विभाग नववा : ई-अंशुमान
ईदिग – ही तेलगु ताडी कलालांची जात उत्तर सरकार, नेलोर कडप्पा जिल्हा, चिंगलपट, उत्तर अर्काट, सालेम वगैरे भागांतून आढळते. बलिज वंशांतील हे लोक असून धंद्यामुळें दूर झाले आहेत असें कोणी म्हणतात. हे मुख्यत: वैष्णव असून त्यांचे उपाध्ये सतानी आहेत. यांच्यांत दोन वर्ग आहेत.– एक दंडु ईदिग व दुसरा बलिज ईदिग कांहीं धंद्यासंबंधीच्या चालीमुळें हे तामिली शानानपासून विभक्त दिसतात. तामिली ताडी कलाल दारु नारळीपासून काढतात पण खजुरीपासून काढीत नाहींत, याच्या उलट तेलगु खजूरीपासून ताडी काढतात. पण नारळीला शिवत नाहींत. यांचा पिढीजाद धंदा ताडी, गाळण्याचा असला तरी हल्लीं फार थोडे लोक तो चालवितात. पुष्कळसे मोलमजुरी शेतकी व इतर धंदे करुन पोट भागवितात. मद्य देवता जी एलम्मा तिला हे लोक भजतात. यांचे पुरोहित ब्राह्मण असतात. मद्य पिणें यांच्यांत वर्ज मानिलें आहे. हे व्यासांपासून आपली उत्पत्ति झाल्याचें सांगतात. यांची मूळभाषा तेलगु आहे व कांहीं कानडीहि बोलतात.
या जातींत बहुपत्नीत्व रुढ आहे. प्रौढविवाह करण्यासंबंधीं या जातींत नियमच आहे. जातिभ्रष्टता अगर व्यभिचार या दोन कारणाशिवाय पुरुषांस स्त्रीचा त्याग करतां येत नाहीं. त्याच प्रमाणें नवरा जातिभ्रष्ट झाला तरच स्त्रीस त्याच्याशीं घटस्फोट करतां येतो. बसवीची चाल यांत रुढ नाहीं. यांच्यांत श्राद्धाची वहिवाट नसून महालय अमावास्येच्या दिवशीं व वर्षप्रतिपदेच्या दिवशीं आपल्या मृतपितरांच्या नांवानें दानधर्म करतात. लग्न व इतर उत्सव प्रसंगीं ब्राह्मणांस उपाध्ये म्हणून ते बोलावतात.
हे मृतांनां पुरतात व बारा दिवस सुतक पाळतात. दोष घालविण्याकरितां ब्राह्मणास ते आपल्या घरांत बोलावितात. `ताताचार्य’ म्हणून एक वैष्णव ब्राह्मण त्यांचा गुरु असतो. कित्येकांचा `सतानी’ गुरु असतो. उच्च जातींच्या लोकांस ते क्वचित प्रसंगी आपल्या जातींत घेतात.
हे शिवभक्त त्याच प्रमाणें विष्णुभक्त आहेत. यांच्यांत एक भिक्षुकांचा वर्ग असून त्याला ते ठराविक वेळीं देणग्या देतात. १९११ च्या खानेसुमारींत ३२३९५७ ईदिग लोक भरले.
[ सेन्सस रिपोर्ट ( म्हैसूर ) १९११; थर्स्टन-कास्टस अँड ट्राईब्स ऑफ सदर्न इंडिया ]