोध होत आहेत. येथील अति प्राचीन संस्कृति व शासनपद्धति याबद्दल मनावर परिणाम होतो व त्याबद्दल शिलालेख सांपडले आहेत. येथील ग्रीक संस्कृतीचा इतिहास, रोमनसाम्राज्य, ख्रिस्ती संप्रदायाचा उदय, इस्लामचा विजय व अलीकडील स्वातंत्र्यार्थ प्रयत्‍न ह्या गोष्टी देखील ईजिप्तच्यां इतिहासांत फार महत्त्वाच्या आहेत.

सतराव्या शतकाच्या आरंभापासून प्राचीन इजिप्तच्या कलाकौशल्याचे नमुने आणण्यास सुरवात झाली. नेपोलियनच्या स्वारीबरोबर एक शास्त्रीय मंडळ असून त्यांनीं बरेच शोध केले व अवशेष जमविले. त्यांचे सर्व अवशेष (प्रसिद्ध रोझेटा दगड धरून) १८०१ मध्यें ब्रिटिश सरकारच्या ताब्यांत आले. पुढें महंमद अल्लीनें यूरोपियन लोकांनां ईजिप्तमध्यें संशोधनाची मुभा दिल्यानें बरेच अवशेष जमविण्यांत आले. १८२१ त शांपोलिअनचा चित्रलिपि वाचण्याचा प्रयत्‍न चांगलाच सफल झाल्यापासून संशोधन विशेष जारीनें सुरू झालें. १८२७ त शापोलिअन व रॉझेलिनी यांनीं कांहीं मंडळी बरोबर घेऊन बराच शोध लाविला व लेखांच्या नकला केल्या. सर्वांत महत्वाचे प्रयत्‍न लेपसियसचे असून तो प्रशियन सरकारतर्फे १८४२-४५ त गेला. मॅरिएटची नेमणूक (१८५८) ईजिप्तच्या पुराणवस्तुसंशोधनखात्याचा चालक म्हणून झाल्यापासून बरीच सुधारणा झाली. यानें बुलाक बेटावर एक घर घेऊन त्यांत आपले शोध ठेविले. येथून ते गिझा येथील राजवाड्यांत ठेवण्यांत आले व तेथून १९०२ मध्यें ते कायरोंत कस्त्रर-एन-निल-मध्यें नेले. ईजिप्तमध्यें पुराणवस्तुसंशोधनखात्याखेरीज म्हणजे आर्किलिऑजिकल सर्व्हेखेरीज दुसर्‍या अनेक संस्था आहेत. इंग्लंड, जर्मनी व फ्रान्स या देशांतील कांहीं सरकारी व कांहीं विश्वविद्यालयातर्फे संशोधनाचें काम होतें. १८८३ त टॅनिस येथील फ्लिंडर्स पेट्रीच्या संशोधनापासून शास्त्रीय युगास सुरवात झाली. पूर्वी एखादा लेख, पुतळा अथवा नेण्यासारख्या वस्तूबद्दल शोधक धडपडत असत. परंतु सांप्रत कलाकौशल्य, भाषा, चालीरीती, इतिहास, दंतकथा यांपैकीं कोणतीहि माहिती मिळविण्याची खटपट असते.

प्राचीन जागा वगैरे. – प्राचीन अवशेषांचे लेख व इतर असे दोन भाग करतां येतात. पहिल्यांत शिलालेख व पापिरस वरील लेख येतात; दुसर्‍यांत प्राचीन शहरांच्या जागा, देवळें, तट, घरें, खाणीं. रस्ते, कालवे, पुतळे, स्तंभ, शस्त्रें, अवजारें, यांचा समावेश होतो. सर्द हवेमुळें नदीमुखप्रदेशामधील पापिरसवरील लेख खराब झाले. खालच्या ईजिप्तमधील शहरें मातीच्या विटांचीं बांधलेलीं होतीं. त्यामुळें लेख दगडावर कोरीत. यामुळें बरेच लेख सांपडले आहेत. मधला व वरचा ईजिप्त हे भाग इतके भरभराटीस आले नव्हते, यामुळें येथें कमी लेख सांपडले. कायरोपासून प्राचीन शहरें व स्थळें येणेंप्रमाणें :- उत्तरेस अबूरोआशपासून दक्षिणेस लिष्टपर्यंत पसरलेलें पिरामिडचें स्थळ असून त्याच्या मध्यभागीं मेम्फिस आहे. यानंतर दहशूर, मेडूम, हलाहून, हवार, येथील पिरामिड होत. फायुमच्या दक्षिणेस वाळवंटाच्या कांठावर डेशाश, मीर, अस्युत व बेणीहसन येथील कबरी, स्पेआस आर्टेमिडॉसचें मंदिर, एल अमर्नाचा स्तंभ व कबर, वगैरे आहेत. अस्युतच्या पुढें ड्रोंका व रीफा या कबरी, अबिडॉस व डेंडेरा हीं मंदीरें आहेत. यापुढें नदीच्या दोन्ही तीरांवर थीबीजचे अवशेष आहेत व एस्नाचें मंदिर, एलकाबचे अवशेष, एडफू मंदिर व पहिल्या धबधब्यावरील कोरीव लेख हे आहेत.

न्युबियांत ईजिप्तपेक्षां जास्त अवशेष व स्मारकें आहेत. येथें डेबोड, केर्टासी, कॅलाबशा, बेत एलवाली, डेन्डर, गर्फ हुसेन, डक्का, महरका, ईस सेबुआ, अमाड, डेर, इब्रिम वगैरे मंदिरें, एलेसिया गुहा, अ‍ॅनिबा कबर, अबु सिंबेलच्या डोंगरांतील मंदिरें, जेबेल अ‍ॅड्डा, वादीहल्फा, सेम्ना, अमार, वसोलेब हीं मंदीरें आहेत. आणखीं जेबेल वर्कसचे पिरामिड, नॅपटा मेरोचे बेगेरविया येथील पिरॅमिड, मेसॉवराट व नागा येथील मंदिरें हीं आहेत.

मोठ्या व लहान ओलवणांत आणि अमॉन ओलवणांत मंदिरें आहेत. त्याप्रणें सिनाई द्वीपकल्पांत वाडीमघारा व सेराबितएल खादिम येथें अवशेष आहेत.

ब्रिटिश म्युझियम लीडेन, बर्लिन, लूव्हर ट्युरीन येथील प्राचीन इजिप्तसंबंधीं संग्रह प्रसिद्ध आहेत. कायरो येथील संग्रह जगांत सर्वांत मोठा आहे. अमेरिकेंतील विश्वविद्यालयांचे संग्रह असून इतरहि शहरांत बरेच संग्रह आहेत.

ईजिप्तमधील देवताइ ति हा स–सा ध नें. – ख्रिस्ती संप्रदायाचा उदय होण्यापूर्वींचा इतिहास समजण्यास येथील लेख फारच चांगले आहेत. साधारणतः लेख व त्यांत वर्णिलेलीं कथानकें हीं समकालीन आहेत. बर्‍याच लेखांचा नाश झाला आहे. सर्व लेख मिळाले नाहींत. बरेच शिलालेख आहेत; पण त्यांवरून हजारो वर्षांच्या इतिहासाची व्यवस्था लावणें सोपें काम नाहीं. चालीरिति वगैरेबद्दल लेख नाहींत; परंतु त्याऐवजीं कबरीवर कोरलेलीं चित्रें मात्र आहेत.

वरील लेखांत चित्रलिपीच्या वाङ्मयानें बरीच भर टाकली आहे. १८ व १९ या घराण्याशीं समकालीन असणार्‍या टेल-एल-अमर्ना येथील शिलालेख महत्त्वाचे होत. हिटाईटांची राजधानी बोघाझकुइ येथें सांपडलेले १९ व्या घराण्यांतील दुसरा रामेसीससंबंधी लेखहि उल्लेखार्ह आहेत. असुरियन राजे एसरहडन व असुरबनिपाल यांच्या ईजिप्तवरील स्वार्‍यांची हकीकत व त्यासंबंधीं हे लेख आहेत. हिब्रू वाङ्मयांत थोडीच पण महत्त्वाची माहिती आहे. अरेमाइक भाषेंतील पापिरसवरील यहुद्यांनीं लिहिलेले लेख (ख्रि.पू. ५ वें शतक) सायने व मेंफिस येथें सांपडले. ग्रीक भाषेंतीलहि कांहीं साधनें आहेत. यांत तद्देशीय इतिहासकार मॅनेथो, हिरोडोटस, डायोडोरस, स्ट्रेबो, टॉलेमी, व फ्लयूटार्क यांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. अलेक्झांडरची स्वारी, टॉलेमी व रोमन यांची माहिती ग्रीक साधनांवरूनच मिळते. लॅटिन भाषेंतील लेख तितके महत्त्वाचे नाहींत पण अरबी लेखांत बरीच दुर्मीळ माहिती असते.

प्राचीन काळची ईजिप्तची स्थिति. - याचें देश्य नांव ‘केमी’ म्हणजे ‘काळा देश’ हें होय. काव्यांत आजूबाजूच्या वाळवंटास ‘टोश्नी’ म्हणजे ‘तांबडा देश’ असें म्हटलेलें आढळतें. असुरियन भाषेंत याला मुश्री अथवा मिश्री म्हणत व मिसर हें अरबी नांव होतें.

पहिल्या धबधब्यापासून समुद्रापर्यंतच्या नाईल खोर्‍याला ईजिप्त म्हणत. खालच्या न्युबियांत प्रागैतिहासिक काळांत शुद्ध ईजिप्शियन होते. कधीं कधीं ईजिप्तमध्यें लहान लहान निरनिराळीं राज्यें होतीं; कधीं कधीं यांत न्युबिया, लिबियन वाळवंट, ओलवण, अरबी वाळवंट, सिनाई, भूमध्यसमुद्राचा किनारा यांचा समावेश होत असे.

भौगोलिक दृष्ट्या ईजिप्तमध्यें फार फरक पडला नाहीं. नाईल नदीथडीवरचा प्रदेश वसला होता. प्राचीन ग्रंथकार म्हणतात कीं, नाईल नदीला पांच मुखें (कृत्रिम दोन धरून सात) होतीं. मळईच्या जमिनींत फारसे फेरफार दिसत नाहींत. पृर्वीं जमिनीच्या लहान तुकड्यांत लागवड करीत. हळूहळू कालवे तयार होऊन शेतेंच्या शेतें लागवडीस येऊं लागलीं. वाळवंटांत जंगलीं जनावरें व झाडें बरींच होतीं, परंतु त्यांचा हळूहळू नाश झाला. पापिरस झाडाची लागवड आठव्या शतकापासून बंद झाली. नाईल नदीमुळें बसणारा गाळ सकस असून त्याच्या कच्च्या विटा होत. मोठ्या इमारतीसाठीं दगडाचा उपयोग करीत. यांत चुनखडीचा दगड फार उत्तम समजत. हा टुरा व मसारा खाणींतून फार निघत असे. ईजिप्तमध्यें धातूचा पुरवठा नव्हता. न्युबियांत सोनें सांपडे. लोखंड सर्व देशभर सांपडत असून अस्वान येथील खाणींतून काढीत. औद्योगिक वगैरे कामासाठीं येथें चांगलें लांकूड नसे. उत्कृष्ट कामासाठीं लेबॅननमधून देवदाराचें लांकूड आणवीत. नाईल नदींतून बोटीनें व्यवहार चालत असे. व न्युबियांत पायमार्ग होता. न्युबियांत स्वारी केली तर तेथून गुलाम व गुरेंढोरें मिळत. गरीब व जंगली न्युबियन हे शरीरानें धष्टपुष्ट व धीराचे असून ते सैन्यांत व पोलिस शिपाई म्हणून नोकरी करीत असत. ओलवण, अरबी वाळवंटातून तांबड्या समुद्रापर्यंत, सोमाली किनार्‍यावरील प्रदेश, सिनाई व भूमध्यसमुद्र याच्याशीं व्यवहार चालत असे.

दक्षिणेस निग्रो (नेहसी) लोक असून हे रानटी होते. प्युप्रोनी व लिबीया येथील लोक वर्णानें फिकट व निग्रोपेक्षा थोडे जास्त सुधारलेले असत. सीरियन व केफ्टीऊ (क्रीटन) हे लोक मात्र ईजिप्शियनांप्रमाणे सुधारलेले असावे.

ईजिप्शियन स्वतःला ‘रोमी’ म्हणजे ‘जन अथवा लोक’ म्हणवीत. वाळवंटांतील लोकांनां इतर नांवे असत. यांच्यासह एकंदर मानव जातीला ‘नऊ तिरंदाज’ म्हणत. इथिओपिआ, असुरिया व इराण यांच्या अमलाखालीं आल्यामुळें हे लोक स्वतःला ‘रोमन-केमी’  म्हणजे ‘ईजिप्तचे लोक’  म्हणवीत. ईजिप्तचे लोक मूळ कोठून आलें हें सांगता येत नाहीं. याची भाषा सेमिटिक तर्‍हेची होती. यांचा धर्म आशियांतील उच्च भावना व आफ्रिकेंतील कांहीं अनागर समजुती याचें मिश्रण मिळून झालेला होता. ममीजवरून ईजिप्शियन लोकांचा बांधा बारीक व केंस काळे असून ते कॉकेशियन पद्धतीचे होते असें दिसतें. डॉ. एलिएट स्मिथच्या मतें वरच्या ईजिप्तमधील लोक उत्तरआफ्रिका, भूमध्यप्रदेश व अरबस्तान यातील मिश्रणानें बनलेले असून पुढें त्याच्या बांध्यांत सुधारणा झाली.

ईजिप्शियन लोक मूळचे क्रूर अथवा भयंकर नव्हते. ते आळशी व निष्काळजी असून धिम्मेपणानें काम करणारे शेतकरी होते. देशाच्या समृद्धीमुळें लोकांत विशेष प्रकारची बुद्धिमत्ता उत्पन्न झाली. याचमुळें आसपासच्या रानटी लोकांवर ते स्वार्‍या करीत. अखेरीस असुरीया व इराणच्या सत्तेचें जूं यांच्या माथीं बसलें व विद्येंत ग्रीकांनीं आघाडी मारली. पुष्कळशा उपदेशकांच्या नीतिकल्पना उच्च दर्जाच्या होत्या. मृत्यूनंतरच्या जीवाची स्थिती याबद्दल यांची कल्पना व धर्मशीलपणा यामुळें याचें वजन तत्कालीन राष्ट्रांत फार वाढलें.

विभाग :- ईजिप्तचे दोन विभाग असून मेनीसच्या अगोदर त्यांत दोन राज्यें असत, खालच्या ईजिप्तला उत्तरेकडचा प्रदेश ‘टोमेह’  म्हणत, बाकीच्या ईजिप्तमधील नाईल खोर्‍याला ‘दक्षिण’ अथवा शेमा म्हणत. सूर्याचें गृह म्हणून दक्षिणेला उत्तरेपेक्षां मान असे. नंतर दोन्ही प्रदेशाला टोरेस (दक्षिण प्रदेश) व टोमेह (उत्तर प्रदेश) म्हणत. शासनांत कधीं कधीं हा भेद अवश्य पाळीत नसत. परंतु पारमार्थिक बाबतींत मात्र हा भेद अवश्य पाळीत असत. रोमन काळीं ‘मध्य ईजिप्त’ म्हणून एक भाग पाडीत. याचे सात ‘नोम्स’ (प्रांत) असत. हेप्टानोमिसच्या दक्षिणेकडील भागाला थिबीज म्हणत. थिबींजवर ईथिओपियाच्या राज्याचा साधारण अंमल असे. प्रांत व विभाग हे मुख्यतः भूगोलदृष्ट्या असावेत. कदाचित् धार्मिक, नीतिविषयक व इतर ऐतिहासिक कारणांवरून सुद्धां बनले असावेत. ह्या प्रांतांचीं नांवें व संख्या याविषयीं चांगली माहिती नाहीं. मंदिरांवर कोरलेल्या यादींत या प्रांतांची संख्या ४२ असून त्यांपैकीं २२ वरच्या ईजिप्तमध्यें, २० खालच्या ईजिप्तमध्यें आहेत. या प्रांतांच्या सरहद्दी ठरलेल्या नसत. यांत एक मुख्य शहर असून तेथें गव्हर्नर अथवा प्रांताधिकारी रहात असे. व तें धार्मिक दृष्टीनें मुख्य ठिकाण असे. नवीन साम्राज्यांत या प्रांतविभागाकडे दुर्लक्ष झालें.

राजा व शासन :- येथें राजसत्ताकपद्धति असून तींत राजा मुख्य असे. त्याला देवाप्रमाणें पूज्य मानीत. तो मानव व देव यांत मध्यस्थ असे. राजाचा मुकुट व पोषाख निराळ्या तर्‍हेचा असे. व त्याच्या कपाळावर नागाचें चिन्ह असे. स्त्रियांनां गादीवर हक्क सांगतां येत असे. परंतु क्लिओपाट्राच्या अगोदर स्त्रीया दिसत नाहींत. त्यापूर्वीं हाट्शेपसुन हीच कायती १८ व्या घराण्यांतील राणी प्रसिद्ध आहे. परंतु तिच्याच घराण्यांतील राजांनीं तिच्या राज्याकडे दुर्लक्ष केलें आहे. स्त्रियांच्या तर्फे हक्क सांगतां येत असे म्हणून पुष्कळशा उपटसुंभ्या राजांनीं राजघराण्यांतील मुलींशीं लग्न करण्याचा प्रयत्‍न केला व आपल्या वंजनांनां कायदेशीर वारस केलें. आपल्या गादीचा वारस राजा ह्यात असतांनाच ठरवीत असे.

मोठाले जमीनदार व लहान राजे मुख्य राजाला करभार देत असत त्याचा दरबार मुख्य राजाप्रमाणें असे. साम्राज्यांत मुख्य सत्ता राजाच्या हातांत असे. राजघराण्यांतील पुरुषास मोठ्या जागा मिळत. सर्वत्र नोकरशाहीचें जाळें पसरलेलें असून त्यावर दिवाण अथवा ‘वजीर’ मुख्य असे. (कधीं कधीं दोन वजीर असत). आपल्या स्वतःचें वजन राखण्यासाठीं तो लोकांत मिसळत नसे व त्याला निःपक्षपाती राहण्याचा हुकूम असे. ईजिप्त ही फारोची जहागीर असून वजीर हा त्याचा कारभारी असें म्हटलें असतां जास्त शोभेल.

सैन्य, व शस्त्रास्त्रें, वगैरे :- प्रत्येक तरुणास राजाच्या सैन्यांत लढावयास जावें लागे. शारीरिक मेहनत व शिस्त यांचें त्यांनां शिक्षण मिळे. धनुष्यबाण, भाला, खंजीर व ढाल, या आयुधांप्रमाणें सैन्याचे विभाग पाडीत. अधिकार्‍याजवळ युद्धपरशु व गदा असे. नवीन साम्राज्याच्या वेळीं सैन्य विशेष तरबेज असून त्याला वेढा व व्यूहरचना यांचें शिक्षण देत असत. त्यावेळींहि सैन्याच्या निरनिराळ्या विभागास निरनिराळीं निशाणें असत. घोडदळाबद्दल विशेष माहिती नाहीं.

कबरी व इतरठिकाणीं कोरलेलीं चित्रें यांवरून प्रागैतिहासिक कालापासून पुढें कोणतीं शस्त्रें प्रचारांत होतीं हें दिसतें. दगडाचीं गदेचीं टोकें, गारेचीं भाल्याचीं टोकें, ब्रांझचे पातळ खंजीर, बाणाचीं दगडीं टोकें, वगैरे प्रचारांत होतीं. लांकडी गदेला परकीय शस्त्र समजत. दुसर्‍या रामेसीसच्या वेळच्या भाडोत्री शिपायांच्या हातांत प्रथम शेरडाना (सार्डीनियन) शिपायांच्या हातांत आली. ख्रि. पू. ८ व्या शतकांत प्रथम गोफणीचा उपयोग सुरू झाला. हिक्सॉस राजांच्या काळीं घोड्याचा रथ प्रथम आला असावा. ढाल बैलाच्या कातड्याची केलेली असे. ब्रांझच्या कड्यांचीं चिलखतें करीत. ईजिप्शियन शिपायांचीं तागाचीं उरस्त्राणें प्रसिद्ध असून त्याचा उपयोग इराणी सैन्यांत करीत. २० व्या घराण्यापासूनचीं अस्सल चित्रें नसल्यानें ख्रि.पू. हजार वर्षांच्या प्रथमार्धांत काय प्रगति झाली तें कळत नाहीं.

उपासक. – उपासक साधारणतः वंशपरंपरागत असत. प्रत्येक देवळांत मुख्य उपदेशकाच्या हाताखालीं चार तर्‍हेचे उपाध्ये असून (पुढें टॉलेमी युअर्जेटेसनें पांच केले) ते आळीपाळीनें काम करीत. देवळांच्या आवारांत यांनां जागा असून देवळाच्या उत्पन्नापैकीं कांहीं भाग मिळे. पुढें हें उपासक केस काढीत आणि स्वच्छता व जपजाप्य यांच्या पावित्र्यांकडे जास्त लक्ष देत. यांच्यांत कांहीं विद्वान असत पण बरेच निरक्षरहि असत.

व्यापार व पैसा :-  प्राचीन काळीं पदार्थांनीं देवघेव चालत असून नंतर धातूच्या आंगठ्या, सोनें, रुपें व ब्रांझ यांचा विनिमयसाधन म्हणून उपयोग होऊं लागला. सोनें, रुपें वगैरे धातू मंदिरांत ठेवीत. प्राचीन नाणीं ग्रीक (विशेषतः आथेन्स येथील) असून, टॉलेमीच्या अंमलांत नाण्यांचा खरा उपयोग सुरू झाला.

येथें धान्याची पैदास पुष्कळ होत असे. पण इतर बाबतींत ईजिप्त दुसर्‍या देशावर अवलंबून असे. कांहीं माल खंडणी म्हणून, कांहीं व्यापारांत कांहीं बदल म्हणून ईजिप्तमध्यें येत असे. अंतर्गत व बहिर्गत व्यापार बहुतेक परकीयांच्या हातीं असावा. ३० व्या घराण्याच्या वेळीं व्यापार फिनिशियन लोकांच्या ताब्यांत होता. अर्टाक्सर्क्सिसच्या वेळीं यहुदी लोक अस्वान येथें पैशाची देवघेव करीत असत.

पारध :- धनुष्यबाण, पारधी कुत्रे व जाळें यांच्या साहाय्यानें पारध करीत. सिंह, चित्ता व कोल्हा यांचें मांस खात नसत. बाकीचीं जनावरें व पक्षी मारून खात. मासे मारण्याचा धंदा येथें चांगला चालत असे. मासे सुकवून त्यांनां खारवीत असत.

शेतकी व बागाईत :- शेतकी हा येथील मुख्य धंदा असे. नदीचा चढ उतार, सुपीक जमीन, कालवे व उष्णता यांचा शेतकर्‍यांस चांगला फायदा होई. पोहरा व ‘शाडूफ’ यांचा पाणी काढण्याकडे उपयोग करीत. रहाटांची माहिती टॉलेमीच्या वेळेपासून दिसते. साधारणतः एकामागून एक अशीं पिकें काढीत. गहूं व जंव हीं मुख्य पिकें असत. त्यापूर्वी ‘बोटी’ नांवाचें धान्य मुख्य असे व त्याच्या अगोदर हलका गहूं व जंव मुख्यतः पेरीत. क्लोव्हर, वाटाणा, कडधान्य, कांदा, एरंड व ताग हीं पिकवीत. खजूर, डाळींब, अंजीर हीं मुख्य फळझाडें होत. द्राक्षवेल पूर्वीं फार असे. पापिरस झाड रानटी स्थितींत असून शिवाय कांहीं ठिकाणीं त्याची लागवड करीत. त्याच्यापासून प्रसिद्ध कागद काढीत. त्याच्या होड्या तयार करीत व दोरहि करीत असत. येथें निळीं व पांढरीं कमळें असत.

ग्राम्य पशू व पक्षी :- शेतकर्‍यांजवळ पुष्कळ प्राणी असत. कांहीं घरगुती कामासाठीं व कांहीं मंदिरांनां वाहिलेले पवित्र प्राणी असत. शेळ्या, विशेष प्रकारच्या मेंढ्या, बैल व जंगली जनावरें असून डुकरें फारच कमी प्रमाणांत असावींत. पुढें डुकराला अपवित्र मानण्यांत येऊ लागलें. हंस, बदक, पारवा, बगळा व इतर भक्ष्य पक्षी बाळगीत. मधाचीं पोळीं देखील असत.

जमीनी मक्त्यानें वाहण्यास देत असत. जनावरें देखील अशीच मक्त्यानें देत, अथवा शेतकर्‍याच्या मालकीचीं असत. घोडे रथासाठीं प्रथम हिक्सॉस राजांच्या वेळीं आणले असावेत. उंट २६ व्या घराण्याच्या अगोदर असावेत असें वाटतें. विशेष नवलाची गोष्ट म्हणजे जनावरावर बसलेलीं मनुष्यांचीं चित्रें फार क्वचितच असून नवीन राज्याच्या अगोदरचीं तर मुळींच नाहींत. कुत्रा, मांजर व माकड हीं जनावरें बाळगीत. देवळांत, सर्वतर्‍हेचे प्राणी – मोठ्या पासून लहानापर्यंत ठेवीत.

कायदा :- ईजिप्शियन लोकांचे संकलित कायदे असल्याचे माहित नाहीं. परंपरेनें चालत आलेल्या चालीरीती व कायदे यांचा उल्लेख शिलालेखांत असून त्यांनाच पुढें पवित्र ग्रंथांत संकलित केलें असावें. विशेष मुद्यावर वेळोवेळीं फर्मान काढीत असत. टॉलेमीच्या वेळीं देशी कायदा देश्य लोकांच्या फिर्यादींत लावीत. रोमन लोकांच्या अमलांत देशी कायदा प्रचलित होता. प्राचीन काळीं अर्ज राजाकडे अथवा जमीनदाराकडे पाठवित. कोर्ट म्हणजे अधिकारी वर्ग असून नवीन राज्यांत मात्र अधिकारी अथवा शिष्ट जन असत. राजाकडे अपील करण्यास सर्वकाळीं मुभा होती. पुरावा व फिर्याद लेखी ठेवित. फौजदारी गुन्ह्यांत कबूली जबाब मिळण्यासाठीं अगर पुरावा गोळा करण्यासाठीं शारीरिक पीडा देत. नवीन राज्यांत मृत्यु, दंड, अवयव तोडणें ह्या शिक्षा असत. प्राचीन राज्यांत अवयवच्छेदनाची शिक्षा असेच. तत्कालीन करार, मृत्युपत्र वगैरे पापिरस वरील लेख सांपडले आहेत.

सव्विसाव्या घराण्याच्या अगोदरचे लग्नसंबंधींचे करार सांपडत नाहींत. स्त्रियांकडे वारस जात असून मातेच्या बाजूनें हक्क सांगणें महत्त्वाचें असे. फारोच्यावेळीं बंधु व वारस भगिनी यांच्या विवाहाचीं उदाहरणें आहेत. टॉलेमीच्या वेळीं ही चालच पडली होती. एतद्देशीयांत लग्नबंधनानें मुलास सर्व मिळकत मिळे. फारकत झाल्यास हुंडा परत मिळत नसे. मुलगी व जांवई यांचें भांडण झाल्यास मुलीचा बाप मुलीस रोमनकाळांत देशी कायद्यान्वयें घेऊन जात असे.

गुलामगिरी प्राचींन काळापासून चालत असून युद्धांतील कैदी राजा विजयी योध्यास गुलाम म्हणून देई. २५ व्या घराण्यापासून गुलाम विकीत असत. डरायसच्या वेळीं कंचुकी असत. सुंता करण्याची पद्धत होती असें ममीजवरून स्पष्ट होतें. हेड्रीयनच्या हुकुमानंतर फक्त उपाध्यायच सुंता करीत.

विज्ञान, गणित, ज्योतिष, वैद्यक व वाङ्मय :- ईजिप्शियन लोक धार्मिक चर्चेंत पटाईत असत; परंतु त्याचें शास्त्रीय ज्ञान म्हणजे कांहीं ठराविक कृती होत. उपपत्तीचें ज्ञान त्यांच्यांत बेताचें असे. कांहीं हुषार लोकांनीं लावलेले शोध लोक विसरले अथवा ठराविक कृती म्हणून त्याच्यांत राहिले. या कृती लोक दुसर्‍यांस कळूं देत नसत. यांच्यापैकीं ईजिप्शियनांत इमहोटप, तिसर्‍या घराण्यांतील झोसरचा शिल्पशास्त्रज्ञ, आणि तिसर्‍या अमेनोफिसचा लेखक, अमेनोफिस (हाषचा पुत्र) या दोघांस देव मानीत. चवथ्या घराण्याच्या हर्डाफलाहि जवळ जवळ असाच मान मिळे. ज्या लोकांनीं मोठाले पिरामिड उभारून आपल्या राजांचें नांव अजरागर केले अशा लोकांस शास्त्रीय ज्ञान असलेंच पाहिजे.

यांची अंक मोजण्याची पद्धति दशात्मक असून लक्षापर्यंत प्रत्येक दहाच्या भागास वेगळी खूण असे. २/३ खेरीज सारे अपूर्णांक ज्याचा अंश एक अशा रीतीनें मांडीत. ९/१३ मांडावयाचे असल्यास २/१३+२/१३+२/१३+२/१३+१/१३ = १/२  १/८+१/२६+१/५२+१/१०४ असे अथवा दुसर्‍या प्रकारानें मांडीत. असा परिच्छेद तोंडींच करीत. याचीं कोष्टकें तयार असत. दुप्पट व दहापट करणें, ५ नें गुणणें व भागणें व पाऊणपट करणें ह्या कृती शिकवीत असून तीवरूनच सर्व गुणाकार, भागाकार करीत. यांचें गणिताचें ज्ञान ‘मधल्या राज्या’ पासून मिळते. हिकसॉस राजांच्या वेळचें (१६०० ख्रि. पू.) एक पुस्तक ब्रिटिश म्युझीयममध्यें असून त्याला र्‍हींड अ‍ॅथेमॅटिकल पापरिस म्हणतात. यांत अंकगणित, भूमिति (म्हणजे क्षेत्रफळ, पिरामिडचें प्रमाण व घनमापन) आणि किरकोळ उदाहरणें दिलीं आहेत.

ब्रिटिश म्युझियममधील रोमन काळांतील पापायरसवरच्या लेखावरून कुंडली करण्याच्या पद्धतीचा शोध ईजिप्शियनांनीं लाविला असावा असें वाटतें परंतु याला जास्त आधार मिळत नांहीं. ज्योतिषाला फार मान असून कांहीं महत्वाच्या तारखा व दिवस ठरवीत व रात्रीच्या घटका मोजीत. नाईल नदीच्या पुराच्या वेळीं उगवणार्‍या “सोथीस” वरून वर्षांतला महत्वाचा दिवस काढण्यांत येई. देवळांत वेळ मोजण्याचें यंत्र असें. कोणतीहि वेळ तार्‍याकडे पाहून सांगत असत. याबद्दल कोष्टकें तयार केलेलीं असत.

शस्त्रविद्या, दंतविद्या याबद्दल पद्धतशीर माहिती देतां येत नाहीं. पण हीं शास्त्रें बरींच वृद्धिंगत झालीं होतीं. कांहीं ठिकाणीं औषधांचे कागद सांपडले आहेत. शारीरशास्त्रासंबंधीं (विशेषतः रुधिराभिसरण व श्वसन) यांनां फार थोडी माहिती होती. औषधाबरोबर मंत्र म्हणण्याची चाल होती. रोग व औषधें यांचीं नांवें अद्याप बरोबर मिळालीं नाहींत.

प्राचीन ईजिप्तसंबंधीं बरेच कागदपत्र सांपडले आहेत. यांपैकीं बर्‍याच लेखांचा उल्लेख आला आहे. भिंतीवर काढलेल्या चित्रांचें वर्णन म्हणून कांहीं शिलालेख आहेत. त्याचप्रमाणें शब्द, पदव्या व शहरें प्रांत, सण, व देवता वगैरे यांच्या यादी दिल्या आहेत. मोठाले ग्रंथ मधल्या राज्यापूर्वींचे असावेत. या राज्याच्या वेळीं उपदेशपर व म्हणींचा संग्रह केलेले ग्रंथ प्रचलित होते. याच वेळच्या अथवा नंतरच्या कांहीं गोष्टी प्रसिद्ध आहेत. पैकीं कांहीं चांगल्या व उपदेशपर असून काहीं काल्पनिक व अद्‍भुत रहस्यमय आहेत. यांत सीरियांत पळून गेलेला सिनुदि उनामुनची हकीकत व दोन बंधू या गोष्टी विशेष प्रसिद्ध होत्या. त्या फार मजेदार व काव्यमय असत. कांहीं पद्यांत असत; परंतु वाङ्मयाच्या दृष्टीनें त्या महत्त्वाच्या नाहींत. या सर्व ईजिप्शियन लेखांत केवळ मानवेतिहासशास्त्रदृष्ट्या महत्त्व असून वाङ्मयदृष्टीनें त्यांत विशेष कांहीं नाहीं. त्यांत कृत्रिमता जास्त दृष्टीस पडते. जुन्या व नव्या ईजिप्शियन भाषेंत कांहीं ईशस्तुतिपर पद्यें आहेत.

परमार्थसाधन :- इजिप्तमधील परमार्थिक संप्रदायासंबंधानें बरीच माहिती मिळविण्याचीं साधनें असतांना देखील त्यां विषयीं आपणांस फार ज्ञान नाहीं. या विशिष्ट उपासनांची वाढ कशी झाली ह्याचें प्रथम संशोधन झालें पाहिजे. परंतु ही वाढ कशी झाली याची माहिती मिळत नाहीं. यामुळें गृहीतपक्ष व अनुभव यानेंच सर्व माहिती जुळवावी लागते. उपासनाविषयक पुस्तकें एकपक्षीय आहेत व त्यांत बर्‍याच चुका असाव्यात. पिरामिडच्या आंतील भिंतीवर कोरलेले लेख मुख्य साधनें होत. हे लेख सॅकारा येथील ५ व ६ या घराण्यांच्या पिरामिडांत असून बरेच जुने असावेत.

पहिलें साधन :-  यांतील विषय मृतसंस्काराचा असून मृत राजा पृथ्वीवरून स्वर्गास कसा जातो, तेथें तारा कसा बनतो, त्याला लागणारीं पेयें व अन्न, इत्यादि आहेत. यांत दिलेले मंत्र प्रथम संस्काराच्या वेळीं फक्त म्हणत असत पण पुढें ते लिहून मृताबरोबर पुरीत. तसेंच त्यांचा उपयोग फक्त मृत राजाच्या वेळीं करीत पण बाराव्या घराण्यापासून इतर लोक देखील त्यांचा उपयोग करूं लागले.

दुसरें साधन. – यांत “मृतासंबंधीं ग्रंथ” हा निरनिराळ्या काळांतील एकाच तर्‍हेचा संग्रह आहे. सैत काळांत ह्याची एक खास आवृत्ति काढण्यांत आली असून त्यांत १६५ भाग होते. ह्या पुस्तकाचा उपयोग मृताच्या संस्काराच्या वेळीं करीत. यांत मृतानें कोणतें रूप धारण करावें, कोणत्या देवड्यांनीं जावें व पाताळांत जातांना भेटणारे राक्षस वगैरे दिले आहेत.

तिसरें साधन :- यांत भिषीस येथील राजांच्या थडग्यांवरील लेख (१८ ते २० घराणें) यांत कांहीं पारमार्थिक ग्रंथ आहेत. ‘आमडुआंत’ अथवा ‘पाताळांत काय आहे’ ह्या ग्रंथांत रात्रीच्या बारा तासांचा सूर्याचा प्रवास दिला आहे; याखेरीज ‘देवडीचें पुस्तक’ ‘सूर्यस्तवन’ हीं पुस्तकें असून दुसर्‍या एका ग्रंथांत मानवजातीचा नाश व गाईच्या रूपानें स्वर्गाची उत्पत्ति कशी झाली याचें विवेचन आहे.

चवथें साधन :- हीं नंतरचीं पुस्तकें होत. यांत “अपोफिसचा पाडाव” आइसिस व मेफथिसचा शोक व “श्वशनग्रंथ” हीं महत्त्वाचीं पुस्तकें आहेत.

पांचवें साधन :- संस्कार विधि. यांत मंदिरांतील समारंभाच्या वेळेचे मृतसंस्कार, वगैरेंचा समावेश करतां येईल.

सहावें साधन :- जादूसंबंधीं आधार. पापिरस हॅरिस नांवाचें पुस्तक महत्त्वाचें असून तें कॅबास यांनीं प्रसिद्ध केलें. जादूसंबंधीं पुस्तकांत रोग, सर्पदंश व वृश्चिकदंश यांवर मंत्र असून दुसर्‍या पुस्तकांत बालकांच्या संरक्षणासाठीं मातेनें म्हणावयाचा मंत्र व शुभाशुभ दिवस आहेत.

सातवें साधन :- हें किरकोळ असून महत्वाचें आहे. यांत थडग्यावरील लेख, पापिरस हॅरिस पंथांतील देणगीचे लेख, इशस्तुतिपर कवनें व टॉलेमीच्या देवळांतील लेख यांचा समावेश होतो.

आठवें साधन :- प्लुटार्कचा इसीस व ऑसिरिस या संबंधीं ग्रंथ महत्त्वाचा असून डिआडोरसची माहिती उपयोगी आहे. डिओडोरसंची माहिती मात्र दुय्यम प्रकारची समजतात.

दैवतें :- घराण्यांची सत्ता स्थापन होण्यापूर्वीं येथें छोट्या छोट्या स्वतंत्र जाती असून त्यांच्यात नेहमीं युद्धें होत असत. यांतूनच पुढें मोठें राज्य बनलें व फारो मुख्य राजा झाला. यावेळेपासून राष्ट्रीय भावनांचा उदय झाला. निरनिराळ्या राष्ट्रजातींच्या पारमार्थिक व सृष्टिविषयक कल्पना एकत्र करून राष्ट्रीय संप्रदायाची उत्पत्ति झाली. याच सुमारास पिरामिडमधील लेख कोरण्यांत आले. या संप्रदायांत अनेक देवता व पौराणिक कल्पनांची मिसळ झाली. यांची पायरी पायरीनें झालेली वाढ लेखनसाधनांच्या अभावामुळें कशी झाली हें सांगतां येत नाहीं.

राजसत्ता सुरू होण्यापूर्वीं दोन तर्‍हेची दैवतें होतीं. एक कुलविशिष्ट अथवा स्थानविशिष्ट दैवते व दुसरीं निसर्गदैवतें. प्रथम प्रत्येक व्यक्तीचा देव निराळा असून तो एखाद्या प्राण्याचें रूप घेतो अथवा एखाद्या दगडांत अथवा झाडांत रहातो अशी समजूत होती. शांततेच्या वेळीं देवाची मंदिरांत स्थापना करीत, व युद्धाच्या वेळीं निशाण म्हणून समरांगणावर त्याला नेत. पुढें ह्या जाती एकाच भागांत राहूं लागल्यामुळें त्यांच्या देवाला स्थानमहात्म्य प्राप्त झालें. यामुळें प्रांताला देवावरून नांव देत असत. उदा. ‘अनुबिसश्वान देवाचा प्रांत’. शहरें व खेडीं वाढूं लागल्याबरोबरच हीं जाति दैवतें स्थानिक बनलीं. यामुळें ईजिप्तमध्यें एकाच देवाची पूजा पुष्कळ ठिकाणीं होऊं लागली. याचा परिणाम असा होत असें कीं, एकाच देवाचीं दोन रूपांतरें होत. कोणत्या देवाचा उल्लेख केला याविषयीं घोटाळा होऊं नये म्हणून त्याच्या पुढें तो कोणत्या ठिकाणचा आहे याचा उल्लेख करीत. नवीन ठिकाणीं एखाद्या देवाचें माहात्म्य वाढविण्याची पद्धत नेहमीं प्रचारांत असे. कांहीं ठिकाणीं रे (सूर्यदेव) सारख्या निसर्गदेवतांनां सुद्धां स्थानमाहात्म्य प्राप्त झालें होतें.

एखाद्या जातीची कुळदेवता व संरक्षक या दृष्टीनें पाहिलें तर या देवांत मूळचा कांहींच फरक नसे. फक्त त्यांच्या आकारांत अथवा रूपांत फरक असे. देवाला प्राण्याचें रूप कोणत्या तर्‍हेवर लोक देत हें सांगतां येत नाहीं. कांहीं ठिकाणीं एखाद्या प्राणिवर्ग पवित्र मानण्यांत येई. यांत मांजर, सुसर, पाल, वगैरे प्राणी असत. कांहीं स्थानिक देवतांनां सर्पाचें रूप दिलेलें आढळतें. व पुढें पुढें चित्र लिपींत सर्प हा देवीबद्दल काढीत असत. सिंहीण व गाय यांना देखील स्त्रीदेवता मानीत. मूळ प्राण्याचें रूप असलेला देव व प्राण्याचें रूप दिलेली निसर्गदेवता यांत बराच फरक असून त्यांनां हें रूप केवळ काल्पनिक देत असत. पुढें पुढें जसजशी सुधारणा झाली व राष्ट्रधर्मीय कल्पनांचा उद्‍भव झाला तसतसा देवांच्या कल्पनेंत बदल होत गेला. देवींना मानवरूपें देण्यांत आलीं परंतु त्यांचीं डोकीं अथवा आयुधे अथवा चिन्हें मात्र कायम ठेवीत. हळूहळू देवांना मानवी आकाराबरोबर मानवी गुणधर्म मिळालें. खालीं दिलेल्या प्रसिद्ध दंतकथेंत मूळ गोष्ट कशी होती व पुढें तिच्यांत कसा फरक झाला हें दिसून येईल.

ऑसिरिस हा फार चांगला व शहाणा राजा असून त्यानें ईजिप्शियन लोकांच्या उपयोगी अशा बर्‍याच गोष्टी केल्या. परंतु त्याचा दुष्ट भाऊ सेथ याने त्याला विश्वासघातानें मेजवानीस बोलावून पेटींत कोंडून मारलें व ती पेटी नाईल नदींत टाकली. आसिरिसची पतिव्रता स्त्री इसीस इनें महत्प्रयासाने आपल्या पतीच्या शवाचा शोध लाविला. परंतु इसीस आपला मुलगा होरस याला भेटण्याला गेली असतां सेथनें तें शव ताब्यांत घेतलें व त्याच चवदा तुकडे सर्व ईजिप्तभर पाठवून दिले. इसीसनें पुन्हां ते तुकडे मिळवून सांपडतील तेथें पुरले. दुसर्‍या हकीकतीवरून इसीसनें ते तुकडे जमवून मंत्रविद्येनें आसिरिसला जिवंत केलें, व तो पाताळांत मृतांचा राजा झाला. होरस मोठा झाल्यावर त्यानें मृत पित्याचा सूड उगविला व आपल्या चुलत्याचा सर्व प्रदेश जिंकला. दुसर्‍या हकीकतीवरून या दोघांतील भांडण थॉथ यानें मिटविलें आणि दोघांत ईजिप्त वांटून दिला. होरसला उत्तर भाग मिळाला व सेथनें दक्षिणेकडे राज्य केलें. होरस व सेथ हे दोन बंधू असून त्यांच्यात युद्ध झालें अशीहि एक जुनी दंतकथा होती. ज्यांचीं कुलदैवतें ससाणा-होरस  व सेथ होतीं अशा दोन जातींत युद्ध होऊन होरसची उपासक जात विजयी झाली असावी अशीहि एक कल्पना आहे. होरस जातींत राजघराण्याचा उदय झाला असून फारो हे नेहमीं होरस नांव लावीत असत.

ऑसिरिस हा बुसीरिस येथील देव असून इसीस ही जवळच्याच बुटो गांवची देवता होती. वर दिलेली दंतकथा प्रचारांत येऊन तिचें रूपांतर दैवकथेत झालें. आसिरिस इसिस, सेथ, होरस व नेफथिस हीं पृथ्वीदेव केब व आकाशदेवता नुत यांचीं मुलें असल्याची दुसरी एक प्राचीन कथा आहे. नंतर वरील दोन्ही हकीकती एकत्र करून दोन होरस समजण्यांत आले.

नि स र्ग दे व ता. – यांत ‘रे’ नांवाची सूर्यदेवता मुख्य होती. याच्या संबंधीं सर्वांत जुनी कल्पना म्हणजे ‘मंन्झेट’ (उषेचें जहाज) या गलबतांत रे देव आकाशभर फिरतो; संध्याकाळीं तो मेसेंकटेट (संध्येचें जहाज) नांवाच्या दुसर्‍या गलबतांत बसून रात्रींत पश्चिमेकडून पूर्वेला येतो ही होय. नंतर याला बरींच रूपें देण्यांत आलीं. कांहीं लोकांच्या मतें रेचें सकाळचें रूप बालकाचें असून दुपारीं तो पूर्ण वाढीच्या मनुष्याचें रूप धारण करी व संध्याकाळीं तो वृद्ध मनुष्याप्रमाणें रूप घेई. जेव्हां आकाश म्हणजे गाय समजण्यांत आली त्यावेळीं रे ह्याला वांसराची कल्पना देण्यात आली. चंद्र हा देव असून तो एका होडींत बसून आकाशांत फिरतो. ग्रह व तारे हे देखील देव असून सीरियस तारा फार महत्त्वाचा असे. आकाश ही नुत देवता असून केब (पृथ्वी) हा तिचा पति असे. कांहीं लोकांच्या मतें नुत “नावांचा” दैविक महासागर असून त्यामधून होड्यांतून सर्व ग्रहतारे पार जातात. यानंतर आकाशाला गाईची उपमा देऊन तिचे चार पाय जमिनीवर पक्के ठेविलेले आहेत अथवा तिच्या मोठ्या चेहर्‍याचे चंद्र व सूर्य हे डोळे आहेत. पृथ्वी सपाट असून तिच्यावर भव्य खांब असून त्यावर आकाश स्थिर आहे अशीहि द्यावा पृथ्वीची कल्पना पसरली. जमिनी खालीं अन्धकारमय व गुप्त प्रदेश असून त्यावर राक्षस पहारा करतात. ह्यास द्वात (पाताळ) नांव असून यांतून रात्रीं सूर्य प्रवास करतो. यांतच मृतांची वस्ती असून तेथें आसिरिस राज्य करतो. नाईल देव असून त्याला ‘हापि’ म्हणत व त्याला स्त्रियांसारखे स्तन आहेत असें मानीत. शिवाय कांहीं निसर्ग देवतांच्या उपासनेचा प्रचार स्थापन झाला होता.

