विभाग नववा : ई-अंशुमान
ईथर (इन्ध्क) - शास्त्रीय लेखकांनीं ईथर किंवा आकाशतत्व या नांवाचें एक सर्वव्यापी तत्व आहे. या प्रकारची कलपना गृहीत धरली आहे. यास मराठींत इन्ध्क असा प्रतिशब्द योजतात. शास्त्राच्या प्रगतीच्या मध्यकाळांत निरनिराळ्या प्रकारचे ईथर गृहीत धरले होते. परंतु प्रयोगानें एकच प्रकारचा ईथर सध्यां गृहीत धरणें भाग आहे. प्रथमत: विद्युच्चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण इत्यादि सृष्टिविषयक कार्यें घडण्यास त्या त्या प्रकारचीं `ईथरें’ गृहीत धरलीं होतीं; आतां फक्त प्रकाशाचें अवकाशांतून गमन होण्यास एकच ईथर गृहीत धरला आहे; व याच ईथरमार्फत विद्युल्लता आणि चुंबकत्व यांचीं कार्यें होतात असें मत प्रस्थापित होऊं पहात आहे.
आतां जर आपण अशी कल्पना केली कीं, ईथर आणि इतर सामान्य जडद्रव्य यांत साम्य आहे, आणि यांच्या गुणधर्मांत जो फरक दिसतों तो यांच्या ठिकाणीं असणार्या लघुगुरुत्वामुळें हा फरक दिसत आहे, तर आपणास ईथर आणि इतर जड द्रव्यें यांची तुलना करितां येण्यासारखीं आहे. सूर्यापासून उष्णतादिकांचें जे उत्सर्जन होत आहे त्यावरुन ही तुलना करणें जास्त सुलभ आहे. सूर्यापासून पृथ्वीवर दर चौरस सेंटिमीटर क्षेत्रफळावर तीन ग्रामक्यालोरी इतकी शक्ति प्राप्त होते; म्हणजे दर चौरस सेंटमीटरला सुमारें १.३X १०६ इतके अर्ग याप्रमाणें शक्ति येते असें समजावे. पृथ्वीवर वातावरणाबाहेर दर घनसेंटिमीटर इतक्या अवकाशांत ४/१०५अर्ग इतकी शक्ति सूर्यपकाशांत असते. या वस्तुस्थितीच्या योगानें अंतराच्या वर्गाच्या व्युत्क्रमप्रमाणांत गणना करुन त्यावरुन सूर्यपृष्ठावर किती शक्ति असते याचें अनुमान करितात. सूर्यपृष्ठावर दर चौरस सेंटिमीटरला १.८ अर्ग प्रमाणांत शक्ति वास करिते. आतां `इ’ ही इथरची स्थितिस्थापकता आहे असें समजून गणना करितां असें उत्तर आलें आहे कीं, ईथरची घनता १/१०१ पेक्षा जास्त आहे आणि ईथरची स्थितिस्थापकता १०३ इतकी आहे. यावरुन कांचेच्या स्थितिस्थापकतेपेक्षां ईथरची स्थितिस्थाकता १/१०८ पट आहे असें दिसून येतें. अवकाशांतून जड पदार्थ जात असतांना त्या योगानें ईथरलां गति प्राप्त होते काय याविषयीं शास्त्रज्ञांनीं बरेच प्रयोग केले आहेत. वार्षिक गतीनें पृथ्वी सूर्याभोंवतीं प्रदक्षिणा करीत असतांना ती दर सेकंदास सुमारें अठरा मैल या वेगानें गमन करिते; अर्थात पृथ्वीचें या वेगानें गमन होत असतांना तिच्या गतीमुळें ईथरमध्यें गति उत्पन्न होत असल्यास ती गति द्दग्गोचर व्हावी म्हणून शास्त्रज्ञांनीं अनेक प्रयोग केले आहेत. परंतु ईथरला गति प्राप्त झाल्याचें अद्याप पावेतों निदर्शनास आले नाहीं.
अलीकडील शोध. – सूर्यप्रकाशाचें पृथक्करण होऊन जो इंद्रधनुष्यात्मक पट्टा पडतो त्यावर चुंबकशक्तीच्या योगानें परिणाम होतो असें सन १८९६ च्या सुमारास पी. झिमन नांवाच्या शास्त्रज्ञानें दाखवून दिलें. त्यावरुन अणूमध्यें कम्प पावणारे विद्युत्कण असतात असें अनुमान कांहीं शास्त्रज्ञांनीं काढलें आहे. मक्सवेल यानें प्रकाशासंबंधानें जे प्रयोग केले आहेत त्यांच्या योगानें ईथरच्या सिद्धान्तास दुजोरा मिळाला आहे. त्याच्या प्रयोगांच्या योगानें असे सिद्ध झालें आहे कीं, उत्सर्जनाच्या योगानें यांत्रिक संस्थिति ( मेकॅनिकल सिस्टिम ) वर परिणाम होतो असें दिसून आले. पी. एन. लेबेड्यू यानें सन १९०० सालीं जे प्रयोग केले त्या प्रयोगात एका चक्राचा उपयोग करण्यात आला होता; व एतत्सद्दश प्रयोग दुसर्या पुष्कळांनीं केले आहेत. त्यावरुनहि असेंच सिद्ध झालें आहे कीं, प्रकाशादिकांच्या योगानें ईथरमध्यें जे प्रकंप उत्पन्न होतात ते द्दग्गोचर करिता येतात.