विभाग नववा : ई-अंशुमान
ईजियन समुद्र – भुमध्यसमुद्राचा एक भाग. पश्चिमेस ग्रीस व पूर्वेस आशियामायनर यांमधील मधून मधून द्वीपें असलेल्या या मोठ्या जलसंचया ( आर्किपेलागो ) च्या उत्तरेस यूरोपमधील तुर्कस्तान असून मार्मोरा समुद्राला व काळ्या समुद्राला डार्डानेल्सनें हा जोडला गेला आहे. याला ईजियन हें नांव कसें पडलें याबद्दल अनेक कथा सांगतात. या समुद्रांतील प्रमुख द्वीपें पुढील होत. थेसॉस; सॅमोथ्रेस; इंब्रॉस आणि लेम्नॉस; यूबोया ( सर्वांत मोठें बेट ); नॉर्दन स्पोरेडीज; लेस्बॉस आणि चिऑस; सॅमॉस आणि निकारिया; कॉस; आशियामायनर किनार्यालगतचीं सर्व बेटें व सायक्लेडीजचा मोठा द्वीपसमूह. द्वीपांच्या रांगांमुळें ईजियन समुद्र कमीजास्त खोल बनलेला आहे. यांतील असंख्य द्वीपें व त्यांचा डोळ्यांत भरणारा उंचवटा या योगानें ईजियन चांगला सुंदर व चित्रविचित्र दिसतो, पण यांतून जहाजें नेणें फार त्रासदायक व धोक्याचें असतें. यांतील कांहीं बेटें ज्वालामुखीपासून बनलेलीं तर कांहीं संगमरवरी दगडाचीं व ज्यांत लोखंड सापडतें अशींहि आहेत. मोठाल्या बेटांतून सुपीक व भरपूर पाणी असलेल्या अशा दर्या व सपाट मैदानें आहेत. गहूं, दारु, तेल, अंजीर, मध, मेण, कापूस, रेशीम वगैरे जिन्नस तयार होतात. स्पंज, पोंवळीं व जलचर प्राणी पकडण्याचा येथील लोकांचा व्यवसाय आहे. पुरुष काटक, मजबूत बांध्याचे व देखणे असतात. येथील स्त्रिया तर सौंदर्याविषयीं प्रसिद्ध आहेत. १९१२ पूर्वीं सायक्लेडीज, नार्दर्नस्पोरेडीज व ग्रीक किनार्यालगतचीं यूबोया आणि लहान लहान बेटें हीं ग्रीसच्या ताब्यांत व बाकीचीं तुर्कस्तानकडे होतीं. पण त्यानंतर इंजियन बेटें कांहीं ग्रीसकडे व कांहीं इटलीकडे गेली. गुदस्ता झालेल्या लासेनच्या तहान्वयें इंब्रॉस व टेनेडॉस हीं दोन बेंटें तुर्कांच्या स्वाधीन करण्यांत आलीं आहेत.