रात्र, दिवस, वर्ष, ऋतु, चव, ज्ञान, आनंद, नशीब, यांच्या देवता, तसेंच सत्य व खरें यांची देवता मात (रेची मुलगी) हीं दैवतें असून आणखी दुसरीं पुष्कळ दैवतें असत.

परकीय देशाशीं संबंध आल्यामुळें सीरियांतील बाल, अनात, व रेशेफ, दक्षिणेकडील कुरूप व खुजा देव “बेस” आणि बिब्लस येथील “अस्टार्टी” या देवता ईजिप्तमधील देवायतनांत आल्या. थिबीजमधला पहिला अमेनोफिस व त्याची राणी नेफेरटारी इमुथेस व अमेनोफिस नांवाचे प्रसिद्ध पुरुष, यांची देवांत गणना करीत. भव्य वस्तू व ज्यांच्या योगानें पूज्यबुद्धि मनांत उत्पन्न होईल अशा गोष्टी व वस्तू यांची पूजा हे लोक करीत असत.

पौराणिक कल्पनांचा बहुधा उपाध्ये वर्गाकडून प्रादुर्भाव होत असून हेलिओपोलीस येथील कथा, संप्रदाय व देवता यांविषयीं कल्पनांनां व्यवस्थित स्वरूप देण्यांत आलें. सूर्य देव रे हा सर्व देव व मानव यांचा पिता असून महासागरांतील एका कमलांतून बालक रूपानें त्याचा जन्म झाला. एका सरोवरांत असणार्‍या टेंकडीवर एका अंड्यांतून त्याचा जन्म झाला अशी दुसरीहि एक कथा आहे. रे पासून शो व तेफनुत यांचा जन्म झाला. त्यांच्या पासून केब व नुत आणि त्यांच्यापासून आसिरिस, सेथ, इसिस व नेफतिस यांचा जन्म झाला. या नऊ देवांनां मोठे ईनियड म्हणत असून होरस वगैरे दुसर्‍या नऊ देवांना लहान ईनियड म्हणतात. स्थानपरत्वें वरील ईनियड मधील आपापल्या देवांनां महत्त्व देण्यांत आलें. पिरामिड मधील लेखांत आसिरिसचें महत्त्व रे च्या बरोबरीचें होतें. मृतसंस्कारविधीमुळें आसिरिसचें महत्त्व जास्त राहिलें असावें. आसिरिस चांगला देव असून सेथ याला दुष्ट देव समजत असत. आसिरिस ह्याला पृथ्वी, नाईल, चंद्र वनस्पति व सूर्य यांची देवता समजत.

इजिप्शियन लोकांचा धर्मभोळेपणा, फारच असल्यानें त्यांच्या देवांसंबंधीं मतांत कधींच फरक झाला नाहीं. नवीन देवता, ग्रंथकार वगैरे गोष्टीनीं सुद्धां त्यांच्यावर कांहींच परिणाम झाला नाहीं. थिबीज मधला अ‍ॅमॉन याला १२ व १८ तें २१ या घराण्यांनीं बरेंच महत्त्व दिलें परंतु पुढें त्याच्या पूजकांनीं त्याचेंच रे या सूर्यदेवतेशीं ऐक्य केलें. त्याचप्रमाणें अखेनटान (४ था अमेनोफिस) यानें दैवत संप्रदायांत क्रांति करण्याचा प्रयत्‍न केला पण तो सपशेल फसला. यावरून ह्या लोकांवर प्राचीन कल्पनांचा किती पगडा बसला होता हें दिसून येतें.

स्थूलदृष्टीनें पाहिलें तर ईजिप्तच्या धार्मिक मूळ कल्पनांत फरक पडला नाहीं. त्यांच्या अर्थांत मात्र बराच फरक पडला. सांप्रदायिक पुस्तकांची दुर्बोध भाषा नंतरच्या उपाध्यायास समजत नसे, व यामुळें ग्रंथांवर टीका वगैरे लिहिण्यास वरीच जागा होती. यांमुळें सुगमता येण्याऐवजीं मूळ कथेंत दुर्बोधता जास्त येऊन दोन कथा अथवा गोष्टी यांचें मिश्रण होत असे. दोन देवांचें बहुधा एकीकरण होऊन अ‍ॅमॉनचीं अ‍ॅमॉनरे, ख्नुम-रे अशीं नांवें तयार होत. विशेषतः ‘रे’ देवाशीं अशा तर्‍हेचें मिश्रण जास्त होत असे.

या लोकांच्या कल्पनेंत सर्व देवांवर एक जगन्नियंता असून तो मुख्य आहे व बाकीचे देव म्हणजे त्याचीं रूपें होत अशी कल्पना होती. एकच देवाची पूजा करण्याकडे यांची प्रवृत्ति मधून मधून होत असे.

फारो चवथा अमेनोफिस यानें राजकीय व धार्मिक आकांक्षा धरून आपली राजधानी थिबीज मधून हालवून उत्तरेस दोनशें मैलांवर खिटेटॉन (आधुनिक-एल-अमर्ना) येथें नेली. त्यानें थिबीजमधील अमॉन-रे व इतर सर्व देवांचें स्तोम माजविलें. स्वतः अखेनटॉन (अटॉनचें तेज) असें नांव धारण केलें. परंतु ६० वर्षानंतर अशी स्थिति झाली कीं, तें शहर उजाड पडलें व अटॉन देवाचें नांव सुद्धां कोणी घेईनासें झालें.

यानंतर बरीच धर्मशास्त्रें उदयास आलीं. त्यांनीं आपापल्यापरी येथील ‘सर्व देवायतनांचा’ खुलासा करण्याचा प्रयत्‍न केला. रे हा पहिला ईजिप्तचा राजा समजून त्याच्यानंतर मोठ्या लहान ईनियडमधील देव राजे झाले. त्यांच्यामागून ‘होरस’  उपासक गादीवर बसले. यामुळें फारो हे दैविक असून त्यांनां ‘रे’  चे वंशज समजत. यानंतरच्या वाङ्मयांत पौराणिक व इतर कथा बर्‍याच असून नवीन राज्याच्या अखेरीस लाक्षणिक व नैतिक अर्थ करण्याच्या पद्धतीला उत्तेजन मिळालें. ऑसिरिसची दंतकथा म्हणजे चांगलें व वाईट यांचें युद्ध असे. रेचा अपोफिस नांवाच्या सर्पावरील विजय हा उजेड व काळोख यांच्या युद्धाचा दर्शक होय. ‘प्ताह’ हा सर्व जीवांचा उत्पादक असून त्यापासून होरस म्हणजे हृदय अथवा मन आणि थॉथ म्हणजे ‘जिव्हा’ यांची उत्पत्ति झाली. अशा अन्वर्थक दृष्टांतावरून ग्रीकांनीं प्राचीन ईजिप्तच्या लोकांसंबंधीं लिहून ठेविलें असावें.

ईजिप्शियन संप्रदायाच्या अखेरच्या स्थितींत रानटी प्रकार विशेष लोकप्रिय झाले. साधारण प्रकारच्या लोकांनीं मूळ देवाची पूजा करण्यास सुरुवात केली. यामुळें धर्मवेड्या लोकांत भांडणें होऊन रक्तपात झाला. ईजिप्तमधील कांहीं पंथ व त्यांतल्यात्यांत सेरॅपिस व इसिस यांची पूजा यूरोपांत देखील होऊं लागली. रोमनकाळांत थिओडोसिअसच्या हुकुमानें अलेक्झांड्रिया येथील सेरॅप्युम जमीनदोस्त केल्यानें मात्र प्राचीन ईजिप्तच्या धर्माला चांगलाच तडाखा बसला.

दैवतसंप्रदाय :- प्रत्येक गांवांत तेथील देवाचें मंदिर असून तें बहुधा दगडी बांधलेलें असे. प्रत्येकांत देवाची मूर्ति असे. प्रथम एकाच देवाच्या नांवाचें मंदिर असून नंतर देवपत्‍नी व तिसरी देवता म्हणजे दुसरी पत्‍नी अथवा मूल, यांचें महत्त्व देवाबरोबर गणण्यांत येऊं लागलें. देवाला अन्न, पेय, वस्त्र वगैरे सर्व वस्तू देण्यांत येत असत. रोज सकाळीं पुजारी मंत्र म्हणून देवद्वार उघडीत असे व यानंतर पूजा व नमस्कार वगैरे झाल्यानंतर ‘मात’ अथवा सत्यदेवीची मूर्ति देवाला वहात असत. यानंतर देवाला नैवेद्य वगैरे अर्पण करीत व दुसर्‍या दिवशी असाच विधि होत असे. शुद्धि, धूप व उटणें ह्यांचा समावेश नेहमीं पूजेंत असे; बैल व हंस यांना देवाला बळी देत असत.

लवकरच नित्य पूजा व कांहीं सण सर्व देशभर एकाच दिवशीं व एकाच पद्धतीनें करीत. यांत ऋतूंचा आरंभ, वर्षारंभ व सीरियस (सोथिस)चा उदय महत्त्वाचे असून अ‍ॅबिडॉस येथील ऑसिरिसच्या सणाच्या वेळीं त्याच देवासंबंधीं नाटक दाखवीत. साधारणतः उत्सवांत देवाची मिरवणूक काढीत असत.

येथील मंदिरें एकाच पद्धतीवर बांधलेलीं असत. प्रथम उंच व मोठ्या भिंती असत. त्यावर लढायांचीं चित्रें काढलेलीं असत. याच्या आंत रिकामी जागा असून त्यांत लोकांनां साधारणतः सणाच्या दिवशीं येण्यास परवानगी असे. यानंतर एक दिवाणखाना असून त्यांत मिरवणूक वगैरे काढीत. यानंतर एका काळोखी खोलींत देवाची मूर्ति असे. त्यांत फक्त पूजार्‍यांना येण्यास परवानगी असे. यापूर्वींची देवळें म्हणजे निव्वळ झोंपडीवजा असत.

जसजशी फारोची सत्ता वाढली तसतशी उपासना ही राज्यकारभाराचा एक भाग झाली. मंदिरें बांधल्याबद्दल प्रसिद्ध राजांना सुद्धां अभिमान वाटत असे. देवाबद्दल राष्ट्रीय भावना उत्पन्न झाल्यावर युद्धांना धार्मिक स्वरूप आलें. व युद्धांतील लुटीचा बराच भाग मंदिरांना देत असत. दीर्घायुष्य व भरभराट यासाठीं राजे देवांना बरीच संपत्ति अर्पण करीत. पुढें अशी समजूत झाली कीं, देवळें हीं फारोची देणगी असून ती तो आपला बाप ‘देव’  याला अर्पण करतो. म्हणून पुष्कळदां भिंतीवर धार्मिक विधि राजा करीत असल्याचें दाखविलें आहे. पुजार्‍यांची सत्ता बरीच असून देवालयाच्या मालमत्तेचा उपभोग तेच घेत. तिसर्‍या रामेसीसच्या कारकीर्दींत अ‍ॅमॉन देवाच्या खास तैनातींत ऐंशी हजार लोक असून ४ लक्ष गुरेंढोरें असत. कांहीं पिढ्यांनंतर अ‍ॅमॉनच्या मुख्य पुजार्‍यांनीं फारोची सत्ता गुंडाळून ठेवून स्वतःचें घराणें स्थापन केलें.

पूजार्‍यांची वेगळी अशी जात केव्हांच झाली नाहीं. पूर्वी जमीनदार हेच मुख्य पुजारी असून त्यांच्या हाताखालीं धंदेवाईक व इतर अशा दोन तर्‍हेचे पुजारी असत. धंदेवाईकांत ‘ खेरहेब’  नांवाच्या विद्वानांकडे विधि वगैरेचें काम असे. सामान्य पुजारी चार प्रकारचे असून ते देवळाचें काम आळीपाळीनें वांटून घेत असत. सर्व पुजार्‍यांना स्वच्छ पोषाख व खाणें पिणें यांत नियमन ठेवावें लागे. पुजार्‍याखेरीज इतर कामगार, देवडीवाले, नोकर व गुलाम देवळांत असत. नवीन राज्यांत पुजारी लेखक असत पण केव्हांकेव्हां अ‍ॅमान देवाचा पुजारी दक्षिण ईजिप्तचा वजीर असे. स्त्रियांनां पुजारी होतां येत असे. कांहीं श्रीमंत स्त्रिया देवळांत देवापुढें गायन करीत. थिबीज येथील ‘अ‍ॅमान देवाची पुजा करणारी’ व ‘देवाची पत्‍नी’ या नांवाच्या दोन स्त्री पुजारी असत. सैतकाळांत खुद्द राजा आपली सत्ता चांगली बसविण्यासाठीं या जागा बहुधा आपल्या मुलींना मिळवून देत असे.

मृत व त्यांची पूजा :- देवांची पूजा सरकार व पुजारी यांच्या हातांत गेली, यामुळें लोकांचा धर्ममताचा ओघ दुसरीकडे वळून त्यांनीं मृतांच्या संस्काराकडे विशेष लक्ष पुरविलें. अगदीं प्राचीन कबरींत शवाबरोबर मेंढीचें कातडें व इतर पदार्थ मृताच्या उपयोगासाठीं म्हणून ठेविलेले सांपडतात. सुधारणेच्या ओघाबरोबर प्रेताबरोबर पुरण्यांत येणार्‍या सामानांत फरक होऊन त्यांत उत्तम वस्तूंचा समावेश करण्यांत आला. ईजिप्शिनयांची अशी कल्पना होती कीं, कबर म्हणजे मृतांचें राहण्याचें स्थान असून त्यांत त्यांच्यासाठीं जिवंत माणसाप्रमाणें सोय करीत असत. या कबरी विशेषेंकरून पश्चिमवाळवंटांत, जेथें सूर्य मावळतांना दिसे तेथें असत. कबरींत प्रेतांना त्रास होऊं नये म्हणून काळजी घेत. असाच प्रकार पिरामिडांत असून मार्गांत उंच भाग केलेले असत. मृतांच्या पूजेसाठीं वेगळ्या खोल्या असून भिंतीवर चित्रें काढलेलीं असत. प्रेत खराब होऊं नये म्हणून बरीच काळजी घेतलेली दिसते. मध्यकालीन राजांच्या अगोदर श्रीमंत लोकांच्या प्रेतांना मसाला लावण्याची पद्धत सुरू झाली. प्रथम आंतडीं काढून ठेवीत, नंतर प्रेताला सज्जीखार व एक तर्‍हेचें डामर लावीत, अशा ममींना आडवे निजवून मग कबरींत पुरीत. पुढें या बाबतींत बरीच सुधारणा होऊन श्रीमंत लोकांच्या प्रेतांना बर्‍याच तिरड्या लागत. प्रेतांत मसाला भरतांना बरेच विधी करीत व मंत्र म्हणत. प्रेताबरोबर बरेंच सामान असून पुढें नोकरांचें काम करीत असलेले पुतळे असत. मध्यकालीन राज्यांत नोकरांऐवजीं ममीसारखे पुतळे करून ठेवीत. याखेरीज महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ग्रंथ होत. पिरामिडमध्यें हे ग्रंथ भिंतीवर लिहिलेले सांपडतात. कधीं कधीं प्रेताच्या दगडी पेट्यांवर आंतल्या बाजूस हे लेख असत. पुढें पापिरस कागदावर ग्रंथ लिहिलेले सांपडत. प्रेत शृंगारलेल्या होड्यांत घालून नाईल नदीच्या पश्चिम तीरावर नेत. तेथून कबरींत नेऊन पुंरीत. पुरतांना बरेच विधी करावे लागत.

वरील संस्कारविधि कितीहि चांगला केला व कबरी मधील तयारी कितीहि चांगली असली तरी मृताची दुसर्‍या जगांतील स्थिति केवळ त्याच्या नातलगांवर अवलंबून असे. त्याच्या घराण्यांतील लोकांच्या पूजेवर त्याला अवलंबून रहावें लागे. मेल्यानंतर ज्या शरीराच्या भागाला अन्न, पाणी व भावना असत त्याला ईजिप्शियन लोक ‘का’ म्हणत. ‘का’ चा मनुष्याबरोबर जन्म होत असे व तो दिसण्यांत त्याच मनुष्यासारखा असे. ‘का’ व आत्मा यांत फरक असून आत्मा अथवा ‘बै’ मनुष्य मेल्यानंतर त्याच्या कंबरेभोंवतीं पक्षी अथवा इतर रूपानें घिरट्या घालीत असे. मृतसंस्कार चांगले झाले असतां जीवाला वाटेल तें रूप घेतां येतें असा समज होता. देवांना देखील ‘का’ व ‘बै’ हीं रूपें असत. ‘का’ लाच फक्त पूजा अर्पण करीत. मृताच्या मुलांनां ही पूजा करणें अवश्य असे व ते ती करीत. सणाच्या दिवशीं कांहीं पदार्थ कबरींत आणींत आणि शुद्धी व प्रेताचें तोंड उघडणें हा विधि करीत. पुढील पिढ्या हा विधि करतील किंवा नाहीं याची खात्री नसल्यामुळें कांहीं विशिष्ट प्रकारचे लोक’ द्रव्य घेऊन हा विधि करीत. त्यांना ‘कांचे दास’ असें म्हणत. किंवा जवळच्या देवळांतील पुजारी कांहीं पैसा घेऊन देवाच्या नैवेद्यांतील कांहीं भाग मृतांसाठीं राखून ठेवीत. इतकी तयारी असतांना सुद्धां कबर खराब होईल व पूजा बंद पडेल या भीतीनें प्रार्थना व धमक्यांचा उपयोग करीत. कबरींत सहज जाणार्‍या मनुष्याला प्रार्थना करावी लागे व कबर उध्वस्त करणार्‍यावर ईश्वराचा कोप होईल अशी समजूत असे. मेल्यानंतर मनुष्य कबरींत राहतो ह्या कल्पनेखेरीज तो आकाशांत तार्‍याच्या रूपानें राहतो अशी दुसरी एक कल्पना होती. असा मान फक्त थोड्यांनाच मिळे. पूर्वीं फक्त सरदार घराण्यांतील लोकांना हा मान असून पुढें नीतिमत्तेनें चालणार्‍या प्रत्येक मनुष्याला हा मान मिळे. आकाशांत तो मनुष्य कधीं कधीं सूर्य देवाच्या जहाजांत बसून फिरे तर कधीं कधीं तो देव व तारे यांनां मारून खात असे. दुसर्‍या कल्पनेप्रमाणें आकाशांत ईजिप्तसारखाच दुसरा एक देश असून त्यांत कायदे असत. या देशांत धनधान्य, फळें यांची समृद्धि असून त्यांत मृत मनुष्य रहात असे. याला ‘सोखेट हर्रु’ (लव्हाळ्याचें रान) म्हणत. प्राचीन ग्रंथांत वरील कल्पना व ऑसिरीस दंतकथा यांचें मिश्रण केलेलें आढळतें. प्रत्येक मनुष्य मेल्यानंतर ऑसिरीसच्या पदावर जाऊन पोहोंचतो व शेवटीं मृत्यु व पापरूपी सेथ यांचा पराजय करतो. पुढें पुढें प्रत्येक मनुष्याला ‘ऑसिरीस-अमुक-अमुक’ म्हणून नांव मिळे. अशी गोष्ट सांगतात कीं सेथनें आसिरीस विरुद्ध खोटी फिर्याद आणली होती व त्याचा निवाडा हेलिओपोलीस येथील न्यायगृहांत होऊन आसिरीस हा प्रसिद्ध वक्ता थॉथ याच्या मदतीनें निर्दोषी ठरला. यावरून प्रत्येक मनुष्याचा निवाडा होऊन मग त्याला स्वर्गांत स्थान मिळेल ही कल्पना दृढ झाली. यावरून एका स्थळीं एका चित्रात सिंहारूढ ऑसिरीस व बेचाळीस पंच दाखविले असून समोर तराजू आहे. यांत प्रत्येक मृताचें हृदय तोलून सत्याबरोबर त्याची नोंद थॉथ ठेवतो. याखेरीच मी अमुक अमुक पापें केलीं नाहींत याविषयीं एक यादीच्या यादीच दिलेली सांपडते. यावरून आपण चांगल्या रीतीनें व सन्मार्गानें वागलों नाहीं तर परलोकीं आपणाला सुख प्राप्त होणार नाहीं अशी कल्पना दृढ झाल्याचें स्पष्ट दिसून येतें. ऑसिरीसला जेथें पुरलें असेल तेथेंच आपल्याला पुरावें अशी प्रत्येक ईजिप्शियनाची इच्छा असे. परंतु सर्वांनाच तें शक्य नसल्यानें ते तेथें ‘कबरीवरचा’ दगड तरी उभारीत, बाराव्या घराण्यापासून अबिडॉसमध्यें ऑसिरीसला पुरलें ही कल्पना दृढ झाली.

मंत्र, जादू वगैरे :-  देवळांत अथवा मृताबद्दल होणार्‍या समारंभांत मंत्र म्हणत असून त्यांचा अर्थ समजण्यास कठिण असे. मंत्राबरोबर कांहीं हातवारे व कृती असत. ‘हिड’ अथवा मंत्रविद्या धर्मोपदेशक व कांहीं विद्वान माणसें यांनां अवगत असे. या लोकांच्या मतें देवांनां मनुष्यापेक्षां मंत्रविद्या जास्त अवगत आहे व त्यामुळें ते श्रेष्ठ आहेत. एखाद्या मनुष्याचा मेणाचा पुतळा करून त्याला इजा करणें वगैरे गोष्टी कायद्यानें गर्ह्य समजल्या जात. बाकीच्या बाबतींत मंत्रविद्येला कांहींच अडथळा होत नसे.

मंत्राचा उपयोग विशेषतः रोग निवारण्याकडे करीत. भूत पिशाच्चाची बाधा मनुष्यांनां होऊन त्यापासून रोग उत्पन्न होतात व त्यांचें निवारण जादूटोण्यानें करतां येते अशी या लोकांची समजूत होती. यामुळें रोग व त्यांची चिकित्सा करण्यांत येऊन त्यामुळें औषधी व झाडपाला यांचा खरा उपयोग समजून आला. पुढें पुढें तर सर्पदंश, वृश्चिकदंश वगैरे बाबतींत मात्र मंत्राचा उपयोग करीत. मंत्र फारसे गूढ नसून त्यांत परकीय शब्द व नांवें बरीच येत. मंत्रांत पौराणिक कथा अथवा होरसच्या गोष्टी असून केवळ शब्दानें कार्य होतें असा समज असावा. त्याचप्रमाणें देवानें मांत्रिकाला  साहाय्य दिलें नाहीं तर तो त्याला उपाशी वगैरे ठेवण्याची धमकी देत असे. मंत्राबरोबर गांठी अथवा ताईत वगैरे असत. पुष्कळदां मंत्र पापीरस अथवा चिंधीवर लिहून तो तुकडा गळ्यांत बांधीत. मणी, ताईत वगैरे मंत्रून रोगनिवारणार्थ देत असत. धार्मिक कृत्यांत मंत्र होते. उपासना व मंत्र यांत खडाष्टक आहे असें म्हणतां येत नाहीं ‘उशेब्ती आंकडे’ व ‘मृताचा ग्रंथ’ हीं मांत्रिक पुस्तकें समजत.

ले खा व ग म न – सतराव्या शतकापर्यंत ईजिप्शियन चित्रलिपि वाचण्याच्या प्रयत्‍नांत फारसें यश आलें नाहीं. १७९९ त नेपोलियननें ईजिप्तवर केलेल्या स्वारीबरोबर फ्रेंच इंजिनीयर होते; त्यांनीं ‘रोझेटा’ शीलालेख शोधून काढल्यापासून चित्रलिपी वाचण्याच्या प्रयत्‍नांत यश येऊं लागलें. या दगडावर चित्रलिपी, लौकिक भाषा व ग्रीक या तीन भाषांत लेख होते. चित्रलिपी वाचण्यांत टॉमस यंग याला थोडेंबहुत आलें. या बाबतींत सर्वांत जास्त श्रम शाम्पोलियन याचे होत. त्यानें वयाच्या ११ वर्षापासून ईजिप्तसंबंधीं अभ्यासास सुरवात केली. नंतर यानें ईजिप्त देशांत सफर केली. १८३२ त हा वारला. याचे इजिप्शियन भाषेसंबंधीं विशेष प्रयत्‍न असून त्याला पूर्वींच्या विद्वानांकडून फक्त लेख वगैरेचीच मदत झाली. या नंतर जर्मनींत लेपसिअस व इंग्लंडमध्यें सॅम्युएल बर्च यांनीं या ज्ञानांत बरीच भर टाकली. ब्रग्श, दरूज, मॅस्पेरो, रेव्हिलो, झोगा, स्टन या विद्वान गृहस्थांनीं भाषाशास्त्रच परिणतेस नेलें. विशेषतः जर्मनीनें या बाबतींत बरीच भर टाकली व अ‍ॅडोल्फ एरमन व त्याचे शिष्य यांनीं ईजिप्शियन भाषेच्या व्याकरणांत चांगलीच प्रगति केली.

भा षे चा इ ति हा स. – हा बराच दूरवर पसरला आहे. त्याची सुरवात पहिल्या घराण्याच्या शीलालेखा (साधारणतः ख्रि. पू. ३३०० वर्षें;) पासून होऊन अगदीं अलीकडचे कॉप्टिक लेख सुमारें इ.स. च्या १४ व्या शतकांतले आहेत. या भाषेंचीं रूपांतरें पुढीलप्रमाणें होतात.

प्राचीन ईजिप्शियन भाषा:- ही प्राचीन राज्यांतील भाषा होती. या भाषेंत पहिल्या घराण्याच्या वेळचे लेख असून ५ व ६ या घराण्यांच्या वेळचे लेख पिरॅमिडावर कोरलेले आहेत.

मध्यकालीन व नंतरची भाषा. – या दोन्ही भाषा अनुक्रमें मध्यकालीन व नवीन राज्यांतील प्रचारांतील होत. पहिली भाषा १३ व्या घराण्यापासून मध्यकालीन राज्याचा नाश होईपर्यंतच्या काळांतील लेखांत सांपडते. दुसरी भाषा १८ ते २१ या घराण्यांच्या कारकीर्दीतील लेखांत वापरली आहे.

डेमॉटिक :- ही भाषा ‘सैत’ घराण्याच्या वेळीं साधारण लोक बोलत असून ती ‘डेमॉटिक’ लिपींत लिहिलेली आहे. थोडा बहुत फेरफार झालेल्या पद्धतीनें ही भाषा इ. स. चौथ्या शतकांत सुद्धां होती.

कॉप्टिक. – ही इ. स. च्या तिसर्‍या शतकापासून १० व्या शतकापर्यंत ईजिप्त मधील ख्रिस्ती लोकांची भाषा होती.

कालमापन :- प्राचीन ईजिप्शियन ३० दिवसांचा महिना याप्रमाणें वर्षाचे बारा महिने धरीत आणि पांच दिवस अधिक म्हणून एकंदर वर्षाचे ३६५ दिवस धरीत. वर्षाचे तीन ऋतु असून त्यांचीं नांवें अनुक्रमें :- ‘जलप्रलय’ अथवा ‘हिरवट’; ‘बी पेरण्याचा हंगाम’ अथवा हिवाळा ‘कापणीचा हंगाम’ अथवा ‘उन्हाळा’; बाकीचे पांच दिवस वर्षारंभीं अथवा अखेरीस मोजीत असत. महिन्यांना त्यांतील प्रसिद्ध सणावरून नांवें दिलीं होतीं. तीं येणें प्रमाणें:- थॉथ, पओफी, अथीर, चोईआक, टोबी, मेचीर फामेनोथ, फार्मुथी, पेकॉन्स, पेनी, एपिफी, मेसूर. या लोकांची शेती नाईल नदीच्या पुरावर अवलंबून असे. ‘जलप्रलयाच्या’ पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षारंभ होय. येथील ज्योतिषी सोथिस तार्‍याच्या उदयावरून वर्षारंभ धरीत असत. अधिक असलेल्या पांच दिवसांस अशुभ मानीत असत. ३६५ दिवसांच्या वर्षाबरोबर ३६० दिवसांचे वर्ष धरीत असावे. असा तर्क आहे. देवळांत चांद्रमास धरीत असत. तिसर्‍या टॉलेमी युअर्डीटिझनें दर चार वर्षाला एक दिवस जास्त धरण्याबद्दल प्रयत्‍न केला पण तो सिद्धीस गेला नाहीं. ऑगस्टचा प्रयत्‍न सिद्धीस जाऊन त्यानें ज्युलियन वर्षपद्धति सुद्धां अंमलांत आणली. साधारणपणें असें अनुमान आहे कीं, प्राचीन ईजिप्त मध्यें सोथीक अथवा दुसरा कोणताहि शक चालू नसावा. राज्यारोहणापासून वर्ष मोजण्याची पद्धति चालू होती. प्राचीन शिलालेखांत प्रसिद्ध गोष्टीवरून वर्षें मोजीत. राज्यारोहण वर्षपद्धति कोणत्या तत्त्वावर होती हें सांगतां येत नाहीं.

मॅसिडोनियन वर्षगणना टॉलेमीच्या वेळच्या कागद पत्रांत सांपडतें. ऑगस्टसनें ‘अलेक्झांड्रीयन शक’ चालू केला.

प्रा ची न ई जि प्शि य न वा ङ्म य. – प्राचीन ईजिप्तचे वाङ्मयात्मक अवशेष आपणास दोन मार्गांनीं उपलब्ध झाले आहे. यांपैकीं एका प्रकारामध्यें भिंती व प्राचीन स्मारकें यांवरील शिलालेखांचा अंतर्भाव होतो आणि दुसर्‍या प्रकारामध्यें पापीरसवर लिहिलेल्या ग्रंथांचा समावेश होतो; तथापि स्मारकांवरील शिलालेखांचा अंतर्भाव या देशाच्या वाङ्मयामध्यें करणें जरा कठिणच आहे. कारण या शिलालेखांमध्यें वाङ्मयक्षेत्रांत समाविष्ट न करतां येण्यासारख्या राजकीय व धार्मिक घडामोडींच्या हकीकती आहेत. तथापि या शिलालेखांमध्यें कांहीं थोडे वाङ्मयाचे उत्कृष्ट नमुनेहि आढळून येतात.    

या शिलालेखांतील एक महत्त्वाचें उदाहरण म्हटलें म्हणजे विख्यात असा जो रामेसीस बादशहा यानें हिटाइट लोकांशीं केलेलें युद्ध वगैरेसारखे पराक्रम वर्णन करणारी कविता होय. याखेरीज शुद्ध ऐतिहासिक स्वरूपाचे अनेक राजवंशावळी असलेले स्मारकावरील शिलालेख उपलब्ध आहेतच; परंतु दुर्दैवाची गोष्ट ही कीं, या राजवंशावळींचा कोणताहि एक शिलालेख पूर्ण स्वरूपांत उपलब्ध नाहीं. तसेंच ट्यूरिन पापीरस या नांवाच्या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक लेखाबद्दलहि असेंच म्हणतां येईल.

ईजिप्तचे वाङ्मयावशेष ज्यांवर कोरण्यांत आले आहेत, त्या पापीरसच्या गुंडाळ्या म्हणजे त्या काळांतील उत्तमोत्तम वाङमय ग्रंथ होत. कारण घडी घातलेल्या पानांचीं पुस्तकें हीं अगदीं अलीकडचीं आहेत. या प्राचीन कालांत पापीरसच्या पुस्तकांचाच कायतो उपयोग करण्यांत येत असे. हा पापरिसचा कागद पापरिस झाडाच्या बाह्य त्वचांचे तुकडे एकमेकांस चिकटवून तयार करण्यांत येत असे. हे कागद ८-१४ इंच रुंद असून लांबी मात्र लागेल तितके फूट ठेवण्यांत येत असे. या लेखांपैकीं कांहीं लेख ख्रिस्ती शकापूर्वीं तिसर्‍या दशसहस्त्रकांतील आहेत. या लेखांमध्यें निरनिराळ्या प्रकारचें वाङ्मय दिसून येतें. यांपैकीं कांहीं लेखांमध्यें नीतिपर उपदेश व उत्तम रीतीनें आयुष्य घालविण्याचे नियम दिले असून कांहीं लेखांमध्यें वैद्यकशास्त्र व गणित याजबद्दलहि माहिती आहे.

याशिवाय दुसरा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हटला म्हणजे मृतांचें पुस्तक या नांवाचा असून ईजिप्शियन लोक या ग्रंथास बायबलप्रमाणें पूज्य मानीत. शुद्ध वाङ्मयाच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचे अवशेष म्हणले म्हणजे या लेखामध्यें सांपडणार्‍या अनेक संपूर्ण अगर त्रुटित स्वरूपाच्या अद्‍भुत कथा व कविता या होत. या वाङ्मयाची भाषा व लेखनपद्धति इतकी जुनी आहे कीं, या लेखांचा कितीहि व्यासंग केला तरी संशोधकांनां या वाङ्मयांतील मार्मिक स्थळें दाखवितां येणार नाहींत. तथापि कांहीं कविता व कथा यांची रचना, विचारपद्धति आणि कल्पकता इत्यादि गोष्टी अर्वाचीन साहित्यशास्त्राच्या कसालाहि उतरण्यायोग्य आहेत. जसजसा या प्राचीन वाङ्‌मयाचा अभ्यास जास्त होऊं लागला तसतसें असें आढळून येऊं लागलें कीं, ईजिप्तच्या या लौकिक वाङ्‌मयामध्यें प्रवास आणि धाङसें यासंबंधीं कथांचा भरणा जास्त आहे. बराच कालपर्येत समुद्रपर्यटनाविषयीं एक कथा देखील उपलब्ध झाली नसल्यामुळें अर्वाचीन संशोधकांनीं प्राचीन ईजिप्तच्या दर्यॉवरर्दीपणाच्या अज्ञानासंबंधीं ठाम उपपत्ति निश्चित केली होती.

परंतु १८८० सालीं सेंटपीटर्सबर्ग या रशियन शहरांतील इंपीरीयल हार्मिटेज म्यूझियम या नांवाच्या पदार्थसंग्रहालयामध्यें एक प्राचीन ईजिप्शियन कथेचें संशोधन करण्यांत आलें. ही कथा वाचतांच सिन्दबाद नांवाच्या खलाशाच्या गोष्टीची आठवण होते. ही कथा म्हणजे साध्या दैवतविषयक कल्पनेला अदभुत गोष्टीचें चढविण्यांत आलेलें रुपक होय. या कथेचा नायक एक हतभागी खलाशी असून त्यानें आपल्या समुद्रपर्यटनांतील हकीकती अदभुत तर्‍हेनें मांङल्या आहेत. या कथेंतील चमत्कृतिपूर्ण बेट म्हणजे मृतजीवांचें निवासस्थान असून या बेटाचा संरक्षक एक सर्प आहे. या कथेवरुन ईजिप्शियन लोकांस दर्यावर्दीपणा व समुद्रपर्यटण यासंबंधी पुष्कळ ज्ञान होतें असें दिसून येईल.

इ जि प्त म धी ल प्रा ची न शि ल्प क ला – प्राचीन इजिप्शियन संस्कृतीचे बरेचसे अवशेष म्हणजे प्राचीन काळांतील कलाविषयक स्मारकें होत. जेव्हां जेव्हां आपण प्राचीन ईजिप्तविषयीं बोलत असतों तेव्हा इजिप्तमधील पिरामिड नांवाचे मनोरे, देवालयें व मोठमोठीं शिल्पें यांजविषयीं बोलत असतों. ज्यावेळी एखादा मनुष्य ब्रिटिश म्यूझियम किंवा लूव्हर येथील पदार्थसंग्रहालय यासारख्या संस्थाच्या दालनांतून फिरत असतो त्यावेळीं शिल्पकला ही प्राचीन इजिप्त राष्ट्राचें जीवन असावें कीं काय असें त्यास वाटेल. इजिप्तमधील प्राचीन कलाविषयक स्मारकांची संख्या जरी दिसण्यांत पुष्कळ असली तरी ही संख्या कित्येक शतकांचे थोडेथोडे अवशेष सांठवूनच तयार झाली असली पाहिजे. तथापि इजिप्शियन लोक हे पृथ्वीवरील सर्व लोकांमध्यें पहिल्या प्रतीचे शिल्पकलाप्रवीण होते ही गोष्ट कोणासहि नाकबूल करतां येणार नाहीं. इजिप्शियन शिल्पप्रतिमांची ग्रीक लोकांच्या सर्वोत्कृष्ट शिल्पाबरोबर तुलना करणें केव्हांहि सयुक्तिक होणार नाहीं. परंतु दगडावर शिल्पकाम करण्याची शक्यता प्रथम इजिप्शियन लोकांनीं सिद्ध केली असा जेव्हां विचार येतो तेव्हां इजिप्शियन शिल्पाची खरी योग्यता कळून येते. या सर्व विवेचनावरुन अखिल जगाच्या कलाविकासामध्यें पहिलें स्थान प्राचीन इजिप्तकडेच येतें हें दिसून येईल. निरनिराळ्या प्रकाराचें सामानसुमान, चंबूच्या आकारांचीं भांडी वगैरे सारख्या चैनीच्या वस्तू तयार करितांना जरी रुचिवैचित्र्यास पुष्कळ वाव असेल तरी मनुष्यप्रतिमेच्या रचनेमध्यें फेरबदल करण्याची थोडी देखील इजिप्शियन लोकांस परवानगी नसून धार्मिक बाबतींतील सर्व वस्तूंचे सांचे प्रथमपासून अगदीं ठराविक असत. देवता, प्रतिमा वगैरे तयार करण्याचे धर्मोपदेशकांनीं जे नियम किंवा नमुने प्रथम घालून दिले त्याबरहुकूम शिल्पशास्त्रज्ञांनां काम करावें लागें.

इजिप्शियन रिलीफ म्हणजे उठावदार प्रतिमाशिल्पाची उत्पत्ति त्यापूर्वीं प्रचलित असलेल्या चित्रकलेपासून  झाली असावी. प्रथम देवतांच्या प्रतिमा व दुसरीं धार्मिक चिन्हें यांची सपाट भागावर रूपरेषा आखून नंतर त्यामध्यें रंग भरीत असत. परंतु कालांतरानें याच आकृती एका बारीक हत्यारानें दगडावर काढण्यांत येऊं लागल्या व या निरनिरळ्या प्रतिमांमधील अंतर कोरून काढण्यांत येऊं लागलें, आणि अशा रीतीनें पूर्वीचा सपाट पृष्ठभाग नाहींसा होऊन त्याला शिल्पाचा आकार आला. या प्राचीन ईजिप्शियन प्रतिमाशिल्पामध्यें यथातथ्य भावाविष्करण करून दाखविण्याचें कौशल्य साधलेलें दिसत नसून फक्त कांहीं सर्वसामान्य कल्पनाबरहुकूम नाक, कान, डोळे, हातपाय इत्यादि भिन्न भिन्न अवयव त्या त्या विशिष्ट ठिकाणीं बसवून दिल्यासारखे दिसतात. पोषाख दाखविण्याची पद्धतीहि अशाच प्रकारची होती. प्रथम आकृति काढण्यांत येऊन मागाहून जसे पाहिजे असतील त्याप्रमाणें निरनिराळे पोषाख त्या आकृतीवर दाखविण्यांत आले आहेत.

मनुष्याकृतीची उंची वगैरेचीं प्रमाणें निश्चित ठरलेलीं नसत. विशेषतः जमिनीपासून गुढघ्यांचीं उंची ही वारंवार बदलत असे. थडग्यांवरील चित्रकामामध्यें खासगी आयुष्यक्रम, व्यापरधंदे आणि इतर चालीरीती इत्यादि गोष्टी दाखविल्या आहेत; त्यामध्यें रुचिभेदास पुष्कळ परवानगी देण्यांत आलेली दिसते. प्राणिशिल्पामध्यें जरी ठराविक सांचे दिसून येत नाहींत तरी एकदां खुरटलेली शिल्पकला या कामींहि अपूर्ण स्थितींत दिसून येते. तथापि एवढें म्हटलें पाहिजे कीं प्राण्यांच्या आकृती आणि स्वभाव हे विशेष स्वतंत्र कल्पकतेनें बसविलेले दिसतात. सविसाव्या राजघराण्याच्या आरोहणानंतर र्‍हास पावत चाललेल्या कलांचें पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला यावेळीं ईजिप्तच्या अनेक भागांत मोठमोठ्या सार्वजनिक इमारती. उत्तम शिल्पकामानें सुशोभित केलेल्या बांधण्यांत आल्या आणि राजवाडे व मेंफिस इत्यादि ठिकाणचीं देवालयें यांना उत्तमोत्तम कलाकुसरींच्या शिल्पानें सुशोभित करण्यांत आलें. अशा रीतीनें कलाविकासास पुष्कळच मदत झाली. ईजिप्शियन कलाकुशल लोकांचें खरें कौशल्य फक्त चित्रांच्या स्पष्ट आणि उठावदार रूपरेषा काढण्यामध्यें दिसून येतें. रंगकामांत त्यांचें अज्ञान कींव करण्यासारखें होतें. त्यांचें रंगकाम निसर्गाबरहुकूम नसून त्यांत फक्त कांहीं रंगाचें सुंदर मिश्रण असे व अशा प्रकारच्या रंगकामाची खुमारी त्यांची त्यांनांच प्रतीत होई.

ईजिप्शियन वास्तुशिल्पाविषयीं विचार केला असतां त्यांत ताडवृक्ष व दुसर्‍या अनेक तद्देशीय वृक्ष, वनस्पती इत्यादि विविध निसर्गोत्पन्न वस्तूंचें अनुकरण पुष्कळच केलेलें दिसतें. ईजिप्शियन गोलस्तंभाची कल्पना ईजिप्तमधील अति प्राचीन इमारतींच्या लांकडी खांबांवरून घेतलेली दिसत नाहीं. वास्तुशिल्पाचा पुष्कळसा विकास होईतोंपर्यंत ईजिप्शियन गृहांच्या अंतररचनेंत गोल खांबांचा उपयोग करण्यांत आला नव्हता. ईजिप्तमधील अगदीं मूळचीं लहान देवालयें व घरें फक्त चारी बाजूस चार भिंती घालून बांधलेलीं असत. व इमारतीच्या दगडी खांबाची कल्पना देवालयांतील दगडी तुळ्यांपासून निघालेली दिसते. गोलस्तंभ  किंवा छतपट्टी यांची शोभा वाढविण्याकरितां विकास पावलेलें कमळ, ताडवृक्ष, पुष्कळशा जलवेली व एखाद्या देवतेचें शीर्ष इत्यादिकांच्या शिल्पांचा उपयोग करण्यांत येई. गोल स्तंभावरील मथळ्याकरितां ईजिप्शियन लोकांच्या अत्यंत आवडीचें कमळ किंवा दुसरीं कित्येक फुलें त्याचप्रमाणें छतपट्टीकरितां कित्येक प्राणी व त्यांचीं मुंडकीं यांच्या आकृतींचा उपयोग करण्यांत येत असे. परंतु अशा प्रकारचे निसर्गबरहुकूम गोष्टींचें अनुकरण वास्तुशिल्पामध्यें चांगलें दिसत नाहीं ही गोष्ट ग्रीक लोकांप्रमाणें इजिप्शियन लोकांस कळलेली दिसत नाहीं.

ईजिप्तमधील देवळांच्या छतास निळा रंग देण्यांत येत असून त्यामध्यें नक्षत्रतारका दाखविल्या जात; आणि ज्या भागांतून राजा आणि इतर धार्मिक मिरवणुकी जात असत त्या भागांवर घुबडें व इतर धार्मिक चिन्हें दाखविलीं जात असत. वास्तु-शिल्पाच्या अलंकरणामध्यें जास्त उठाव दिसण्याकरितां मुलामा देण्याची कृतीहि अंमलांत होती. ईजिप्शियन लोकांचा मुख्य गुण म्हणजे रंगाचा उपयोग करण्याची पद्धति होय. त्यांचीं भूषणें, घरगुती सामान व चंबूच्या आकृतीचीं भांडीं इत्यादिकांचे घाट सुबक आहेत. ईजिप्शियन लोकांच्या वास्तुशिल्पामधील एक मुख्य विशेष म्हणजे गोलस्तंभ व दुसर्‍या कांहीं क्षुल्लक गोष्टी यांमध्यें केव्हांहि रचनेंत सारखेपणा न दिसण्याबद्दल घेतलेली खबरदारी ही होय. या गोष्टीचा क्वचित स्थलीं त्यांनीं अतिरेकहि केला आहे. ईजिप्तमध्यें विटांच्या कमानींचा उपयोग वास्तुशिल्पामध्यें ख्रि.पू. १६ व्या शतकांत केलेला दिसून येतो. ईजिप्शियन शिल्प ही एक उत्तरकालीन जगास बराच कालपर्यंत चमत्कृतिजनक गोष्ट होऊन बसली होती. कारण या शिल्पावर बारीक बारीक प्राण्यांच्या, देवतांच्या व अशाच दुसर्‍या चिन्हांच्या आकृती दाट ओळीमध्यें इतक्या कोरलेल्या दिसत कीं, त्यामुळें कोणाचीहि जिज्ञासा जागृत होणें शक्य होतें. परंतु पुढील संशोधनावरून असें दिसून आलें कीं या आकृतींचें महत्त्व शिल्पाच्या दृष्टीनें विशेष नसून वाङ्मयदृष्ट्या व त्यापेक्षांहि प्राचीन इतिहासदृष्ट्या जास्त आहे, किंवा एकाच शब्दांत सांगावयाचें म्हणजे या आकृती प्राचीन ईजिप्शियन लोकांची एक विचित्र लेखनपद्धति होय. बुद्धपूर्व जग उत्तरभाग पृ.४ ते ७ पहा.

