विभाग नववा : ई-अंशुमान
ईश्वरसिंग – एक जयपूरचा राणा. याचा बाप जयसिंग इ. स. १७४३ त वारल्यावर हा गादीवर बसला. याचा वडील भाऊ माधवसिंग मेवाडांत जहागीरदार होता. पण लागलीच तो मेवाडराण्याची मदत घेऊन ईश्वरसिंगाशीं लढूं लागला. ईश्वरसिंगानें शिंदे होळकरांची मदत मागीतली. त्यांनीं प्रथम ईश्वरसिंगाचा पक्ष घेऊन राजमहाल येथें माधवसिंगाचा पराभव केला व त्याचा तंटा तीन लाखांवर तोडला. पण माधवसिंगाचा मदतनीस मेवाडचा राणीं जगात्सिंग यानें खुद्द पेशव्याकडे वकील पाठवून मदत मागितली. माधवसिंगानें यापूर्वींच होळकरास पासष्ठ लक्ष रुपयांचे आमीष दाखवून फोडला होता. शिंदे विरुद्ध असतांहि पेशव्यानें पैशाच्या लोभास्तव माधवसिंगाचा पक्ष उचलून जयपूर राज्यांतील नेवाई प्रांतावर स्वारी केली ( १७४७ ). तेव्हां ईश्वरसिंगानें नेवाईसुद्धां चार महाल माधवसिंगास व पेशवेहोळकरांस नजराणा अशा तर्हेचा करारनामा करुन दिला. [ बाळाजी बाजीराव रोजनिशी भा. १ ले. २०८ ]. परंतु पेशव्याशीं केलेला हा करार ईश्वरसिंगानें पाळला नाहीं म्हणून होळकर त्यावर चालून गेला व त्याची हंट्टी नरम करुन करार पुरा करुन घेतला. [ इ.स. १७३८. राजवाडे खं. ६. १९०, १९१, ५८१ ]. यापुढें ईश्वरसिंगास होळकराचा अतोनात जाच होऊं लागला. अखेर तो जिवाला कंटाळून विष खाऊन मेला [ १७५१. रा. खं. ३. १६३ ]. त्याच्या नंतर माधवसिंग गादीवर आला. [मराठी रियासत मध्य विभाग २].