ई जि प्त म धी ल अ र्वा ची न सं शो ध न. – १९१० ते १९२० च्या दरम्यान ईजिप्तमधील पुराणवस्तुसंशोधनाच्या बाबतींत महायुद्ध सुरू झाल्यामुळें विशेष प्रगति झाली नाहीं. तथापि जेवढी झाली ती देखील कमी आहे असें नाहीं. १९१० नंतर व महायुद्ध सुरू होण्याच्या अगोदर प्रो. फ्लिंडर्स पेट्री यानें तारखान येथें व प्रो. जंकर यानें टुरा येथें जें संशोधन केलें त्यामुळें ईजिप्तच्या प्राचीनतम इतिहासासंबंधीं थोडी फार खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. हीं दोन्हीं शहरें मध्यईजिप्तमध्यें आहेत. तीं शहरें खणल्यामुळें ‘स्कार्पियन किंग’ च्या अमदानींत वरच्या ईजिप्तच्या (अपर ईजिप्त) राजांनीं कायरोच्या उत्तरेला ‘डेल्टा’ पर्यंत आपला अंमल बसविला होता असें सिद्ध झालें आहे. गर्झेह येथें बेनराईट यानें इतिहासपूर्व काळांतील एका लोखंडी हारामधील, मणी शोधून काढले. हे मणी निदान ख्रि. पू. ४००० वर्षांच्या वेळचे असावेत असें खात्रीलायक अनुमान काढण्यास जागा आहे. त्यावरून लोहयुगाला सुरवात होण्यापूर्वींच ईजिप्तमधील लोक मधून मधून लोखंडाचा उपयोग करीत होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. रँडाल मॅक इव्हर यानें ख्रि. पू. २००० वर्षांपूर्वींच्या एका थडग्यांतील लोखंडी भाल्याचें टोंक शोधून काढलें आहे त्यावरून देखील वरील अनुमानाला बळकटी येते.
न्यूबिया येथईल संशोधनावरून देखील प्राचीन ईजिप्तमधल्या मानवजातीसंबंधानें बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. या न्यूबियाच्या संशोधनावरून असें सिद्ध झालें आहे कीं, आर्मेनाईड वंशाच्या लोकांनीं ईजिप्तमध्यें येऊन लोअर ईजिप्त व अपर ईजिप्त येथें आपलीं राज्यें स्थापण्यापूर्वीं न्यूबियामध्यें नवपाषाणयुगीन संस्कृति अस्तित्वांत होती व ती वरील राज्यें स्थापण्याच्या पूर्वींच्या ईजिप्तच्या संस्कृतीसारखी होती. राज्यस्थापनेच्या काळापूर्वींच्या ईजिप्तमध्यें ज्या तर्‍हेचीं व तांबडीं काळीं भांडीं तयार होत असत त्यापेक्षांहि अधिक सुबक अशीं भांडीं न्यूबियन वसाहतवाल्यांनीं ईजिप्त मध्यें आणलीं होतीं असें दिसून आलें आहे. ईलियट स्मिथनें संशोधनांती असें सिद्ध केलें आहे कीं, ईजिप्तमध्यें, दोन मानववंशाचे लोक रहात असावेत. हे दोन वंश म्हणजे, एक नायलोटिक व दुसरा आर्मेनियाड वंश. या आर्मेनियाड वंशाच्या लोकांनांच ईजिप्तला रानटी स्थितींतून वर काढून सुधारणेच्या मार्गावर नेण्याचें श्रेय आहे. आर्मेनियाड वंशाचे लोक मूळ कोठून आले हें मात्र नक्की सांगतां येत नाहीं. कारण आर्मेनियाड मनुष्याची जी कवटी उपलब्ध झाली आहे ती कवटीहि सेमेटिक वंशाच्या माणसासारखी दिसते, पण तोंड मात्र मध्ययूरोपांतील लोकांच्या सारखें आढळतें.

प्राचीन ईजिप्त व बाबिलोनिया, यांच्या मध्यें तांबड्या समुद्राच्या मार्गानें अगर वालुकामय प्रदेशांतून दळण वळण चालू होतें किंवा नाहीं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाईल नदीच्या तीरावर नग हमडीच्या समोर, वडी-एल-अरक म्हणून एक गांव आहे. त्या ठिकाणीं, राज्यस्थापनेच्या पूर्वीच्या ईजिप्तच्या काळचा हिपापोटेमस प्राण्याच्या दातांच्या मुठीचा एक दगडी चाकू सांपडला असून, त्या मुठीवर प्राचीन ईजिप्त मधील लोक व इतर जाती यांच्यामध्यें, युद्ध चाललें आहे असें चित्र कोरलें आहे. या चित्रामध्यें जहाजाचें चित्रहि काढलें आहे; व शिवाय बाबिलोनियांतील देवतांच्या सारखी भासणारी एक देवता काढली आहे. या चित्रावरून बाबिलोनिया व ईजिप्त यांमध्यें पूर्वापार दळणवळण होतें असें अनुमान काढण्यास पुष्कळच जागा आहे. शिल्पशास्त्राचा पुरावा पडताळून पाहिल्यास वरील अनुमानाला पुष्टीव मिळते. उदाहरणार्थ क्विबेलनें शोधून काढलेलें हीरॅकान पोलीस येथील पहिला पेपी व त्याचा मुलगा यांचे पितळी पुतळे व १९१८-१९ सालीं हालनें उरजवळ टेल एल ओबिड येथें शोधून काढलेले तांब्याचे सिंह यांचा बारकाईनें विचार केला तर दोन्हीमध्यें शिल्पशास्त्राच्या दृष्टीनें बरेंच साम्य आढळून येतें. या दोन्ही चित्रांतील डोळे ठराविक तर्‍हेनें व ईजिप्शियन वळणावर बनवलेले दिसतात. त्यावरून या दोन्ही राष्ट्रांत दळणवळण प्राचीन काळापासून होतें असें दिसतें.

इमारतीला मोठमोठ्या दगडांचा उपयोग करण्याची चाल ईजिप्तनेंच प्रथम प्रचारांत आणली व तिचें अनुकरण, ब्रिटन ते चीन पर्यंतच्या सर्व देशांत झालें असें स्मिथ सारख्या संशोधकांनीं प्रतिपादन केलें आहे. या सिद्धांताचा खरेपणा अद्यापि सिद्ध झाला नाहीं. तरी पण त्यांत बरेचसें तथ्य आहे यांत शंका नाहीं. बाबिलोनियामध्यें ईजिप्तच्या धर्तीवर दगडांनीं बांधलेली अशी एक एरिड शहराची भिंत एवढीच आहे.

‘ईजिप्त एक्स्प्लोरेशन सोसायटी’ नें टेल एल अमर्ना येथें खणण्यास सुरवात केली आहे व नवीन नवीन शोध लागत चालले आहेत. महायुद्ध सुरू होण्यापूर्वी जर्मनांनीं अखेनेटॉन राजाच्या काळच्या शिल्पकलेचे निरनिराळे नमुने शोधून काढले होते, त्याच्याच पुढें ईजिप्तच्या वरील संस्थेनें शोध लावण्यास सुरवात केली आहे. प्रसिद्ध संशोधक प्रो. पीट यानें असें सिद्ध केलें आहे कीं, अखेनेटॉन राजानें ईजिप्तमध्यें सूर्य देवतेचीच उपासना सरसहा अमलांत आणण्याचा प्रयत्‍न केला, ही जी जुनी समजूत होती ती खरी नसून सूर्यदेवतेव्यतिरिक्त इतर देवतांचीहि पूजा त्या वेळीं केली जात असे. प्रो. नेव्हिली यानें महायुद्धापूर्वीं अ‍ॅबिडास येथील असुरियनांची इमारत खणण्याचा प्रयत्‍न केला होता; पण युद्ध सुरू झाल्यामुळें तें काम तसेंच पडून राहिलें असून अद्यापिहि सुरू झालें नाहीं; पण ही इमारत खणून काढल्यास बरेच नवीन शोध लागतील, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. मध्य ईजिप्तमध्येंहि प्रो. पेट्री यानें संशोधन करण्यास सुरुवात केली असून तेथेंहि बरेच शोध लागतील असा अजमास आहे. गिझा येथील मनोरा खणून काढून न्यूबिया येथील संशोधनावरून व नपाट येथील मनोर्‍यांचा अभ्यास करून डॉ. रीनर यानेंहि बरेच शोध लावले आहेत. न्यूबिया येथें ग्रिफिथ यानें निरनिराळीं भांडीं शोधून काढलीं आहेत, त्यांवरून ईजिप्तच्या शिल्पकलेवर टॉलेमिक व रोमन संस्कृतीची छाप पडलेली दिसून येते. पेन्सिलव्हिनिया विश्वविद्यालयातर्फे पाठविलेल्या संशोधक मंडळानें व व्हिएन्ना येथील संस्थेनें पाठविलेल्या प्रो. जेकर यानें तिसर्‍या ते सातव्या घराण्याच्या काळचीं मस्तबा येथील थडगीं खणून काढून पॅलेर्मो दगडाचे निरनिराळे नमुने शोधून काढले आहेत. प्रो. पेट्री यानें लहून येथील बाराव्या घराण्याच्या वेळचीं रत्‍ने शोधून काढलीं आहेत. याशिवाय आणखी अनेक प्रकारचे शोध निरनिराळ्या राष्ट्रांच्या संशोधक मंडळानीं लावण्यास सुरवात केली आहे. सिनाई येथील सर्व शिलालेख छापून प्रसिद्ध करण्याचें महत्त्वाचें कार्य डॉ. गार्डीनर व पीट यांनीं चालविलें आहे व सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे लंडन येथील ‘बर्लिंग्टन फाइन आर्टस् क्लब’ने ईजिप्तमधील ‘ईजिप्शियन कलेच्या नमुन्यांचें प्रदर्शन’ निरनिराळ्या ठिकाणीं भरविण्याचें काम अंगावर घेतलें आहे ही होय.

ईजिप्तमधील पुराण वस्तूंचे संशोधक लॉर्ड कार्नार्व्हन यांनीं मि. हॉवर्ड कार्टर यांच्या मदतीनें ईजिप्त देशांत नाइल नदीच्या प्रदेशांत लुक्झार नजीक एक मोठा शोध लावला. ईजिप्त देशांत इ. स. पूर्व १३०० च्या पूर्वीं होऊन गेलेल्या फारो वंशांतल्या राजांची प्रेतें पुरण्याच्या जागेचा लॉर्ड कार्नार्व्हन यांनीं शोध लावून त्या वंशांतील तुतनखामे राजाचें थडगें त्यांनीं नुकतेंच उकरून काढलें. या थडग्यांत सांपडलेल्या वस्तू आश्चर्यचकित करणार्‍या आहेत. मुख्य थडगें ज्यांत आहे तें दालन अद्यापि उकरावयाचें आहे. पण या मुख्य दालनाच्या पश्चिमेचें जें दालन उकरलें आहे त्यांत तीन पलंग आहेत. या पलंगांना सोन्याचा मुलामा दिलेला असून त्यांचे खूर सुबक नक्षीदार आहेत. एकेकावर तीन माणसें निजूं शकतील इतके ते रुंद असून वजनानें हलके आहेत. याच दालनांत एक सिंहासन असून तें फारच कलाकुसरीचें व शोभिवंत आहे, त्यावरून त्यावेळीं ईजिप्शियन कलाकौशल्य पूर्णत्वास पोंचल्याचें दिसून येतें. याच दालनाच्या एका कोपर्‍यांत चार सोनेरी रथ असून ते उकलून ठेवले आहेत. या रथांवरहि जागजागी सोन्याचें व जडावाचें काम आहे. पण त्यांतला जेवढा भाग काढून नेतां येईल तेवढा चोरांनीं काढून नेलेला दिसतो. तथापि जेवढा भाग अवशिष्ट आहे तेवढ्यावरून देखील या कामांतील कलाकौशल्य व्यक्त होतें.

तुतनखामच्या थडग्याचें मुख्य मध्यवर्ती दालन अद्यापि उकरून काढावयाचें आहे. तेथें काय काय अमोलिक चिजा सांपडतात तें पाहण्याची संशोधकांस उत्कंठा लागून राहिली आहे. ईजिप्त देशांत असा कायदा आहे कीं, अशा जुन्या पुराण्या वस्तू कोणी शोधून काढल्या तर त्या वस्तूंचा चतुर्थांश भाग संशोधकांनां बक्षीस देण्यांत येतो. परंतु प्राचीन राजांचीं थडगीं व त्यांतील या अमोलिक वस्तू सांपडल्यापासून ईजिप्शिअन अधिकार्‍यांनीं पूर्वींचा कायदा बदलून सरकारच्या परवानगीशिवाय कोणाहि संशोधकानें या प्राचीन वस्तूंस हात लावूं नये असा हूकूम केला आहे. कारण ईजिप्तच्या प्राचीन कलाकौशल्याचे नमुने देशांतून नाहींसे होऊं नयेत अशी ईजिप्शियन लोकांचीहि इच्छा आहे. या योगानें लॉर्ड कार्नार्व्हन प्रभृति संशोधकांचें जें नुकसान होईल तें इतर रीतीनें भरून देण्याचा ईजिप्शियन सरकारचा विचार आहे. तुतनखामेनच्या थडग्यांत आणखी कोणत्या अपूर्व चिजा सांठविल्या आहेत, तें यथाकाल जगाच्या निदर्शनांस येईलच; परंतु इ. स. पू. १३०० च्या पूर्वीं सोन्याचांदीचें, जडावाचें व विशेषतः मुलाम्याचें काम इतकें सुबक होत होतें, ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणें सोनेरी रथ प्रत्यक्ष सांपडल्यानें महाभारतादि पौराणिक ग्रंथांत वर्णिलेले सोन्याचे रथ केवळ कविकल्पना नव्हत, हेंहि कबूल करणें प्राप्त आहे. त्याचप्रमाणें सोनेरी पलंगाची जी रुंदी दिली आहे तिच्यावरून त्या वेळचीं माणसें शरीरानें कशीं धिप्पाड असावींत याचेंहि अनुमान करतां येतें. (केसरी ता. २३ जानेवारी १९२३).

[सं द र्भ ग्रं थ – स्मिथ – क्यूनिफार्म टॅब्लेटस् फ्रॉम कॅपॅडोशियन टॅब्लेटस् इन दि ब्रिटिश म्यूझियम १९२१; न्यूबेरी अ‍ॅन्ड हाल कॅटलॉग ऑफ अ‍ॅन एक्झिबिशन ऑफ एनशंट ईजिप्शियन आर्ट लंडन बर्लिंग्टन फाईन आर्टस् क्लब १९२१; इनक्रिप्शन्स ऑफ सिनाइ (१९१७);

ई जि प्त म धी ल प्रा ची न यु द्ध क ला. – ईजिप्तचा इतिहास पाहिला तर ईजिप्शियन लोक हे स्वभावतः युद्धप्रिय नव्हते असें म्हटलें पाहिजे. तथापि या राष्ट्राच्या इतिहासामध्यें इतर अनेक राष्ट्रांच्या इतिहासाप्रमाणें युद्धविषयक घडामोडींनीं अगदीं आरंभापासून तों अखेरपर्यंत बराच काल आक्रमण केला, आणि नव्या राजसत्तेच्या आमदानींत एक असा काल येऊन गेला कीं, त्या वेळीं ईजिप्त हें एक बलाढ्य जेत्या लोकांचें राष्ट्र बनलें. या काळांतील महत्त्वाचा राजा दुसरा रामेसीस याला आपण स्वतः केलेल्या लढाया वगैरेंचा इतिहास चिरस्थाईक शिलालेखांमध्यें कोरून ठेवण्याचा नाद असल्यामुळें या कालामध्यें लोकांचीं शस्त्रास्त्रें व सर्वसामान्य युद्धपद्धती कशा प्रकारच्या होत्या हें कळण्यास सांप्रत आपणांजवळ पुष्कळ पुरावा उपलब्ध आहे. ईजिप्शियन सैन्यामध्यें मुख्यत्वेंकरून धनुष्यें व जंबिये या हत्यारांनीं युक्त असे लोक मुख्यभागीं असून रथी वीरांचीं लहान लहान पथकें मिळून सैन्याचा एक महत्त्वाचा भाग तयार करण्यांत येत असे, आणि त्याचें अधिपत्य राजाकडे असे. मात्र त्यावेळीं युद्धविषयक साहित्यामध्यें घोडेस्वारांचा उपयोग करण्यांत येत नसे. शत्रूंच्या नगरासभोंवतीं वेढा घालतांना उंच चढण्याचे जिने व किल्ला फोडण्याचीं यंत्रें यांचा उपयोग करण्यांत येत असे. अर्वाचीन पद्धतीप्रमाणें सैनिकांस तुतारीच्या आवाजावर कवाईत करण्यास शिकविली जात असे, असें प्राचीन शिलालेखांवरून दिसून येतें.

त्यावेळीं सर्व दर्जाच्या लोकांस सैनिक किंवा धर्मोपाध्याय होणें यांपैकीं कोणता तरी एक धंदा स्वीकारावा लागत असे. आरमाराचा समावेश सैन्यांतच करण्यांत येत असे. शूर सैनिकांचा वर्ग आणि धर्मोपदेशकांचा वर्ग या दोघांमध्यें अधिकाराची अदलाबदल सारखी चालू असे. राजाच्या मुलांनां व इतर राजकुटुंबीय पुरुषांना तिरंदाज, रथी व पायदळ यांच्या लहान मोठ्या पथकांचें आधिपत्य देण्यांत येत असे. एकंदर राज्यांत धर्मोपदेशक वर्गाच्या खालोखाल सैनिक वर्गास मान, सत्ता व मालमत्ता उपभोगितां येत असे. प्रत्येक सैनिकास तो कामावर असो अगर नसो सुमारें आठ एकरच्या वर जमीन देण्यांत येत असे, व कर्जाबद्दल कोणासहि तुरुंगांत टाकण्यांत येत नसे. शिपाईगिरीचें शिक्षण देण्याकरितां ईजिप्तमध्यें एक शाळेसारखी शिक्षणसंस्था अस्तित्वांत असल्याचें दिसून येतें. व या संस्थेमध्यें तरुण सैनिकांस सर्व प्रकारचें शिक्षण देण्यांत येत असे. प्रत्येक मनुष्यास जरूरीच्या संरक्षक व मारक हत्यारांचा पुरवठा करणें भाग पडत असे व जरूर पडेल तेव्हां युद्धास तयार असण्याची त्यास ताकीद असे. सैन्यांतील महत्त्वाचें स्थान तिरंदाज लोकांस असून या लोकांच्या कौशल्यामुळेंच ईजिप्शियन राष्ट्रास जय मिळत गेला. याखेरीज निरनिराळीं आयुधें धारण करणार्‍या सैनिकांच्या निरनिराळ्या तुकड्या असत.

ईजिप्शियन लोकांच्या मारक शस्त्रांमध्यें धनुष्य, खंजीर, दोन प्रकारचे जंबिये, गोफण, आंखूड अशी सरळ तलवार, खंजीर, सुरी, एक प्रकारची कोयत्यासारखी तलवार, कुर्‍हाड, गदा व एक प्रकारची वांकडी काठी यांचा समावेश असे. त्याचप्रमाणें त्यांच्या संरक्षक आयुधांमध्यें एक धातूंचें शिरस्त्राण किंवा एक प्रकारचा जिरेटोप, धातूंच्या पत्र्याचें बनविलेलें उरस्त्राण किंवा चिलखत आणि एक मोठी ढाल इतक्यांचा समावेश होत असे. सैनिकांचें मुख्य संरक्षक आयुध म्हणजे ढाल हीच असून तिची उंची त्याच्या उंचीच्या निम्यानें आणि रुंदी त्याच्या स्वतःच्या दुप्पट असे. ही ढाल बहुतेक बैलाच्या कातड्यानें मढविलेली असून त्या कातड्याचे केंस बाहेरच्या बाजूस करण्यांत येत असत, आणि त्याजवर धातूचे खिळे किंवा टांचण्या लावण्यांत येत असून ढालेची कडहि धातूच्या पत्र्यानें भक्कम करण्यांत येत असे, व आंतील भाग लांकडाचा केलेला असे.

ईजिप्शियन लोकांचें धनुष्य एका वाटोळ्या लांकडाच्या पांच साडेपांच फूट लांबीच्या कांबीचें असून दोन्ही टोंकास ते निमुळतें होत गेलेलें असे. बाणांची लांबी वीसपासून चौतीस इंच असून ते लांकडाचे किंवा वेताचे व टोंकाला धातूचा तीक्ष्ण फाळ बसविलेले व मागे तीन पंख असलेले तयार करीत. अशा रीतीनें बहुतेक शस्त्रांमध्यें लांकडें व धातू यांचा उपयोग करण्यांत येत असे. बहुतेक सर्व सैनिकांजवळ हींच हत्यारें कमीजास्त प्रमाणांत असत. परंतु यापैकीं कांहीं सैनिकांजवळ गोफणी व धनुर्बाण असल्यामुळें त्यांजवळ ढाली नसत. ईजिप्शियन सैन्यांत रथी लोकांचीं पथकें संख्येंनें जास्त व महत्त्वाची असत. प्रत्येक रथामध्यें एक सारथी व एक योद्धा किंवा क्वचित दोन योद्धे बसत असत. कधीं कधीं स्वत: रथी हाच युद्धाचें आणि सारथ्याचें काम करीत असे. रथ हांकतांना सारथी ग्रीक लोकांप्रमाणें चाबकांचा उपयोग करीत असत. हा चाबूक म्हणजे एक गुळगुळीत वाटोळी लांकडी मूठ आणि तिला एकेरी अगर दुहेरी वादी किंवा दोरी लावलेली असे. सैन्यामध्यें राजे व दुसरे महत्त्वाचे अधिकारी यांच्या रथाबरोबर अपघात टाळण्याकरीतां दुसरा एक रथ असे. जर एखाद्या वेळीं प्रतिस्पर्धी युद्धांत पराजित होऊन शरण आला तर त्याला जिंकणारा योद्धा आपल्याबरोबर रथांत घालून नेत असे. आणि इतर सामान्य कैदी युद्धांतील कैदी या नात्यानें राजास नजर करण्यांत येत. यानंतर विजयी राजापुढें शत्रूंच्या मृत सैनिकांच्या हातांची गणती करण्यांत येई. आणि या गणतीचा विजयस्मारकांत मोठ्या डौलानें उल्लेख करण्यांत येत असे.

ईजिप्तमधील रथांनां बैठक नसून त्यांच्या तळाच्या भागास चामड्याच्या वादीनें अगर दोर्‍यांनीं विणलेली एक लांकडी चौकट घातलेली असे. ती अशाकरितां कीं, रथाची गति आंतील योद्धयास त्याच्या खालीं असलेल्या लवचिक जाळीमुळें अडचणीची होऊं नये, आणि याचकरितां रथाचीं चाकें शक्य तितकीं मागील बाजूस लावण्यांत येऊन आंतील मनुष्याचें वजन बरेचसें पुढें जुंपलेल्या घोड्यावर येईल, अशी व्यवस्था करण्यांत येत असे. हा रथ लांकडाचा करण्यांत येत असे हें प्राचीन शिल्पावरून स्पष्ट झालें आहे. व ईजिप्शियन लोकांनीं तीन हजार वर्षांपूर्वीं अशा प्रकारच्या सोइस्कर रथांची कल्पना व्यवहारांत आणिली. हीच कल्पना पाश्चात्य राष्ट्रांत १९ व्या शतकांत प्रचलित झाली. यावरून “सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं” या सालोमनच्या म्हणीची यथार्थता प्रत्ययास येते.

ज्यावेळीं परकीय देशावर स्वारी करण्याचा राजाचा बेत ठरे त्यावेळीं प्रत्येक प्रांतातून ठरलेली सैनिकांची संख्या मिळवून देण्यांत येत असे. अशा रीतीनें सर्व सेना एकत्र जमल्यावर राजा किंवा त्याच्या आज्ञेवरून एखादा शूर सेनापती ससैन्य स्वारीला निघे. प्रथम शत्रूवर मोकळ्या मैदानांत हल्ला करण्यांत येत असे आणि नंतर तुतारीच्या आवाजानें युद्धाची खूण करितांच तिरंदाज लोक शत्रूवर बाणांचा हल्ला सुरू करीत. व याच वेळीं पुष्कळशीं रथी सैन्यांचीं पथकें व भाले, गदा, ढाली वगैरे शस्त्रांनीं सज्ज झालेलें पायदळ हेंही लगट करून शत्रुसैन्याच्या मध्यावर व दोन्ही बाजूस चाल करीत.

ईजिप्शियन लोकांची युद्ध करण्याची पद्धति रानटी राष्ट्रास शोभण्यासारखी नव्हती, आणि त्यांनीं वारंवार पकडलेल्या कैद्यांवरून स्पष्ट दिसून येतें कीं, जे लोक ईजिप्शियन लोकांस शरण येत त्यांस अभय मिळत असे. तिसरा रामेसिस याच्या कारकीर्दीत झालेल्या आरमारी युद्धांत बरेचसे ईजिप्शियन सैनिक जहाजांमध्यें व किनार्‍यावर शत्रुपक्षाकडील समुद्रांत बुडणार्‍या सैनिकांस जलसमाधींतून वांचवीत असल्याचें दाखविलें आहे. अर्थात् ही भूतदयेची गोष्ट शिल्पस्वरूपांत चिरस्मरणीय करून ठेवण्यामध्यें ईजिप्तमधील शिल्पज्ञ लोकांस फार धन्यता वाटली असावी.

ज्याप्रमाणें युद्धांत जिवंत सांपडलेल्या व मारल्या गेलेल्या शत्रुसैन्याची मोजदाद राजापुढें होत असे त्याचप्रमाणें युद्धांत मिळालेलीं शस्त्रास्त्रें, घोडे, रथ इत्यादि लूट एका मोकळ्या जागीं जमविण्यांत येऊन त्याच्या सभोंवतालीं तात्पुरती भिंत घालण्यांत येत असे, व या भिंतीस एकच दरवाजा असून त्या दरवाजाच्या आंत व बाहेर नागव्या तलवारींचा कडक पहारा ठेवण्यांत येत असे. ईजिप्शियन लोकांमध्यें किल्ले बांधण्याची पद्धति प्रथम प्रथम बरीच प्रचलित होती. या किल्ल्यांचा आकार चौकोनी असून तट ओबडधोबड विटांचे, सुमारें १५ फूट जाडीचे व ५० फूट उंचीचे असे बांधण्यांत येत असत, व याच्या चारी बाजूस चौकोनी बुरूज करण्यांत येत असत. परंतु पुढें पुढें अशा तर्‍हेचे किल्ले किंवा तटबंदी शहरें बांधण्याची पद्धति कमी कमी होत जाऊन त्याऐवजीं मोठमोठीं तटबंदीं देवालयें बांधण्यांत आलीं.

सैन्याचे तळ चौरस अगर दीर्घ चौरस आकाराचे असून त्यांच्या एका बाजूस एक मुख्य दरवाजा असे. आणि या तळाच्या मधोमध मुख्य सेनापती व इतर प्रमुख अधिकारी यांचे तंबू असत. या तळामध्यें रथ ठेवण्याकरितां आणि घोडे व इतर युद्धोपयोगी जनावरें चारण्याकरितां निरनिराळ्या जागा राखून ठेवण्यांत येत असत. मुख्य सेनापतीच्या तंबूशेजारीं देवतांचीं यज्ञकुंडें, निशाणें, खजिना इत्यादि महत्त्वाचा भाग ठेवण्यांत येई. तटबंदी शहरावर हल्ला करितांना ईजिप्शियन लोक तिरंदाजांनीं शत्रुपक्षावर बाणाचा वर्षाव चालविला असतांना त्याच्या आच्छादनाखालीं ते पुढें चाल करीत; आणि लागलींच तटानां चढण्याचे जिने लावीत किंवा नेहमींचा वेढा देऊन बसण्याचा धोपटमार्ग पत्करीत. त्याचप्रमाणें बाहेरील वेढ्यानें शत्रूचा किल्ला अगर तटबंदी शहर जर ताब्यांत घेणें शक्य न झालें तर ते किल्ल्याच्या खालून पुष्कळ भाग पोखरून त्या भुयारांतून शत्रूंवर मारा करीत आणि ही भुयारें खणण्याची कला त्यांना फार पूर्वीपासून माहीत होतीं.

आ धु नि क ई जि प्त

म र्या दा व क्षे त्र फ ळ – ईजिप्त देशाच्या उत्तरेंस भूमध्य समुद्र असून दक्षिणेस अँग्लो ईजिप्शियन सुदान, आग्नेयेस पॅलेस्टाईन, पूर्वेस तांबडा समुद्र, पश्चिमेस ट्रिपोली व सहारा. ट्रिपोली व ईजिप्तमधील सरहद्द सोलमच्या आखातापासून निघून दक्षिणेस व नंतर पूर्वेस वळून सिबा ओलवणाला वळसा घालून त्याच्या दक्षिणेकडून पूर्वेस वदीहल्फा जवळून जाते. ही दक्षिण सरहद्द ग्रेटब्रिटन व ईजिप्त यांच्या मतानें २२० उत्तर अक्षांश ठरली आहे. ईशान्य सरहद्द म्हणजे आकाबाच्या आखातावरील टाबा पासून भूमध्य समुद्रावरील शफापर्यंतची सरळ रेषा होय. यामुळें भौगोलिक दृष्ट्या आशियांत असलेल्या सिनाई द्विपकल्पाचा ईजिप्तमध्यें समावेश केला आहे. या देशाचें एकंदर क्षेत्रफळ ३६३१८१ चौ. मैल असून त्यांपैकी १४/१५ जमीन वाळवंटानें व्यापिली आहे. कालवे रस्ते खजूराचे मळे यांनीं १९०० चौ.मै. जागा व्यापिली असून नाईल नदी, सरोवरें व दलदलीचा प्रदेश यांनीं २८५० चौ. मैल जागा अडविली आहे. कायरोच्या थोड्या दक्षिणेस ३०० उत्तर अक्षांशावरून सरळ रेघ काढली तर ईजिप्तचे खालचा व वरचा असे दोन नैसर्गिक भाग पाडतात. अरब या भागांनां अनुक्रमें ईररिफ (सुपीक) व ईससैय्यर (सुखी अथवा नशिबवान) म्हणतात.खालचा, मधला व वरचा असे तीन सुद्धां भाग करतात. यांत मधला म्हणजे कायरो व अस्यूत यां मधील भाग होत.

नाईल नदी व वाळवंट हे ईजिप्तचे विशेष भाग होत. नाईल नदी नसती तर ईजिप्त हें वाळवंटच बनलें असतें. परंतु नाईल नदीमुळें मुखाजवळचा प्रदेश व वरच्या ईजिप्त मधला भाग एवढा प्रदेश सुपीक बनला असून हाच खरा ईजिप्त होय. ‘काळा प्रदेश’ हें प्राचीन नांव व अरबांचा मिसर देश हीं दोन्हीं नावें एकाच प्रदेशाला आहेत. वरच्या ईजिप्तमध्ये नाईल नदीचें खोरें अरुंद असून दोन्ही बाजूस वाळवंट आहे. यांत मोठाले पर्वत मुळींच नाहींत. नाईल नदीचें खोरें अत्यंत सुपीक असून प्राचीन शहरांचीं टेकांडें मधून मधून दृष्टीस पडतात.

कि ना रा. – भूमध्यसमुद्रावरील किनार्‍याची लांबी ६०० मैलांवर असून तांबड्या समुद्रावरील किनारा १२०० मैल आहे. भूमध्य किनारा सोलमच्या आखातापासून पूर्वेस राफापर्यंत आहे. नाईल नदीच्या मुखापर्यंत हा किनारा खडकाळ असून त्यांत बंदरें नाहींत. हे खडक म्हणजे लिबीयन वाळवंटाच्या डोंगर पठाराचीं टोकें आहेत. मुखाजवळ किनारा रेताड टेकड्यांचा असून दोन उपसागर होतात. त्यांपैकीं अबुद्दीरचा उपसागर इतिहासप्रसिद्ध आहे. या पलिकडचा किनारा ओसाड व खडकाळ आहे. हा पुढें उंच होत जातो व याचें रूपांतर सिनाई द्वीपकल्पाच्या पठारांत होतें. तांबड्या समुद्राच्या किनार्‍यावर पर्वत फार असून कांहीं शिखरांची उंची ६०० फुटांपेक्षां जास्त आहे. जेबेक, घरीब, डुखान, इसशयिष, फतिरा, अबुतियुर, झुबरा व हमदा हीं मुख्य शिखरें होत. इजिप्त व सुदन यांच्या सरहद्दी मिळतात तेथील किनार्‍यावर रासएल्बा आहे.

ना ई ल न दी चें खो रें – खास ईजिप्तमध्यें शिरल्यावर दुसर्‍या धबधब्याच्या अंमळ उत्तरेस नाईल नदीची रुंदी २ मैलांपेक्षां जास्त नसते. कॅलाबशा येथें नदी १७० यार्ड रुंद व १०० फूट खोल असून येथें व असुअब येथें ग्रॅनाईटं खडकांतून नाईल वहाते. लागवडींत असलेल्या जमिनीची रुंदी सुमारें १० मैल असून त्यांपैकीं बराच भाग नदीच्या डाव्या तीरावर आहे.

फा यु म. – हा सुपीक प्रांत नाईल नदीच्या पश्चिमेस असून या दोन्हींत सहा मैलाचें वाळवंट आहे. या प्रांतांत नाईलचा कालवा बहरयुसुफ यामधून पाणी पुरविलें जातें.

मु खा ज व ळ चा प्र दे श – हा भाग म्हणजे कायरो शहरापासून समुद्र किनार्‍यापर्यंत त्रिकोणाकृति भाग होय. याची दक्षिणोत्तर लांबी १०० मैल असून पोर्ट सैय्यदपासून अलेक्झांड्रियापर्यंत पूर्व पश्चिम रुंदी १५५ मैल आहे. या भागांत डॅमिएटा व रोझेटा हे नाईल नदीचे फांटे इतर कालवे यांतून पाणी मिळतें. मुखाजवळच्या प्रदेशांतून नदींतून आलेला गाळ बसतो व किनार्‍यावर वाळूच्या टेंकड्या आहेत. दक्षिणेकडील जमीन अधिक सुपीक होत जात असून तो भाग ईजिप्त मध्यें सर्वांत सुपीक आहे.

स रो व रें. – नाईल नदीच्या मुखाजवळच्या प्रदेशांत खालील सरोवरें आहेत. ती अनुक्रमें पश्चिमेकडून, मॅरिओटीस (मॅरिअट) एडकू, बुरलुस व मेन्झाला हीं होत. हीं सर्व भूमध्य समुद्रापासून १० मैलाच्या आंत आहेत. मॅरिओटिस हें सरोवर अलेक्झांड्रियाच्या दक्षिणेस असून प्राचीन काळी यांत होड्या चालत व बाजूच्या प्रदेशांतील द्राक्षांपासून प्रसिद्ध मॅरिओटिक मद्य निघत असें. याच्या ईशान्येस अबुशीर सरोवर होतें. बुरलुस सरोवराची सर्वांत जास्त रुंदी १६ मैल आहे. या सरोवरास बरेच कालवे येऊन मिळतात. कलिंगडें बुरलुसचीं फार प्रसिद्ध असून तीं आंतून पिवळीं असतात. मेंझाला हें सर्वांत मोठें सरोवर असून त्याचें क्षेत्रफळ ७८० चौ. मैल आहे. हें सरोवर व भूमध्यसमुद्र यांत फार थोडें अंतर आहे. हें सरोवर ४० मैल लांब व १५ मै. रुंद आहे. हें इतर सरोवरांपेक्षां खोल असून याचें पाणी खारट आहे. यामध्यें बरींच बेटें असून टेनीस (प्राचीन टेनेसुस) बेटावर रोमनकाळांतील कांहीं अवशेष आहेत. या बेटांवर व किनार्‍यावर बरेच कोळी राहतात. याच्या पूर्वेस सुएझचा कालवा आहे. याच्या पूर्वेस सेरबोनीक नांवाचें (सध्यां कोरडें) सरोवर होतें. सुएझच्या संयोगभूमींत तिमसा, ग्रेट व लिटल बिटर हीं सरोवरें आहेत. कायरोच्या पश्चिम – वायव्येस ७० ते ९० मैलांवर एका वाळवंटीच्या खोर्‍यांत सुमारें सात क्षार सरोवरांची रांग आहे. फेयुम प्रांतांत बिर्कतएल केढन नांवाचें सरोवर आहे. हें प्राचीन मॉएरीस सरोवराचा भाग आहे. फारोंच्या काळच्या पाटबंधार्‍यांच्या शिल्पाच्या दृष्टीनें हें फार महत्त्वाचें सरोवर आहे. केरून सरोवराच्या उत्तरेस लिबीयन वाळवंट असून जवळ बर्‍याच प्राचीन शहरांचे अवशेष आहेत. कस्त्र – करून नांवाचें मंदिर रोमन काळापासून प्रसिद्ध आहे. फेयुमच्या नैऋत्येस वाडीरयन नांवाचें सरोवर आहे.

वा ळु का म य डों ग र प ठा र :- ईजिप्तच्या दक्षिण सरहद्दीपासून उत्तरेस नाईल नदीमुखाजवळच्या प्रदेशापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूंस वालुकामय डोंगर पठार आहेत. नाईल व तांबडा समुद्र यामधील भाग ९० पासून ३५० मैल रुंद आहे. याचा उत्तरेकडील भाग अरबी वाळवंट म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिमेकडचा प्रदेश हजारों मैलपर्यंत पसरत गेला असून तो सहारा वाळवंटाचा भाग आहे. कायरोच्या पश्चिमेस कांहीं अंतरावर या वाळवंटाच्या पूर्वेकडील टोंकावर गिझे अथवा गिझा पिरामिड आहेत. असुरिअनच्या उत्तरेस या वाळवंटाला लिबीयन वाळवंट म्हणतात. उत्तरेकडील पठार फार उंच नाहीं. परंतु कायरोच्या दक्षिणेस त्याचीं उंची समुद्रापासून हजार दीडहजार फूट होत जाते. हवेच्या योगानें या वाळवंटांत नेहमीं फरक पडतात. खडक दिवसा गरम होऊन रात्रीं थंड होतात व वार्‍यानें वाळूचे बारीक थर उडून जातात; यामुळें वरील फरक होतात. नाईल नदीच्या पश्चिमेस वाळूच्या टेंकड्या दृष्टीस पडतात.

ओ ल व ण :- पश्चिम वाळवंटांत सिवा, बहारिया, फराफ्रा, डाखला व खर्गा हीं मोठाली पांच ओलवणें आहेत. यांना पाण्याचा बराच पुरवठा असल्यानें तीं फार सुपीक  आहेत. ख्रि. पू. १६०० त हीं ओलवणें ईजिप्शियनांना माहित असून यांत त्यांच्या वसाहती होत्या. इराणी वसाहतीमुळें खर्गाची फार भरभराट झाली. खर्गा अथवा प्राचीन हेबी शहराजवळ पहिल्या डरायसनें बांधलेल्या अमॉनेंमंदिराचे व टॉलेमी, व सीझर यांच्या वेळचे अवशेष आहेत. या ओलावणाशिवाय दोन खोरीं आहेत. त्यापैकीं ‘क्षार सरोवरें’ असलेल्या पहिल्या खोर्‍यांत चार मठ व निट्री येथील मठवासी लोकांच्या वसाहतीचे अवशेष आहेत. वाडीक्षार खोर्‍यांच्या दक्षिणेस त्याला समांतर असलेली बहरबेलामा अथवा ‘जळहीन नदी’  नांवाचें खोरें आहे.

सि ना ई द्वि प क ल्प :- हें द्विपकल्प त्रिकोणाकृति आहे. याचा उत्तरभाग म्हणजे तिद वाळवंट होय. येथें पाऊस थोडा व उष्णमान जास्त यामुळें वनस्पती फार कमी आहेत.

भू स्त र व र्ण न :- भूपृष्ठदृष्ट्या ज्याप्रमाणें नाईल खोर्‍याचें महत्त्व आहे तसेंच भूस्तरदृष्ट्याहि आहे. प्राचीन खडक स्फटिकमय थरांचे बनलेले असून त्यांत ग्रॅनाईट, पॉरफिरी वगैरे बरेच आढळतात. थीबी व खार्टुम मधील नाईल नदीचें पश्चिमतीर न्युबीयन सँडस्टोनचें बनलेलें आहे. व हा थर लिबियन वाळवंटापर्यंत आहे. याच्या काळाबद्दल बराच वाद आहे. नाईल नदीचा गाळ खोर्‍यांत बसतो यामुळें मुखआजवळ फारशी भरती होत नाहीं. मेंफीस येथें गाळाची जाडी ५० फुटांपेक्षां जास्त आहे. बरीच वाळवंटें वालुकामय आहेत. कांहींत मात्र खडकाळ पठारें असून वाळू थोडी असतें. त्यांतच वार्‍यानें वाळूच्या टेंकड्या नवीन तयार होतात व जुन्या नाहींशा होतात.

ख नि ज प दा र्थ :- ईजिप्तमध्यें खनिज पदार्थ विपुल सांपडतात. प्राचीन काळीं तांबड्या समुद्राच्या टेंकड्यांतून सोनें व जवाहीर सांपडत असे. मुसुलमानी अंमलांत खाणी खोदणें बंद झालें परंतु २० व्या शतकांतील या धंद्याला पुन्हां उर्जितावस्था आली. मॅरीओटीस सरोवरांपासून निघणारें मीठ सर्व देशाला पुरतें. वाडीक्षारसरोवरांतून पुष्कळ सज्जीखार निघतो. पश्चिम ओलवणांत तुरटी (अ‍ॅलम) वाळवंटाच्या कांहींभागांत नत्रायितें (नायट्रेट) व स्फुरितें (फॉस्फेट) सिनाईलमधील खाणींत वैडूर्य, जेबेल झुबरा येथें पांच, जेबेल झैत (सुवेझ आखाताच्या पश्चिम किनार्‍यावर) येथें पेट्रोलियम, सिनाई व तांबड्या समुद्रांतील टेकड्यांत लाल (हेमटाइट) सांपडतात. खाणीजवळ व तेथें जाणार्‍या मार्गावर लहान देवळें व मंदिरें आहेत. उमरूस व उमगॅरेट येथें १९०५ पासून सोनें काढण्यास सुरवात झाली. सुएझ आखाताच्या दोन्ही तीरांवर पेट्रोलियमच्या खाणी आहेत अशी तज्ज्ञांनां खात्री वाटत होती. त्याप्रमाणें त्यांनीं शोध लावून १९१२ सालापासून त्या खाणींमधून कच्चें तेल (कूडऑईल) काढण्यास सुरवात झाली. या खाणींना “जेम्स” खाणी असें नांव आहे. १९१४ सालीं हरघडा येथें एक नवीन तेलाची खाणी सांपडली. १९१३ मध्यें पेट्रोलियम तेल १०४००० टन निघत असें ते १९१८ मध्यें २८१८०० टन निघू लागलें. त्याच्या खालोखाल फॉस्फेटची निपज होते. १९१९ सालीं फॉस्फेटची निपज ७८५०० मेट्रिक टन होती. मँगनीजची निपज १९१९ मध्यें २७४९८ टन होती.

ह वा मा न :- वरच्या ईजिप्तचा कांहीं भाग उष्ण कटिबंधांत असून बाकी बहुतेक भाग कर्क वृत्ताच्या उत्तरेस आहे. भूमध्य समुद्रावरील थोडा भाग खेरीज करून बाकी सर्व प्रदेशांत पाऊस फार कमी पडतो अगर अगदीं पडत नाहीं म्हटले तरी चालेल. या भागांत दिवसा उष्णतामान जास्त असून रात्रीं जमीन एकदम थंड होते. अलेक्झांड्रिया व पोर्ट सैय्यद येथील सरासरी उष्णतामान ५७० (जानेवारींत) ते ८१० (जुलैंत) च्या दरम्यान असतें. कायरो वाळवंटांजवळ असल्यानें तेथें तें ५३० ते ६४० असते. जानेवारी कडक थंडीचा महिना असून त्यावेळीं नाईल खोरें व उघडें वाळवंट यांत उष्णतामान ३२० (फा) अथवा कमी सुद्धां असतें. अलेक्झांड्रिया येथें व भूमध्यसमुद्राच्या किनार्‍यावर हिवाळ्यांत फक्त सुमारें ८ इंच पाऊस पडतो. याच्या दक्षिण भागांत पाऊस कमी होत जाऊन ३१० उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेस फारच थोडा पाऊस पडतो. कायरो येथील आंकड्यांवरून असें दिसतें कीं, पाऊस फार अनियमित पडतो. मात्र वादळें नेहमीं होतात. दरवर्षीं सरासरी १.५० इंचापेक्षां जास्त पाऊस पडत नाहीं. उघड्या वाळवंटांत भयंकर वादळें होतात. वातावरणाचा सरासरी दाब २९० ८४’ ते २९० ९०’ इंचाच्या मध्यें असतो. ईजिप्त मध्यें उत्तरेकडचा वारा नेहमीं वाहत असतो. खमसिन अथवा वाळू उडविणारे वसंत ऋतुंतील उष्ण वारे दक्षिणेकडून येतात. दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे झोबा अथवा वाळुकामय वादळ ही होय. यावेळीं वाळूचा एक उंच स्तम्भ दिसतो. मृगजळाचा चमत्कार वाळवंटांत व भूमध्यसमुद्राच्या जवळच्या ओसाड भागांत फार वेळां दृष्टीस पडून मनुष्याची अनेक वेळां फसवणूक करतो.

व न स्प ति :- ईजिप्तमध्यें जंगलें नाहींतच. वनस्पतीनां योग्य असणार्‍या सर्व जमीनी लागवडीखालीं आहेत. यामुळें इतर वनस्पतींच्या जाती कमी आहेत. खजूर हें महत्त्वाचें झाड असून तें सर्वत्र दृष्टीस पडतें. द्राक्षांचे मळेहि ईजिप्तमध्यें आहेत. संत्रे, लिंबू, डाळिंब व मलबेरी हीं झाडें बरींच आहेत. संत, चिंच, सायकामोअर हीं झाडें आहेत. लेबेक हें परकीय देशाहून येथें आणलेलें झाड आहे. फळांपैकीं खजूर मुख्य असून त्याच्या तीस जाती आहेत. फेयूमचीं द्राक्षें प्रसिद्ध आहेत. याखेरीज अंजीर, डाळिंब, बदाम, पीच, संत्रे, लिंबु, केळें, मलबेरी, हिंदी अंजीर, ऑलिव्ह व कमल यांची फळें प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणें गुलाब, जाई वगैरे फुलें असून कांहीं जंगलीं फुलें प्रसिद्ध आहेत. नदीमुखाजवळच्या प्रदेशांत पांढरीं व निळीं कमळें आढळतात.

प्राणी :- ईजिप्तमध्यें पाळींव जनावरें मुख्य आहेत. त्यांत गाढव व उंट हीं महत्त्वाचीं आहेत. म्हशी व मेंढ्याहि पुष्कळ आढळतात. घोडे वेगवेगळ्या जातीचे आहेत. जंगली जनावरांत मुख्य तरस, कोल्हा, रानडुकर, व रानमांजर हीं आहेत. येथें पुष्कळ तर्‍हेचे विषारी सर्प आहेत व विंचवाच्या दंशानेंहि मनुष्यास मृत्यू आल्याचीं उदाहरणें आढळतात. नाईलमध्यें निरनिराळ्या जातीचे मासे आहेत. ईजिप्तमध्यें ३०० जातीचे पक्षी आहेत. यांपैकीं कांहीं या देशांतील असून कांहीं फक्त हिंवाळ्यांत येतात व कांहीं इतर ठिकाणीं जात असतांना थांबतात. गरूड, गिधाडें, ससाणा, कोळी वगैरे मोठाले पक्षी आहेत. सुंदर पिसारा असलेले कांहीं पक्षी वसंत ऋतूंत ईजिप्तमध्यें येतात.

आ रो ग्य स्थ ळें :-  हिंवाळ्यांत बरेच यूरोपियन प्रवासी ईजिप्तमध्यें हवा खाण्यासाठीं व चैनीसाठीं येणास खालच्या ईजिप्तपेक्षां वरचें ईजिप्त सोयीचें आहे. जवळच खनिज झरे असलेले हेलवान, वरच्या ईजिप्तमधील लुक्झार व असुआन हीं ठिकाणें आरोग्यस्थळें म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील घाणेरड्या वस्तीमुळें रोगांच्या सांथी येतात, परंतु १८८२ त ब्रिटिशांच्या अंमलापासून रोगराई बरीच कमी आहे. १८४४ पर्यंत प्लेग होता व मधून मधून महामारी उद्‍भवत असे. देवी, त्वग्रोग वगैरे आढळतात. एतद्देशीय लोकांनां इस्पितळांत रहाणें पसंत नसून ते आपल्याच पद्धतीनें रोगावर उपचार करतात.

मु ख्य श ह रें – कायरो (राजधानी) – ह्याची स्थापना अरबांनीं नाईल नदीच्या पूर्वकिनार्‍यावर केली याची लोकसंख्या (१९१७) ७९०९३९ असून हें आफ्रिकेंतील सर्वांत मोठें शहर आहे. याच्या खालोखाल अलेक्झांड्रीया असून तें मुख्य शहर आहे. याची लोकसंख्या १९१७ सालीं, ४४४६१७ असून हें भूमध्यसमुद्रावर आहे. पोर्टसैय्यद हे दुसर्‍या प्रतीचें बंदर सुवेझ कालव्याच्या उत्तर प्रवेशद्वारावर असून याची लोकसंख्या १९१७ सालीं ९१०९० होती. पोर्टसैय्यद व अलेक्झांड्रिया यांच्यामध्यें रोझेटा व डॉमियटा हीं दोन शहरें आहेत. मध्ययुगांत ह्यांची फार भरभराट असे. कालव्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ असलेलें सुवेझ, तांबड्या समुद्रावरील कोंसेर, मसी मद्रुह, एलआरिश, हीं दुसरीं बंदरें होत. मुखाजवळच्या प्रदेशांत बरींच शहरें आहेत. त्यांपैकीं टान्टा डमानहूर मन्सुरा, झगाझिग, बिलबीस, इस्मालिया हीं शहरें कापसाच्या व्यापाराबद्दल प्रसिद्ध आहेत.

खालच्या ईजिप्तमधील इतर शहरें येणेंप्रमाणें.- मेहाडेटईल कूब्रा, येथें कापसाचे कारखाने आहेत. सलिहिया, महारिया, झिफ्टा, समानुद, फुआ, शिषीन ईलकाम, मिनफ व दहा ते वीस हजारपर्यंत लोकसंख्या असलेलीं बरींच शहरें आहेत.

वरच्या ईजिप्तमध्यें मुख्य शहरें नाईल नदीच्या अरुंद खोर्‍यांत सांपडतात. ओलवणांतील शहरें महत्त्वाची नाहींत. फेयुम प्रांताची राजधानी मेदिनेतईल होय. फेयुमची लोकसंख्या ३७,३२० आहे. नाइल नदीवरील मुख्य शहरें कायरो पासून अनुक्रमें येणेप्रमाणें – बेनिसुएफ (२३,३५७), हें एका मुदिरिआची राजधानी असून लोंकरीचें कापड येथें तयार होतें. मिनिआ येथें साखरेचा कारखाना असून कापसाच्या गिरण्या आहेत. अस्यूत (३९,४४२) हें वरच्या ईजिप्तमधील व्यापाराचें केन्द्र आहे. सुहाग यापासून ३-४ मैलांवर प्राचीन व प्रसिद्ध असे ईलआबिआद व ईलअहमार नांवाचे दोन मठ आहेत. याच्या जवळ अ‍ॅखमिम अथवा एखमिम नांवाच्या गांवीं रेशमी व सुती कापड होतें. गिर्गा हें मातीच्या भांड्याबद्दल प्रसिद्ध आहे. केवा येथें मातीच्या झिरपणार्‍या बाटल्या होतात. लुक्झॉर थीबीसच्या जागेवर वसलें आहे. ईस्त्र (१९१०३) हें मातीच्या भांड्यांबद्दल प्रसिद्ध आहे. ईडफू (१९,२६२) येथील प्राचीन देवालय प्रसिद्ध आहे. असुआन पहिल्या धबधब्याच्या पायथ्याशीं आहे. कोरोस्कोपर्यंत पूर्वीं उंटावरून व्यापार बराच चालत असे.

प्रा ची न श ह रें व स्मा र कें – ईजिप्तचीं बरींच आधुनिक शहरें प्रचीन शहरांच्या जागीं वसलीं आहेत, व त्यांतील बहुधा फारो, ग्रीक अथवा रोमन यांच्या वेळचीं आहेत. फारोची राजधानी मेम्फिस हें नाईल नदीच्या पश्चिम तिरावर असून कायरोपासून १४ मैलांवर होतें. कायरोच्या उत्तरईशान्येस पांच मैलांवर हेलिओपोलीस होतें. वाळवंटाच्या टोंकावर असलेलें गिझा अथवा गिझ येथील पिरामिड कायरोच्या पश्चिमेस आठ मैलांवर आहेत. येथील पिरामिड सर्वांत मोठे असून त्यांत प्रसिद्ध मेंफिस जवळ बांधलेल्या प्रसिद्ध स्फिन्क्स (स्त्रीमुखी सिंह) आहे. असुआन शहराजवळ सायरीनी शहर होतें. समोर नाईल नदीवरील एका बेटांत एलिफन्टाईन शहर व जवळच दुसर्‍या बेटावर फिलीचें मंदीर होतें. केवाच्या उत्तरेस कांहीं मैलांवर डेडेरा असून तेथें प्रसिद्ध मंदीर आहे. अबिडासचे अवशेष बेलिआना गांवाच्या नैऋत्येस चार मैलांवर आहेत. अबुसिंबेलची पडकीं मंदिरें नाईल नदीच्या पश्चिमतीरावर आहेत. तांबड्या समुद्रावर कोसेरच्या दक्षिणेस मायासहॉर्मास व बेरेनिस येथील अवशेष आहेत. सेस, इसियुम, टॅनिस, बुबॅस्टिस, ओनिऑन, सेबेनिल पायथॉम, पिल्युशियम व ग्रीक शहरें नॉक्रेटीस व डॅफनी ह्यांचे अवशेष नदीमुखाजवळच्या प्रदेशांत आहेत. याशिवाय कॉप्टिक शहरें, मठ व मंदिरें यांचे अवशेष आहेंत. इस्लामीसाधूंच्या कबरी बर्‍याच असून त्या डोंगरावर सांपडतात.

व्या पा रा चे र स्ते व द ळ ण व ळ णा चीं सा ध नें :- भौगोलिक दृष्ट्या जगांतील अतिमहत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर ईजिप्त वसलें आहे. यूरोपमधून पूर्वेकडे जाणार्‍या रस्त्यावर ईजिप्त हें एखाद्या तटबंदी किल्ल्याप्रमाणें आहे. ही स्थिति प्राचीन काळीं होती व सुवेझकालवा झाल्यानें तीच कायम आहे. सुवेझ कायम आहे. सुवेझ कालव्याची लांबी ८७ मैल असून ६६ मैल कालवा व २१ मैल तळीं आहेत. याची खोली बरीच असून त्यांतून जहाजें जातात. या कालव्याचा कारभार एका कंपनीच्या हातीं असून तिची मुख्यकचेरी पारिस येथें आहे व या कालव्याचें उत्पन्न ईजिप्शियन खजिन्यांत जात नाहीं. अलेक्झांड्रियाहून यूरोपीय बंदरांत जहाजें जातात. सुवेझ व पोर्टसुदान यांमध्यें बोटीनें दळणवळण चालतें. महायुद्धामध्यें व त्यानंतर जपान, नार्वे आणि युनायटेडस्टेटस् या राष्ट्रांचीं, जलमार्गानें, व्यापाराची ने आण व्यवस्थित तर्‍हेनें चालली आहे.

अंतर्गत दळणवळणाचीं साधनें म्हणजे रेल्वे व नदी होत. वरच्या ईजिप्तमध्यें दोन्हीं उपयोगांत असून मुखाजवळच्या प्रदेशांत फक्त रेल्वेचा उपयोग करतात. रेल्वे दोन प्रकारच्या आहेत. १) सरकारच्या मालकीची व सरकारने चालविलेली. २) खाजगी मालकीच्या व खाजगी रीतीनें चालविलेल्या शेतकी रेल्वे. रेल्वे प्रथम १८५२ मध्यें तयार झाली. पहिल्या अब्बासनें अलेक्झांड्रिया व कायरो यांत रेल्वेचा फांटा तयार करण्यास हुकूम सोडला. पोर्टसैय्यद व अलेक्झांड्रियाहून निघणारे फांटे कायरो येथें मिळतात. तेथून लुक्झॉरपर्यंत मोठी लाईन आहे, व तेथून रोलालपर्यंत लहान लाईन आहे. एकंदर अलेक्झांड्रियापासून ६८५ मैलांची रेल्वे तयार आहे. या खेरीज नाईल नदींतून आगबोटी चालतात. अँग्लो ईजिप्शियन सुदनमध्येंहि रेल्वे आहे.

कायरो व अलेक्झांड्रिया या शहरांपासून सुवेझ व इतर शहरांपर्यंत फांटे आहेत. सुवेझचा कालवा होण्यापूर्वीं सुवेझपर्यंत रेल्वेनें प्रवास करीत व तेथून आगबोटीनें हिंदुस्थानांत जात. नदीमुखाजवळच्या प्रदेशांत सातशें मैलांची लहान रेल्वे असून ती खेडीं, शहरें व बंदरें यांना जोडते. १९१५ – १६ मध्यें सलहिया ते कांतारापर्यंत रेल्वे बांधण्यांत आली. तेथून सिनाई द्वीपकल्पामधून यरुशेलम आणि  हलीफापर्यंत तिचा विस्तार वाढला. महायुद्धामध्यें रेल्वेखात्याचें फार नुकसान झालें. ह्यामुळें जुन्या रेल्वे रस्त्यांची व्हावी तशी डागडुजी झाली नाहीं. नवीन रेल्वे लाइन मोठ्या प्रमाणावर बांधतां आली नाहीं. यामुळें जलमार्गानेंच व्यापार अधिक सुरू झाला.

नाईल नदींतून सर्व ईजिप्तभर बोटी चालतात व माल नेण्याचे दरहि कमीच असतात. नाईलनदींपासून पूर्वेस व पश्चिमेस व्यापारी रस्ते आहेत. खालच्या ईजिप्तमध्यें गाड्यांना योग्य असे रस्ते आहेत, परंतु गाढव, खेंचर व उंट यांवरून बहुधा व्यापार चाले व त्यासारखे रस्ते आहेत.

पो स्ट व ता र. – ईजिप्तमधील पोस्टखात्याची रचना व व्यवस्था फार चांगली आहे. ईजिप्त हें पोस्टल युनियनचें सभासद आहे. मुख्यशहरांतून तारा असून तारखातें सरकारच्या ताब्यांत आहे. याची व्यवस्था रेल्वेखात्यामार्फत चालते. बाह्यदेशांशीं तारायंत्रें व जलतारायंत्राच्या योगानें ईजिप्त जोडलें गेलें आहे. मोठाल्या शहरांत टेलेफोनचा (ध्वनिवाहक यंत्राचा) उपयोग करतात. कायरो व अलेक्झांड्रियांमध्यें ध्वनिवाहक यंत्र आहे. बिनतारी संदेशगृहें, कायरो, अस्यूत येथें ठेवलीं आहेत. १९१९ मध्यें दळणवळणखातें असें स्वतंत्र खातें निर्माण करण्यांत येऊन त्या खात्यानें रेल्वे, तारायंत्रें, पोस्टखातें बंदराची व दीपगृहांची व्यवस्था व विमानें यांच्यावर देखरेख करावी असें ठरलें.

ईजिप्तमध्यें प्रमाणकाल (स्टँडर्ड टाइम) अलेक्झांड्रियाच्या रेखांशावरून (३०० पूर्व,) काढतात. ही वेळ ग्रीनीच पुढें दोन तास आहे.

शे त की व धा रा प द्ध ति. – ईजिप्तमध्यें मुख्य धंदा शेतीचा आहे. नाईल नदीमुळें बसणारा गाळ व पाट यांवर शेती अवलंबून असते. नाईल नदीच्या पाण्याचा पाट काढून अलीकडे बराच उपयोग करतात. १९१७ सालीं ३८३९४७२ एकर जमिनींत धान्याचें व १६७७ हजार ‘फेडन’ जमिनींत कापसाचें पीक होतें.

नदीजवळच्या जमिनींत थोडी रेती सांपडते. भूमध्यसमुद्राजवळची जमीन क्षारामुळें खराब होते. म्हणून त्यांत पिकें चांगलीं येत नाहींत. लागवडींतील जमिनीपैकीं तीनचतुर्थांश जमीन तीत्विकदृष्ट्या तहह्यात वहिवाटीला असते. सर्व जमिनीची मालकी सरकारकडे आहे म्हणून जमिनीवर सारा असतो. सारा देणार्‍या जमिनींना खरजी म्हणतात. उशुरी जमिनी पूर्वी इनाम म्हणून दिल्या होत्या व त्यांना सध्यां थोडासा धारा द्यावा लागतो. सर्व कुळांना नाईल नदीचा बांध अथवा तीर संरक्षण करावा लागतो व तो खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करावी लागते. वर्षभर पाटाचें पाणी घेणार्‍यास जास्त कर द्यावा लागतो. जमीन मोजण्याचें प्रमाण फेडन म्हणजे १.०३ एकर आहे. दोनलक्ष चाळीस हजार फेडन सरकारी जमीन असून सुमारें सहा लक्ष फेडन जमीन परकीयांच्या ताब्यांत आहे. देश्य लहान शेतकरी कायम ठेवावयाचे व त्यांची शेती मोठाल्या यूरोपियन भांडवलवाल्याकडे जाईल अशी कोणतीहि गोष्ट करावयाची नाहीं असें सरकारचें धोरण आहे.

नदीमुखाजवळचा प्रदेश, मध्यईजिप्त व वरच्या ईजिप्तचा कांहीं भाग यांस पाटाचें भरपूर पाणी मिळतें. अशी एकंदर चाळीस हजार एकर जमीन असून त्यांत दोन व कधीं कधीं तीन पिकें काढतात. ज्या ठिकाणीं वर्षभर पाणी मिळत नाहीं तेथें जमिनीचे चौकोनी तुकडे पाडून त्यांत नदीला पूर आला म्हणजे पाणी भरून ठेवून नंतर त्यांचा उपयोग करतात. या पद्धतीनें साडेसतरा लक्ष एकर जमीनीची लागवड होते. नाईल नदीकांठच्या उंच प्रदेशांत कालवे नेण्याची सोय नसल्यामुळें पंप, रहाट (सकिआस) वगैरेनीं जमिनीला पाणी देतात. फेला (शेतकरी) शेताचे चौकोनी तुकडे पाडून त्यांना पाण्याचे पाट काढून पाणी देतो.  

येथें तीन ऋतु असतात. उन्हाळा (सेफी) १ एप्रिल पासून ३१ जुलैपर्यंत यांत वर्षभर पाणी मिळणार्‍या जमिनींतच फक्त पीक होतें. (२) पूर (निली) १ आगष्ट ते ३० नोव्हेंबर (३) हिंवाळा (शेतवी) १ डिसेंबर ते ३१ मार्च. कापूस, साखर, तांदूळ व कांहीं अंशी ज्वारी, बाजरी वगैरे आणि भाजीपाला हीं उन्हाळ्यांतील पिकें होत. गहूं, जंव, ताग, व भाजी वगैरे हिंवाळ्यांत होतात. मका, ज्वारी, बाजरी वगैरे व निलि तांदुळ हीं निलि पिकें होत. मोठ्या शेतांत कायती लोखंडी नांगर, व इतर यंत्रें उपयोगांत आणतात. परंतु लहान शेतकरी आपलीं जुन्या तर्‍हेचीं अवजारें उपयोगांत आणतो.

पि कें. – जगांतील कापूस उत्पन्न होणार्‍या देशांत ईजिप्तचा तिसरा नंबर लागतो. येथें एकरी कापसाचें उत्पन्न जास्त येतें. परंतु लागवडीला फारच थोडी जमीन असल्यामुळें येथें संयुक्त संस्थानाच्या एकदशांश व हिंदुस्थानच्या निम्मा कापूस होतो. एकंदर सोळा लक्ष एकर जमीन कापसाच्या लागवडीखालीं असून त्यापैकीं पांच सहा लक्ष जमीन खालच्या ईजिप्तमध्यें आहे. व येथें उत्तम प्रतीचा कापूस होतो. १९१० मध्यें ३,५८,४०,००० पौंड, कापूस पिकला. कापसाचा अतिशय खप होऊं लागल्यामुळें शेतकर्‍यांचें लक्ष्य तिकडेच वेधूं लागलें व धान्य पेरण्याकडे त्यांची कमी प्रवृत्ति होऊं लागली. य प्रवृत्तीला आळा घालण्याकरितां कापूस पेरण्याची मर्यादा सरकारला घालावी लागली.

पा ळी व प शू :- अरबी अथवा पूर्वेकडील वाळवंटांत बेदुईन लोक उंट, घोडे, मेंढ्या व बकरीं पाळतात. नाईल नदीच्या खोर्‍यांत उंट, गाढव, खेंचर, बैल, म्हैस, मेंढी व बकर्‍या पाळतात. घोडे फार थोड्या प्रमाणांत सांपडतात. गुरें लहान, गुटगुटीत, शांत असून त्यांना लहान शिंगें असतात. मेंढ्या व शेळ्या येथें फार आहेत.

मा से मा र णें :- मेन्झुला सरोवरावर मुख्य मच्छी मारण्याचीं ठिकाणें आहेंत. नाईल नदींत देखील मासे सांपडतात. दरवर्षी दोन लक्ष पौंड किंमतीचा व्यापार चालतो.

का ल वे :- येथें कालवे फार महत्त्वाचे आहेत व त्यांतून लहान होड्या चालतात. मुखाजवळच्या प्रदेशांत लहान लहान बरेच कालवे आहेत. त्यांना रय्या बेहेरा, रय्या मेनुफिया, रय्या ट्युफिकी वगैरे कडून पाण्याचा पुरवठा होतो. रय्या बेहेराला प्रथम खटाटबा नांव आहे व पुढें रोझेटा हें नांव मिळालें. महमुदीया कालव्यांतून अलेक्झांड्रियाला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. यांच्या खेरीज आल मोईझचा कालवा, अबुल मुबेजीक कालवा (शर्काविया), इस्मालिया अथवा गोडे पाण्याचा कालवा आणि वरच्या ईजिप्तमधील इब्राहिमीया व बहरयुसुफ हे दोन असे कालवे आहेत. १९१२ सालीं अ‍ॅसुझान येथें मोठें धरण बांधण्यांत आलें. तसेच मोठमोठे कालवे बांधण्याच्या योजना करण्यांत आल्या पण महायुद्धामुळें आर्थिक पेंच उत्पन्न झाल्यामुळें या योजना पूर्णपणें तडीस गेल्या नाहींत. ईजिप्तमध्यें नं अद्यापि पडीक जमीन आहे ती पेरण्यायोग्य व्हावी या हेतूनें, व महापुरापासून लोकांचें संरक्षण व्हावें या हेतूनें, गेबेल औलिया व नगहमदी येथें अशीं दोन मोठीं धरणें बांधावयाचें १९२० सालीं मुकर झालें आहे.

का र खा ने व उ द्यो ग धं दे. – हा देश मुख्यतः शेतीचा आहे तरी येथें बरेच उद्योगधंदे आहेत. सुताच्या गिरण्या बर्‍याच असून त्यांत चिटें छापतात व तेलहि काढतात. वरचा ईजिप्त व मुख्य प्रदेश यांत साखरेचे कारखाने आहेत. तांदुळाच्या गिरण्या व पिठाच्या गिरण्या साबू व कमावलेलीं कातडीं करणें, दारू गाळणें वगैरे धंदे चालतात. अलेक्झांड्रिया व कायरो येथें तंबाखूच्या सिगारेट करतात. देश्य लोक रेशीम, लोंकर, ताग व कापूस यांचे कापड विणतात. येथें साधीं मातीचीं भांडीं तयार होतात. लांकूड व धातू यांवर कोरीव व नक्षीचें काम होतें. कायरो व केयुममध्यें गुलाबी अत्तर व इतर सुगंधी पदार्थ तयार होतात. बोटी बांधण्याचा धंदाहि महत्त्वाचा आहे.

व्या पा र. – ब्रिटिशसत्ते (१८८२) पासून ईजिप्तचा व्यापार वाढला. कापूस, सरकी, साखर, कडधान्य, सिगारेटस्, कांदे, तांदूळ व गोंद यांची मुख्य निर्गत होते व यांच्या खालोखाल कातडीं, अंडीं, धान्यें, खजूर वगैरे येतात. मुख्य आयात सुती व इतर कापड, कोळसा, लोखंड, पोलाद, इमारतीचें लांकूड, तंबाखू, यंत्रें, मद्य, पेट्रोलियम, फळें, कॉफी यांची होते.

१९११ – २० या सालांत सरासरी १०१८८०००० पौंडाची आयात व ५११५६००० पौंडाची निर्गत म्हणजे एकंदर १५३०३६०० पौंडांचा व्यापार झाला.

बहिर्गत व्यापारांपैकीं शेंकडा ९० व्यापार अलेक्झांड्रिया बंदरांतून चालतो. पोर्ट सैय्यदचें महत्व अलिकडे वाढलें असून उतारू व टपाल याच बंदरांत येतात. पूर्वेकडील देशांशीं होणारा व्यापार बहुतकरून सुवेझच्या कालव्यातून चालतो. यांतून ब्रिटिश जहाजें फार जातात त्यांच्या खालोखाल जर्मन जहाजांचा नंबर असून पुढें अनुक्रमें फ्रेंच, डच, आस्ट्रियन वगैरे येतात.

च ल न प द्ध ति. – इ. स. १८८५ पासून येथील चलनपद्धति सुधारली. सुवर्णपरिमाणपद्धति प्रचलित असून सोन्याचा पौंड हें प्रमाण नाणें आहे याची किंमत इंग्लिश १ पौं. ६ पेन्स बरोबर आहे. हा पौंड १०० पिआस्टरच्या बरोबर असून २०­;१०;५;२ पिआस्टरचीं रुप्याचीं नाणीं, व १, १/ १/५ १/१० पिआस्टरचीं निकेलचीं नाणीं आहेत. सध्यां इंग्लिश साव्हरीन, फ्रेंच २० फ्रान्कचें नाणें व तुर्की मेजिदी हीं परकीय नाणीं ईजिप्तमध्यें चालतात. नॅशनल बँकेच्या १००;५०;१;०५;१ पौंडांच्या नोटा असून त्यांची गणना कायदेशीर चलनांत होत नाहीं. सरकार करासाठीं मात्र नोटा घेतें. वास्तविक पाहतां ईजिप्शियन पौंड चालू नव्हता बहुतेक सर्व नाणीं प्रचरांतून नाहींशीं झालीं होती. तरी सुद्धां ही पद्धति चांगली चालली होती.

वजनें व मापें :- सरकारी कामांत दशमानात्मक (मेट्रिक) परिमाणें उपयोगांत आणतात. साधारण लोक मात्र त्यांचा उपयोग करीत नाहींत. फितर म्हणजे टिच, शिबर (वीत) हीं मापें असून फेदन हें जमिनीचें परिमाण आहे. अर्देब म्हणजे ५ बुशेल, ओकिए (१.३२ औं.); ओके (२.७५ पौंड) कांतार (९९.०४ पौंड) अशीं वजनें आहेत.

रा ज्य घ ट ना व शा स न प द्ध ति. – ईजिप्त हें तुर्की साम्राज्याचें मांडलिक असून येथील राजास खेदीव म्हणतात. या घराण्यांत वडील मुलगा गादीवर बसे. मध्यवर्तिसत्ता मंत्रिमंडळाच्या ताब्यांत असे. यांची नेमणूक सुलतान करी व यांच्यापैकीं एक मुख्य प्रधान नेमला जात असे. कौन्सिलांत ब्रिटिश जमाबंदी मसलतगार असून त्याच्या सल्ल्याशिवाय कोणतीहि जमाबंदी सुधारणा अथवा कायदा करीत नसत. अंतर्गत व्यवस्था, जमाबंदी, लोकोपयोगी कामें, न्याय, युद्ध, परराष्ट्रीय व शिक्षण या प्रत्येक खात्यावर एक मंत्री असे. कोणताहि मसुदा प्रथम मंत्रिमंडळाला सादर करून नंतर त्यावर खोदिवची सही लागे. ब्रिटिश मंत्र्याच्या सल्ल्याशिवाय १८८२ पासून कोणतीहि महत्त्वाची गोष्ट घडलीं नाहीं. येथील कायदे बर्‍याच अंशीं परकीयांस लागू नसत.

येथील कायदेमंडळांत नेमलेले व निवडलेले सभासद असून त्यानीं फक्त सल्ला द्यावयाची असे. अर्थात ही सल्ला सरकार मान्य करीत असे. सर्व साधारण सभेंत कायदे मंडळ व मंत्रिमंडळ यांचा समावेश होत असून त्यांत कांहीं लोकनियुक्त सभासद असत. ही सभा कायदे करीत नसे; परंतु हिच्या संमतीशिवाय कोणताहि नवीन कर बसविण्यांत येत नसे. दोन वर्षांतून एकदां तरी हीं सभा भरलीच पाहिजे असा नियम होता.

मोठाल्या शहरांवर गव्हर्नर असून बाकीच्या भागांचें मुदिरीया अथवा प्रांत बनविले आहेत. गव्हर्नर-मुदीर (प्रांताधिकारी) हे अंतर्गत मंत्र्यास जबाबदार असतात. प्रत्येक प्रांतांत जिल्हे असून त्यावर ममूर असतो व प्रत्येक गांवावर अथवा खेड्यावर ओमदा काम पहातो.

१९१३ मध्यें पूर्वीची सर्व साधारणसभा व कायदे मंडळ हीं नाहींशी होऊन त्या जागीं एकच कायदेमंडळ असावें असें ठरलें. या कायदेमंडळांत (१) निरनिराळ्या खात्यांचे दिवाण, (२) ६६ लोकनियुक्त प्रतिनिधी व (३) १७ अल्पसंख्याकांचे सरकारनियुक्त प्रतिनिधी इतके लोक बसावयाचें ठरलें होतें. दर सहा वर्षांनीं कौन्सिलनिवडणुकी व्हावयाचें ठरलें. या नूतन कायदे मंडळाची पहिली सभा १९१३ सालीं झाली. पण पुढें १९१४ सालीं लष्करी कायदा, ईजिप्तमध्यें पुकारण्यांत आल्यामुळें या मंडळाच्या बैठका पुढें झाल्याच नाहींत. डिसेंबर १९१४ मध्यें, ईजिप्त हें इंग्रजांचें ‘संरक्षित संस्थान’ म्हणून ठरलें. व ब्रिटिश कॉन्सलच्या ऐवजीं हायकमिशनर नेमावा असें ठरलें. त्या वेळचा खेदिव अबास हिल्मी याला पदच्युत करण्यांत येऊन खेदिव इस्मायल यास ईजिप्तच्या गादीवर बसविण्यांत आलें. याच्या मरणानंतर अहमद फुमद पाशा याला राज्यपद मिळालें.

न्या य. – येथें चार न्यायपद्धती असून त्यांतल्या दोन फक्त ईजिप्शियन प्रजेस, एक फक्त परकीयांस व एक कांहीं अंशीं परकीयांस व कांहीं अंशीं एतद्देशीयास लागू आहे. येथें १५ परकीय राष्ट्रांचे कॉन्सल आहेत व त्यांस तहनाम्यांप्रमाणें आपापल्या राष्ट्रांतील फौजदारी गुन्हेगारांची अगर आपल्याच राष्ट्रांतील लोकांच्या दिवाणी मुकद्दम्याची चौकशी करण्यास अधिकार आहे. परकीय व देश्य भिन्नराष्ट्रीय परकीय ह्यांमधील दिवाणी खटले सार्वराष्ट्रीय अथवा मिश्र न्यायाधीशमंडळापुढें (टायब्युनल) चालतात. ह्या संस्था १८७६ त नुबरपाशाच्या सल्ल्यानें स्थापन झाल्या. अरबी, फ्रेंच, इटालियन अथवा इंग्लिश या भाषांतून कोर्टांत काम चालतें. यांत परकीय व ईजिप्शियन न्यायाधीश असतात. परंतु परकीय अधिकांश असतात. हे कोड नेपोलियनमध्यें कांहीं मुसलमानी कायद्याप्रमाणें दुरुस्त्या घालून तयार केलेला कायदा अनुसरतात.

ईजिप्शियनांनां लागू पडणार्‍या न्यायपद्धतीवर न्यायमंत्र्याची देखरेख असते. मेहेकेमेह व एतद्देशीय न्यायधीशमंडळ (ट्रायब्युनल) या दोन न्यायपद्धती आहेत. यांपैकीं पहिलीं म्हणजे काजीचीं कोर्टें असून त्यांत कुराणानुसार कायदे मान्य करतात. यावरील मुख्य काजी कायरो येथें असतो. व त्याच्या मदतीला उलेमा अथवा विद्वज्जन सभा असते. या कोर्टांत लग्न, वडिलोपार्जित मालमत्ता व पालकत्व वगैरे बाबतींत दावे चालतात. इतर दिवाणी व फौजदारी खटल्यांच्या बाबतींत १९०५ सालीं एतद्देशीय न्यायपद्धतींत बरीच सुधारणा करण्यांत आली. लहान मुलांच्या गुन्ह्यासाठीं मुलांचीं कोर्टें आहेत.

पोलिस खातें अंतर्गत मंत्र्याकडे असून त्याला मदतीला ब्रिटिश कामगार असतात. प्रांतिक पोलिस प्रांताधिकार्‍यांच्या हुकुमाखालीं असतात.

प र मा र्थ सा ध न :- लोक महंमदी धर्माचे आहेत. १९१७ मध्यें ११६५८१४८ लोक मुसुलमान होते. कॉप्टांची लोकसंख्या ८५४७७८ होती. तसेच ख्रिस्ती लोकवस्ती १५५१६८ होती व यहुदी लोकांची संख्या ५९५८१ होती. याशिवाय इतर धर्माचे लोक २३२४३ होते. मुसुलमान लोक सुनी पंथाचे असून बहुतेक शफी मताचे आहेत. कित्येक हनिफी व मलिकी मताचे आहेत. शेख-ईल-इस्लामची नेमणूक खेदीव करतो. हाच धर्मखात्याचा मुख्य असून कांहीं बाबतींत न्याय देखील देतो. मुख्य काजीची नेमणूक तुर्कस्तानच्या सुलतानाकडून होत असे व काप्टीक पंथाचा मुख्य अलेक्झांड्रिया येथील पॅट्रीआर्क आहे.

शि क्ष ण. – यूरोपीय व देश्य अशा दोन तर्‍हेच्या शिक्षणपद्धती येथें आहेत. या दोन पद्धतीवर कमी अधिक प्रमाणांत शिक्षणखात्याच्या मंत्र्याची देखरेख असते. सरकार पाश्चात्य शिक्षणाचा पुरस्कार करिते. त्याचा अवलंब ब्रिटिशांपूर्वीं झाला असून प्राथमिक, दुय्यम, धंदे, अध्यापन, शेतकी, स्थापत्य, कायदा, वैद्यक वगैरेच्या सरकारी शाळा आहेत. प्राथमिक शिक्षण अरबी भाषेंतून देतात. सरकारी शाळा खेरीज इतर पंथांच्या लोकांच्या व मिशनरी बर्‍याच शाळा येथें आहेत. १९०८ मध्यें चळवळ होऊन मुसुलमानांनीं खाजगी खर्चानें एक राष्ट्रीय विश्वविद्यालय स्थापन केलें. त्यांत शास्त्रीय, वाङ्मयात्मक व तात्विक विषयांचा अभ्यास होणार असून राजकीय व पारमार्थिक विषय गाळले आहेत.

एतद्देशीय शिक्षणपद्धतीचा कुताब व अझार विश्वविद्यालयांत (कायरो येथील) अवलंब केला आहे. कुताब म्हणजे मशिदीला जोडलेली शाळा. यांत पूर्वीं मुलांनां कुराण पाठ करण्यास शिकवीत. अलीकडे दुसरेंहि शिक्षण कांहीं ठिकाणीं देतात. यासंबंधीं सरकारनें बरीच सुधारणा केली असून कांहीं शाळा शिक्षणखात्यानें ताब्यांत घेतल्या आहेत. एकंदर १० हजार कुताब असून त्यांत २५० हजार विद्यार्थी आहेत. काप्टांच्या कांहीं प्राथमिक शाळा, कांहीं धंदे शाळा, व एक विद्यालय आहे.

कायरो हें मुसुलमानांचें विद्यापीठ आहे. येथील अझार विश्वविद्यालयांत व्याकरण, अलंकार, काव्य, कुराण व त्यावर अवलंबून रहाणारे विषय, बिजगणित, वगैरे विषय शिकवितात. सर्व मुसुलमानी जगांतून विद्यार्थीं येथें येतात. विद्यार्थ्यांना फी व प्रोफेसरांनां पगार नसतो. प्रोफेसर शिकवण्या अथवा ग्रंथांच्या हस्तलिखीत प्रती करून पोट भरतात. येथील शिक्षणपद्धतींत सुधारणा करण्यासाठीं १९०७ मध्यें कायदा करण्यांत आला परंतु लोकांनीं बराच विरोध केल्यामुळें तो तात्पुरता अंमलांत आणला नाहीं.

१९१७ सालीं पांच वर्षावर वय असलेल्या मुसुलमान मुलांत शेंकडा ८ मुलांनां व शेकडा १ मुलीला लिहितां वाचतां येत असे. व परकीयांत शेंकडा ७५ मुलांनां लिहिणें वाचणें येत असे.

ही स्थिति सुधारण्याकरितां प्रांतिक कायदेमंडळानें बरीच खटपट चालविली आहे. शिक्षणमंत्रि, अडलीपाशा यानें १९१६ सालीं, प्राथमिक शाळांमध्यें बरीच सुधारणा घडून आणली. १९२० सालीं, वरिष्ठ कायदेमंडळानें सहा व प्रांतिक कायदेमंडळानें अठरा अशा शाळा स्थापन केल्या. याच सालीं मुलींच्या शाळांची संख्या ५४ होती. दुय्यम व उच्च शिक्षणाच्या बाबतींत १९१० ते १९२० या काळांत म्हणण्यासारखी वाढ झाली नाहीं. १९२२ मध्यें शास्त्रीयविषयाच्या निरनिराळ्या शाखांचें अध्ययन करण्यास ईजिप्त सरकारनें १० ईजिप्शियन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन अमेरिकेला पाठविलें आहे.

वा ङ्म य व नि य त का लि कें. – ब्रिटिश अंमलापासून आरबी भाषा व वाङ्मय यांचें पुनरुज्जीवन झालें असून प्राचीन मुसुलमानांचा इतिहास, पुराणवस्तुसंशोधन व पारमार्थिक ज्ञान यांवर बराच प्रकाश पडला आहे. आरबी भाषेंत मासिकें व वर्तमानपत्रें निघतात. ‘आललिया’ हें मुख्य वर्तमानपत्र आहे. अशीच आलओम्मा, आलमोयद, आलजेरिदा हींहि आहेत. याखेरीज कांहीं इंग्रजी व फ्रेंच वर्तमानपत्रें प्रसिद्ध होतात.

लो क. – १९१७ मध्यें येथील लोकसंख्या अरब अथवा बेदुईन धरून एकंदर १,२७,५०,९१८ होती. म्हणजे १९०७ च्या लोकसंख्येच्या मानानें, शेंकडा १२.९ या प्रमाणांत लोकसंख्येची वाढ झाली. वाळवंटाचा प्रदेश सोडला तर ईजिप्तची लोकसंख्या फार दाट आहे. गेल्या पांच सहा वर्षांत ईजिप्तची लोकसंख्या भराभर वाढत चाललेली आहे. त्या प्रमाणांत मृत्युसंख्येचेंहि प्रमाण वाढत चाललें आहे. वाढत्या लोकसंख्येची योग्य तर्‍हेनें कशी व्यवस्था लावतां येईल या संबंधीं ईजिप्त सरकारपुढें मोठा प्रश्न येऊन पडला आहे.

येथील लोकांचे साधारणतः खालिलप्रमाणें विभाग पाडतात. १) फेलाहिन अथवा शेतकरी व शहरांतील एतद्देशीय. २) बेदुईन अथवा वाळवंटांतील भटकणारे अरब. ३) नुबा, व नुबीयन अथवा बर्बेरिन, म्ह. असुआन व डोंगोल मधील नाइल खोर्‍यांत राहणारे. ४) परकीय.

पहिल्या विभागांत मुसुलमान कॉप्टिक यांचा समावेश होतो. बेदुईनमध्यें दोन प्रकार आहेत. पहिला अरबी भाषा बोलणारा. दुसरा कोसेर आणि स्वाकिन मध्यें रहाणार्‍या म्हणजे हॅडेन्डोआ, बिशारिन, व अबाबदी जाती. ह्यांची भाषा वेगळी असून ते बहुधा प्राचीन ब्लेमीस चे वंशज असावे. नुबा लोक अरब व निग्रो यांच्या मिश्रणापासून झाले असून शेतकी करतात. परकीय लोक दीड लक्षाच्यावर म्हणजे लोकसंख्येच्या शेंकडा दीडपट आहेत. यांत ग्रीक, इटालियन ब्रिटिश व फ्रेंच यांचा समावेश होतो. तुर्क फार थोडे आहेत परंतु ते मोठ्या हुद्यावर आहेत.

लोकसंख्येच्या मानानें शेंकडा २० लोक शहरांत राहतात. ९७ हजार शुद्ध भटके लोक सोडले तर सुमारें पांच लक्ष बेदुईन सुपीक भागाजवळील वाळवंटांत राहतात. एकंदर लोकसंख्येंत पुरुषांपेक्षां स्त्रियां ४६ हजारांनीं जास्त आहेत.

ईजिप्शियन लोकांचें वर्णन, पोशाख, व सामाजिक स्थिति. – यूरोपियनांशीं संबंध आल्यानें ईजिप्शियनांची राहणी बदलली आहे. जेथें पाश्चात्त्य संस्कृतीचा मुळींच संबंध नाहीं अशा लोकांचें वर्णन खालीं दिलें आहे. ह्या लोकांची साधारण उंची चांगली असून यांचे अवयव रेखीव असतात व शरीर सुदृढ असतें.  यांचा वर्ण साधारण गोरा असून चेहरा लांबट गोल असतो. डोळे काळे व पाणीदार असतात. पुरुषांना लहान दाढी व मिशा असतात व डोक्यावर फक्त ‘शुशेह’ म्हणजे एक बट असते. स्त्रिया डोळ्यांत काजळ अथवा ‘कोहल’ घालतात. स्त्रिया सुंदर असून त्यांचें सौंदर्य १५-१६ व्या वर्षापर्यंत बहारीचें असतें. यांची वाढ लवकर होते, त्याचप्रमाणें र्‍हासहि लवकर होतो. स्त्रियांवर ४० व्या वर्षी म्हातारपणाची कळा दिसूं लागते. त्या शरीरावर गोंदवितात आणि हातापायाला मेंदीचा रंग देतात.

बरेच लोक यूरोपीय पोषाख करूं लागले आहेत. मूळ ईजिप्शियन लोक तुमान, (पोकळ बाह्याची) पैरण, घोट्यापर्यंत पोहचणारा अंगरखा अथवा कफ्तान; व वरून झगा घेतात. कफ्तानवर कंबरपट्टा लावतात. डोक्याला तांबड्या कापडाची ‘फेझ’ टोपी अथवा ‘टरबुश’ असतो. युरोपियन पोशाख घालणारे लोक ‘टरबुश’ वापरतात. निरनिराळ्या धंद्याच्या व पारमार्थिक मताच्या लोकांच्या डोक्याचें शिरस्त्राणाचा आकार व रंग मात्र वेगळे असतात. स्त्रिया तुमानी अंगरखा व जाकीट वापरतात. सर्व स्त्रियांनां बुरखा असतो. या डोक्यावर लहान टरबुश घालतात. व कानाभोंवतीं रुमाल बांधतात. बाहेर जातांनां स्त्रिया अंगावर झगा घेतात. बायका नेहमीं जोडे (स्लीपर्स) वापरतात.

लहान मुलांनां वडील मनुष्यांचा मान ठेवण्यास शिकवितात. ५ व्या ६ व्या वर्षीं त्यांची सुंता करतात व एखाद्या लग्नाबरोबर त्यांची मिरवणूक काढतात. मुलांनां बहुतेक शाळेंत पाठवून स्वभाषेचें म्हणजे अरबीचें शिक्षण अवश्य देतात. १९ व्या शतकाअखेरपासून मुलींनां देखील शिक्षण देण्याची सोय केली आहे.

तारुण्यांत आलेल्या पुरुषानें लग्न न करणें म्हणजे ईजिप्तमध्यें बदलौकिक समजतात. यामुळें फार थोडे लोक अविवाहित सांपडतात. हल्लींचीं लग्नें साधारण दहाव्या वर्षीं होतात. १६ व्या वर्षांच्या अविवाहित मुली फार थोड्या सांपडतात. नवरा मुलगा नवरी लग्नाच्या वेळींच फक्त पहातो; पूर्वी पहात नाहीं. नवर्‍यास हुंडा मिळतो व फिकी दोन साक्षीदारासमोर लग्न लावितो. शेवटच्या दिवशीं नवरीला मोठ्या समारंभानें नवर्‍याच्या घरीं नेतात. लग्नाच्या चार बायका करण्यास धर्माची सवड असतांनां सुद्धां ईजिप्शियन एक लग्न करतात. परंतु त्यांच्या रखेल्या असतात. या ठेवलेल्या स्त्रियांवर लग्नाच्या स्त्रीचा अधिकार असतो व ती यांनां साधारण कडकपणानेंच वागविते. यांच्यात घटस्फोट होतो पण तो केल्यास हुंडा परत देतात.

मृतांचे संस्कार बरेच आहेत. मेल्यावर प्रेताचें तोंड मक्केकडे वळवितात. स्त्रिया व भाडोत्री लोक शोक करितात. फिकी कुराण वाचतात. त्याच दिवशीं अगर दुसर्‍या दिवशीं प्रेतास स्नान घालून चांगल्या रीतीनें तें ताटीवर बांधतात. स्मशानांत नेण्याच्या अगोदर प्रेत एखाद्या मशिदींत नेऊ तेथें इमाम प्रेतविधि करतो. व नंतर प्रेत पुरतात. त्यादिवशीं रात्रीं फिकी कुराण वाचतो. स्त्रियांनां फक्त सुतकांत काळे कपडे घालावे लागतात व त्या हातांनां, भिंतीला वगैरे काळा रंग लावितात. केव्हां तरी एकदां खातमेह अथवा कुराणाचें पारायण मृताच्या घरीं करतात.

स्त्रियांनां वेगळे जानानखाने (पडदापद्धति) येथें आहेत. पण ती पद्धत कडक नाहीं. स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षां कमी समजतात. फक्त आईला कायतो विशेष मान असतो. जनानखान्याबाहेर स्त्रियांचे जोडे असेल तर पुरुषाला आंत जाण्याला मज्जाव असतो. या रीतीनें एखाद्या मनुष्यास पुष्कळ काळपर्यंत आंत जातां येत नाहीं. वरच्या व मधल्या वर्गांतील स्त्रिया स्नानागार, भेटी व शिवणकाम वगैरे गोष्टींत वेळ घालवितात. स्त्री व पुरुष या दोघांतहि अनीति फार दृष्टोत्पत्तीस येते.

हे सूर्योदयानंतर फराळ, मध्यान्हकालीं जेवण, सूर्यास्तानंतर मुख्य जेवण करतात. मिठाई, फळें वगैरे हे लोक फार खातात. तसेच हे लोक काफी फार घेतात. सर्व दर्जाचे लोक तंबाखू फार ओढतात. श्रीमंत स्त्रियांनां सुद्धां ही संवय असते. कायद्याविरुद्ध असलेली हशिश ओढण्याची संवय बर्‍याच लोकांत आहे. स्त्रिया गाढवावर बसून जातात. गरीबांच्या स्त्रियांस जनाना नसतो परंतु त्या बुरखा घेतात. घरगुती कामाकरितां नीग्रो गुलाम स्त्रिया असतात.

यांच्या पद्धती व रीती फार चांगल्या आहेत. परकीयांशीं हें लवकर बोलतात. यांची भाषा फार मिठ्ठी असते. हे महंमह व कुराण यांनां फार पवित्र समजतात. यांचा देवावर फार भरंवसा आहे. मातृपितृभक्ति, वडिलांचा सन्मान, परोपकार, भूतदया, आनंदी स्वभाव वगैरे गुण आहेत. स्वधर्मीयांखेरीज इतरांवर यांचा भरंवसा नसतो. लहानसहान चोर्‍या मात्र येथें फार होतात.

हमामखाना (स्नानागार) ही पुरुष व स्त्रिया दोघांच्याहि आवडीची जागा आहे. महंमदाची आज्ञा नसतांना सुद्धां हे लोक गायनाचे व वादनाचे शोकी आहेत. गायनकुशल स्त्रियांना ‘अवालिम’ म्हणतात. गवाझी अथवा नायकिणीचें काम करणार्‍या दुसर्‍या स्त्रिया असतात व यांची जातहि वेगळी असते. सध्यां कायरोंत असणार्‍या नायकिणी अवालिम अथवा गवाझी नसून हलक्या दर्जाच्या स्त्रिया आहेत. रिफाफिया, दरवेशी अथवा गारोडी यांचे सापाचे खेळ येथें फार होतात. याचप्रमाणें, इतर खेळ, ढोंबारी वगैरेंचे खेळ आढळतात.

सा र्व ज नि क स ण :- मुसुलमानी वर्षारंभाचे (मोहरमचे) पहिले दहा दिवस फार गडबडीचे असतात. दहाव्या दिवशीं महंमदाचा नातू व अलीचा मुलगा हसन याच्या कत्तलीसंबंधीं वार्षिक समारंभ होतात. यानंतर यात्रेकरूंच्या परत येण्याचा समारंभ होतो. तिसर्‍या महिन्याच्या सुरवातीस ‘महंमदा’ ची जयंति होते. यानंतर अनुक्रमें मोलिदएल हसनेन, आलसाली अयुब, इमामशफी हे उत्सव असतात. यानंतर रमजान, अलइदअसशाघीर, किस्वा, अल ईद अल कबीर वगैरे सण येतात.

नाईल नदीला पूर येतो त्यावेळींसुद्धां कांहीं मोठे समारंभ करतात. यापैकीं कांहीं प्राचीन काळापासून चालत असावे असें वाटतें. याला सुरुवात लेलेतएन नुक्ता म्हणजे १७ जूनच्या रात्रीं होते. यानंतर कांहीं दिवसांनीं नाईल नदीचा पूर कायरो येथें दिसतो. दवंडीवाला पूर आल्याची बातमी दूर पोहोंचवितो. नदीचें पाणी २०-२१ फूट चढल्यावर त्यास वेफाएन नील म्हणतात. याच्या दुसर्‍या दिवशीं कायरो येथील कालवा ज्यानें बंद करतात तो बांध फोडण्याचा समारंभ होत असे. हा कालवा बुजविल्यानें आतां समारंभांत फरक पडला आहे. या बांधासमोर एक स्तंभ असून त्याला ‘नाईलची पत्‍नी’ म्हणत. एक अरब इतिहासकार असें म्हणतो कीं, मुसुलमानांपुर्वीं येथें एक कुमारी बळी देत असत. पण मुसुलमानी अंमलापासून एक होडी सुशोभित करीत व दारूकाम उडवीत. गव्हर्नर व काजी हे बांध फोडण्याची आज्ञा देत. पुढें दुसरे समारंभ होत.

ईजिप्तमध्यें प्रत्येक शहरात, गावात व डोंगरावर साधूंच्या कबरी दृष्टीस पडतात. येथील मुख्य साधु म्हणजे शफी मताचा संस्थापक इमाम अशाफी, सय्यद अहमद अलबैदावी, सय्यद इब्राहिम एद-देसुकी हे होत. बैदावी १३ व्या शतकात होऊन गेला व त्याला टान्टा शहरात पुरलें. त्याच्या कबरेच्या दर्शनास बरेच यात्रेकरू येतात. तसेंच देशुक येथें एद-देशुकीच्या कबरीपुढें बरेच लोक जमतात. याखेरीज महंमदाच्या वंशातील म्हणजे अल्लीची मुलगी सय्यीदा झिनेब, हुसेनची मुलगी सय्यीदा सिकैना, व हसनची नात नेफिसा याच्या कबरी असल्याचें सांगतात व त्याविषयीं फार पूज्यबुद्धि आहे. कायरो येथील हसनीन (अथवा दोन हसन) मशीद फार प्रसिद्ध आहे. व त्यांत हुसेनचें शिर आहे असें म्हणतात.

ईजिप्तमधील दरवेशांचे मुख्य पंथ येणेंप्रमाणें :- १) रिफाईआ व त्याचे उपपंथ इलवानिया व सादिया, २) कादिरिया (काहिरीया) अथवा ओरडणारे दरवेशी, ३) सय्यद अहमद अलबैदादीचे अनुयायी, अहमदीया; व उपपंथ बेयुमिया, शिनाविया, शरविया, व इतर ४) सय्यद इब्राहिम एद-देसुकीचे अनुयायी अथवा बरामिया. या सर्वांवर खलिफ अबूबकर यांच्या वंशांतील पुरुष मुख्य असतो व त्याला शेख-एल-बेकरी म्हणतात. सादिया हे साप पकडण्यांत, त्यांना जिवंत खाण्यांत आणि इलवानीया प्राणी, कांच वगैरे खाण्यांत प्रसिद्ध आहेत. जादूटोण्यावर या लोकांचा भरंवसा आहे. म्हणून दारावर कुराणांतील वचनें लिहिलेलीं सांपडतात. प्रत्येकाजवळ एखादा भारलेला ताईत असतो.

ज मा बं दी. – १९०७ सालीं १,६३,६८,००० पौंड (ईजिप्शियन) वसूल झाला व १,४२,८०,००० पौंड खर्च झाला. १९०५ सालीं ३१ डिसेंबरला एकंदर ९,६४,८४,००० पौंड कर्ज होतें. पुढें सन १९११ सालामध्यें १,६७,९३,००० पौंड वसूल आला व १,४८,७२,००० पौंड खर्च झाला. महायुद्धामुळें वसूल कमी येण्यास लागून खर्च मात्र वाढूं लागला. १९१४|१५, मध्यें १४,६८,००० पौंड तूट आली. १९१९|१९२० मध्यें मात्र वसुलाचें उत्पन्न वाढून तें ३,३६,७७,००० पौंड इतकें झालें व खर्च २,८९,९१,००० पौंड झाला. १९२० सालीं शिल्लक फंड १,५५,७६,००० पौंड होता. १९२१-१९२२ च्या अंदाज पत्रकांत वसुलाचें उत्पन्न ३,६७,०१,००० पौंड धरलें असून खर्च ३,८६,८२,००० धरला  होता. १९१९ च्या अखेरीस राष्ट्रीय कर्ज ९,३२,९९,००० इतकें होतें.

सै न्य. – बहुतेक इतिहासलेखकांचा असा समज आहे कीं, फारोच्या वेळीं त्याच्या पदरी परकीय सैन्य असे. त्यांनंतर कँबिसेस ते शिकंदरपर्यंत टॉलेमीपासून अँटनीपर्यंत, आगस्टपासून ७ व्या शतकापर्यंत, अरबी काळांत, सलाद्दीनच्या घराण्यापासून १३ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ईजिप्तमध्यें भाडोत्री शिपाई होते. यानंतर मॅमेल्युक (गुलाम) यांना काळ्या समुद्राच्या कांठच्या प्रदेशांतून आणून लष्कपी शिक्षण दिले. परंतु पुढें यांनीं राज्यकारभार आपल्या हाती घेतला. १५१७ त तुर्कांची सत्ता सुरू झाली. पुढें अठराव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच व त्यांच्यानंतर ब्रिटिश व तुर्क असा अम्मल झाला. पुढें १८२१ त मेहेमेतअल्ली नांवाच्या कॅव्हाला येथील तंबाखूवाल्यानें कांहीं सैन्यानिशीं येऊन सुभेदारी पटकावली व हळू हळू सर्व देश ताब्यांत घेतला. यानेंच येथील फेलाहिनांनां (अडीच लाख) सक्तीची नौकरी करण्यास लाविलें. याच्या लष्करांत एका डोळ्याचे व हाताचीं बोटें नसलेले लोक असत. कारण बर्‍याच लोकानीं लष्करी नौकरीच्या त्रासांतून सुटण्यासाठीं डोळे, हात, पाय यांनां इजा करून घेतली होती; परंतु याच लोकांनीं पहिल्या व दुसर्‍या सीरियन युद्धांत विजय संपादिले. कोनिया येथील युद्धांत तुर्कांची दाणादाण उडविणारा ईजिप्शियन योद्धा इब्राहिमपाशा याचें असें मत असे कीं, ईजिप्शियन लोकांनां सैन्यांतील सार्जंटपेक्षां वरिष्ठ जागा देऊं नये. त्याच्या वेळीं तुर्क व सिरकाशियन हेच वरिष्ठ अधिकारावर असत. यानंतर अबासच्या कारकीर्दीत ईजिप्शियन सैन्याचा पराजय झाला. सैय्यदच्या अमलांत फक्त तीन हजार सैन्य असे. इस्मायलनें ईजिप्शियन सैन्य वाढविलें; परंतु शेतकर्‍यांवर कराचें ओझें लादल्यानें त्याची गादी डळमळूं लागली. अखेरीस अरबीचें बंड झालें व ब्रिटिशांनीं ईजिप्तमध्यें पाय शिरकावून इस्मायलच्या अठरा हजार सैन्यास रजा दिली.

इ.स. १८८३ त मेजर जनरल सर ईव्हेलीन वुड याला दोन लक्ष पौंड खर्चाची मंजुरी मिळाली व त्यानें ईजिप्तच्या संरक्षणासाठीं सहा हजार फेलाहिन सैन्य तयार करावें, असें ठरलें. त्याच्या मदतीस २६ अधिकारी असून त्यांत कर्नल ग्रेनफेल व लेफ्टेनंट किचनेर हे होते व ते पुढें सरदार झाले. सरदारांनीं अधिकारी वर्ग जुन्या सैन्यांतून व अरबीच्या सैन्यांतून निवडले; परंतु शिपाई मात्र शेतकर्‍यांपैकीं होते. जुनी सक्तीची पद्धति तत्त्वतः रद्द करण्यांत आली. एकंदर विचार करून २० पौंड देणाराला नौकरी माफ असें सरदारांनीं ठरविलें. १९०८ सालीं याचें उत्पन्न अडीच लाख पौंडांपेक्षां जास्त झालें. हा पैसा शिपायांच्या उपयोगास लावतात. वर्षाचा पगार ३ पौं. १४ शि. असतो. ईजिप्शियन शिपाई फार मेहनती असतो. अधिकार्‍यास अवश्य गुण त्याच्या अंगांत नाहींत; परंतु परकीय अधिकार्‍याच्या हाताखालीं तो चांगलें काम करतो. इ. स. १८८३ च्या महामारीच्या सांथींत ब्रिटिश अधिकार्‍यांचें औदार्य व परोपकार याचा परिणाम चांगला झाला व फेलाहिन शिपायांत बरीच सुधारणा झाली. स्वाकीन येथील युद्ध व खार्टूम येथील वेढा उठविण्यास पाठविलेलें सैन्य यांत ईजिप्शियन सैन्यानें फार चांगलें काम केलें. इतकेंच नव्हे तर या शिपायांचा प्रामाणिकपणा व शिस्त फार अवर्णनीय होती व अद्यापिहि आहे. आमडूर मन येथील विजयास बर्‍याच अंशीं फेलाहिन शिपायी कारण झाले.

फेलाहिन याला स्वभावतः युद्ध व लष्करी बाणा आवडत नाहीं. त्याची अंगकाठी सदृढ असून तो काम करणारा असतो. समरांगणावर तो स्थिर असतो. त्याच्यांत सुधारणा होण्यासारखी असते. दरवेश्याबरोबर झालेल्या युद्धांत त्यानें चांगली कामगिरी बजावली. सुशिक्षित ईजिप्शियन अधिकारी निश्चयी व करारी असतो व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखालीं चांगलें काम करतो. काळ्या शिपायांत सुद्धां चांगले गुण आहेत. मेहमेतअल्लीच्या सैन्यांत कांहीं शिपायी होते. सुदानिज शिपायी नेम मारण्यांत कुशल असतात. यांनां कवाईत आवडत नाहीं. १९०८ सालीं ईजिप्शियन सैन्य अठरा हजार होतें. सैन्याबरोबर व देशांत औषधपाण्याची सोय आहे. १८८७ त लष्करी शाळेची पुनर्घटना केली. जनरल सर ईव्हेलीनवुड नंतर कर्नल सर फ्रांसिस ग्रेनफेल व त्याच्यानंतर कर्नल किचनेर हे ईजिप्तचे सरदार बनले. मेजर जनरल सर एफ. आर. विंगेट हा चवथा सरदार झाला.

वरील विवेचनाखेरीज विज्ञानेतिहास या भागांत ईजिप्तसंबंधीं बरेंच विवेचन निरनिराळ्या शास्त्रांचा इतिहास देताना आलें आहे त्याची येथें पुनरावृत्ति केली नाहीं, तथापि उल्लेख करावयाचा म्हणजे मिसरदेशीय लिपि (पृ.३८); लेखनसाहित्य (पृ.७३); ईजिप्शियन हिंदी अंकांची तुलना (पृ.८२-८३); मिसरदेशीय कालगणना (पृ.१०१); इतिहाससंशोधन (पृ.१२७); प्राचीन मिसरदेशांतील शास्त्रीय ज्ञान (पृ.२२७); ज्योतिष ज्ञान (पृ.३२२); औषधिविज्ञान (पृ.३८९) इत्यादि विषयांचा उहापोह तेथें केला आहे. प्राचीन इतिहास बुद्धपूर्वजग उत्तरभाग प्रकरण २ मध्यें दिला आहे.

इ ति हा स.
प्रा ची न. – ईजिप्तचा प्राचीन इतिहास म्हणजे ख्रिस्तपूर्व ३४० पर्यंतचा तिसर्‍या विभागांत दिला आहे (उत्तर भाग, प्रकरण दुसरें) या सुमारास ईजिप्तवर इराणची सत्ता पुन्हां प्रस्थापित झाली होती. पण लवकरच म्हणजे ख्रि.पू. ३३२ मध्यें अलेक्झांडर दि ग्रेटनें ईजिप्तवर स्वारी केली, आणि इराणच्या गव्हर्नराजवळ पुरेसें सैन्य नसल्यामुळें सर्व ईजिप्त देश अलेक्झांडरनें लवकरच हस्तगत केला. नवीन अलेक्झांड्रिया नांवाचें शहर वसवून तेथें राजधानी करण्याचें ठरविलें. ईजिप्तमध्यें मिळालेला खजिना त्याला फार उपयोगी पडला. त्यानें मिसरी लोकांच्या धर्माबद्दल आदर दाखवून लोकांची सहानुभूति मिळविली, व ग्रीकांचा अम्मल तेथें बसवून तो दुसरे देश जिंकण्यास गेला.

ईजिप्तचा खजीना व खंडणी अलेक्झांडरच्या फार उपयोगी पडली. त्यानें ईजिप्शियन धर्माबद्दल सहानूभूति प्रदर्शित केली व लोकाचें प्रेम संपादन केलें. राज्यकारभारावर दोन कामगार नेमिले. अलेक्झांड्रिया शहर राजधानी झालें. त्याच प्रमाणें कर, सैन्य व आरमार या सर्वांवर ग्रीकांची देखरेख होती. ख्रिस्त पूर्व ३३१ त त्यानें सैन्यानिशी फिनीशियांत स्वारी केली. एलिफन्टाईन येथें ख्नुम देवालयाच्या दरवाज्यावर अलेक्झांडरचें नाव कोरलें आहे.

टॉलेमी राजांचा काळ. – (ख्रि. पू. ३२३ – ख्रि. पू. ३०) इसवी सनापूर्वी ३२३ त अलेक्झांडरच्या साम्राज्याचे तुकडे पडल्यावर लॅगसचा मुलगा टॉलेमी याच्या वाट्यास ईजिप्त आला. यानें टॉलेमी घराण्याची स्थापना केली. युद्धाचा खर्च वगैरे करण्यासाठीं या राजांनीं जबरदस्त कर बसविले होते. याच्या अमदानींत सर्व अधिकारी ग्रीक होते. एकंदर राज्यकारभार इतक्या सुरळीत चालत असे कीं, शेतकरी वर्ग फार संतोषित दिसत असे. ग्रीक लोक सर्वत्र वसाहती करून राहिले होते. विवाहसंबंध होऊन ग्रीक व ईजिप्शियन लोक एकत्र झाले होते. पहिल्या टॉलेमीनें मेंफाईट सेरॅपिसचा पंथ चालू केला होता. टॉलेमीच्या कारकीर्दीत न्यूबिया व वरचा ईजिप्त यांमधील मंदीरें बांधलीं गेलीं. थीबीजमध्यें दोन देशी राजे झाले. परंतु धार्मिक बाबीखेरीज इतर बाबतींत थिबीजचें महत्त्व कमी झालें. पहिल्या टॉलेमीच्या अंमलांत ईजिप्तची लोकसंख्या सत्तर लक्ष होती असें डिओडोरस म्हणतो. आपसांतील लढाया व बंडें यामुळें वरच्या व खालच्या ईजिप्तचें बरेंच नुकसान झालें. टॉलेमीच्या अंमलांतील देवळें व पापीरस कागदावरील लेख येथें सांपडत नाहींत.

रोमन सत्तेचा काळ. – ख्रि. पू. ३० मध्यें आगस्टसनें ईजिप्तवर आपला अंमल बसविला. त्यानें हा देश आपल्या खासगी मालकीचा समजून त्यांत सीनेटला कांहींच ढवळाढवळ करूं दिली नाही. टॉलेमीची राज्यपद्धति साधारणपणें कायम ठेवून मोठ्या हुद्यांच्या जागा त्यानें रोमन लोकास दिल्या. कोणत्याहि सीनेटरला बादशहाच्या हुकुमाशिवाय ईजिप्तमध्यें जाण्याची परवानगी नसे. ईजिप्तमधून रोमला धान्याचा पुरवठा होई. यामुळें एखाद्या बंडखोर सेनापतीनें ईजिप्तमधून धान्य जाण्याचें बंद केलें असतें तर रोमची उपासमार झाली असती. सर्वांत मोठी ‘प्रिफेक्ट’ ची जागा रोमन सरदारांना देण्यांत येई. बादशहाचा प्रतिनिधि या नात्यानें ‘प्रिफेक्ट’ हा राजाप्रमाणें असे. पहिला प्रिफेक्ट कॉर्नेलियस गॅलस यानें वरच्या ईजिप्तवर रोमन अंमल चांगला बसविला. तिसर्‍या प्रिफेक्टनें इथिओपिअन लोकांचा पराभव करून त्यांना हांकून दिलें व त्यांची राजधानी नॅपाटा सर केली. यानंतर ग्रीक व यहुदी याचीं भांडणें व द्वेष यामुळें बराच त्रास झाला. क्लॉडीयसनें हिंदुस्थानचा ईजिप्तशीं व्यापार वाढविला. निरोच्या कारकीर्दीपासून भरभराट झाली व ती शंभर वर्षें कायम होती. ट्राजन बादशहाच्या अंमलांत यहुदी लोकांचें बंड, ग्रीकांची कत्तल, यहुद्यांची अलेक्झांड्रियातील कत्तल, वगैरे गोष्टी घडल्या. हेड्रीयन दोनदां ईजिप्तमध्यें आला होता (इ. स. १३४ व १३७). त्यानें अर्टिनो स्थापन केलें. ह्याच्या वेळेपासून ग्रीकोरोमन पद्धतीच्या इमारती सर्व देशभर होऊं लागल्या. मार्कस आरेलियसच्या ब्युकोलिक अथवा देशी शिपायांचें बंड झालें व तें महत्प्रयासानें मोडण्यांत आलें. या युद्धानें शेतीचा नाश झाला व जबर कर बसले. आफ्रिकेचाहि प्रांत ईजिप्तप्रमाणें धान्याचा पुरवठा करण्यांत महत्त्वाचा गणीत असत. रोमन सैन्याचा अधिपति अव्हिडीयस कॅसीयस यानें राजा म्हणून आपली द्वाही फिरवली, परंतु मार्कस आरेलियस येतो आहे असें पाहून त्याच्याच पक्षांतील लोकांनीं त्याला ठार केलें. अ‍ॅन्टोनाईन घराण्याचा र्‍हास झाल्यावर पिसेनियस नायगर, ईजिप्शियन सैन्याचा सेनापति यानें सम्राट म्हणून द्वाही फिरविली (१९३). परंतु सेव्हरस यानें त्याचा पराभव केला. त्याच्या कारकीर्दीत ख्रिस्ती लोकांचा फार छळ झाला. ईजिप्तमध्यें ख्रिस्ती धर्म केव्हां आला, हें नक्की सांगतां येत नाहीं. प्रथम या संप्रदायांचे अनुयायी अलेक्झांड्रिया येथील यहुदी लोकांत होते. नंतर ग्रीक लोकांनीं हा संप्रदाय घेतला व त्यानंतर सर्व देशभर हा धर्म पसरला व अलेक्झांड्रियन व ईजिप्शियन असे दोन पंथ उदयास आले. दोन्हीचा एकमेकांवर बराच परिणाम झाला.

कॅराकालानें सर्व ईजिप्शियन लोकांना रोमचें नागरिकत्व दिलें. परंतु त्यानें जबरदस्त कर वसूल केला. इ. स. २५० मध्यें डेसियसच्या अंमलांत ख्रिस्ती लोकांना बराच त्रास झाला. गॅलीएनच्या अंमलांत प्रीफेक्ट ईमिलीआनस यानें अलेक्झांडर अथवा अलेक्झांड्रिनस नांव धारण करून साम्राज्य पद धारण केलें. परंतु त्याचा गॅलिएनसनें पराभव केला. त्यानें ब्लेमीस जातीचा हल्ला परतवून लाविला. पाल्मीराची राणी झेनोबिया ईनें दुसर्‍या स्वारींत ईजिप्त ताब्यांत आणलें. ऑरेलियननें ईजिप्त पुन्हां जिंकून घेतलें (२७२) व पाल्मीरा जिंकून आपल्या राज्यास जोडला. ईजिप्तचा गव्हर्नर प्रोबस याला टॅसिटसच्या नंतर बादशहा निवडण्यांत आलें. यानें ब्लेमीस लोकांना हांकून दिलें. इ. स. २९६ त झालेलें बंड डायोक्लेशियननें मोडलें. व सर्वत्र नवीन व्यवस्था चालू केली. इ. स. ३०३ चा ख्रिस्त्याविरुद्ध हुकूम ईजिप्तमध्यें अमलांत आणिला. याच्या व गॅलेरियसच्या अमलांत ख्रिस्ती लोकांचा बराच छळ करण्यांत आला. स्पेनचा दुसरा फिलीप यानें ३११ त सहिष्णुता दाखविण्याचा दुसरा हुकूम सोडला.

कॉन्स्टन्टाईननें ३१३ त मिलन येथील राजाज्ञेनें ख्रिस्ती संप्रदाय मान्य केला व पुढें सर्व सत्ता हातांत आल्यावर त्यानें आपल्या प्रजेस ख्रिस्ती संप्रदायाचा अंगीकार करण्याचा आग्रह केला(३२४). या वेळेला ईजिप्तमधील ख्रिस्ती लोकांत दोन गट पडले ते म्हणजे ऑर्थाडॉक्स व एरिआनिझम हे होत. ३८९ त ख्रिस्ती लोकांनीं अलेक्झांड्रिया येथील सेरॅपिसचें मंदिर उध्वस्त केलें. व त्याचें चर्च बनविलें. अलेक्झांड्रीयाचा पॅट्रिआर्च सायरिल यानें तेथून यहुद्यांना हांकून दिलें (४१५). पुढें आपसांत तट पडून यादवी माजली व ईजिप्त साम्राज्यापासून वेगळा बनला. धर्ममत व राजकीय मत यांत कांहींच फरक दिसत नसे. राजसत्ता दिवसेंदिवस कमी झाली.

पांचव्या शतकाच्या मध्यांत ब्लेमीस व नोबेटी या जातींनीं ईजिप्तवर हल्ले केले. पुढें अशी स्थिति असतांना खुश्रुनें (६१६) ईजिप्त सर केला. इराणी अंमल १० वर्षें होता. हेरॅक्लियसनें पुन्हां ईजिप्त जिंकून रोमन साम्राज्यास जोडलें. पुढें अरबांनीं देश जिंकिला. या वेळेपासून खरें इजिप्शियन राष्ट्र नाहींसें झालें. ईजिप्तवर रोमन लोकांची लष्करी सत्ता होती. शिवाय रोमन लोकांनीं ग्रीकांचा पक्ष घेतला. धार्मिक भांडणांत देशी लोकांचा राज्यकर्त्यावरील विश्वास उडाला व लष्करी अंमलानें देशावर सत्ता राहिली. राजधानीच्या पलीकडे राज्यकर्त्याचा अंमल नसे. लोकांत क्षात्रतेज राहिलें नव्हतें. यामुळें मुसुलमानांची सत्ता लवकर स्थापन झाली.

मु सु ल मा नी स त्ते चा का ळ :- इ. स. ६३९ च्या अखेरीस दुसरा खलीफ उमर (पहिला) यानें अमरच्या हाताखालीं चार हजार सैन्य पाठविलें. अमरनें पेल्युशियम घेऊन व नाईल ओलांडून, फेयूममध्यें प्रवेश केला. ६४० मध्यें दुसरें बारा हजार सैन्य अमरच्या मदतीस आलें. अमरनें रोमन सैन्याचा हेलिओपोलीस येथें पराभव केला. यानंतर बाबिलोनला वेढा दिला व तें शहर ६४१ मध्यें सर झालें. अलेक्झांड्रिया शहर ८ नोव्हेंबर ६४१ च्या तहानें खालीं करून देण्याचें ठरविलें. मध्यंतरीं अमरनें कायरोच्या जवळ फोस्टाट शहर वसविलें व किनार्‍यावरील शहरें ताब्यांत आणलीं.

अलेक्झांड्रियाचा पॅट्रीआर्क व ईजिप्तचा गव्हर्नर सायरस याच्या विश्वासघातामुळें ईजिप्तवर अरब लोकांचा अंमल लवकर बसला असावा. रोमन सेनापति देखील कुचकामाचे होते. कित्येक म्हणतात कीं, सायरसनें गुप्तपणानें इस्लामी धर्माचा स्वीकार केला होता. अरबांनीं कॉप्ट व रोमन लोकांनां सारख्याच निर्दयपणानें वागविलें. ६४५ त मॅन्युएलनें अलेक्झांड्रिया सर करून बायझन्टाईन साम्राज्यास जोडलें परंतु लवकरच अमरनें बायझन्टाईन सैन्यास हांकून दिलें. ईजिप्त घेण्याचे या पुढील प्रयत्‍न निष्फळ झाले.

ईजिप्त तरवारीच्या जोरावर घेतलें, अथवा स्वाधीन झालें याविषयीं अरबी लोकांचा बराच वाद आहे. अलेक्झांड्रियावरून ईजिप्त स्वाधीन झालें असावें असें वाटतें. जिझीया कर व सैन्याला रसद देण्याच्या अटींवर ख्रिस्ती लोकांनां लष्करी नौकरी माफ व धार्मिक व खासगी बाबतींत स्वातंत्र्य असे.

६३९ पासून ९६८ पर्यंत ईजिप्त हा पूर्वेकडील खलीफाच्या ताब्यांतील प्रांत होता. ८६८ पासून ९०५ पर्यंत अब्बासी खलीफांच्या अंमलांत येथील लुलुनिद सुभेदारांनीं यानें स्वतंत्र घराणें स्थापन केलें. ९३५ पासून ९६९ पर्यंत इक्षीदी घराण्याचा स्वतंत्र अंमल होता. ९६९ त जौहार यानें ईजिप्त जिंकला व त्यावर फातिमिद खलीफ मोईझ याचा अंमल सुरू झाला. त्यानें माहदियाहून राजधानी बदलून कायरो येथें आणली. हें घराणें ११७१ पर्यंत असून पुढें सलादिननें ईजिप्तवर अब्बासी घराण्याचा अंमल बसविला. परंतु खुद्द सलादीननें अयुबाईट अथवा अयुबीद हें अर्धवट स्वतंत्र घराणें स्थापन केलें. अयुबाईटघराण्यानंतर मामेलुकांचा अंमल बसला. यांत बाहरी (१२५२-१३८२) व बुर्जी (१३८२-१५१७) हीं दोन घराणीं होतीं. हे राजे नांवास मात्र अब्बासि खलिफांची सत्ता मान्य करीत व खलीफ हे मामेलुक सुलतानांच्या हातांतील बाहुली असून कायरो येथें रहात असत. १५१७ त ईजिप्त तुर्क साम्राज्यांत सामील झाला व त्यावर कान्स्टँटिनोपलहून पाशांची नेमणूक होत असे. १७०७ पासून पुन्हां मामेलुकांची नेमणुक होऊं लागली व त्यांना शेख अल बलद हा किताब होता. फ्रेंच सत्ता नाहींशी झाल्यावर पाशांचा अंमल पुन्हां बसला. मेहमेट अलीनें (हा १८०५ त पाशा नेमला) १८४१ त तुर्की सरकारपासून आपल्या घराण्यांत ईजिप्तची सत्ता असावी हें कबूल करून घेतलें. त्याच्या वंशांतील इस्मायल पाशाला खेदीव हा किताब मिळाला व तो अद्याप चालू आहे.

पूर्वेकडील खलीफाच्या तर्फेनें आलेल्या गव्हर्नराची कारकीर्द – ईजिप्त जिंकणारा अमर याला प्रथम गव्हर्नर नेमिलें. याचा अमल खालच्या ईजिप्त वर होता. वरच्या ईजिप्तवर अबदल्ला बिन सादची नेमणूक केली. तिसर्‍या खलीफानें अमरला परत बोलाविलें व खालच्या ईजिप्तवर अबदल्लाला नेमिलें. ऑथमन उस्मान गादीवर बसल्यानंतर इतर सम्राज्याबरोबर ईजिप्तमध्यें घोंटाळे झाले. अखेरीस अमरनें अलींच्या अनुयायांपासून ईजिप्त जिंकला व त्यावर मोअवियाचा अंमला चालू केला. उमईद खलीफ यझीद मेल्यानंतर बरेच घोंटाळें झाले व ईजिप्तच्या मुसुलमानांनीं अबदाल्ला बिन झोबेरचा पक्ष घेतला. परंतु या पक्षाचा मेरबान बिनहकम (पहिला मेरवान) यानें पराभव केला व आपला मुलगा अबदल अझीझ याला गर्व्हनर नेमिलें. ७४५ त ईजिप्त देश दुसरा मेरवान याच्या विरूद्ध होता. याचा सेनापति अल- हौथरा यानें मोठ्या सैन्यानिशी फोस्टाटमध्यें प्रवेश केला. ७५० मध्यें अबासीच्या मुळें दुसरा मेरवान पळून ईजिप्त मध्यें आला. परंतु त्याचा पराभव होऊन होऊन तो मारला गेला. अबासीद सेनापति सालिह-बिन-अली याला गव्हर्नर नेमिलें.

मुसुलमानांचा ईजिप्तमध्यें पाय शिरकल्यापासून तो उमइद घराण्याचा नाश होईपर्यंत येथें लष्करी सत्ता जाऊन त्या ऐवजीं वसाहतीचें स्वरूप आलें. फारच थोड्या कॉप्ट लोकांनीं इस्लामी धर्म स्वीकारला. पहिल्या शतकापर्येंत जुनी कर घेण्याची पद्धत चालू ठेविली. देशांचे जिल्हे पूर्वीप्रमाणें कायम ठेविली. प्रथम जिल्ह्यांतून वेगळी वसूली करण्यांत आली. प्रथम जिझीया व खराज ( जमीनीचा सारा) यांत फरक नव्हता. मुसलमान लोकांनां जमिनी घेण्याची परवानंगी मिळाल्यानंतर परकीयांवर जिझीया कर बसविण्यांत आला. पुढें कॉप्टीक जमीनदारांनीं इस्लामी धर्माचा स्वीकार केला फडणीस ओबैदल्लाबिन हभाव (७२०-७३४) च्या वेळीं सरकारी रीत्या जमिनीची मोजणी करण्यांत आली व खानेसुमारी झाली. यापूर्वीं कॉप्ट लोकांपासून वरिष्ठ जागा काढून त्यांवर अरबांची नेमणूक करित. यामुळें असंतोष माजून ७२५ त कॉप्टांनीं बंड केलें. तें मोडण्यास बरेच आयास पडले. दोन बर्षांनीं उत्तरकडील अरबांनीं बिलबीस येथें वसाहत स्थापिली अरबी भाषेचा प्रचार वाढत जाऊन ७०६ त सरकारी कामांत तिचा उपयोग करूं लागले. ७८० पर्यंत ग्रीक भाषेचा मधून मधून उपयोग करीत. ७३९ व ७५० मध्यें काप्ट लोकांची बंडें झालीं. याला विशेषेंकरून कराची वाढ हेंच कारण होतें.

आबासी करकीर्दीत फोस्टाटच्या उत्तरेस नवी राजधानी करण्यांत येऊन तिला अस्कर अथवा ‘छावणी’ म्हणत. कर जास्त वाढल्यामुळें लोकांवर जुलुम होऊं लागला. गव्हर्नर सारखे बदलत. गव्हर्नराखेरीज फडणीस, शरीर संरक्षक सैन्याचा अधिपति व न्यायाधिश यांच्या नेमणुका झाल्या. इस्लामी तिसर्‍या शतकांत मेमुननें इजिप्त जहागिर म्हणून आबदल्ला-बिन-ताहीर याला दिला. या वेळेपासून जहागिरीची पद्धत सुरू झाली. अबदल्लानें बगदाद येथें राहण्याचें ठरविलें व ईजिप्तचा कारभार पाहण्यासाठीं आपला प्रतिनिधि पाठविला. हीच पद्धत पुढें चालू झाली. ८२८ त मेमुनचा भाऊ मोलासिम हा जहागिदार होता. या वेळीं कराच्या ओझ्यानें बंड झालें. परंतु तें अर्धवट मोडलें. ८३१ मध्यें अरब व कॉप्ट लोकांनीं बंड केलें. खलीफ मेमून याचा सेनापति अफशिन यानें बंडखोरांचा पराभव केला. कॉप्ट लोक शरण आले. सर्व पुरुषांची कत्तल केली. स्त्रिया व मुलें यांना गुलाम म्हणून विकण्यांत आलें.

या वेळेपासून काप्टराष्ट्र कायमचें चिरडलें गेलें. खलीफ मोतासिमनें स्वतःभोवतीं परकीय शिपाई जमविले व अरबी शिपायांचा मुशाहिरा बंद केला. यामुळें बंड झालें. पण तें मोडून अरबी सत्ता नष्ट केली. परकीय भाडोत्री शिपायांची सत्ता मात्र सुरू झाली. पुढें अशनास नांवाच्या तुर्की सेनापतीला ईजिप्त जहागिर म्हणून दिला. यावेळेपासून फातिमिद घराण्याच्या अंमलापर्यंत तुर्की लोकांचें प्राबल्य वाढलें. ८४४ त अशनास वारल्यावर ईताख नांवाच्या तुर्की सेनापतीला ईजिप्त मिळाला. याच्या नंतर खलीफ मोतावक्कील याचा मुलगा मोतासिर आणि ८५६ त फथेबिन खाकान याना जहागिर म्हणून ईजिप्त मिळाला. फथेनें तुर्की गव्हर्नराची नेमणूक केली. मोठ्या जाग्यावर तुर्की लोक नेमले. अबासीपासून अर्धवट स्वतंत्र घराण्याचा अंमल बसेतोंपर्यंत कांहीं धर्मवेड्या खलिफांच्या अंमलांत इतर मुसुलमानी पंथांच्या लोकांचे बरेच छळ झाले. या खलीफांनीं अलीचें घराणें अथवा अनुयायी यांच्या विरुद्ध बरीच दडपशाही दाखविली.

तुलुनिद घराणें :- इ. स. ८६८ त ईजिप्त बयीकबेग नांवाच्या तुर्की सेनापतीस जहागिर म्हणून मिळालें. यानें आपला सावत्र मुलगा अहमद बिन तुलुन याला प्रतिनिधी नेमलें. तुलुननें खलिफाच्या खजिन्याचें चोरापासून संरक्षण करून नांव मिळविलें होतें. नंतर तो खलीफ मोस्ताईनबरोबर हद्दपारीवर गेला होता. ईजिप्तमध्यें त्याला फडणीस इबन अलमोदाबिर हा प्रतिस्पर्धि होता. हा स्वतंत्र असून याच्या जवळ गुलामांचें सैन्य असें. तुलूननें मोदाबिरचे सैन्य कमी करून आपले सैन्य वाढविलें. अलीच्या पक्षाच्या लोकांनीं बंड केलें. तेव्हां टुलुन याला आपलें शौर्य दाखविण्यास चांगलिच संधि मिळाली. ७८० मध्यें याचा सावत्र बाप वारला व ईजिप्त त्याच्या सासर्‍याला मिळालें. यामुळें याची जागा कायम राहिली. सिरीयांत कांहीं गडबड झाल्यामुळें खलिफानें अहमदास सैन्य घेऊन बोलविलें. पुढें परत आल्यावर अहमदानें सैन्य कायम ठेविलें. कायरोच्या आग्नेयीस कताई नांवाचें नवीन शहर स्थापिलें. सासरा मेल्यावर खलिफाचा भाऊ मोवा याला  ईजिप्त मिळालें. अहमदानें लाचलुचपत देऊन आपली नेमणूक कायम करून घेतली. ८७५ त यानें बगदादला खंडणी पाठविण्याचें नाकारलें. सैन्य व इमारती यांच्याकडे त्यानें पैसा खर्च करण्यास सुरवात केली. ८७७-७८ त अहमदानें सिरीयांत स्वारी करून मुख्य शहरें ताब्यांत घेतलीं. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा अबास याने बंड केले. परंतु अहमदच्या सैन्याने त्याचा पराभव करुन त्याला कैद केले.  ८८२ त अहमद व मोवाफाक यांच्यांत बरीच तेढ येऊन मोवाफाक याने अहमदास कामावरुन दूर केल्याचें जाहीर केले. अहमदानें उलटपक्षी मोवाफाकचां अधिकार नाकबूल केला. ८८३ त सिरियांतील बंड मोडण्यास जात असतां अहमद आजारी पडला व ८८४ त कटाई येथे मरण पावला. यानें प्रथम ईजिप्तचा अधिकार सिरियावर बसविला. याच्या वेळेपासून ईजिप्त पूर्वेकडील खलिफाच्या अधिकारापासून स्वतंत्र बनत चालले. याचा मुलगा खोमारुय हा २० वर्षाचा असतानांच गादीवर बसला. खलिफानें सिरिया घेण्यांचा प्रयत्‍न केला पण याच्या सेनापतीनें त्याच्या सैन्याचा पराभव केला. ८८६ त मोवाफाकनें खोमारुयला ईजिप्त, सिरिया व सरहद्दीवरील शहरे यांवर ३० वर्षेपर्यंत अधिकार दिला. खोमारुयनें युफ्रेटीस व टैग्रिस पर्यंत आपला अंमल वाढविला. ८९१ मध्ये मोवाफाक मेल्यावर यानें खलिफाशी संधान बांधून आणखी ३० वर्षांची सनद मिळविली व आपल्या मुलीचें खलिफाशीं फार थाटानें लग्न केलें. यामुळें त्याला पश्चिमेस बार्कापासून पूर्वेस हीटपर्यंतच्या प्रांतावर अधिकार मिळाला. ३ लक्ष दिनार खंडणी याला द्यावी लागे. ८९६ त राजवाड्यांतील कांहीं कटामुळे हा दमास्कस येथे मरण पावला.

याचा मुलगा अबुल असाफिर जैरा याचा सहा महिन्यांच खून झाला. त्याचा भाऊ हरुन हा गादीवर बसला. याच्या राज्यांत बरींच बंडे झालीं. सिरियांत कार्मेथियन लोकांनीं उचल खाल्ली. खलिफाने त्यांची खोड मोडून महमंद बिन सुलेमान याला ईजिप्त जिंकण्यास पाठविले. हरुन याचा खून होऊन त्याचा चुलता शैबान गादीवर बसला.  महंमदानें ९०५ च्या सुरवातीला ईजिप्त घेऊन ईसा-अलनौशरी याची सुभेदार म्हणून नेमणूक केली. तुलुनिद पक्षाच्या लोकांनीं ईजिप्त घेण्याचे प्रयत्‍न केले पण ते निष्फळ झाले.  यामुळे कटाई येथील टुलुनिदांचा राजवाडा जमीनदोस्त करण्यांत आला. इ. स. ९१४ त फातिमिद खलिफ अल महादी-ओबैदल्ला यानें ईजिप्त जिंकण्यास सैन्य पाठविलें.  अबासि खलिफानेंहि याविरुद्ध बरीच मदत केल्यानें त्याची डाळ शिजली नाही. ९२१ पर्यंत फातिमिद सैन्याचा ईजिप्तला शह होता.  यावर्षी बगदादहून बरेंच सैन्य आल्यानें त्यांनां हांकून दिलें. यानंतर बरीच अंदाधुंदी माजली व सुभेदारीबद्दल बराच लढा पडला. दमास्कस येथील तुलुनिद प्रिफेक्टचा मुलगा महंमद बिन तुघज यानें सर्वांचा पराभव करुन आपली सत्ता स्थापिली.

ईक्षिदी घराणे:- महंमद बिन तुघज हाच या घराण्याचा संस्थापक होय. ईक्षिद ही पदवी त्याला खलिफाने दिली. यानें यापूर्वी ईजिप्तमध्यें नौकरी केली होती. महंमदनें फडनिसाचें काम स्वत: पाहण्यास सुरवात केली. काटकसर व दंड यामुळें त्यानें खजिना भरण्यास सुरवात केली. कांहीं लोकांचा फातिमिदांशीं पत्रव्यवहार चालू असल्यामुळें यानें बरेंच सैन्य जमविलें पण इकडे इब्नराइकनें सीरियांत गडबड केली. महंमदानें त्याला खंडणी देण्याचें कबूल केलें. पुढे राइक याचे बगदाद येथें बरेच प्रस्थ माजलें. त्यामुळें ईक्षिदनें फातिमिद लोकांशीं संधान बांधून प्रार्थनेंत सुद्धां त्यांचें नांव घेण्याचा हुकूम केला. ९४१ त राइक मेला व ईक्षिद यांनीं सीरिया जिंकला. खलिफानें त्याला मक्का व मदिना सुद्धां त्या प्रांतावर अधिकार चालविण्यास परवानगी दिली. ९४४ मध्यें तुझुनने खलिफाला बगदादमधून हांकून दिलें व खलीफत हमदानिदांच्या ताब्यांत गेली.  ईक्षिद हा त्याच्या मदतीला गेला. याच वेळेला त्याला ईजिप्तची सुभेदारी वंशपरंपरागत मिळाली. हमदानिद-सैफ-अदाउल्ला याच्याशीं ईक्षिदचें वांकडें आलें. सैफ-अदाउल्लानें ईक्षिदचा सेनापति काफूर याचा पराभव केला; पण ईक्षिदने त्याचा उलट पुन: पराभव केला. तहांत सैफ-अदाउल्लानें सर्व सीरिया ठेवावा व ईक्षिदनें आपला प्रिफेक्ट दमास्कस येथे ठेवावा असें ठरलें. बुयिद बादशहानें ईक्षिदला सुभेदार कायम केलें. ईक्षिद दमास्कस येथें ९४६ त मरण पावला. याचा मुलगा उन्जुर गादीवर बसला व सर्व कारभार नीग्रो काफूर हा पाहूं लागला. काफूरनें सैफ अदाउल्लाचा पराभव केला. उन्जुरच्या मृत्यूनंतर ( ९६१ ) त्याचा भाऊ अबुल हसनअली हा सुभेदार झाला व काफूर पहिल्याप्रमाणें कारभार पहात असे. हा ९६५ त मेला. काफूरनें त्याचा मुलगा अहमद याला गादीवर बसविण्याचें ढोंग करुन स्वत:च्या हातीं सूत्रें घेतलीं.  तीन वर्षांनीं काफूर मेला व अहमद अथवा अबूल फवारिस गादीवर बसला. याचा वजीर इबन फुरात होता. या वेळेला कार्मेथियनांनीं सीरियांत स्वारी केली. गव्हर्नर ईजिप्तमध्यें पळून आाला व त्यानें नालायक म्हणून ईब्नफुरातला कैद केलें. इब्न फुरातची कारकीर्द ईजिप्तला चांगली झाली नाहीं. या वेळेला फातिमिदांनीं ईजिप्तवर स्वारी करण्याची चांगली तयारी केली. त्यांचा सेनापति जौहार हा एक लक्ष सैन्यानिशी ९६९ त चाल करुन आला.  या वेळेला इब्न फुरातच्या हाती पुन: सूत्रें आलीं. त्यानें जौहारच्या ताब्यांत देश करण्याचें ठरविलें; परंतु सैनिकांना तें न आवडून त्यांनीं युद्धाची तयारी केली.  जौहारनें ईजिप्शियन सैन्याचा पराभव करुन मोईझच्या नांवाची द्वाही फिरविली. सीरियाच्या ईक्षिदी गव्हर्नराचा पराभव होऊन ते घराणें नामशेष झालें. अशा रीतीनें ईजिप्त पश्चिमेकडील खलिफांच्या ताब्यांत आला.

फातिमिदांची कारकीर्द:- जौहारनें फोस्टाट घेतल्यावर अल-कहिरा अथवा कायरो शहर बांधण्यास सुरवात केली. त्याचप्रमाणें खलिफासाठीं राजवाडा व एलअझर नांवानें प्रसिद्ध असलेली मशीद त्याने बांधली. लवकरच त्याला कार्मेथियनांशी युद्ध करावें लागलें.  कार्मेथियनांचा सेनापति अलहसननें खुद्द कायरोला वेढा दिला; परंतु लांच देऊन त्याच्या सैन्यांत फूट पाडण्यांत आली व जौहारनें त्याला ईजिप्तबाहेर हांकून दिलें व कांहीं सीरियाचा भाग देखील ताब्यांत आला.  मध्यंतरी मोईझ हा ९७३ त अलेक्झांड्रिया येथें आला व अपल्या शियापंथाचा प्रसार करण्याचे त्यानें ठरविले.  कार्मेथियन शियापंथाचेच असल्यानें त्यांना आपल्या बाजूस वळविण्याचा प्रयत्‍न त्यानें केला; पण तो सिद्धीस न जाता उलट त्यांनीं राजधानीला वेढा दिला. हा वेढा उठवून त्यांना ईजिप्त व सीरिया यांमधून हांकून दिले. मोईझनें बायझन्टाईन सैन्याबरोबर काही युद्धें केली. तो मरण्यापूर्वीं त्याची सत्ता मक्का, मदिना, सीरिया, ईजिप्त व उत्तर आफ्रिका यांवर चांगली बसली.

यानंतर अझिझविल्ला हा गादीवर बसला. जेकबबिन किलीस हा त्याचा वजीर होता व त्याच्या सांगण्यावरुन इतराजी झालेल्या जौहारला पुन: नौकरीवर घेतलें. तुर्की सेनापति अफ्ताकिन यानें कार्मेथियनांच्या मदतीनें सीरियांत बरीच धामधूम केली. यावर जौहरला पाठविलें. अखेरीस अझीझने स्वत:सैन्याचें आधिपत्य घेऊन ९७७ त अफ्ताकिन व कार्मेथियन यांचा पराभव केला व अफ्ताफिनला कैद केलें. वजीरानें फातिमिदांचीं मतें एकत्र करुन तीं एल-अझर या मशिदींत विद्यार्थ्यांनां शिकविण्याचें अमलांत आणलें. या व मागील राज्यांत इतर इस्लामी पंथाच्या व इतर धर्माच्या लोकांस  चांगल्या रीतीनें वागविले. अलीपक्षास मानणारा बगदादचा बुयिद बादशहा अदोद-अदाउल्ला यानें फातिमिद हे अलीचे वंशज म्हणून कबूल केलें नाहीं. याच्यानंतर याचा मुलगा अबुअली अलमन्सूर हा अलहकीम बियामर-अलन ही पदवी धारण करुन अकरा वर्षांचा असतांनाच गादीवर बसला.  स्लाव्ह बुरजुवान हा कारभार पहात असे. याचा हकीमच्या चिथावणीनें खून पडला.  हकीमला प्रजेवर विलक्षण कायदे करण्याबद्दल फार आनंद होत असे. यानें यरुशलेम ( १०१० ) येथील `होली सेपल्करचे’ चर्च पाडून टाकलें. सर्व ख्रिस्ती व यहुदी लोकांनां एकदम मुसुलमान बनविण्याचाहि याचा विचार असावा. यानें बगदादच्या पद्धतीवर कायरो येथील राजवाड्यात मोठें ग्रंथसंग्रहालय स्थापन केलें व त्यांत विद्यार्थ्यांची सोय केली. १०२० मध्यें स्वत: देव म्हणून यानें जाहीर केलें. दराझी नांवाच्या गृहस्थानें ह्या मताचा सर्वत्र प्रचार करण्याचा  प्रयत्‍न केला. याला मुसुलमानांनी चांगलाच अडथळा केला. १०२१ सालीं हा एकाएकीं नाहींसा झाला होता.  यानें राज्यकारभार चांगल्या रीतीनें चालविला व बंडें मोडलीं. याचा मुलगा अबुल हसन अली हा अलझाहीर लि-इ-झाझ-दिन-अल्ला ही पदवी धारण करुन गादीवर बसला. हा १६ वर्षांचा असल्यानें याची आत सितअलमुल्क ही कारभार पहात असे. पुढें चार वर्षांनीं ही वारली. यामुळें हा खलीफ पुष्कळ मंत्र्यांच्या ताब्यांत गेला. सीरिया ताब्यांतून गेला व ईजिप्त वर सलिहबिन मिर्दासनें स्वारी केली. याने अलेष्पो येथे स्वतंत्र घराणें स्थापिलें. अनुष्टकिननें १०२९ मध्यें पॅलेस्टाईन व सीरिया जिंकून पुन्हां ईजिप्तला जोडला. हा खलीफ आपल्या बापासारखा कांहीं बाबतींत विचित्र असे. याच्या नंतर याचा सात वर्षांचा मुलगा अबु तामीन मा-आद हा अलमोस्तान्सीर पदवी धारण करुन बसला. सर्व सत्ता याची निग्रो आई च्या हातांत असे.  याच्या वेळेस मॅग्निबच्या मांडलीक झैरीद घराण्यांतील चवथा पुरुष मोईझबीन बदीस यानें सुनी पंथ स्वीकारुन बगदादच्या खलीफाची सत्ता मान्य केली. येमेन प्रांतांनें याच्या उलट फातिमिदांची सत्ता मान्य केली. बासिरसी नांवाच्या तुर्कानें बगदाद घेऊन तेथें फातिमिदांची द्वाही फिरविली ( १०५८ ), परंतु त्याला वेळेवर मदत न मिळाल्यामुळें सेल्जुक तोघ्रलबे यानें बगदाद परत घेतलें. व अबासि खलीफांचा अंमल चालूं केला. या नंतर एक वर्षांनें मोस्टान्सिरच्या सैन्यांत दुफळी माजून तुर्क व नीग्रो यांत युद्ध सुरु झाले. तुर्की सेनापति नासीर अदाउल्ला-बिन-हमदान यानें बर्‍याच लढाया मारुन कायरो घेतलें व खलिफाचा राजवाडा लुटला. हकीमनें केलेल्या ग्रंथालयाला आग लागून बरीच नासाडी झाली. खलीफ व त्याचें कुटुंब यांचीं बरीच दुर्दशा झाली. इतक्यांत नासीरचा खून पडला व मोस्तान्सिरनें बेद्रअल जमाली नांवाच्या आर्मिनियनास मदतीस बोलाविलें. त्यानें १०७४ त कायरो घेऊन बहुतेक ईजिप्त जिंकून खलीफाची सत्ता बसविली. त्यानें कायरोचा तट चांगलाच मजबूत बांधला. याच सुमारास असॅसिनांचा उदय झाला व त्यांनीं मोस्तान्सिरचा वडील मुलगा निझार याचा पक्ष घेतला. सर्वांत लहान अहमद याच्या पक्षास बद्र घराणें होतें. बद्र १०९४ त मरण पावला. व त्याचा मुलगा अलअफदल शहिन शहा हा पुढें आला. मोस्तान्सिर त्याच वर्षी मेला व त्याचा मुलगा अहंमद हा अलमोस्ताली बिल्लाह पदवी धारण करुन गादीवर बसला.

मोस्ताली गादीवर बसल्यावर निझारनें अलमोस्ताफा लिदिन अल्ला ही पदवी घेतली व बरीच गडबड केली, परंतु त्याला यश मिळालें नाहीं. या खलीफाच्या राज्यारंभी धर्मयोध्याची स्वारी झाली. अलअफदालनें फ्रँक लोकांनां यरुशलेम व बाजूचा प्रांत घेण्याला मदत केली व ही चूक दुरुस्त करण्याकरितां त्यानें पॅलेस्टाइनवर स्वारी करण्याचा प्रयत्‍न केला पण तो फुकट गेला. ७ वर्षे राज्य केल्यावर मोस्ताली मरण पावला व त्याच्या अफदाल या पाच वर्षांच्या मुलास अलअमीर बिहाकमअल्ला ही पदवी देऊन गादीवर बसविलें. अफदालनें सीरिया व पॅलेस्टाईन जिंकण्याचा बराच प्रयत्‍न केला. परंतु उलट पहिल्या बाल्डिविननें ईजिप्तवर स्वारी केली. तो टिनिसपर्यंत आला होता. इ. स. ११२१ त अब्दालचा खून पडला व यास खलिफांची संमति होती असें दिसतें. महमद बिन फतिक अल-बताहि याला वजीर नेमिले. यानें अल-ममून ही पदवी धारण केली.फ्रँक लोकांनीं टायर घेतलें व व्हेनेशियनांनी ईजिप्तच्या आरमाराचा पराभव केला. खलिफ अमीरनें वजीर व त्याच्या अनुयायांस कैदेंत टाकून नंतर सुळावर चढविलें. खलिफानें खुद्द राज्याचा कारभार पाहाण्यास सुरुवात केली. याच्या कारकीर्दीत बराच जुलूम झाला व ११२९ मध्ये याचा खून पडला. याच्यानंतर याचा चुलत भाऊ अबुलमैमून अबदल मजीद हा अलहफिज लिदीनअल्ला ही पदवी धारण करुन गादीवर बसला. वर्षभर वजिरानें याला कैदेंत ठेविलें परंतु त्याचा खून झाल्यावर हा स्वतंत्र झाला. याच्या सैन्यांत अंदाधुंदी माजून आपसांत युद्धें चालू होतीं. याचा मुलगा हसन याचा पक्ष बळावून त्याच्या हातीं खलिफा सापडला. पुढें हसनवर सैन्याची इतराजी झाली व खलिफाने त्याला विष देऊन मारिलें.  ( ११३५ ) हफिजनंतर त्याचा मुलगा अबुल मन्सुर इस्मायल हा अल-झाफिर-लियादा अल्ला ही पदवी धारण करुन गादीवर बसला. उसामाबिनमुन्किध व उमाराह या दोघा ग्रंथकारानीं या वेळचा इतिहास लिहिला आहे. या सुमारास इजिप्तमध्यें जिकडे तिकडे यादवी माजली होती. वजीराच्या जागेबद्दल युद्ध होऊन अमिर इब्नसल्लार हा विययी झाला होता. याचा सावत्र मुलगा आबास यानें याचा खून करुन वजिराची जागा पटकाविली. यानंतर सिरियांतील शेवटचें ठाणें अस्कालान हें फातिमिदांच्या ताब्यांतून नाहींसें झालें. चार वर्षानंतर अबासनें खलिफ व त्याचें बंधू यांचा खून केला व खलिफाचा लहान मुलगा अबुल कासिम इसा याला गादीवर बसविले. हा पांच वर्षाचाहि नव्हता व यानें अलफैझ बिनसरअल्ला ही पदवी धारण केली. राजस्त्रियांनीं उषमुनेनचा प्रिफेक्ट तलाई बिनरुझीक याची मदत मागितली आबास सिरियांत पळून गेला व तेथें तो मारला गेला. बाल खलिफ हा ११६० मध्यें मेला. तलाईनें झाफिरचा ९ वर्षांचा नातू गादीवर बसवून त्याला अल-अदिद-लिदीन-अल्ला ही पदवी दिली. राज्याचीं सर्व सूत्रें यानें आपल्या हातांत घेतलीं.  यानें सहा महिन्यांनें कर वसूल करण्याची पद्धत ठेविली त्यामुळें लोकांना फार त्रास झाला.  तलाई ११६० मध्यें वारला व त्याचा मुलगा रुझिक हा वजीराच्या जागेवर आला. एक वर्षानंतर वरच्या ईजिप्तचा प्रिफेक्टशावर बिन मुजिर यानें स्वारी करुन रुझिकला पळावयास लाविलें. शाबरनें ११६३ त कायरोंत प्रवेश केला. नऊ महिन्यानंतर दिरघाम नांवाच्या सैन्यांतील अधिकार्‍यापुढें शावरला पळावें लागलें. तो सिरीयांत गेला. व तेथून नुरेद्दीन याच्याकडून त्यानें मदत आणली. सिरियन सरदार असद-अलदीन शिरगुह हा कुर्द सैन्यानिशीं ईजिप्तमध्यें आला. याच वेळेला फ्रँक लोकांनीं ईजिप्तवर स्वारी केली होती. दिरघामचा पराभव होऊन तो मारला गेला. पुढें सिरियन लोक व शावर यांचें जमेना म्हणून त्यानें फ्रँक लोकांच्या मदतीनें शिरगुहला वेढा दिला. परंतु पुढें वेढा उठवून शिरगुहला परत जाऊं द्यावें लागलें. ११६० त पुन्हां सिरियन लोकांनीं स्वारी केली. शिरगुह व त्याचा पुतण्या सल्लादिन यांनीं शवार व फ्रँक लोकांचा पराभव केला. परंतु तहान्वयें फ्रँक व सिरियन लोकांनीं ईजिप्त सोडावें असे ठरलें.  कायरो येथे सिरियन सैन्य राहिलें.  यामुळें राजा अमालरिक यानें पुन्हां स्वारी केली. परंतु खलिफानें शिरगुहला मदतीस बोलाविलें.  त्याने शावरला पकडून फांशी दिलें. खलिफानें शिरगुहला वजीर नेमिलें. दोन महिन्यांनीं शिरगुह वारल्यावर त्याचा पुतण्या सल्लादिन याला वजीर नेमिलें. सल्लादिन हा नुरेद्दीनचा प्रतिनिधि म्हणवीत असे. व नुरेद्दिननेंहि त्याला मदत दिली. नुरेद्दिन हा सुनी असल्यामुळें त्यानें फातिमिद यांची सत्ता नाहींशी करण्याबद्दल सल्लाद्दिनला लिहिलें.  मध्यंतरी खलिफ मरण पावला. या शेवटच्या खलीफाचें वय २१ वर्षाचें होतें.

आयुबितांची कारकीर्द.– नुरेद्दीनच्या सांगण्यावरुन सलाद्दिनानें फातिमिद न्यायाधिशांनां काढून जुन्या धर्मशास्त्राचा अभ्यास वाढविला. नुरेद्दीन ११७४ त वारल्यावर त्याने सुलतान ही पदवी धारण केली. यावेळेपासून आयुबितांची खरी कारकीर्द चालू झाली. दमास्कस हें राजधानीचें शहर झालें. यानें इजिप्शियन सैन्यास रजा दिली व कायरो शहराची डागडुजी केली. ११८३ मध्यें सलाद्दिनची सत्ता ईजिप्त व उत्तर सिरियावर चांगल्या रीतीनें प्रस्थापित झाली. याचा बराच काळ सिरियांत गेला. धर्मयुद्धांत याचें नांव प्रामुख्यानें पुढें येतें.  मृत्युसमयीं सलाद्दिननें आपलें राज्य आपल्या मुलांत वांटून दिलें.  त्यांपैकीं ऑथमन हा मलिक अलअझीझ इमाद अलदिन हा किताब घेऊन ईजिप्तवर राज्य करुं लागला. वरील राज्याची विभागणी न आवडून तीन वर्षांनीं अलअझीझनें आपला चुलता मलिक अलअदील याच्या मदतीनें आपला दमास्कस येथील भाऊ अल अफदालवर चढाई केली. त्याला सर्खद येथें हांकून देऊन अझीझनें दमास्कस घेतलें.  अझीझ ११९८ त मरण पावला व त्याचा लहान मुलगा गादीवर बसला. मुलाचा चुलता अल-अफदाल याला राजप्रतिनिधि होण्यास बोलाविलें. त्यानें अल-अदीलपासून दमास्कस घेण्याचा प्रयत्‍न केला. परंतु पराभव होऊन पुन्हां सार्खद येथें जावें लागलें.  अदील लहान राजाचा पालक बनला. परंतु लवकरच त्याला पदच्युत करुन त्यानें मलिक अल-आदिल सैफ अलदिन या नांवानें गादी बळकाविली. याचें नांव अबूबकर असें होतें.

हा गादीवर बसल्यावर याच्या राज्यांत प्रथम दुष्काळ, रोगराई व धरणीकंप यांनीं बराच त्रास झाला. यानें सलाद्दिनच्या वेळचें साम्राज्य आपल्या ताब्यांत आणून येमेन प्रांतहि आपल्या राज्यास जोडला. आपल्या मुलांनां वेगवेगळ्या प्रांताचे सुभेदार म्हणून पाठविलें. ईजिप्त वर त्याचा वडील मुलगा महंमद अथवा मलिक अल कामिल हा सुभेदार होता. हा १२१८ त मरण पावला. त्यावेळीं फ्रँक लोक डॅमिएटाला वेढा देत होते. मध्यें अल कामिलला काढून अलफैज याला सुभेदार करण्याचा कांहीं अमीरानीं घाट घातला, परंतु अलमुअझ्झम इसा यानें भावास मदत केल्यानें फैजाला मोसळला पळून जावें लागलें. १२१९ त फ्रँक लोकांनीं डॅमिएटा घेतलें. अलकामिलनें जिहाद पुकारली. यामुळें ईजिप्त, सिरिया व मेसापोटेमिया येथील सैन्यें त्याला येऊन मिळालीं. कामिलनें फ्रँक लोकांची आघाडीपिछाडी कापली. अखेरीस १२२१ तील तहान्वयें फ्रँक लोकांनीं ईजिप्त सोडला.  कांहीं काळपर्यंत अल-आदिलच्या साम्राज्यांत फाटाफूट होती. परंतु अल्कामिलनें एकत्र सर्व करण्याची हांव धरली. यामुळें सहावें धर्मयुद्ध झालें. मुअझ्झम इसा याच्या मुलाविरुद्ध मदत दिल्यामुळे सिरिया व पॅलेस्टाईन मधील कांहीं शहरें दुसर्‍या फ्रेडरिकला द्यावी लागलीं.  कामिल मरण्यापूर्वी मक्का येथें प्रार्थनेंत त्याचा मक्का, येमेन, झबीद, वरचा व खालचा ईजिप्त, मेसापोटेमिया आणि सिरिया यांचा राजा म्हणून उल्लेख करित. हा १२३८ मध्यें मेला त त्याचा मुलगा अबूबकर हा अलिफ-अल-आदिल सैफअलदिन या नांवानें गादीवर बसला. याचा वडील भाऊ मलिकअल सालिह नझ्म अलदिन अयुब यानें दमास्कस घेऊन ईजिप्तवर स्वारी केली. परंतु हामाथचा राजा इस्मायल यानें दमास्कस घेतलें.  यामुळें नझ्म अलदिनच्या सैन्यानें त्याला सोडलें.  पुढें केराकच्या राजानें त्याला कांहीं दिवस कैदेंत ठेऊन नंतर सोडलें. १२४० त नवीन सुलतानास पदच्युत करुन अमिरांनीं नझ्मअलदिन याला गादींवर बसविलें. सुलतान आपल्या भावाच्या कैदेंत १२४८ त मरण पावला. १२४४ मध्यें यरुशलेम फ्रँक लोकांपासून घेतलें. यानें बरेच गुलाम ( मॅमेल्यूक ) विकत घेऊन त्यांच्यासाठीं रोडा बेटावर बराकी बांधल्या. यावरुनच त्यांना बहरी अथवा नाईलचें मॅमेल्यूक म्हणतात. नजमअलीदेनचा बराच काळ सीरियांत अयुबाईत व धर्मयोद्धे यांच्याबरोबर लढण्यांत गेला. होम्सचा वेढा उठवून १२४९ त त्याला ईजिप्तवर स्वारी करणार्‍या नवव्या लुईचा प्रतिकार करण्यास जावें लागलें. लुईनें डॅमिएटा घेतले. मध्यंतरीं सुलतान मरण पावला. परंतु अमीर लाजिन व अकबई यांनीं राणी शजरअल-दुर इच्या मदतीनें सुलतान मेल्याची बातमी राज्याचा वारस तुराणशहा येईपर्यंत गुप्त ठेविली.  फरिस्कुर येथील युद्धांत ( १२५० ) फ्रेंच राजाचा पराभव होऊन तो कैद झाला. या जयांत सुलतानचें कांहींच अंग नव्हतें. परंतु त्याची वर्तणूक अमीर व राणी यांना बरीच बाधक झाल्यामुळें राणीनें त्यावर हल्ला करुन त्यास ठार मारविलें.

बहरी मॅमेल्यूकांची कारकीर्द - आयुबाइतानंतर ओटेमनांची कारकीर्द सुरु होईपर्यंत तुर्क घराण्यांनीं राज्य केलें. परंतु तीं मामेल्यूक या नांवानें प्रसिद्ध आहेत. या घराण्यांतील पुरुष मूळचे गुलाम असून पुढें स्वतंत्र झालेलें होते.  चवथा सुलतान कआऊन ( कलाऊन ) याच्या घराण्यानें ११० वर्षें राज्य केले परंतु कोणीहि बराच काळ टिकणारें घराणें स्थापन केलें नाहीं. सुलतान मेल्यानंतर त्याचा अल्पवयी मुलगा राज्यावर बसे, परंतु लवकरच त्याला पदच्युत करुन त्याऐवजी एखादा बलिष्ठ अमीर गादी बळकावीत असे.

सुलतान तुराण शहाच्या मृत्युनंतर त्याची सावत्र आई राणी शजरअलदूर गादीवर बसली.  परंतु स्त्रीनें राज्य चालविणें मुसुलमानांना आवडलें नाहीं. यामुळे ऐबेक या सरदाराशीं लग्न लावून त्याला तिनें सुलतान पद दिलें. ऐबेकला सिरीयांतील आयुबाईत मलिक अल नासिर याबरोबर युद्ध करावें लागलें. त्यानें मॅमेल्यूकाचें बंड मोडलें. ऐबेकनें दुसर्‍या राणीशीं लग्न करण्याचें ठरविल्यानें शजरअलदुर इनें त्याचा खून करविला परंतु दरबारी लोकांनीं ऐबेकचा तान्हा मुलगा गादीवर बसविला. याला पदच्युत करुन कोटूझनें गादी बळकाविली. या सुमारास ( १२६० ) प्रसिद्ध मांगोलियन हुलकु ( हुलगु ) यानें अलनासीरचें सिरीयांतील राज्य उध्वस्त करुन बगदादच्या खलिफास पळवून दिलें आणि इलखान घराणें स्थापन केलें. कोटूझनें सिरीयांत स्वारी करुन मोगलांच्या सेनापतीचा पराभव केला व ईजिप्तची सत्ता स्थापन केली. लवकरच सरदार विबर्स यानें कोटूझचा खून केला ( १२६० ) व मलिकअल काहिर ( नंतर अलझाहिर ) ही पदवी धारण करुन तख्त बळकाविलें.हा पूर्वीं मलिक-अल-सलिहचा गुलाम होता. हा नवव्या लुईबरोबर झालेल्या युद्धांत व तुराणशहाचा खून करण्याच्या कटांत प्रसिद्धीस आला. यानें झाहिरचा मुलगा अबुलकासिम अहमद याला ३५ वा खलिफ करुन अबासिद खलिफाची स्थापना केली. यानें बिबर्सला सुलतान पदवी दिली. बगदाद घेण्यास पाठविलेल्या सैन्याचा पराभव होऊन खलिफ मारला गेला. यामुळें बगदादच्या गादीवर खलिफाची स्थापना करण्याचा इरादा सोडून खलिफानें कायरो येथें रहावें असें ठरविलें. या त्याच्या कृतीनें ईजिप्तचें महत्त्व बरेंच वाढलें. यानें बरींच युद्धें करुन मरण्यापूर्वीं सिरिया, अरबस्तान, युफ्रेटीस नदीवरील बिरापासून केरकोसियापर्यंतचा प्रदेश यावर अंमल बसविला. यानें चार पद्धतीचे कायदे मान्य करुन त्यांचे न्यायाधीश नेमले.  हा मेल्यावर  (१२७७ ) याचा मुलगा गादीवर बसला. परंतु लवकरच त्याला राज्य सोडावें लागलें व त्याचा सासरा कलाऊन हा गादीवर बसला.  यानें सिरीयांतील बंडाळी मोडली.  सिरीयनांनीं मोंगलास मदतीस बोलाविले. कलाऊनानें दोन्ही सैन्यांचा १२८१ त पराभव करुन सिरीयावर आपला अंमल बसविला. इराणवर राज्य करणार्‍या इल्खान घराण्यांतील तिसरा राजा निकूदर अहमद यानें मुसुलमानी धर्म स्वीकारल्यानें मोंगल व ईजिप्त यांमध्यें सख्य राहिले. कलाऊन यानें ईजिप्तचा व्यापार वाढविण्याकडे लक्ष दिलें. ईजिप्त व सीरियांतून हिंदुस्थानांत सुरक्षित माल जाण्यास यानें परवाने दिले. त्याचप्रमाणें फ्रँक लोकांपासून राहिलेलीं शहरें घेण्याचा यानें सपाटा चालविला. एकरवर हल्ला चढविण्याच्या खटपटींत असतां हा मरण पावला. ( १२९० ) याच्या अंमलात प्रथम बुर्जाइन मामेल्युकांचें नांव ऐकूं येतें. कायरोच्या बुरुजाच्या रक्षणार्थ ३७०० मामेल्युक होते. यानें सरकारी नौकर्‍या मुसुलमानांखेरीज इतरांस न देण्याचें ठरविलें. याच्या मागून याचा मुलगा खालिल ( मलिक-अल-अफ) हा गादीवर बसविला. यानें एकर व इतर शहरें घेऊन धर्मयोध्यांस सीरियांतून हांकून लाविलें. याचा बैदारा यानें खून केला. परंतु बैदाराचा देखील खून होऊन कलाऊनचा लहान मुलगा महंमद मलिक अलनसिर याला गादी मिळाली. हा तीन वेळ गादीवर बसला व दोनदां पदच्युत झाला. हा ९ वर्षांचा असतांना प्रथम १२९३ त गादीवर बसला. राज्यकारभार एका मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानें चाले. कितबोगा नांवाच्या मोंगल सरदारानें सर्व सत्ता बळकाविली. यामुळें याला राज्य सोडणें भाग पडलें. १२९६ त कितबोगा पदच्युत होऊन सुलतान बिबर्सचा जांवई हुसाम-अल-दिन हा गादीवर बसला. यानें आर्मिनियांत स्वारी केली व ईजिप्त आणि सीरियांतील जमीनीची मोजणी करुन पुन्हां विभागणी केली. १२९९ मध्यें याचा खून होऊन अल-नासिर याला गादीवर बसविले. सर्व सत्ता सलार व बिबर्स जहांगिर यांच्या हातांत होतीं. ७ वा इलखान राजा घझन महमूद यानें सीरियावर स्वारी केली व दमास्कस घेतलें. ( १२९९ ) परंतु १३०३ त सर्व ठिकाणांहून आपलें सैन्य परत नेलें. १३०३ मध्यें मोगलांनीं पुन्हां स्वारी केली. परंतु त्यांचा मर्जअल सफर येथें १३०३ मध्यें पराभव झाला. आपल्या हाती सत्ता नाहीं असें पाहून अलनासिर यानें केराक येथें जाऊन राज्य सोडल्याचें जाहीर केलें ( १३०९ ). याच्या नंतर बियर्स जहांगीर गादीवर बसला. ईजिप्तच्या गादीवर बसणारा हाच पहिला सिरकॅसियन होय. याला १३१० त गादी सोडावी लागली व अलनासिर पुन्हां गादीवर बसला. यानें प्रथम बिबर्स व सलार यांचा शिरच्छेद केला. १३२२ मध्यें सुलतान व इल्खान घराण्यांतील नववा राजा अबुसैद यांच्यांत तह झाला. कांहीं काळपर्यंत याचा अंमल उत्तर आफ्रिका, अरबी इराक, व आशियामायनरवर होता. मेदिनावर सुद्धां यानें आपला अंमल चालू केला. इतर सुलतानांपेक्षां यानें बरेंच राजकारणी पत्रव्यवहार केलें. यांत बल्गेरिया, हिंदुस्थान, अबिसिनिया, अरेगॉन व फ्रान्स येथील राजें पोप हे होते. मेढ्या पाळणें व शेतकी याकडे यानें बरेंच लक्ष दिलें. १३१५ सालीं यानें ईजिप्तची पहाणी केली. यानें जबर कर कमी केले आणि ख्रिस्त्यांविषयीं बरीच सहनुभूति दाखविली. प्रसिद्ध इतिहासकार व भूशास्त्रज्ञ इस्माईल अबुल फेंदा हा अलनासिरच्या वेळीं होता. हा १३४१ त मरण पावला. याच्या नंतर बाल राजे गादीवर बसवावयाचे व नंतर त्यांनां काढून दुसरे बसवावयाचे व एखाद्या बलिष्ठ सरदारानें सर्व सत्ता हाती घ्यावयाची, पुढें त्या सरदाराचा पाडाव करुन पुन्हां दुसर्‍यानें बलिष्ठ व्हावयाचें ही स्थिति चालू होती. अलनासिरचा हसन नांवाचा मुलगा गादीवर असतांनां ( १३४८-४९ ) ईजिप्तमध्यें ‘काळ्या मृत्यू’ ची सांथ येऊन ९ लाख लोक मेले. १३७७ मध्यें शबानचा खून होऊन अली या आठ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. सर्व सत्ता कर्ताई व आयबेक यांच्या हातीं होती. आयबेकनें मामेलुकांच्या कडील सर्व सत्ता आपल्या हातात घेतली. पुढें सिरियांत बंड झालें. यामुळें आयबेकला उतरती कळा लागून बरेके व बरकुक यांच्या हातीं सर्व सत्ता आली. हळूहळू बरकुक मुख्य बनला. अली मेल्यावर त्याचा लहान भाऊ हाजी याला गादीवर बसविलें ( १३८१ ). परंतु त्याला पदच्युत करुन बरकुकनें सुलतानपद घेतलें. अशा रीतीनें बाहरी घराण्याचा र्‍हास झाला.  कांहीं काळपर्यंत हाजीला पुन्हां सुलतानपद मिळून बरकुकला पळून जावें लागलें. बरकुकनें १३९० मध्यें विजय संपादून हाजीला कैद केलें व कायरो येथें आपल्या नांवाची द्वाही फिरविली.

बुर्जी मामेलुकांची कारकीर्द:- बरकुकनें ओटोमन सुलतान पहिला बायेझीद याच्याशीं राजकारस्थान सुरु केलें. याने तैमूरकडून आलेला वकील ठार मारला व सीरियांत स्वारी केली. हा १३९९ त मरण पावला. याचा तेरा वर्षांचा मुलगा फरज गादीवर बसला. यावेळीं ओटोमन सुलताननें ईजिप्तच्या मांडलिकावर स्वारी केली. याच सुमारस तैमूरनें प्रथम सीरियावर स्वारी करुन पुष्कळशीं शहरें व दमास्कस घेतलें. १४०२ मध्यें तैमूरनें आोटोमन सुलतानचा पराभव करुन ईजिप्तच्या राजाला शरण येण्यास सांगितलें. फरज हा त्याला शरण गेला पण तैमूर १४०५ मध्यें वारल्यामुळें सीरियावर पुन्हां ईजिप्तचा अंमल बसला. फरजच्या अमिरांनीं बंड करुन त्याला पदच्युत केलें व त्याच्या भावाला गादीवर बसविलें.  दोन महिन्यानंतर पुन्हां फरजलाच गादीवर बसविलें.  नेवरुझ व शेख महमुदी या दोन अमिरांनीं सीरियांत बराच पुंडावा चालविला. अखेरीस १४१२ त दमास्कसच्या वेढ्यात फरज सांपडून त्यानें तख्त सोडलें. मोस्तासिन हा अबासिद खलिफा गादीवर बसविला. परंतु लवकरच त्याला पदच्युत करुन शेख महमुदीनें तख्त बळकाविलें. नुवरुझनें सीरिया प्रांत घेतला पण त्याचा पराभव होऊन तो मारला गेला. शेखनें आशियामायनर मधील तुर्कोमन राजांनां मांडलिक बनविलें. शेख १४२१ त मरण पावला. यानंतर कोणीतरी बालराजा गादींवर बसवून अमीरांनीं तख्त बळकवावें अशी स्थिति कांहीं काळ होती. १४२२ मध्यें बर्सबई अमीर हा राजा बनला. यानें अलेक्झांड्रियावर हल्ला करणार्‍या सायप्रियन जहाजांचा सूड घेतला. सायप्रसच्या राजाला कैद करुन खंडणी घेऊन त्याला सोडलें. यानें व्यापारी व यात्रेकरु यांच्या जवळून पुष्कळसे पैसे उकळले. नाण्याच्या बाबतींत सुद्धां यानें घोटाळे करुन पैसे काढले. आशियामायनरमधील समरांगणावर याचा बराच काळ गेला. याच्या अल्पवयी मुलाला पदच्युत करुन जकमाकनें ( १४४२-४४ ) तख्त बळकाविलें. यानें र्‍होडस घेण्यासाठीं तीन आरमारें पाठविलीं. याच्या मुलाला पदच्युत करुन इनलअलअलाई हा मलिकअल अश्रफ हा किताब घेऊन सिंहासनारुढ झाला ( १४५३ ). याची व कास्टान्टिनोपल सर करणारा आटोमन सुलतान दुसरा महंमद याची मैत्री होती. याच्या अंमलात मामेल्युकाची सत्ता वाढून त्यांच्या तंत्रानें राज्यकारभार चालत असे. नेहमींप्रमाणें याच्या मुलाला पदच्युत करुन अमीर खोषकदम यानें तख्त बळकाविलें ( १४६१ ). याच्या कारकीर्दींत १४६३ पासून करमनच्या गादीच्या वारसाबद्दल ईजिप्तचा सुलतान व आटोमन सुलतान यांत लढा पडला. व त्याचे पर्यवसान म्हणजे पुढें ईजिप्तवर तुर्कांचा अंमल बसला.  याच्या मृत्यूनंतर मामेल्युकांनी दोन सुलतान एका मागून एक गादीवर बसविले. पण त्यांच्या नंतर अताबेग कैतबे अथवा कैतबई हा सुलतान झाला ( १४६८ ). यानें आटोमन सुलतान दुसरा बायेझिद याचा भाऊ जेम याला आपल्या दरबारीं ठेविलें म्हणून, व हिंदुस्थानांतून बायेझिदकडे जाणारी वकीलमंडळी अडकविली म्हणून बायेझिदनें ईजिप्तवर स्वारी केली. ईजिप्शियन सैन्यानें आटोमन सैन्याचा बर्‍याच ठिकाणीं पराभव करुन तहाचें बोलणें लाविलें व तहान्वयें आटोमन सैन्यानें ईजिप्त मोकळा केला. याच्या मुलाचा खून करुन अताबेग कानसूह यानें अधिकारसूत्रें हातीं घेतली ( १४९८ ). लवकरच याला पदच्युत करुन तुमानबेनें जानबेयाला गादीवर बसविलें ( १५०० ). परंतु लवकरच तो स्वत: सिंहासनावर बसला ( १५०१ ). याच्या कारकीर्दीत ईजिप्शियन व पोर्तुगीज यांच्या दर्यांवर बर्‍याच चकमकी झाल्या. कारण या वेळीं पोर्तुगीज दर्यावर्दी मक्केचे यात्रेकरु यांना त्रास देत आणि हिंदुस्थान व ईजिप्त मधील व्यापारास अडथळा आणीत. कानसूहनें सफाविद इस्मायलच्या वकीलास सीरियांतून व्हेनिस येथे जाऊ दिलें. या सबबीवर ओटोमन सुलतान पहिला सेलिम यानें १५१५ त युद्ध जाहीर केलें. मेर्जेदकीदच्या युद्धांत कानसूहचा पराभव होऊन तो मारला गेला. यामुळें सीरिया आटोमनांच्या ताब्यांत गेला. सुलतान मेला असें पाहून कायरोचा गव्हर्नर तुमानेब हा सुलतान बनला. १५१७ त कायरो आोटोमनांनीं घेतलें व सेलिम हा ईजिप्तचा सुलतान म्हणून द्वाही फिरविली. तुमानबे हा लवकरच सांपडला व त्याला ठार मारण्यांत आले.

तुर्कांची कारकीर्द:- सुलतान सेलिम यानें राज्यकारभारांत फारशी ढवळाढवळ केली नाहीं.  त्यानें आपला प्रतिनिधि राज्यकारभारावर देखरेख पहाण्यासाठीं नेमला. संजाकावर ( जिल्ह्यावर ) बहुधा मामेलुक अमीर असत. सुलतान सुलेमाननें मोठा दिवाण व लहान दिवाण अशी दोन सभागृहें पाशाला कारभारांत मदत करण्यासाठीं उत्पन्न केलीं. ईजिप्तचे गव्हर्नर वारंवार बदलत असत. १५२७ त सर्व जमिनीची मोजणी व पहाणी झाली.

राज्यकारभारांत वारंवार ढवळाढवळ होत असल्यामुळें सैन्यांत शिस्त राहिली नाहीं. ११ व्या शतकापासून इस्लामी सैन्यांत नेहमीं बंडे होऊं लागलीं. १६०४ मध्यें गव्हर्नर इब्राहिमपाशा याचा सैन्यानें खून केला. बंडाचें मुख्य कारण म्हणजे सैन्यांतील लोकप्रजेपासून ‘तुलबा’ नांवाचा कर घेत. त्यामुळें बराच जुलूम होईं. हा कर बंद करण्याचा प्रयत्‍न पाशानें केला. १६०९ मध्यें सैन्य व पाशा यांच्यामध्यें युद्ध सुरु झालें. महंमद पाशानें सैनयाचा पराभव केला.  पुढें साम्राज्याच्या राजधानींत धुमाकूळ माजल्यामुळें ईजिप्तच्या गव्हर्नराबद्दल ईजिप्शियन लोकांस विशेष आदर वाटत नसे. १६२३ त तुर्क सरकारनें मुस्ताफा पाशास काढून अलिपाशास नेमिलें; परंतु इजिप्शियन लोकांनीं अलिपाशास हांकून देऊन मुस्ताफा पाशाची नेमणूक करुन घेतली. १६३१ मध्यें सैन्यानें मुस्ताफा पाशा याला पदच्युत केलें. व याला तुर्क सरकारनें पुढे संमति दिली. सुलतान हा कधींच गव्हर्नरचा पक्ष घेत नसे आणि नवीन गव्हर्नर हा नेहमीं जुन्यापासून खजिन्याचा पैसा म्हणून जबरदस्त दंड घेत असे. या शतकांत दुष्काळ व रोग यांनीं बराच कहर माजविला.

अठराव्या शतकापासून पाशाचा अंमल कमी होऊन त्या ऐवजीं `बे’ चा अंमल वाढला. शेख अलबलद व अमीर अल-हाज या दोन जागा महत्त्वाच्या असून त्या जागेवर असणार्‍या मनुष्याच्या हातांत सर्व सत्ता असे. १७०७ मध्यें शेख अलबदल कासिम इयवाझ हा कासिमी व फिककारी या दोन्ही विरुद्ध पक्षांचा मुख्य होता. या पक्षांत भांडण लागून कासिम मारला गेला. त्याच्या नंतर त्याचा मुलगा इस्मायल याला वस्त्रें मिळालीं. १७२४ तं याचा खून होऊन शिरकासबे यानें गादी मिळविली. नंतर याला हांकून देऊन धुलफिकारनें गादी बळकाविली. १७३० मध्यें याचा खून झाला व आटोमनबे यानें मोठ्या शहाणपणानें १७४३ पर्यंत कारभार चालविला. इब्राहिम व रिद्वान बे यांनीं हाथमला हांकून दिलें. यानंतर पाशानें यांच्याविरुद्ध कट केला व तो फसला. पुढें इब्राहिमचा खून पडला व रिद्वान मारला गेला. याच्यानंतर अल्ली हा मुख्य बनला. यानें मामेल्युकांनां चांगलेंच वठणीवर आणलें. यामुळें याला पळून जावें लागलें. यानें खलीलबेचा पराभव केला ( १७५० ). व शेख अलबलद झाला.  यानें इब्राहिमच्या मारेकर्‍यांना फांशी दिल्यामुळें याला पुन्हां पळून जावें लागलें. पण त्यानें एकरचा गव्हर्नर झाहिरबिन उमरयाच्या मदतीनें तुर्क सरकाराकडून शेख अलबलदची जागा पुन्हां मिळविली. यानें आपल्या मित्रांनां `बे’ च्या रांकेस चढविलें व ईजिप्तमध्यें शांतता स्थापन केली. १७६९ मध्यें तुर्क सरकारनें रशियन युद्धासाठीं अल्लीपासून बारा हजार सैन्याची मागणी केली. आणि या सैन्यामुळें त्यानें स्वतंत्र होऊं नये म्हणून त्याला फांशी देण्याचा गुप्त हुकूम पाशास सोडला. ही बातमी कळून अल्लीनें एकरच्या झाहीरपाशाच्या मदतीनें स्वातंत्र्य पुकारलें.  अल्लीनें आपला अंमल सर्व ठिकाणीं बसवून सहा महिन्यांत अरबस्तानचा बहुतेक भाग आपल्या ताब्यांत घेतला व आपल्या नांवाचीं नाणीं पाडलीं. अल्लीनें १७७१ मध्यें आपला जांवई अबुलधहाब याला सैन्यानिशीं पॅलेस्टाईन व सीरिया जिंकण्यास पाठविलें. त्यानें मुख्य शहरें घेऊन दमास्कस घेतलें. याच सुमारास तुर्क सरकारशीं गुप्त बोलणें होऊन अबुलनें ईजिप्तवर स्वारी केली व कायरोंत प्रवेश केला. अल्ली पळून गेला. त्यानें रशियन लोकांच्या मदतीनें पुन्हां स्वारी केली. प्रथम त्याला यश मिळालें. परंतु नंतर पराभव होऊन तो शत्रूच्या हातीं सापडला. तो सार दिवसांनीं मरण पावला. यानंतर तुर्कांची सत्ता पुन्हां स्थापन झाली. अबुल-धहाबला पाशा पदवी आणि शेख-अल-बलद पद मिळालें. यानें सीरियावर स्वारी केली. पॅलेस्टाईनमध्यें असतांनाच हा मरण पावला. याच्या मागून इस्माईलबे हा शेख अल-बलद- झाला. परंतु याला हांकून देऊन इब्राहिम व मुराद या दोघांनीं राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. १७८६ मध्यें तुर्कांनीं पुन्हां ईजिप्त जिंकलें व इस्माईल हा शेख अलबलद झाला. १७९१ च्या भयंकर प्लेगांत इस्माईल व त्याचें कुटुंब यांचा समूळ नाश झाला. यामुळें इब्राहिम व मुराद यांना पुन्हां बोलाविलें. याच सुमारास फ्रेंचानीं स्वारी केली.

फ्रेचांच्या स्वारीपासून महंमद अल्लीच्या उदयापर्यंत:- ईजिप्तवर स्वारी करण्याचा फ्रेंचाचा मुख्य हेतु, तुर्कसत्ता स्थापन करुन, मामेल्युकांचें महत्व कमी करण्याचा होता. बोनापार्टनें याच अर्थाचा जाहीरनामा असबी भाषेंत प्रसिद्ध केला. अंबबाहच्या युद्धांत मुरादबे व इब्राहिमबे यांचा पराभव केल्यावर फ्रेंच व ईजिप्शियन यांचे संबंध चांगले राहिले; परंतु फ्रेंच आरमाराचा नाईलच्या युद्धांत झालेला पराजय व वरच्या ईजिप्तवर पाठविलेल्या फ्रेंच सैन्यास मिळालेलें अपयश यामुळें लोकांचा फ्रेंचावरील विश्वास कमी झाला. १७९८ त कायरो येथे बंड झालें; परंतु बोनापार्टनें ते बंड सेनापति क्लेबरच्या मदतीनें मोडलें.  यानंतर तुर्कांप्रमाणें दोन दिवाण उत्पन्न करुन नवीन जाहीरनामे लाविले.

तुर्क सरकारनें ३ जानेवारी १७९९ त ईजिप्त तरवारीच्या जोरावर घेण्याचें जाहीर केल्यामुळें बोनापार्टनें सीरियावर स्वारी केली. या स्वारीवरुन तो जूनमध्यें परत आला. त्यानें मुरादबे व इब्राहिमबे यांचा पराभव करुन अबु कीर येथें ब्रिटिशांच्या सहाय्यानें  उतरणार्‍या तुर्की सैन्याचा पराभव केला. त्यानें क्लेबर याला सर्व अधिकार दिले व तो फ्रान्समध्यें गेला.  या वेळेस तुर्कांनीं ईजिप्त घेण्यास दोन सैन्यें पाठविलीं. यांपैकीं पहिल्याचा पराभव करुन क्लेबरनें तुर्कांशीं बोलणें लाविलें व फ्रेंच सैन्यानें ईजिप्त सोडण्याचें कबूल केलें. मध्यंतरीं ब्रिटिश सरकारनें फ्रेंच सैन्याला युद्धांतील कैदी म्हणून वागविण्यांत येईल, असा आग्रह धरल्यावरुन क्लेबरनें सर्वत्र आपला अम्मल बसविला व संरक्षणाची तयारी केली. त्यानें बुलाक व कायरो तोफा लावून घेतलें. मुरादबेनें क्लेबरशी बोलणें लावून वरच्या ईजिप्तचा कारभार आपल्या ताब्यांत घेतला. तो लवकरच मेला व त्याच्या नंतर ओस्मानबे अलबर्डिसी हा कारभार पाहूं लागला. १४ जून १८०० मध्यें क्लेबरचा एका धर्मवेड्यानें खून केला. त्यामुळें सेनापति मेनन हा त्याच्या जागीं आला. त्यानें आपण मुसुलमानी धर्माचे आहों, असें जाहीर केलें. कॉप्ट लोकांनां काढून मुख्य जागा मुसुलमानांनां देल्या; परंतु ईजिप्त फ्रेंच्यांच्या संरक्षणाखालीं असल्याचें जाहीर केलें. १८०१ मार्चमध्यें इंग्लिश सैन्य अ‍ॅबरक्रांबीच्या आधिपत्याखालीं अबु कीर येथें दाखल झालें. ब्रिटिश व तुर्की सैन्यानें कायरो व अलेक्झांड्रिया यांनां वेढा दिला. त्यामुळें सेनापति बेलिआर्ड व मेनन यांनीं ईजिप्त सोडण्याचें कबूल केलें. अशा रीतीनें फ्रेंच स्वारीचा शेवट झाला. या स्वारीबरोबर आलेल्या फ्रेंच विद्वानांनीं लिहिलेला `ईजिप्तचें वर्णन’ हा ग्रंथ मात्र बराच महत्त्वाचा आहे. सुव्यवस्थित राज्यपद्धतीचे फायदे व त्याचप्रमाणें यूरोपांतील विद्या व शास्त्र यांची प्रगति याचा मात्र परिणाम ईजिप्शियन लोकांवर झाला.

फ्रेंच गेल्यावर तुर्कांनीं मामेल्युकांच्या विरुद्ध शस्त्र धरल्यामुळें देशात बंडाली माजली. तुर्की अ‍ॅडमिरलनें मुख्य बेंनां मेजवानीस बोलावून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व कांहीना कैद केलें; परंतु ब्रिटिशांनीं धाक दाखवून त्यांची सुटका केली. त्याचप्रमाणें कायरो येथील बेंची सुद्धां सुटका झाली. महमद खोसरेव्ह हा पहिला गव्हर्नर झाला. यानें मामेल्युकांविरुद्ध सैन्य पाठविलें; परंतु त्या सैन्याचा अल-अल्फी अथवा अल-बर्डिसी यानें पराभव केला. इ. स. १८०३ मध्यें ब्रिटिशांनीं अलेक्झांड्रिया सोडलें व त्यांच्याबरोबर महमदबे अलअल्फी विलायतेस गेला. पगार थकल्यामुळें अल्बानियन पलटणीनें बिथरुन पाशाच्या राजवाड्यास वेढा दिला; परंतु महमद खोसरेव्ह पळून गेला. या वेळेपासून अल्बानियन व तुर्क यांत वैमनस्य येऊन अखेरीस अल्बानियन मेहमेतअल्ली याचा उदय झाला.

ताहीरपाशानें सर्व सूत्रें आपल्या ताब्यांत घेतलीं. परंतु लवकरच तुर्क सैनिकांनीं त्याचा खून केला. या वेळेपासून तुर्क व अल्बानियन यांत लढा माजून देशावर या दोघांचें राज्य सुरु झालें. अल्बानियनांचा मुख्य मेहमेत अल्ली यानें मामेल्युकांस आपल्या बाजूस वळवून डॅमिएटा येथें खोसरेव्हपाशाचा पराभव करुन त्यास कैद केलें.

कांहीं दिवासानंतर अलीपाशा जझैरली हा `पाशा’ पदाचा अधिकारनामा व फर्मान बरोबर घेऊन अलेक्झांड्रिया येथें उतरला. या वेळेला मामेल्युकांची सत्ता वरचा व खालचा ईजिप्त आणि राजधानी यांवर होती. अलीपाशानें अल्बानियन लोकांस फोडण्याचा प्रयत्‍न केला व मामेल्युकांस पेन्शन कबूल केलें. त्यानें कायरोवर चाल केली. अखेरीस तो मामेल्युकांच्या हातीं सांपडला, व एका चकमकींत मारला गेला. यानंतर कांहीं काळपर्यंत शांतता होती.

इ. स. १८०४ मध्यें महंमद बे अलअलफी इंग्लंडहून परत आला. याचें व अलबर्डिसीचें वैमनस्य असल्यामुळें मामेल्युकांत दोन तट पडले. बर्डिसीनें मेहमेतअलीच्या मदतीनें अलअल्फीच्या पक्षाची दाणादाण उडवून दिली. या मदतीबद्दल कायरोच्या लोकांवर कर लादण्यास परवानगी दिली. परंतु लोकांत बंड होण्याचा संभव दिसल्यावरुन मेहमेतअलीनें लोकांची मर्जी संपादन केली आणि इब्राहिमबे व अलबर्डिसी यांना पळण्यास लाविलें.  त्यानें महंमद खोसरेव्ह याला पुन्हां पाशा नेमलें. दीड दिवसानंतर याला पुन्हां पदच्युत केलें. या वेळीं कायरोंत भयंकर अव्यवस्था माजून राहिली होती.

यानंतर अल्बानियन लोकांनीं अहंमद पाशा खोरशिद याला ईजिप्तचा कारभार हातीं घेण्यास बोलाविलें. या वेळेला अलबर्डिसीचें सैन्य राजधानीच्या दक्षिणेस धुमाकूळ करीत होतें.  अलअल्फी व ओस्मानबे हसन यांनीं प्रथम पाशाचें स्वामित्व पत्करुन नंतर युद्ध जाहीर केलें.मामेल्युकांना प्रथम यश येत गेलें.  परंतु शुब्राच्या युद्धांत त्यांचा पराजय झाला.  यामुळें मामेल्युकांत एकी उत्पन्न झाली. मामेल्युकवरच्या ईजिप्तमध्ये गेले. तेथें त्यांच्यावर पाशानें तीन सैन्यें पाठविलीं. यापैकीं एकावर मेहमेतअलीची नेमणूक होती. बर्‍याच लढाया झाल्या, परंतु अखेरीस कांहीच निष्पन्न झालें नाहीं.

खोरशिदनें अल्बानियन लोकांवर दाब बसविण्यासाठीं सीरियांतून डेलिस अथवा कुंर्द सैन्य बोलाविलें. या लोकांनीं भयंकर अत्याचार केले.  हें सैन्य आल्याबरोबर मेहमेतअली परत आला. कायरोंत बंडाची कल्पना पक्व दशेस येत होती. लोक पाशाच्या जुलमास कंटाळले होते. अखेरीस लोकांनीं कंटाळून मेहमेतअलीस पाशा होण्याची व खोरशिदच्या जाचातून सोडविण्याची विनंति केली. खोरशिदनें हें ऐकून युद्धाची तयारी केली. मेहमेतअलीनें कायरो येथील लोकांच्या मदतीनें युद्ध सुरु केलें.  खोरशिद हा बालेकिल्ला बळकावून बसला. याच सुमारास मेहमेतअलीला पाशा नेमल्याचा व खोरशिद याला अलेक्झांड्रिया येथें जाण्याचा हूकूम घेऊन एक जासूद आला. खोरशिदनें हूकूम पाळण्याचें नाकारलें. मामेल्युक बे यांनीं खोरशिदच्या मदतीस म्हणून कायरोवर चाल केली. मेहमेतअलीनें त्यांनां पिटाळून लावलें.  इतक्यांत तुर्की अ‍ॅडमिरल कांहीं जहाजानिशीं अबु कीरच्या उपसागरांत आला.  त्यानें खोरशिदास बालेकिल्ला सोडण्यास लावून मेहमेतअलीला गव्हर्नरचा अधिकार दिला.

मेहमेतअलीचा अधिकार कायरोच्या बाहेर नव्हता. बेनां खोरशिदचा सिलेदार व कांहीं अल्बानियन मिळाले. तेव्हां मामेल्युकबेंनां फसवून कायरोंत प्रवेश करण्यास लाविलें. तेथें त्यांची कत्तल करण्यांत आली. जे जिवंत राहिले त्यांनां पकडून हालहाल करुन ठार मारण्यात आलें. सुमारें ८३ शिरें कान्स्टाँटिनोपल येथें धाडण्यांत आलीं. अशा रीतीनें मामेल्युकांची पहिली कत्तल झाली. बहुतेक मामेल्युकबे वरच्या ईजिप्तमध्यें गेले.

इंग्लिशांच्या सांगण्यावरुन आणि अलअल्फीच्या लुचपतीमुळें तुर्क सरकारनें चोवीस बेंची नेमणूक करुन त्यावर अलअल्फीस नेमण्याचें कबूल केलें. याला मेहमेतेअल्ली व इतर मामेल्युक यांनीं बराच विरोध केला. कारण अलबर्डिसीचा वैराग्नि अद्यापि शमन झाला नव्हता. व त्याचें वजन देखील बरेंच होतें. १८०६ मध्यें तुर्की अ‍ॅडमिरल सलिहपाशा हा अलेक्झांड्रिया येथें आला, परंतु मेहमेतअल्लीनें तुर्की सरकारला नजराणा पाठवून आणि इतर कारस्थानानें आपली नेमणूक कायम केली. व मामेल्युकांनां अधिकार देण्याचा बेत मागे टाकिला. लवकरच अलबर्डिसी व अलअल्फी मरण पावले. यामुळें पाशाचा मार्ग अगदीं निष्कंटक झाला. पाशानें शाहीनबेचा पराभव करुन त्याचा तोफखाना व सामान लुटलें.

इ. स. १८०७ मध्यें पांच हजार ब्रिटिश सैन्य अलेक्झांड्रिया येथें आलें. तेथें त्यांनां अल्फीच्या मृत्यूचें वर्तमान कळल्यामुळें त्यांनीं त्याच्या पक्षांतील व इतर लोकांस बोलाविलें. त्यांनीं डॅमिएटा घेण्याचें ठरवून त्यावर चाल केली. व शहर त्यांच्या हातीं आलें.  मध्यंतरीं मेहमेतअली वरच्या ईजिप्तमध्यें लढत असून त्यानें अयूस्त येथें बेंचा पराभव केला. ब्रिटिश सैन्य आल्याचें ऐकून त्यानें बेंच्या मागण्या कबूल करुन त्यांनां आपल्या बाजूस वळविलें आणि कायरोवर चल केली. `रोझेटा’ शहर घेण्यासाठीं पुन्हां ब्रिटिशांनीं त्याला वेढा दिला, परंतु आंतील लोकांस कुमक मिळाल्यानें वेढा उठवावा लागला. त्यांत ब्रिटिशांची बरीच हानि झाली. ब्रिटिशांस व पाशास मदत देणार्‍यांमध्यें दोन पक्ष झाल्यामुळें ब्रिटिश सैन्य निघून गेलें. १८११ पर्यंत बेंनीं कांहीं मागण्या सोडल्या व पाशानें त्यांच्या कांहीं मागण्या कबूल केल्या. शाहीनला फेयुम प्रांत आणि गिझांब व बेनी सुएफ प्रांताचा कांहीं भाग दिला. इतरांना सैद प्रांताचा भाग दिला. इतकें करुंनहि शांतता झाली नव्हती. इ. स. १८११ त अरबस्तानांतील वाहाबी लोकांवर स्वारी करण्याचें ठरुन सैन्याचें अधिपत्य पाशाचा आवडता मुलगा टुसून याला देण्याचा समारंभ करण्यात आला.  त्यासाठीं सर्व मामेल्युक बेंनां बोलावून ते बाले किल्ल्यांत आले असतां त्यांची कत्तल करण्यांत आली. या कत्तलीमुळें सर्व ईजिप्तभर मामेल्युकांचीं कत्तल होऊन त्यांचीं डोकीं कान्स्टाँटिनोपल येथें पाठविण्यांत आलीं.  बेंचीं घरें शिपायांनीं अगदीं उध्वस्त करुन टाकली. कांहीं मामेल्युक न्यूबियांत पळून गेले. तेथेंहि त्यांचा पिच्छा पुरविल्यामुळें उरलेल्या लोकांनीं नवीन डोंगोला शहर स्थापिलें. १८२० मध्यें पाशानें न्युबिया व सेन्नार जिंकल्यामुळें कांहीं इजिप्त मध्यें परत आले आणि सुमारें १०० लोक सेन्नारच्या जवळच्या देशांत गेले.

मेहमेत अल्लीची कारकीर्द:- अशा रीतीनें मेहमेत अल्लीचा अंमल ईजिप्तवर बसला. नंतर त्यानें स्वत:ची स्वतंत्र सत्ता बसविण्याकडे लक्ष दिलें. त्यानें सुलतानचें सार्वभौमत्व कबूल करुन १८२१ मध्यें ८००० सैन्य वाहाबींच्या विरुद्ध पाठविलें. या सैन्यानें मदिना, जेद्दा आणि मक्का हीं शहरें घेतली. १८१३ त मेहमेत अल्लीनें स्वत: सैन्याचें आधिपत्य घेतलें.  मक्केच्या शरीफला पदच्युत करुन त्यानें वाहाबींचा पुढारी दुसरा सौद मेल्यावर अबदुलाशीं तह केला. निपोलियन एल्बा येथून निसटला हें ऐकून तो ईजिप्तला परत आला. तो अरबस्तानमध्यें असतांना त्याच्या प्रतिनिधीनें खाजगी जमिनी जप्त करुन त्या सर्व राष्ट्राच्या मालकीखालीं आणल्या. अशा रीतीनें मेहमेत अल्ली हा सर्व जमीनीचा मालक बनला. १८१५ सालीं `निझाम जेदीद’ म्हणजे यूरोपियन पद्धति सैन्यांत सुरु केल्यामुळें सैन्यांत असंतोष पसरला. तेव्हां ही पद्धत त्यानें बंद केली. १८१६ त त्यानें आपला मुलगा इब्राहिम पाशा याच्या हाताखालीं सैन्य देऊन पुन्हां अरबस्तानांत पाठविलें. त्यानें वांहाबींची राजधानी घेऊन अबदुल्लाला कैद केलें. व त्याला कान्स्टाटिनोपल येथें पाठविलें.

मध्यंतरीं मेहमेतअल्लीनें व्यापार व उद्योगधंदे याजकडे लक्ष पुरविलें. मुख्य मालाचे कुलहक्क त्यानें स्वत:कडे ठेविले. यामुळें लोकांचें भयंकर नुकसाने झालें. अलेक्झांड्रिया येथील `महमुदीया कालवा ( १८१९-२० ) यानें तयार केला. १८२२ मध्यें यानें डेल्टांत कापसाची लागवड सुरु केली.

तांबड्या समुद्राशीं होणारा व्यापार आणि सेनार मधील सोन्याच्या खाणीं हातीं येण्यासाठीं त्यानें १८२० मध्यें पूर्व सुदान जिंकण्याचें ठरविलें. त्याच्या सैन्यानें न्यूबिया, सेन्नार व कार्डोफन घेऊन १८२२ मध्यें खार्टूमची स्थापना केली. १८२३ मध्यें तर तांबड्या समुद्रावरील स्वाकीन व मसावा या बंदरावर त्याचा ताबा बसला.

इ. स. १८२४ मध्यें अहमद नांवाच्या  गृहस्थानें स्वत: पैगंबर असल्याचें जाहीर करुन बरीच गडबड केलीं. परंतु त्याचा पराभव होऊन तो नाहींसा झाला. फेलाहिन मूळचे शांत स्वभावाचे व गरीब असून, त्यांच्यापासून कर, वगैरे जबरीनें वसूल करीत. यामुळें त्यांची फारच वाईट स्थिति झाली.  इ. स. १८३८ मध्यें तुर्कस्तानशीं ग्रेटब्रिटननें व्यापारी तह केल्यामुळें मेहमेतअल्लीच्या कुलहक्कास धक्का बसला. याच्या अंमलांत सर्वत्र शांतता होती. प्रवाश्यांनां प्रवास करण्यांत धोका राहिला नव्हता. शिक्षण व वैद्यकी यांनां उत्तेजन मिळालें. मेहमेत अल्लीनें यूरोपियन व्यापारास बर्‍याच सवलती दिल्या. यूरोपचा हिंदुस्थानशीं होणारा व्यापार ईजिप्तमार्फत होण्यास मेहमेत अल्लीचे प्रयत्‍न कारण झाले.

तुर्क सुलतान दुसरा महंमद याच्याकडून आपल्या साम्राज्यास त्रास होईल असें जाणून मेहमेत अल्लीनें पाश्चात्य पद्धतीवर सुधारणा सुरु केल्या. त्यानें यूरोपीय पद्धतीवर सैन्य व आरमार तयार केलें. १८२९ मध्यें त्यानें अलेक्झांड्रिया येथें गोदी व शिलेखाना उघडला.  कवायती सैन्यांत त्यानें तुर्क व अल्बानियन यांनां काढून नीग्रो व फेलाहीन यांची भरती केली. ग्रीक लोकांविरुद्ध तुर्क सुलताननें मदत मागितली; या बद्दल मोरिया व सीरिया या प्रांतावर पाशा नेमण्याचें कबूल केलें. इब्रामपाशानें कांहीं जहाजें घेऊन ग्रीकांचा समुद्रावरील ताबा नाहींसा केला व मोरियांत जय मिळविले. परंतु यूरोपियन राष्ट्रें मध्यस्थ झाल्यानें ईजिप्शियन सैन्यास सीरियांतून परत यावें लागले. ग्रीसचें स्वतंत्र राज्य होण्यापूर्वी १८३१ मध्यें पूर्वेकडील प्रश्नाला बराच रंग चढला होता. या वेळीं सुलतानविरुद्ध मेहमेतअल्लीनें बंड केलें. कारण सुलताननें कराराप्रमाणें सीरिया देण्याचें नाकारलें. मेहमेतअल्लीनें एकरचा पाशा अबदुल्ला याला वठणीवर आणण्याचें ढोंग केले. सुमारें दहा वर्षेपर्यंत ह्या प्रश्नावर सर्व राष्ट्राचे सारखे डोळे लागले होते. सुवेझची संयोगीभूमि व युफ्रेटिसचें खोरें यामुळें ब्रिटनला सुद्धां काळजी वाटत होती. इतक्यांत इब्राहिमनें एकर घेऊन रेषिदपाशाचा कोनिया येथें पराभव केला ( १८३२ ). अखेरीस तो रशिया मध्यें पळाला. बरीच भवति न भवति होऊन १८३३ मध्यें कुतयाच्या तहानें सुलताननें मेहमेत अल्लीला सीरिया, दमास्कस, अलेप्पो वगैरेचा पाशा नेमिलें.

सुदनपासून टॉरस पर्वतापर्यंतच्या भागावर मेहमेत अल्लीचा ताबा असून त्याला फार थोडा कर द्यावा लागे. कुतयाच्या तहानंतर एक वर्षांनीं सीरियन, डरुजेज व अरब यांनीं बंड केलें.  मेहमेतअल्लीनें ते बंड स्वत: मोडलें, आणि सीरियन लोकांवर चांगलीच दहशत बसविली.  सुलतान महंमदनेंहि सूड घेण्यास चांगली संधि आहे असें पाहून सैन्य पाठविलें ( १८३९ ).  परंतु त्याचा इब्राहिमनें पुन्हां पराभव केला. यापूर्वीच सुलतान महंमद मरण पावला व सर्व तुर्की साम्राज्य उघडें पडलें. परंतु यूरोपियन राष्ट्रांच्या मदतीमुळें मेहमेतास कांहीं करतां आलें नाहीं. त्यानें फार ओढून धरल्यामुळें उलट त्याला विशेष फायदेशीर अटी मिळाल्या नाहींत.

१८४१ च्या नवीन फर्मानाप्रमाणें मेहमेतअल्लीचा ताबा ईजिप्त, सिनाई द्वीपकल्प, सुदान व तांबड्या समुद्राकडील अरबस्तानचा भाग यांवर मुकर करण्यांत आला. ईजिप्तचें पाशापद मेहमेत अल्लीच्या घराण्यांत वंशपरंरागत करण्यांत येऊन ईजिप्तच्या सरहद्दीचा नकाशा, मेहमेत अल्लीचें मांडलिकत्व व त्यावर निर्बंध वगैरे गोष्टी फर्मानमध्यें होत्या. १८४२ मध्यें गुरांवर साथ आली व नाईल नदीला पूर आला. १८४३ मध्यें टोळधाड आली. यामुळें देशांत लोकांची फारच भयंकर स्थिति झाली. १८४४-४५ मध्यें काही आर्थिक सुधारणा करणें भाग पडल्यामुळे लोकस्थिति चांगली झाली. मेहमेत अल्लीला मुख्य वजिराची पदवी मिळून तो १८४६ त इस्तंबूल येथें गेला. व खोसरेव्ह पाशाशीं पुन्हां त्याचा सलोखा झाला. १८४७ मध्यें त्यानें नाईल नदीची खोली वाढविण्यासाठीं दगडी काम सुरु केलें. या वर्षाच्या अखेरीस वृद्धपणामुळें त्याला कारभार पाहणें अशक्य झाल्यानें १८४८ मध्यें इब्राहिमला तुर्क सरकारनें पाशा नेमिलें. परंतु तो लवकरच मेला. मेहमेत अली १८४९ मध्यें ८० वर्षांचा होऊन मरण पावला. याच्या कारकीर्दीत तुर्की सत्ता कमी झाली; कापसाच्या उद्योगधंद्यास सुरूवात झाली; पाश्चिमात्य शास्त्रांचे फायदे द्दष्टोत्पत्तीस आले आणि सुदान जिंकलें.

मेहमेत अल्लीच्या मृत्यूपासून ब्रिटिश सत्तेपर्यंत:- इब्राहिमच्या मृत्यूनंतर ( १८४८ ) त्याचा पुतण्या व टुसुनचा मुलगा पहिला अब्बास याला खेदीव नेमलें. यानें व्यापारी कुलहक्क मोडिले आणि अलेक्झांड्रियापासून कायरोपर्यंत रेल्वे बांधण्यास सुरुवात केली. १८५४ मध्यें याचा खून झाला. याच्या मागून याचा चुलता सय्यद पाशा गादीवर बसला. हा शरीरानें व मनानें दुर्बल असल्यानें याचे सर्व बेत सिद्धीस गेले नाहींत. सुदानमध्यें गुलाम पकडण्याची चाल बंद करण्याचा याचा प्रयत्‍न व्यर्थ गेला. फेलाहिनच्या कल्याणासाठीं यानें १८५८ चा जमीनीचा कायदा पास केला. १८५६ मध्यें यानें लेसेप याला सुवेझ कालवा खणण्यास परवानगी दिली. परंतु ब्रटिशांच्या विरोधामुळें तुर्क सरकारने याला दोन वर्षे मंजुरी दिली नाहीं. यानें पौरस्त्य विद्युतवाहक कंपनी व ईजिप्त बँक या दोन ब्रिटिश कंपन्यांना सवलती दिल्या होत्या. यानें राष्ट्रीय कर्जास सुरुवात केली. हा १८६३ त मरण पावला व याच्यामागून याचा पुतण्या म्हणजे इब्राहिम पाशाचा मुलगा इस्मायल हा गादीवर बसला.

इस्मायल ( १८६३-७९ ) गादीवर बसल्याबरोबर ईजिप्तमध्यें नवीन कारकीर्द सुरु झाली असें वाटलें. याच्या सुधारणा, दांडगा खर्च वगैरे गोष्टीशिवाय यूरोपियन राष्ट्रांनीं ईजिप्तच्या अंतर्गत राज्यव्यवस्थेंत हात घातल्याबद्दल याची कारकीर्द प्रसिद्ध आहे. १८६६ मध्यें यानें कांहीं खंडणी देऊन तुर्की कायद्याप्रमाणें घराण्यांतील वडील मनुष्यास राज्य न मिळतां वडील मुलास राज्य मिळण्याचा कायदा पास करुन घेतला. १८६७ मध्यें याला वलीच्या ऐवजी खेदीव ही पदवी मिळाली व १८७३ च्या फर्माननें जवळजवळ हा स्वतंत्र राजा बनला. यानें मेहमेत अल्लीच्या राज्यपद्धतींत सुधारणा केली. लष्करी शाळा सुधारुन शिक्षणाला मदत केली. रेल्वे, तारायंत्र, दीपगृहें, सुवेझचें बंदर वगैरे बर्‍याच लोकोपयोगी गोष्टी केल्या. सर्वांत महत्त्वाची गेष्ट म्हणजे १८६९ मध्यें सुवेझ कालवा उघडणें होय. या सर्व गोष्टींना लागणारा पैसा व श्रम जबरदस्तीनें लोकांपासून घेण्यांत आले. त्यामुळें लोकांची दैना जास्तच वाढली.

सुदानमध्यें सत्ता वाढविण्यांत व अबिसीनियाशीं टक्कर देण्यांत बराच पैसा व प्राण खर्ची पडले. १८७५ सालीं फेलांची इतकी वाईट स्थिति झाली कीं, राज्यकारभाराच्या महत्वाच्या बाबींइतके देखील उत्पन्न होईना. कर्जदारांनां नेहमीं फसविल्यामुळें कर्जहि मिळेना. कर बरेच महिने अगोदर वसूल करण्यांत येत. अखेरीस इस्मायलनें आपलें सुवेझ कालव्याचे १,७६,६०२ शेअर ब्रिटिश सरकारांस ३९,७६,५८२ पौंडांस विकले. यामुळें तात्पुरता फायदा झालाच. परंतु ब्रिटिश सरकाराला देशाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देणें भाग पडलें. केव्ह व इतर कमिशनें बसून १८७७ मध्यें `केसे दलाडेटे’ स्थापन होऊन बर्‍याच उत्पन्नावर आंतरराष्ट्रीय ताबा बसला. इंग्लिश व फ्रेंच रोखे असणार्‍यांच्या तर्फें १८७६ मध्यें गोशेन व जुबर्ट यांचें मिशन येऊन उत्पन्नावर व खर्चावर अनुक्रमें इंग्लिश व फ्रेंच यांची देखरेख सुरु झाली. लवकरच रेल्वे व अलेक्झांड्रिया बंदर हीं सुद्धां सर्व राष्ट्रांस खुलीं करण्यांत आलीं. १८७८ मध्यें चौकशीसाठीं नवीन कमिशन नेमलें. यामुळें इस्मायलनें घटनात्मक मंत्रिमंडळ कबूल केलें व त्यावर नुबर पाशा याला अध्यक्ष नेमलें. ७ महिन्यांतच त्यानें मंत्रिमंडळ मोडून आपली जुनी राज्यपद्धति सुरु केली, यामुळें इंग्लंड व फ्रान्स यांनीं चूप न बसता तुर्कस्तानकडून शह पोहोचविला. १८७९ त ता. २६ जून रोजी इस्मायलला तुर्क सुलतानकडून तार आली. त्यांत त्याला काढून ट्यूफीकला खेदीव नेमल्याचा हुकूम होता. लगेच ट्यूफीकच्या नांवाची द्वाहि फिरवण्यांत आली.  

कांहीं दिवसपर्यंत कांहींच सुधारणा झाली नाहीं. तरी स्थिति वाईट असल्यामुळें १८७९ मध्यें मेजर बेअरिंग ( लार्ड क्रोमर ) व डी ब्लिगनीअरेस यांनां नेमून द्विराजपद्धति सुरु केली. यानें कांहीं सुधारणा केल्या. परंतु एका विशिष्ट वर्गाच्या आड राज्यपद्धति येत असे.  हा वर्ग लष्करी होता. या वर्गानें अहंमद अरबी नांवाच्या गृहस्थास पुढें करुन, तुर्की व परकीय लोकांस सवलत देण्याविरुद्ध ओरड चालविली. नंतर ख्रिस्त्यांविरुद्ध त्यांनीं चळवळ सुरु केली. राज्यकर्त्यांस विशेष जोम नसल्यामुळें त्यांनीं त्यांच्या अटी कबूल केल्या. यामुळें बंडखोरांनीं आणखी मागण्या केल्या. बंडखोरांच्या भयंकर अत्याचारामुळें ब्रिटिश व फ्रेंच आरमारानें अलेक्झांड्रियावर तोफा डागल्या. कान्स्टंटीनोपल येथें सर्व राष्ट्रांच्या वकीलांची परिषद भरुन सुलतानला बंडखोरांचें पारिपत्य करण्यास सांगितलें. परंतु त्यानें नाखुषी दाखविली.

ब्रिटिश सत्ता. – वरील प्रकार घडल्यानंतर ब्रिटिश सरकारनें लष्कराचा उपयोग करण्याचें ठरविलें. फ्रान्स व इटली यांनीं भाग घेण्याचें नाकारल्यावरुन ब्रिटिश सैन्यानें टेलइल केबीरच्या लढाईंत ( १८८२ ) बंडखोरांची दाणादाण उडविली. खेदीव अलेक्झांड्रियाहून कायरो येथें आला व शेरिफ पाशानें राज्यकारभारासाठीं प्रधान मंडळ बनविलें. अरबी व त्याच्या अनुयायांस ब्रिटिशांच्या मध्यस्थीमुळें हद्दपार करण्यांत आलें. लॉर्ड डफरीन कान्स्टांटिनोपल येथील वकील यास ईजिप्तचे हायकमीशनर नेमिलें होतें, यानें इजिप्तचा कारभार कसा करावा याविषयीं साधारण दिशा आंखून दिली होती. भविष्यकालीं स्वराज्याचे कांहीं हक्क द्यावे असें त्याचें मत होतें.

वरील तत्त्वें अमलांत आणण्याचें काम सर ईव्हेलीन बेअरिंग यानें केलें. १८८४ त सर एडवर्ड मेलेटच्यानंतर याला कान्सलजनरल व डिप्लोमॅटिक एजंट नेमिलें. कान्सल जनरल व डिप्लोमाटिक एजंटचा अधिकार इकडील पोलिटिकल एजंटाप्रमाणें असे. तो सल्ला अर्ज म्हणून पाठवी पण तो सल्ला अगर अर्ज अमान्य करण्याची मात्र खेदीवाची छाती नसे. या वेळेला मागील दोन प्रसंगाप्रमाणें वाईट वेळ होती. परंतु ब्रिटिश सैन्याच्या मदतींनें त्यानें स्थिरस्थावर करुन शांतता स्थापिली. १८८३ त द्विराजपद्धति बंद करण्यांत आली. व त्या ऐवजीं एक इंग्लिश फडणिसी सल्लागार म्हणून देण्यांत आला. फ्रान्सनें बंडाच्या वेळीं मदत न दिल्यामुळें या वेळीं त्याला कुरकुर करतां आली नाहीं. `कायसे डी ला डेटी’ संस्था राहिली कायमच व तिनें आर्थिक सुधारणांत बराच विरोध केला.

ब्रिटिश सरकारचा इरादा खोदिवाची सत्ता स्थापन करुन त्याचा कारभार सुरळीत ठेऊन नंतर ईजिप्तमधून सैन्य नेण्याचा होता. सुधारणा अंमलांत आणण्याचा देखील विशेष इरादा नव्हता. परंतु लहाना सहान सुधारणा अंमलांत आणल्यामुळें त्यांना बर्‍याच गोष्टी कराव्या लागल्या. प्रथम त्यांनां सुदानकडे लक्ष द्यावें लागलें.  तेथें महंमद अहंमद नांवाच्या एका धर्मवेड्यानें आपण इस्लामचा महादी असल्याचें जाहीर करुन बंड केलें. कर्नल हिक्स ( हिक्स पाशा ) याचा १० हजार सैन्यासह १८८३ त ओबेदच्या जवळ पराभव झाला. खेदीव व मुख्य प्रधान शेरिफपाशा यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष्य करुन सर ईव्हेलीन बेअरिंगनें सुदानच्या बाबतींत कांहीं करावयाचे नाहीं असें ठरविलें. शिरिफनें राजीनामा दिला व नुबरनें मोठ्या मिनतवारीनें त्याची जागा घेण्याचें कबूल केलें. खार्टूम व इतर जागा खेरीज बराच भाग महादीनें घेतला होता. सिन्काट व टोकर येथील वेढा उठविण्यास जनरल बेकर जात असतां त्याचा ईलटेब येथें पराभव झाला ( १८८४ ). याच सुमारास जनरल गॉर्डन खार्टुम येथें जाऊन पोहोचला. सिन्काट व टोकर येथील सैन्याला मदत करण्यासाठीं मेजर जनरल ग्रॅहम याची नेमणूक झाली. याच सुमारास सिन्काट शत्रूच्या हातीं पडलें. लवकरच टोकरचीहि तीच स्थिति झाली. नंतर ब्रिटिश सैन्यानें ईलटेब येथें शत्रूचा पराभव करुन टोकर घेतलें. नंतर टमाई घेण्यांत आलें. अशा रीतीनें बंडखोरांना दोनदां चांगला हात दिखविल्यावर स्वाकीन येथें थोडें सैन्य राहून बाकीचें निघून गेलें.

ब्रिटिश सैन्य गेल्यामुळें सुदान मधील जातींनीं फार उचल खाल्ली. यामुळें गॉर्डनची स्थिति फार विलक्षण झाली. खार्टूमशीं व्यवहार कठिण झाला. गॉर्डन व परराष्ट्रीय खातें याचें जमेना. अखेरीस खार्टुम सोडून सैन्य बर्बरमध्यें नेण्याचा अधिकार गॉर्डनला देण्यांत आला.  परंतु गॉर्डनची स्थिति चमत्कारिक झाल्यामुळें नाईल नदीच्या मार्गानें लॉर्ड वेलस्लीच्या हाताखालीं सैन्य पाठविण्यांत आलें. या सैन्याच्या एका भागानें अबुक्लिआ विहीरी फार निकराची लढाई करुन ताब्यांत घेतल्या. व सैन्य गुबान येथें पोहोचलें. परंतु २६ जानेवारी १८८५ त खार्टुम शत्रूच्या हातीं जाऊन गॉर्डन मारला गेला. यामुळें सैन्यानें परत जाण्याचें ठरविलें. याचा परिणाम म्हणजे खेदीवची सत्ता दिहल्फाच्या उत्तरेस नाइल नदीच्या खोर्‍यापर्यंत राहिली.

इकडे राज्यकराभारांत सुधारणा करण्याचें सर इव्हेलीन बेअरिंग यानें ठरविलें. दोन तीन वर्षेपर्यंत त्याला यश येईल असें वाटेना. कारण देशांत गडबड असून लोकांचा व एतद्देशीय अधिकार्‍यांचा परकीयांवर विश्वास बसेना. त्याचप्रमाणें ब्रिटिश अधकिारी व सत्ता यांचा एतद्देशीय कामगार द्रोह करुं लागले. जमिनदारांना मनास वाटेल तितकें पाटाचें पाणी मिळत नसे यामुळें ते खूष नसत. फेलाहिनांची जरी स्थिति सूधारली होती तरी अरबी व त्याचे अनुयायी यांचा पराभव झाल्यापासून त्यांच्या मनांत वांकडें आले होतें. कारण आतां ख्रिस्ती सावकारांचा तगादा त्यांच्या मागें लागला. याच सुमारास सरकारचें दिवाळें निघण्याची स्थिति होती. पैसा दुर्मिळ झाल होता व बर्‍याच कामगारांचे पगार थकले होते. यामुळें रोखेवाल्यांना मिळणारा करांमधील पैसा घ्यावयाचें ठरविलें. याला सर्व राष्ट्राकडून थप्पड मिळाल्यामुळें तो बेत जागच्या जागींच ठेवावा लागला. यामुळें फायदा न होतां उलट आंतरराष्ट्रीय घोटाळे माजण्याचा संभव दिसूं लागला. याच सुमारास ब्रिटिश सरकारनें १८८५ मार्चचा लंडनचा तह घडवून आणला, यानें मागील अटी सौम्य करुन ९० लक्ष पौंडाचें कर्ज ईजिप्तला देवविलें. इतर खर्च व दंड वजा जातां राहिलेलें १० लाख पौंड कालवे करण्यासाठीं उपयोगांत आणलें यामुळें देशाची स्थिति सुधारली. खर्चांत काटकसर व कारभारांत सुधारणा केल्या. सुदानकडे वाहणारा पैशाचा व माणसांचा पूर बंद झाला.  नवीन सैन्य तयार करण्यांत आलें. कालवे व फडणिसी खातें यांच्याकडे लक्ष देण्यांत आलें.  नुबरपाशा मुख्य प्रधान राहिला. त्यानें प्रांतिक कारभारांत व एतद्देशीय न्याय कोर्टे यांत ढवळाढवळ करण्याबद्दल पुष्कळ विरोध केला. यामुळें युद्ध, सार्वजनिक खातें, व फडणिसी खातें यांतच सुधारणा करण्याचें ठरले. हळूहळू एतद्देशीय लोक व यूरोपियन यांत सलोखा होऊन विश्वास उत्पन्न झाला. `ईजिप्शियनांवर राज्य करावयाचें नसून त्यांना राज्यकारभार शिकण्यास लावावयाचें’ हे तत्व मान्य करण्यांत आलें. इतकें करुन सुद्धां ब्रिटिशांची स्थिति चांगली नवहती. सुलतान ब्रिटिश ढवळाढवळीला विरोध करण्याचा संभव होता. फ्रान्स त्याला सहाय्य करण्यास तयार होतें. १८८५ त कान्स्टांटिनोपल येथें ब्रिटिश वकील पाठवून सैन्याची रचना, सुदानप्रश्न व राज्यकारभारांत सुधारणा यासाठीं एक तुर्क व एक इंग्लिश कमिशनर नेमावा असें ठरले. याप्रमाणें मुख्तारपाशा व सर हेनरी डरुमंड वुल्फ यांची नेमणूक झाली. १८८६ च्या अखेरीस त्यांची चौकशी संपून त्यांनीं आपल्या सरकारांस रिपोर्ट सादर केले. यानंतर तीन वर्षांत ब्रिटिशांनीं आपलें सैन्य काढून घ्यावें; परंतु अंतर्गत व्यवस्था वगैरेसाठी मुदत वाढवावी असें ठरलें. प्रथम या तहावर सुलताननें सही केली; परंतु त्याप्रमाणें वागण्याचें नाकबूल केलें. तुर्क कमिशनर कायरोंत १९०८ पर्यंत होता.

१८८६ ते १८८७ त देशाची चांगली भरभराट झाली. यानंतर सर इव्हेलीन बेअरिंगनें प्रांतिक कारभार व न्याय यांमध्यें सुधारणा करण्याचें ठरविलें. नुबरपाशानें १८८८ त राजिनामा दिला. त्याच्यानंतर रिआज पाशा आला. हा १८९१ पर्यंत होता. या तीन वर्षांत बर्‍याच सुधारणा होऊन देशाची संपत्ति वाढली. ईजिप्शियन सैन्यानें महादीवर बरेच जय मिळविलें.  न्यायखात्यांत सुधारणा झाली. रिआझनंतर मुस्तफा फाशा फेहमी याची नेमणूक केली.  न्यायकोर्टे, तुरुंग, आरोग्य व शिक्षण यांत सुधारणा करण्यात आल्या.

१८९२ त खेदीव ट्युफिक मरण पावला व त्याच्यामागून त्याचा मुलगा अवास हिलमी हा गादीवर बसला. याला परकीय सत्तेचें जूं नको होतें म्हणून यानें मुस्ताफापाशास काढून ( १८९३ ) तेथें फक्रीपाशाची नेमणूक केली. परंतु ब्रिटिश प्रतिनिधीनें राज्यकारभारांत ढवळाढवळ होऊं नये म्हणून फंक्रीपाशास राजिनामा देण्यास लाविलें. त्याच्या जागीं रिआझ नेमला गेला; परंतु खेदीव व लॉर्ड क्रोमर ( सर इव्हेलीन बेअरिंग ) यांच्यात बेबनाव होता. त्यानें राष्ट्रीय व ब्रिटिशांच्या विरुद्ध पक्षास उत्तेजन दिलें. हळू हळू खेदीव व ब्रिटिश यांचे संबंध चांगले झाले. १८९४-९५ त नुबरपाशा अधिकारावर आला व त्याच्यानंतर पुन: मुस्ताफा फेहमीची नेमणूक झाली.

आंग्लो-ईजिप्शियन कारभारामुळें बराच आर्थिक फायदा होऊन १८९६-९८ त महादीपासून सुदान प्रांत परत मिळविला. त्या भागांत फ्रान्स व ग्रेटब्रिटन यांच्या चळवळीचें क्षेत्र ठरविण्यात आलें. ईजिप्त गडबडींत आहे असें पाहून फ्रान्सनें नाईलवरील खोरें घेण्याचें ठरविलें. फ्रेंच कांगोमधून नाईल नदीवरील फॅशोडा घेण्यासाठीं सैन्य पाठविलें; परंतु लॉर्ड किननेरनें चांगलीच दौड मारल्यानें फ्रेचांचा बेत फसून २१ मार्च १८९९ च्या तहानें कांगोफ्रीस्टेटच्या उत्तर सरहद्दीपासून ट्रिपोलीच्या दक्षिण सरहद्दीपर्यंत दोन्ही राष्ट्रांच्या चळवळीचें क्षेत्र ठरविण्यात आलें.

सुदानच्या राज्यकारभारांसंबंधीं ठराव १९ जानेवारीं १८९९ त करण्यांत आले. त्याच्या अन्वयें ब्रिटिश सरकारच्या अनुमतीनें खेदिवानें गव्हर्नर जनरलची नेमणूक करुन त्याच्या हातीं सर्व लष्करी व मुलकी सत्ता द्यावयाची. सुदान प्रांत ईजिप्तप्रमाणें आंतरराष्ट्रीय कायद्यानें बांधला नव्हता. सुधारणा करण्यांत ब्रिटिश, ईजिप्शियन व सुदानीज या सर्वांनीं मदत केली. तेथील पहिला गव्हर्नर जनरल सर रेजिनाल्ड विंगेट हा नेमला.

विसाव्या शतकाच्या आरंभी ईजिप्तची चांगलीच भरभराट झाली. बिगार बंद करण्यांत आली. गुलामांचा व्यापार नव्हताच म्हटलें तरी चालेल. अरबी पाशाला सिलोनमधून ईजिप्तमध्यें येण्यास परवानगी मिळाली. फेलाहिन लोक सुखी झाले. ब्रिटिशांनीं नाईल खोरें घेतल्यामुळें व सैन्य न नेल्यामुळें फ्रान्सच्या मनांत अद्यापि तेढी होतीच. ता. ८ एप्रिल १९०४ च्या तहानें फ्रान्सचें मोरोक्कोंत व ब्रिटिशांचें ईजिप्तमध्यें चळवळीचें क्षेत्र असल्याचें ठरलें. याच ठरावाला अनुसरुन खेदीवाच्या जाहीरनाम्यानें १९०५ पासून ईजिप्त व परकीय रोखेवाले यांचे नवीन संबंध ठरले. या दोन्ही गोष्टींपासून बराच फायदा झाला. तहानें ब्रिटनचा ईजिप्तमध्यें शिरकाव होऊन त्याला यूरोपीय मान्यता मिळाली व फ्रेंच लोकांच्या विरोधापासून मुत्तच्ता झाली. खेदीवाच्या जाहीरनाम्यानें कायसेदीलाडेटेची सत्ता कमी होऊन ईजिप्तला आर्थिक स्वातंत्र्य मिळालें. कर्जाची फेड होण्यासाठीं सार्‍याचा बराच भाग राखून ठेवण्यात आला.

वरील तहानें एक बाबतींत मात्र फरक झाला नाहीं.  ती म्हणजे तुर्कस्तानशीं झालेल्या तहानें म्हणजे कॅपीट्यूलेशन पद्धतीनें यूरोपियन लोकांनां विशेष हक्क मिळाले होते ही होय. दिवाणी खटले मात्र `मिश्र न्यायकोर्टा’ च्या मार्फत चालत. फौजदारी खटल्यांत परराष्ट्रीय वकीलाचा अधिकार चाले. यूरोपियन लोकांच्या बाबतींत १५ राष्ट्रांच्या संमतीशिवाय कायद्यांत फरक करणें शक्य नव्हते. अशा रीतीनें कॅपिट्यूलेशन जाचक झालें होतें. लॉर्ड क्रोमरचें मत यूरोपियन लोकांचें एक कौन्सिल करवून त्यांच्याकडून कायदे पास करवून घ्यावे असें होतें.

१९०५-०६ या वर्षीं तुर्कांचीं कारस्थानें व मुसुलमानीं धर्मवेड यांच्यामुळें बराच त्रास झाला. याच सुमारास एक पक्ष अस्तित्वांत आला याचें म्हणणें `ईजिप्त स्वराज्यास योग्य असून फत्त ब्रिटिशांचा कांटा मार्गांत येतो’ असें होतें या पक्षाचा अध्वर्यु मुस्ताफा केमेलपाशा ( १८७४-१९०८ ) हा होता. या `राष्ट्रीय’ पक्षानें `इस्लाम धर्माच्या’ चळवळीला प्रोत्साहन दिलें. या पक्षाच्या वर्तमानपत्रांनीं ईजिप्त सरकार सिनाई द्वीपकल्यांत किल्ले बांधून दमास्कस ते मक्केपर्यंत होणार्‍या तुर्की रेल्वेला अडथळा आणणार आहे अशी हूल उठविली.  यामुळें `टाबा प्रकरण’ उपस्थित झालें तें पुढें दिलें आहे. यामुळें लोकांच्या मनांत धर्मवेड शिरलें आणि पत्रांतील लेखांमुळें सर्व ख्रिस्ती व यूरोपियन यांच्याविरुद्ध मतें झालीं, लोकांच्या मनांत दहशत उत्पन्न करुन शांतता स्थापण्यासाठीं ब्रिटिश सैन्य वाढविण्यांत आलें. याच सुमारास डेनशवाई खेड्यांत ब्रिटिश सैन्यातील ५ अधिकार्‍यांनीं हुकुमाशिवाय कबुतरें मारलीं म्हणून लोकांनीं त्यांच्यावर हल्ला केला. यांत एक कामगार ठार होऊन दोन जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हेगारांस चांगलीच शिक्षा करण्यांत आली. यामूळें ईजिप्तमध्यें बरीच गडबड उडाली.

टाबा प्रकरण म्हणजे इ. स. १९०६ त सुलतानानें सिनाईवर दाखविलेला हक्क होय. याचें मूळ इ. स. १८९२ पासून उपस्थित झालें होतें. मेहमेतअल्लीपासून ट्युफिकपर्यंत सिनाई व इतर जागा यांवर ईजिप्तचा अंमल चालत असे. परंतु अबासच्या वेळीं सुलताननें नवीन फर्मान काढून त्यांत जवळजवळ ईजिप्तचा सिनाई वरील हक्क उडविला. याच सुमारास ईजिप्तमधील धर्मवेड्या लोकांनीं ईजिप्शियन सरकार सिनाईंत तटबंदी करणार असल्याची गप्प उठविली. यामुळें तुर्कस्ताननें टाबा आपल्या ताब्यांत घेतलें. यामुळें बरीच गडबड झाली. अखेरीस ब्रिटिशसरकारनें खेदिवची बाजू घेऊन निर्वाणीचा खलिता पाठविला. यामुळें सरहद्द ठरुन तुर्क सैन्य टाबा येथून निघालें यामुळें ब्रिटिशांची चांगलीच छाप बसली. १९०७ मध्यें लॉर्ड क्रोमर यानें राजिनामा दिला. यानें २४ वर्षांच्या कारकीर्दीत ईजिप्तमध्यें फार सुधारणा घडवून आणली. इ. स. १८८३ तील ईजिप्त व १९०७ मधील ईजिप्त यात जमीनअस्मानाचा फरक होता. याच्या मागून सर एल्डन गोर्स्ट याची नेमणूक झाली.

१९०७ मध्ये बर्‍याच कारणांनीं आर्थिक बाबतींत बराच घोटाळा झाला. तरी पण फेलाहिनची स्थिति चांगली होती. १९०८ मध्यें मुस्ताफाकेमेल मरण पावला व डेनशवाई प्रकरणांतील लोकांना सोडण्यांत आलें. पुढें राष्ट्रीय पक्षांत बरीच दुफळी माजली व महंमदबे फरीद याला पुढारी म्हणून नेमण्यास बराच त्रास पडला. १९०८ सालीं कायदेकौन्सिल व सभासद सभेचे लोक इंग्लंडमध्यें गेले होते. त्यांना सर एडवर्ड ग्रे, परराष्ट्रीय मंत्री, यांनीं बरेंच आश्वासन दिलें.

इ. स. १९०८ मध्यें तुर्कस्तानमध्यें झालेल्या राज्यक्रांतीमुळें इजिप्तमधील राष्ट्रीय पक्षास आशा उत्पन्न झाली. परंतु त्यांना तरुण तुर्कांकडून फारसें उत्तेजन मिळाले नाहीं.  ब्रिटिशांशी सहकारित्व करण्याचाच त्यांना उलट सल्ला मिळाला. सर एल्डन गोर्स्टनें एका पत्रांत ब्रिटिश सरकारचे उद्देश जाहीर करुन ईजिप्तला सध्यां पार्लमेंटपद्धति चांगली नसल्याचें कळविलें त्याचप्रमाणें म्युनिसिपालिटी वगैरे बाबतींत मात्र त्यांना बरीच स्वतंत्रता देण्यांत आली.  नोव्हेंबर १९०८ मध्यें मुस्ताफा फेहमीनें राजीनामा दिला व त्याच्या ऐवजी बुत्रासपाशा नांवाच्या काप्टाची नेमणूक झाली. याचें राष्ट्रीय पक्षाशीं वैमनस्य येऊन त्याचा १९१० त खून झाला.

ई जि प्त चा १९०९-१९२१ प र्यं त चा अ र्वा ची न रा ज की य इ ति हा स. - क्रोमरच्या जागीं १९०७ सालीं गोर्स्ट नेमून आला होता. ते ईजिप्तमधील लोकांना राज्यकारभारांत अधिकाअधिक हक्क मिळत जावेत या मताचा हा असल्यानें आपल्या कारकीर्दींत त्यानें उदार धोरणाचा पुरस्कार केला. प्रांतिक कायदेमंडळांना बरच हक्क देण्यांत आले. हे हक्क देऊं केल्यानें, इजिप्तमधील असंतोषाची लाट दबेल असें गोर्स्टला वाटत होतें पण उलट ही अंतोषाची चळवळ अधिकच फेलावत चालली. शन १९१० च्या फेब्रुवारींत, बुत्रास घालीपाशा या प्रधानाचा एका तरुण राष्ट्रीय इजिप्शियनानें खून केला. इंग्लिशासंबंधींच्या द्वेषाचें अधिकच प्रदर्शन होऊं लागलें. या परिस्थितीला आळा घालण्यासाठीं, गोर्स्टला कठोर उपाय योजण्याची शिफारस करावी लागली. तरुण राष्ट्रीय पक्षाचा पुढारी शेक अब्द-एल अझीझ शवीश याला हद्दपार करण्यांत आलें व तो बर्लिन येथें जाऊन राहिला. घालीपाशाच्या मृत्यूनंतर, महंमद सय्यदपाशा हा मुख्य मंत्री झाला. १९११ सालीं गोर्स्ट हा मरण पावल्यामुळें त्याच्या जागीं सुप्रसिद्ध लार्ड किचनेर याची नेमणूक झाली. लार्ड किचनेरनें अधिकार आपल्या ताब्यांत घेतला नाहीं तोंच इटली व तुर्कस्तान यांच्या दरम्यान युद्ध सुरु झालें. या युद्धांत ईजिप्त तटस्थ राहील असें किचनेरनें जाहीर केलें. पण तुर्कस्तानांतील जातभाईबद्दल ईजिप्तमधील मुसलमानांना जात्याच सहानुभूति वाटत असल्यामुळें, त्यांना मनांतून ही गोष्ट पसंत नव्हती. त्यामुळें त्यांनीं बंडखोरीस सुरवात केली. १९१२ सालीं लार्ड किचनेर, महमदपाशा व खेदीव या तिघांना ठार करण्याचा गुप्त कट करण्यांत आला पण तो उघडकीस आला.

लॉर्ड किचनेर यानें आपल्या कारकीर्दीत, इजिप्तमधील शेतकरीवर्गाच्या उन्नतीप्रीत्यर्थ बरीच चळवळ केली. पक्षिसंरक्षक कायदा त्यानें अंमलांत आणला. १९१२ मध्यें, सार्वराष्ट्रीय-कापूस-काँग्रेस भरविली गेली. १९१३ मध्यें खेदिव व महंमदपाशा याचें न जमल्यामुळें महंमदपाशा यानें राजीनामा दिला. त्याच्या जागीं हुसेन रशदीपाशा याची नेमणूक झाली.  १९१३ सालीं पूर्वींचें वरिष्ठकायदेमंडळ व प्रांतिक  कायदेमंडळ यांचें एकाच कायदेमंडळात रुपांतर करण्यात आलें, व या मंडळास बरेच हक्क देण्यांत आले. नवीन निवडणुकी झाल्या, त्यांमध्ये सय्यद झागलूलपाशा हा प्रचंड बहुमतानें निवडला गेला व लोकांच्या तर्फें त्याला अध्यक्ष म्हणून निवडण्यांत आलें. ईजिप्तच्या स्वातंत्र्याचा हा पक्का कैवारी होता. त्यामुळें त्यानें, लार्ड किचनेर याच्यावर व ब्रिटिशांच्या ईजिप्तविषयक धोरणावर खरमरीत टीका करणार्‍यास सुरवात केली. व या कामीं त्याला खेदिवाचीहि फूस मिळूं लागली.

याच सुमारास यूरोपमध्यें महायुद्ध सुरु झालें.  लॉर्ड किचनेरला इंग्लंडमध्यें बोलाविण्यांत आलें व त्याला ब्रिटिश सैन्याचा मुख्य सेनापति निवडण्यात आलें. १९१४ सालीं ईजिप्तमधील जर्मन, ऑस्ट्रेलियन वगैरे शत्रुपक्षीय लोकांनां हांकलण्यात आलें.  ईजिप्तमध्यें लष्करी कायदा पुकारला गेला. पुढें कांहीं दिवसांनीं तुर्कस्तान हें जर्मनीला मिळालें. तेव्हां ईजिप्तमधील लोक कदाचित बंड करतील या समजुतीनें एक जाहीरनामा काढण्यात आला. त्यांत असें जाहीर करण्यांत आलें होतें कीं, `या युद्धांत ईजिप्शियन लोकांनां भाग घेण्याची सक्ती करण्यांत येणार नाहीं.’ पण ईजिप्तमधील लोकांनीं आपण होऊनच स्वयंसेवक पथकें उभारुन, ब्रिटिशांनां मदत केली.

ईजिप्तचे सुलतान हे तुर्कस्तानचे मांडलिक असल्यामुळें व इंग्लंडविरुद्ध तुर्कांनी हत्यार उपसल्यामुळें, ईजिप्तची व्यवस्था लावून टाकणें इंग्लंडला भाग पडलें. ईजिप्त हें ब्रिटिश साम्राज्याला जोडण्यांत यावें अशी एक कल्पना पुढें आली. पण विचारांतीं, ईजिप्तला आपल्या संरक्षणाखालीं घ्यावयाचे ठरवून `ईजिप्त हें तुर्कस्तानच्या ताब्यांतून काढून घेतलें असून तें ब्रिटिशांचें संरक्षित संस्थान झालें आहे व त्याच्या संरक्षणार्थ इंग्लंड हें शक्य तितकी काळजी घेईल’ असा जाहीरनामा इंग्लंडनें काढला. लगेच दुसरे दिवशी `ईजिप्तचा खेदिव अबास हिम्ली हा कॉन्स्टाटिनोपलमध्यें असून तो ब्रिटिशांविरुद्ध तुर्कस्तानला मदत करतो आहे अशी शंका आल्यामुळें, त्याला पदच्युत करण्यात आलें आहे अशा अर्थाचा दुसरा एक जाहीरनामा काढण्यांत आला. त्याच्या जागीं, प्रिन्स हुसेन कॅमल हा गादीवर आला. पण तुर्कस्तानला जरी युद्धाच्या बाबतींत ईजिप्तमधील मुसुलमानानीं मदत केली नाहीं तरी पण खिलापतवर जें संकट येऊं पहात होतें त्या बाबतींत त्यानां मुळींच स्वस्थ बसवेना; आणि महायुद्धानंतर ईजिप्तला स्वातंत्र्य देण्याचें जर्मन एजंटानीं अभिवचन दिले होतें, तिकडेहि कानाडोळा करवेना अशी त्यांची चमत्कारिक स्थिति झाली होती.

ईजिप्त हें संरक्षित संस्थान म्हणून ठरल्यामुळें त्याची व्यवस्था पाहण्याकरिता, इंग्लंडने सर एच मॅकमोहन याची हायकमिशनर म्हणून नेमणूक केली. याच्याच ताब्यांत परराष्ट्रमंत्र्याचीं सूत्रें आपोआपच आल्यामुळें, ईजिप्तचा पूर्वीचा परराष्ट्रमंत्री, याला आपल्या अधिकाराचा राजीनामा द्यावा लगाला.

महायुद्धामध्यें ईजिप्तमधील पुष्कळ ब्रिटिश अधिकार्‍यांना युद्धावर जावें लागलें; ही संधि साधून लोकपक्षीय पुढार्‍यांनीं राष्ट्रीय चळवळ फैलावण्यास सुरवात केली. त्यातच इंग्लंडच्या हितशत्रूंनीं वाटेल त्या भलत्या सलत्या कंड्या पिकवून ब्रिटिशांच्या विरुद्ध लोकांचीं मनें चिथावून टाकलीं. सिव्हिल सर्व्हिसमधील ईजिप्शियन लोकांनां, ब्रिटिश सिव्हिल सर्व्हंट हे आपल्या मार्गांतील अडथळे आहेत असें वाटत असे. या कारणाने हेहि या लोकांच्या चळवळींत सामील झाले. वकील वर्ग विद्यार्थी वर्ग यांनीहि या चळवळीत प्रमुखपणें भाग घेण्यास सुरुवात केली. ख्रिश्चन लोकांच्या ताब्यांत मुसुलमानांनीं काय म्हणून रहावें; त्यांच्या ताब्यांतून स्वत:ला सोडवून घेतलेंच पाहिजे अशा प्रकारची विचारसरणी तरुण ईजिप्तच्या डोक्यांत घोळूं लागली.

इ. स. १९१६ च्या डिसेंबरमध्यें, सर रेजिनाल्ड विंगेट यांची हायकमिशनरच्या जागीं नेमणूक झाली. १९१४ पासून सुलतान हुसेनची प्रकृति बिघडलेली होती; ती सुधारण्याचीं लक्षणें दिसेनात त्यामुळें त्याच्या पाठीमागून कोणाला गादीवर बसवावें यासंबंधींचा प्रश्न उपस्थित झाला. यावर बरीच भवति न भवति होऊन शेवटीं इस्मायलचा सहावा मुलगा अहमद फुअद हा वारस म्हणून ठरविण्यांत आला; व १९१७ सालीं सुलतान हुसेन वारल्यानंतर अहंमद हा गादीवर आला.

महायुद्धानंतर, प्रेसिडेंट वुइल्सन यानें जी चौदा तत्त्वें पुकारलीं होतीं त्यांचा ईजिप्तच्या सुशिक्षित जनतेवर फार परिणाम झाला होता. ईजिप्त हें संरक्षित संस्थान म्हणून कायमचें आमच्या ताब्यांत आम्ही ठेवू इच्छित नाहीं असें इंग्लिश मंत्र्यांनीं वारंवार आश्वासन दिलें होतें. तें आश्वासन पुरें करण्याची वेळ आली असून ईजिप्तला स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाप्रमाणें, स्वतंत्रता देण्यांत आली पाहिजे असें ईजिप्तमधील मवाळ, जहाल वगैरे सर्व पक्षांचें मत बनूं लागलें. नोव्हेंबर १९१८ मध्यें, इंग्रज व फ्रेंच यांनीं असा जाहीरनामा काढला कीं, `तुर्की अंमलाखालीं, प्रजेच्या हक्कावर जो घाला आला होता तो नाहीसा करुन लोकमतानुसार राज्यकारभार चालविण्याचें धोरण प्रस्थापित करण्यांत येईल.’ या जाहीरनाम्याला अनुसरुन ईजिप्तला स्वयंनिर्णयाचे हक्क मिळालेच पाहिजेत असें ईजिप्तमधील लोकांनां वाटूं लागल्यास यांत आश्चर्य नाहीं. अशा रीतीनें लोकमताचा वारा वाहूं लागला असतां, तत्पूर्वी कांहीं दिवस, ईजिप्तच्या कायदेमंडळाच्या पुनर्घटनेसंबंधीं विचार करण्याकरितां, एक कमिशन बसले होतें, त्याचा अभिप्राय याच सुमारास प्रसिद्ध झाला. त्या अभिप्रायाप्रमाणें पुनर्घटना घडून आल्यास, कायदेमंडळाच्या ताब्यांत कायदे करण्याची सत्ता मुळींच राहणार नाही व परकीयांचें बहुमत असलेल्या सीनेटच्या ताब्यांत ती सत्ता जाऊन ईजिप्तचें नुकसान झाल्याशिवाय रहाणार नाहीं असें ईजिप्तला वाटूं लागलें व त्याच्या निषेधार्थ त्यांनीं जाहीर सभा भरविल्या व लोकमत प्रक्षुब्ध केलें. राष्ट्रीय पक्षानें आपल्या पक्षाची उत्तम रीतीनें संघटना करुन झगलूल पाशाला आपला पुढारी निवडलें. त्यानें लगेच हायकमिशनरची गांठ घेऊन, ईजिप्तच्या स्वातंत्र्याची कल्पना इंग्लंडमध्यें प्रस्तृत करण्यासाठीं लंडनला जाण्याची इच्छा दर्शविली. पण हायकमिशनरला तें पसंत पडलें नाहीं. त्याच वेळीं ईजिप्तसंबंधीं पुढील विचार करण्याकरितां सुलतानच्या संमतीनें प्रधानानें लंडनला जावयाचा बेत केला; पण इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री व इतर मंत्री हे शांततापरिषदेला जाणार असल्यामुळें ईजिप्तसंबंधीं वाटाघाट करण्यास त्यांनां अवसर सापडणार नाहीं. तेव्हां यावेळीं जाण्याचा काहीं उपयोग नाहीं असें हायकमिशनर यांनीं ईजिप्तच्या प्रधानाला कळविलें. यामुळें चिडून जाऊन रशदीपाशा व अडलीपाशा या दोघांनीं राजीनामे दिले. राजीनामे परत घेण्याविषयीं त्यांनां विनंति करण्यांत आली पण त्यांनीं राजीनामे परत घेतले नाहींत. अशी स्थिति पहातांच इंग्लंडच्या प्रधानमंडळानें हायकमिशनर यास ईजिप्शियन प्रश्नासंबंधीं सल्ला देण्यास बोलाविलें. हायकमिशनरनें राष्ट्रीय चळवळीवरील दडपण काढून टाकण्याचा व ईजिप्तच्या प्रधानमंडळाला लंडनला बोलावण्याचा सल्ला दिला. पण ईजिप्तचें प्रधानमंडळ, झगलूल व त्याचे अनुयायी यांनां लंडनला जाण्याची परवानगी दिल्याशिवाय लंडनला जाण्यास तयार होईना. झगलूलनें तर ब्रिटिशांविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध करण्याची जंगी चळवळ चालविली होती, त्यामुळें झगलूलला परवानगी देणें अशक्य होतें व इंगलंडच्या प्रधानमंडळानें तर ईजिप्तच्या प्रधानमंडळाला आमंत्रण केलें होतें. अशी विलक्षण स्थिति प्राप्त झाली असता, हायकमिशनरला अशी बातमी लागली कीं, झगलूल व त्याच्या पक्षानें ईजिप्तला स्वातंत्र्य मिळावें यासाठीं परराष्ट्रांपुढें आपल्या मागणीचा खलिता ठेवण्याचा बेत केला आहे. ही बातमी अगदीं खरी होती. तसेंच झगलूलपाशानें सुलतानकडे `ईजिप्त हें स्वतंत्र राष्ट्र आहे व त्यानें ब्रिटिशांपासून स्वतंत्र होण्याचें ठरविलें आहे’ अशा अर्थाचा अर्ज पाठविला होता.  अर्थातच हायकमिशनरला कठोर उपायांचा अवलंब करणें भाग पडलें.  मार्चच्या आठव्या तारखेला झगलूल व त्याच्या हाताखालील तीन प्रमुख पुढारी यांनां पकडून माल्टा येथें पाठवण्यात आलें.

झगलूल पाशाच्या अटकेची बातमी समजतांच, लोकांचीं मनें प्रक्षुब्ध झालीं. विद्यार्थ्यांनीं कायरोमध्यें ब्रिटिशांबद्दलच्या द्वेषाचें निरनिराळ्या तर्‍हेनें प्रदर्शन केलें. टँटा येथें व ईजिप्तच्या नदीप्रमुखप्रदेशामध्यें बंडाळी माजली. रेल्वेचे रुळ उखडण्यांत आले. कायरो येथील रुळ व तारांचा विध्वंस करण्यांत आला. मार्चच्या १८ तारखेला लोकांनीं चिडून जाऊन डिरत येथें ब्रिटिश अधिकार्‍यांचे खून केले. ईजिप्तमधील शेतकरीवर्ग सुद्धां या बंडाळींत सामील झाला. महायुद्धांत त्यांच्यावर सैन्यांत सामील होण्यासाठीं जुलूम करण्यांत आला होता; व त्यामुळें तेहि असंतुष्ट झाले होते.

या परिस्थितीला आळा घालून, ब्रिटिशांचें हित संरक्षण करण्यासाठीं लॉर्ड अलेनबी यास हाय कमीशनर म्हणून धाडण्यांत आलें. लॉर्ड अलेनबी याने समेटाचे धोरण स्वीकारून, ईजिप्शियन राष्ट्रीय पक्षाच्या चळवळीवरील दडपण काढून टाकलें. झगलूलचीहि बंधमुक्तता झाली. तो थेट पॉरिस येथें आला. पण तो ज्या दिवशीं पॅरिसमध्यें उतरला त्याच दिवशीं, `ईजिप्त हें ब्रिटिशांचें संरक्षित संस्थान आहे’ या म्हणण्याला प्रेसिडेंट विल्सन यानें संमति दिली. शांतता परिषदेपुढे आपलें म्हणणें मांडण्यासाठीं त्यानें पुष्कळ प्रयत्‍न केलें पण त्याला यश आले नाहीं.

लॉर्ड अलेनबी यानें ईजिप्तमधील बंडाळी मोडण्यासाठीं कंबर बांधली. बंडखोर लोकांनां त्यानें चांगली दहशत बसविण्याचा प्रयत्‍न केला पण सर्व अधिकारीवर्गानें याचा निषेध म्हणून संप करण्याचें ठरविलें. हा संप कांहीं दिवस टिकला पण त्याचा परिणाम विशेष झाला नाहीं. या असंतोषाच्या कारणांची चौकशी करुन त्याच्यावर अभिप्राय देण्यासाठीं इंग्रज सरकारनें मिलनरच्या अध्यक्षतेखालीं एक मंडळ नेमलें. इकडे राष्ट्रीयपक्ष हा ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पसरविण्याचें काम सारखें करीतच होता. तसेंच या मिल्नर कमीशनवर बहिष्कार घालविण्यासाठींहि या पक्षानें जोरानें चळवळ चालविली होती.

मिल्नर साहेब आपल्या कमिटीसह डिसेंबर १९१९ मध्यें ईजिप्तमध्यें येऊन पोहोंचले. या कमिटीचें संरक्षण करण्यासाठीं शक्य ती खबरदारी घेण्यात आली होती. ईजिप्तमधील लोकपक्षाच्या पुढार्‍यांनीहि या कमिटीवर बहिष्कार घालण्याचे कसून प्रयत्‍न चालविले होते.  ईजिप्तमधील प्रसिद्ध पुढार्‍यांनीं या कमिशनपुढें आपलें म्हणणें मांडण्यास जाऊं नये या साठींहि लोकांनीं खटपट चालविली होती. लोकांनीं संप पुकारला होता; व रस्त्यामधून त्यांनीं दंगाधोपा सुरु केला होता. या चळवळींत पुष्कळ बायकांनींहि भाग घेतला होता. कोणता पुढारी साक्षीला जातो याच्यावर टेहेळणी ठेवण्यांत आली होती व त्याची वर्तमानपत्रांतून नाचक्की  करण्यांत येत होती. टँटा येथें कमिटी आली असतांना तेथेंहि दंगे झाले व ते लष्कराच्या मदतीनें, शमविण्यांत आले. कायरोमध्यें कमिटी बसली असतांना तेथेहि दंगा होऊन ईजिप्तच्या प्रधानमंडळावर बाँब फेकण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला. कायरो येथील अल-अझर विश्वाविद्यालयानें ईजिप्तचा पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करुन घेण्याचा हक्क आहे अशा अर्थाचा खलिता मिल्नर कमिशनकडे पाठवला. ईजिप्त हें संरक्षित संस्थान यापुढें राहूं नये अशा अर्थाचें पत्र खेदिवाच्या राजघराण्यांतील सहा राजपुत्रांनींहि मिल्नरकडे रवाना केलें.

मिल्नर कमिटी ही अलेक्झांड्रिया येथें चौकशीला गेली. तेथील प्रसिद्ध फ्रेंच, इटालियन व ग्रीक लोकांच्या साक्षी घेण्यांत आल्या. ब्रिटिश व्यापारीसंघाच्या अध्यक्षाचेहि म्हणणें ऐकून घेण्यांत आले. राज्यकराभारांतील प्रत्येक खात्याची या कमीटिनें बारीक तपासणी केली अशा रीतीनें सर्व माहिती काढून घेऊन हें कमिशन आपला रिपोर्ट लिहिण्याकरतां लंडन येथें परत आलें. याच वेळीं, ईजिप्तमधील लोकपक्षीय पुढार्‍यांचें मंडळ पॅरिस येथें गेलें होतें.  या मंडळाची, व मिल्नर कमिटीची मुलाखत घडून येण्याची संधि अडलीपाशाच्या मध्यस्थीनें प्राप्ती झाली. झगलूल व त्याचें मंडळ हें मिल्नर कमिटीकडे आपलें म्हणणें मांडण्याकरतां लंडन येथें आलें. दोन्ही मंडळांमध्यें बरेच दिवस चर्चा चालून दोघांच्या संमतीनें, ईजिप्तच्या पुढील राज्यव्यवस्थेसंबंधींची एक सर्वसाधारण रुपरेषा आखण्यांत आली. ही रुपरेषा लोकांनां पसंत पडल्यास तिच्यावर आपण सही करुं असें झगलूलनें मिल्नरला कळविलें व लोकांची याला संमति घेण्याकरतां त्यानें, आपल्या पैकीं चार जणांनां ईजिप्तला रवाना केलें. मिल्नर व झगलूल यांनीं आपल्या मंडळाच्या संमतीनें जो खर्डा तयार केला होता त्यांतील आशय पुढील प्रमाणें होता.

`ईजिप्तचें स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठीं इंग्लंड व ईजिप्तमधील, पुढील संबंध मुक्रर करणें अत्यवश्यक आहे. यासाठीं खालील गोष्टी करण्यांत याव्या.

`ग्रेटब्रिटन व ईजिप्तमध्यें सलोख्याचा तह होऊन त्या तहान्वयें इंग्लंडनें, ईजिप्तमध्यें प्रातिनिधिक एकसत्ताक राज्यपद्धतीची स्थापना करुन, ईजिप्त हे स्वतंत्र राष्ट्र मानावें; व ईजिप्तनें इंग्लंडच्या ईजिप्तमधील हितसंबंधाला कोणत्याहि तर्‍हेनें धोका न पोंहोंचेल अशी खबरदारी घ्यावी. परराष्ट्राशीं ग्रेटब्रिटनननें युद्ध पुकारल्यास ईजिप्तनें ग्रेटब्रिटनला मदत केली पाहिजे. परराष्ट्रांत ईजिप्तला आपले वकील ठेवण्याचा अधिकार असावा. ग्रेटब्रिटनच्या हितसंबंधाच्या विरुद्ध व ग्रेटब्रिटन व ईजिप्त मधील सलोख्याच्या तहाविरुद्ध कोणतेंहि धोरण ईजिप्तनें ठेवतां कामा नये. ब्रिटिशांचें लष्कर, आपल्या हितसंबंधाचें संरक्षण करण्यासाठीं ईजिप्तमध्यें राहील. ईजिप्तनें आपल्या न्याय खात्यांत एक ब्रिटिश न्यायमंत्री नेमावा व ग्रेटब्रिटनच्या संमतीनें फडणिसाच्या जागेवर एक अधिकारी नेमावा. परकीयांच्या विरुद्ध ईजिप्तनें कायदा पसार केला तर त्यात ढवळाढवळ करण्याचा ग्रेटब्रिटनला पूर्ण हक्क असावा.” याखेरीज परधर्मसहिष्णुता, परकीयांच्या हक्काचें संरक्षण वगैरे बाबतींसंबंधींहि या खडर्यांत पुष्कळ सूचना आहेत.

हा खर्डा ईजिप्तमधील लोकांना साधारणत: पसंत पडला असें म्हणावयास हरकत नाहीं.  लोकांची या खडर्याला संमति आहे हें कळविण्यासाठीं, झगलूलचे चार प्रतिनिधी पुन्हां लंडन येथें परत आले. यानंतर किरकोळ चर्चा होऊन झगलूलचें मंडळ ईजिप्तकडे यावयास निघालें, निघतांना ईजिप्त हें संरक्षित संस्थान म्हणून यापुढें राहतां कामा नये, व तें स्वतंत्र गणण्यांत यावें ही हमी जर इंग्लंड न घेईल तर नुकताच तयार करण्यांत आलेला खर्डा कुचकामाचा ठरेल असें झगलूलनें मिल्नरला बजावलें. या नंतर मिल्नर साहेबांनीं परराष्ट्रमंत्र्याकडे आपला रिपोर्ट, ९ डिसेंबर १९२० रोजीं पाठविला व तो पार्लमेंटपुढें १ जानेवारी १९२१ रोजीं ठेवण्यांत आला.

या रिपोर्टाचें अरबी भाषेमध्यें भाषांतर झालें. लोकांनाहि तो रिपोर्ट सर्वसाधारण रीतींनें पसंत पडला. अडलीपाशा यानें संयुक्त प्रधानमंडळ बनविलें. थोड्याच दिवसांनीं इंग्रज सरकारतर्फें असें जाहीर करण्यांत आलें कीं, `मिलनर कमिटीचा अभिप्राय वाचून त्यावर विचार केल्यानंतर, इंग्रज सरकारला असें आढळून आलें आहे कीं, यापुढें ईजिप्त हें ब्रिटिशांचें संरक्षित संस्थान म्हणून रहाणें युक्त नाहीं. यापुढें ईजिप्त व इंग्लंड यामध्यें कोणत्याप्रकारचें नातें असावें यासंबंधीं, सुलताननें निवडून दिलेल्या प्रतिनिधीशीं चर्चा करण्याची सरकारची इच्छा आहे.

झगलूलपाशा हा पॅरिसहून एप्रिलच्या ५ तारखेस ईजिप्तमध्यें आला. त्याचें लोकांनीं अपूर्व तर्‍हेनें स्वागत केले. अडलीपाशानें जे संयुक्त प्रधानमंडळ बनविलें होतें त्याला विरोध करण्याची त्यानें चळवळ सुरु केली. तसेंच सुलताननें ग्रेटब्रिटनशीं ईजिप्तचें नातें काय असावें यासंबंधीं चर्चा करण्याकरितां जें प्रतिनिधीमंडळ निवडावयाचें होतें त्यांत झगलूलला एक जागा देण्यांत आली; पण या प्रतिनिधि मंडळाचे अध्यक्ष आपणाला निवडल्यास आपण प्रतिनिधि मंडळात सामील होऊं असें झगलूलनें सुलतानास कळविलें. झगलूलचें हें करणें, त्याच्याच कित्येक अनुयायांनां पसंत पडलें नाहीं. तरी पण तिकडे लक्ष न देतां, या प्रतिनिधि मंडळानें इंग्लंडला चर्चा करण्याकरितां जाऊं नये, यासंबंधीं त्यानें जोरानें चळवळ सुरु केली. या बाबतींत ईजिप्तमधील मवाळ लोकांनीं त्याल विरोध केला; पण जहाल पक्षाने मात्र झगलूलला पाठिंबा दिला. झगलूलनें याचा पूर्ण फायदा घेऊन, या प्रतिनिधींच्या जाण्याविरुद्ध मोठमोठ्या सभा भरविल्या. कायरो व अलेक्झांड्रियामध्यें लोकांनीं दंगे करण्यास सुरवात केली. यूरोपीयन लोकांवरच या लोकांचा मुख्य रोख दिसून येत होता. अलेक्झांड्रियामध्यें या दंग्याला फारच उग्र स्वरुप आलें; त्यामुळें लष्कराची मदत घेणें जरुर झालें. या दंग्यात ६८ ईजिप्शियन व १९ युरोपियन ठार झाले आणि १६२ ईजिप्शियन व ६६ यूरोपियन जखमी झाले. झगलूल पाशानें या झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला, पण संयुक्त प्रधानमंडळाविरुद्ध तसेंच प्रतिनिधी पाठवण्याविरुद्ध चळवळ चालूंच ठेवली व फार जहाल भाषणें करण्यास सुरवात केली. त्यामुळें, या दंगेधोप्यांचा व झगलूल पाशाचा अप्रत्यक्ष संबंध जोडण्यांत येऊं लागला. १९२१ च्या हेमंत ॠतूमध्यें अडलीपाशा हा ईजिप्तच्या भावी घटनेसंबंधीं पार्लमेंटशी चर्चा करण्याकरितां लंडन येथें गेला. पण त्या चर्चेंत कांहींच निष्पन्न न होतां तो ईजिप्तमध्यें परत आला. ब्रिटिश प्रधानमंडळाचें हें अरेरावी व बिन मुत्सद्दीगिरीचें धोरण खुद्द लंडन टाइम्सलाहि पसंत पडलें नाहीं. ब्रिटिश प्रधानमंडळाच्या या धोरणाचा झगलूल पाशानें व त्याच्या अनुयायांनीं जाहीर रीतीनें निषेध केला. झगलूलनें महात्मा गांधीच्या असहकारितेच्या चळवळीच्या दिशेवरहुकूम ईजिप्तमध्येंहि असहकारितेची चळवळ सुरु केली. लोअर ईजिप्तमध्यें बंडाळी माजली. कायरो येथील विद्यार्थ्यांनीं, सरकारी शाळा ओस पाडल्या यामुळें ईजिप्तमध्यें पुन्हां लष्करी कायदा पुकारण्यांत आला.

अडलीपाशानें प्रधानपदाचा राजीनामा दिल्यामुळें, सरबत पाशाला प्रधानपदाचा स्वीकार करण्याची विनंति करण्यांत आली, पण त्यानें कांहीं अटीवर प्रधानपदाचा स्वीकार करण्याचें कबूल केलें. यापैकी मुख्य अटी अशा होत्या. संरक्षित संस्थान या नात्यानें ईजिप्तनें यापुढें राहूं नये. ईजिप्तचें परराष्ट्रखातें स्थापण्यांत यावें; ईजिप्तच्या शासनसंस्थेंत लोकनियुक्तांचाच भरणा असावा. लष्करी कायदा रद्द करण्यांत यावा. परदेशीय अंमलदारांच्या जागीं ईजिप्तमधील ईजिप्शियन अंमलदार नेमण्यांत यावेत. या अटींना मान्यता मिळाल्यामुळें सरबतपाशा हा प्रधान झाला. असहकारितेचे जे आठ प्रणेते त्यांनां पकडण्यांत आलें व झगलूलपाशाच्या बाजूचीं जी वर्तमानपत्रें होतीं ती बंद पाडण्यांत आलीं. झगलूलपाशाला हद्दपारीची शिक्षा दिली गेली.

लॉर्ड अलेनबीनें आपली एक योजना पुढें आणली होती. तींत लष्करी कायदा रद्द करण्यांत यावा अशी त्यानें शिफारस केली होती. लॉर्ड अलेनबी यानें जी आपली योजना पुढें मांडली होती, ती साधारणत: ईजिप्तमधील ब्रिटिश लोकांनां पसंत पडण्यासारखीच होती. फेब्रुवारी १९२२ मध्यें, ब्रिटिश पार्लमेंटनें अलेनबीच्या सूचना कबूल करुन, ईजिप्तची नवीन घटना करण्याचें ठरविलें, तरी पण ईजिप्तमधील झगलूल पाशाच्या जहाल पक्षानें दंगा धोपा करण्यास सुरुवात केली, त्यामुळें थोडें फार हक्क मिळतील अशी जी आशा होती तिहि दुरावण्याचा रंग दिसूं लागला. शेवटीं १९२२ च्या फेब्रुवारीच्या २८ तारखेस ब्रिटिश सरकार व ईजिप्तचा सुलतान यांमध्यें पुढील अटीवर करारनामा झाला. (१) ईजिप्त हें यापुढें संरक्षित संस्थान म्हणून न राहता तें स्वतंत्र राष्ट्र म्हणून माजले जाईल. (२) इंग्रज सरकार ज्यावेळीं ईजिप्शियन रहिवाश्यांनां उद्देशून, माफीचा कायदा पास करील त्यावेळीं ताबडतोब, लष्करी कायदा रद्द करण्यांत येईल. (३) ईजिप्त मधील साम्राज्यविषयक दळणवळणाचीं साधनें ब्रिटिशांच्या ताब्यांत राहतील; त्याचप्रमाणें परराष्ट्रांचा ईजिप्तमध्ये शिरकाव होऊं लागल्यास ईजिप्तचें संरक्षण करण्याचा हक्क ब्रिटिश सरकारकडे राहील, तसेंच परराष्ट्रीय हितसंबंध व अल्पसंख्याकांचे हितसंबंध रक्षण करण्याचा हक्क ब्रिटिश सरकारकडे राहील.

या अटींना ईजिप्शियन लोक प्रतिकूल नव्हते. त्यामुळें या अटीवर करारनामा होऊन १६ मार्च १९२२ रोजीं ईजिप्तला स्वातंत्र्य मिळालें. सुलताननें `ईजिप्तचा राजा’ ही पदवी धारण केली.

ईजिप्तला स्वातंत्र्य मिळताच, ईजिप्त सरकारनें, निरनिराळ्या महत्वाच्या खात्यांवर जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनां काढून त्या जागी ईजिप्शियन लोक नेमले. ईजिप्शियन पीनलकोडची दुरुस्ती करण्यांत आली. नवीन नवीन सुधारणा करण्यांत आल्या. तरी पण अद्यापि ईजिप्तमधील असंतोषाची लाट पूर्णपणें दबली नव्हती. ईजिप्तला जें स्वातंत्र्य मिळालें तें जुजबी स्वातंत्र्य असून, खरें स्वातंत्र्य अद्यापि मिळालेंच नाही असें जहाल पक्षीय मंडळी प्रतिपादन करीत होती. शिवाय झगलूल पाशाला हद्दपारी झाली असल्यामुळेंहि लोकांत असंतोष माजला होता व त्याला परत ईजिप्तमध्यें आणण्यासंबंधींची चळवळ चालू होती. त्यातच ईजिप्तच्या राजाची आंतून झगलूलपाशाबद्दल सहानुभूति होती.  अर्थातच अशा स्थितींत सरबतपाशाला आपल्या मंत्रिमंडळासह राजीनामा देणें भाग पडलें.  यानंतर टेवफिक नेसीम यानें आपलें मंत्रिमंडळ बनविलें, पण तेहि लवकरच मोडलें जाऊन, त्याच्या जागीं येहिया इब्राहिमचें प्रधानमंडळ अस्तित्वांत आलें.  इकडे झगलूलपाशाच्या सुटकेबद्दल तर जहाल पक्षानें प्रचंड चळवळ चालविली होती. या चळवळीला यश येऊन १९२३ च्या एप्रिल महिन्यांत झगलूलपाशाची सुटका झाली.

सन १९२३ मध्यें ईजिप्तच्या राज्यशासनपद्धतीची पुनर्घटना होऊन ईजिप्त हें पूर्ण स्वतंत्र राष्ट्र बनलें. इस्लाम हा राष्ट्रधर्म म्हणून जाहीर करण्यांत आला. दरबारची भाषा अरबी ठरविण्यांत आली. सक्तीचें व मोफत प्राथमिक शिक्षण, मुलामुलींना दिलें जाईल असें प्रसिद्ध करण्यांत आलें. १८ वर्षांच्या आंत मुलांचा व १६ वर्षांच्या आंत मुलींचा विवाह करण्यास कायद्यानें प्रतिबंध करण्यांत आला. याला मुख्य कारण म्हणजे १९२१ सालीं स्थापन झालेल्या `वीमेन्स यूनियन’ ची चळवळ होय. सुदानचा दर्जा मात्र काय असावा हें या पुनर्घटनेंत ठरविलें गेलें नाहीं. सुदान हें ईजिप्तच्या राजाच्याच ताब्यांत असणें अत्यंत जरुर आहे असें जहाल पक्षाला पूर्णपणें वाटत होतें. त्यामुळें वरील पुनर्घटनेसंबंधीं त्यांनीं नापसंती दर्शविली. तरी पण सर्व साधारण लोकमत या पुनर्घटनेला विरुद्ध नव्हतें. जून १९२३ मध्यें `अ‍ॅम्निटी अ‍ॅक्ट’ मंजूर झाल्यामुळे व लष्करी कायदा रद्द करण्यांत आल्यामुळें, अडीचशें ईजिप्शियन लोकांनां मुक्तता मिळाली. १९२४ च्या जानेवारींत बहुपत्‍नीकत्वाच्या चालीस प्रतिबंधक असा कायदा करण्यांत आला. याच वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस झगलूलपाशा हा प्रधान झाला. ईजिप्तचें पहिलें राष्ट्रीय पार्लमेंट १९२४ च्या मार्चमध्यें उघडलें. ब्रिटनशीं सख्य ठेवण्याच्या आवश्यकतेचें धोरण त्यावेळीं जाहीर करण्यांत आलें.

[ सं द र्भ ग्रं थ. – जी. एबसे-ईजिप्त, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, पिक्चरेस्क ( भाषांतरकार – क्लॅरा बेल २ भाग लंडन १८८७ ); बर्च - ईजिप्त फ्रॉम दि अर्लिएस्ट टाइम्स टु बी सी. ३००; केली – ईजिप्त, पेंटेड अँड डिस्क्राइब्ड; ए. बी. एडवर्डस-ए थावजंड माइल्स अप दि नाइल ( लंडन-१८८९ ); एडवर्डस-फॅरोआज, फेलाहज अँड एक्सप्लोअरर्स ( लंडन १८९२ ); मॉर्डन-जिऑग्रफी ऑफ ईजिप्त (लंडन १९०२ ); वॉर्ड-पिरॅमिड्स अँड प्रोग्रेस ( १९०० ); वुइलकॉक्स-ईजिप्शियन इरिगेशन ( १८९९ ); लेकॅने-दि मीटिऑरॉलजी ऑफ ईजिप्त अँड इट्स इन्फ्लूएन्स ऑन डिसीज ( १८९७ ); कॅप्टन जी. ई-शेले-बर्डस ऑफ ईजिप्त (लंडन १८७२ ); लेडी डफ गॉर्डन-लेटर्स फ्रॉम ईजिप्त ( लंडन १९०२ ); लेन्स-मॅनर्स अँन्ड कस्टम्स ऑफ दि मॉडर्न ईजिप्शिअन्स ( लंडन १८६० ); लेन पूल-सोशल लाइफ इन ईजिप्त ( १८८४ ); सेंट जॉन-व्हिलेज लाइफ इन ईजिप्त ( २ भाग १८५२ ); विल्किन्सन-मॅनर्स अँड कस्टम्स ऑफ एन्शंट ईजिप्शियन्स, ईजिप्शियन इन दि टाइम ऑफ फॅरोआज; विलमोर-दि स्पोकन अ‍ॅरेविक ऑफ ईजिप्त ( द्वितीय आवृत्ति लंडन १९०५ ); नाइट-अकाउंट्स ऑफ दि गॉड्स, अ‍ॅम्यूलेटस एटसेट्रा ऑफ दि एन्शंट ईजिप्शियन्स; ईजिप्टॉलॉजिकल रीसर्चेस ( वॉशिंग्टन १९०६ ); थॉम्सन अँड, रँडाल मॅक इव्हर-एन्शंट रेसेस ऑफ थीबेड ( ऑक्सफोर्ड १९०५ ); अर्मन-लाइफ इन एन्शंट ईजिप्त ( भाषांतरकार-एच.एम टिरार्ड लंडन १८९४ ); मॅस्पेरो लाइफ इन एनशंट ईजिप्त अँड असीरिया ( भाषांतरकार मॉर्टन लंडन १८९२ ) स्टीनडॉर्फ-एन्शंट रिलिजन ऑफ इजिप्शियन्स; वीडेमॅन रिलिजन ऑफ एन्शंट ईजिप्शियन्स; टीले-हिस्टरी ऑफ ईजिप्शियन रिलिजन ( टरुब्नर ओरिएंटल सीरीज ); मॅस्पेरो-मॅन्युअल ऑफ ईजिप्शियन अर्केऑलजी आणि ईजिप्सियन आर्ट-स्टडीज; शार्प-ईजिप्शियन अँटिक्विटीज इन दि ब्रिटिश म्यूझियम; फोडेन अँड फ्लेचर. टेक्स्ट बुक ऑफ ईजिप्शियन अ‍ॅग्रिकल्चरल ( दोन भाग ); शार्प-ईजिप्शियन हीरोग्लिफिवस वुइथ ए व्हॉकेब्युलरी; रनॉफ-एलेमेंटरी ग्रामर ऑफ एन्शंट ईजिप्शियन लँग्वेज. मरे-एन्शंट ईजिप्शियन लीजंड्स; बज-ईजिप्शियन लिटरेचर २ भाग, ऑस्वर्न-मॉन्युमेंटल हिस्ट्री ऑफ ईजिप्त ( दोन भाग ) कॅपॅर्ट प्रिमिटिव्ह आर्ट इन ईजिप्त; पेट्री-ईजिप्शियन टेल्स ( दोन भाग लंडन १८९५ ); ब्रेस्टेड एनशंट रेकॉर्डस ऑफ ईजिप्त ( शिकॅगो १९०६ ); ए हिस्टरी ऑफ ईजिप्त फ्रॉम दि अर्लिएस्ट टाइम्स टु दि पर्शियन काँक्वेस्ट; ( न्यूयॉर्क लंडन १९०५ ); ब्रेस्टेड-ए हिस्टरी ऑफ एनन्शंट ईजिप्शियन्स ( न्यूयॉर्क अँड लंडन १९०८ ); बज-ए हिस्टरी ऑफ ईजिप्त १.८ भाग ( लंडन १९०२ ); पेट्री-ए-हिस्टरी ऑफ ईजिप्त ( फ्रॉम दि अर्लिएस्ट टाइम्स टु दि थर्टिएथ डिनॅस्टी ); मॅस्पेरो-दि स्ट्रगल ऑफ दि नेशन्स, दि पासिंग ऑफ दि एम्पायर्स ( लंडन १९०४ ); महाफी-दि एम्मायर ऑफ दि टॉलेमीज ( लंडन १८९५ ); मिल्ने-ए हिस्टरी ऑफ ईजिप्त अंडर रोमन रुल (लंडन १८९८ ); गिबन-डिक्लाइन अँड फॉल ऑफ दि रोमन एम्पायर; बटलर-दि अरब काँक्वेस्ट ऑफ ईजिप्त १९०२; सर डब्ल्यू म्यूर-दि मॅमेल्यूक ऑर स्लेव्ह डिनॅस्टि ऑफ ईजिप्त ( लंडन १८९६ ); झैडन-हिस्टरी ऑफ मॉडर्न ईजिप्त; पेटन-हिस्टरी ऑफ दि ईजिप्शियन रेव्होल्यूशन ( २ भाग १८७० ); मस्का-ईजिप्त अंडर मेहेमेट अली ( दोन भाग ); डी.ए. कॅमेरॉन-ईजिप्त इन दि नाइंटीन्थ सेंचरी ( लंडन १८९८ ); डायसी-दि स्टोरी ऑफ दि खेदिव्हेट ( लंडन १९०२ ); जे.सी. मॅककोन-ईजिप्त अंडर इस्माइल (लंडन १८९९ ); लॉर्ड क्रोमर मॉडर्न ईजिप्त ( दोन भाग लंडन १९०८ ); लॉर्ड मिलनर-इंग्लंड इन ईजिप्त ( ११ वी आवृत्ति लंडन १९०४ ); कॉल्व्हिन दि मेकिंग ऑफ मॉडर्न ईजिप्त ( लंडन १९०६ ); वॅलेस ईजिप्त अँड ईजिप्शियन कश्चन ( लंडन १८८३ ); ब्लंट सीक्रेट हिस्ट्री ऑफ दि इंग्लिश ऑक्युपेशन ऑफ ईजिप्त ( लंडन १९०७ ); फाइफ-न्यू स्पिरिट इन ईजिप्त; रायले-दि ईजिप्शियन कँपेन्स १८८२-१८९९ ( लंडन १९०० ); स्टीव्हन्स-वुइथ किचनेर टु खार्टम; एडिंबरो ( १८९८ ); चर्चिल-दि रिव्हर वार ( लंडन १९०२ ); बटलर कँपेन ऑफ दि कॅटेरेक्ट्स ( लंडन १८८७ ); ]

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .