विभाग नववा : ई-अंशुमान
ईसॉप – प्रसिद्ध ग्रीक कल्पितकथाकार. हा ख्रिस्ती शकापूर्वीं ६२० ते ५६० या कालांत होऊन गेला. सॅमॉस इयाड्मनचा तो गुलाम होता, यापलीकडे त्याच्यासंबंधीं कांहींच माहिती उपलब्ध नाहीं. ह्यामुळेंच त्याच्या अस्तित्वाबद्दलहि बरेच जण शंका घेतात. इयाड्मननें त्यास मुत्त केलें असलें पाहिजे असें म्हणतात. पुढें तो लिडियाचा राजा क्रोसिअस याच्या दरबारीं राहिला. तेथें सोलनची व त्याची गांठ पडली. एके ठिकाणीं तो फार कुरूप होता असें दर्शविलें आहे. हा कुबडा होता अशी समजूत आहे व त्यावरून इंग्रजींत ईसॉप म्हणजे कुबडा असें विशेषण रूढ झालें आहे. याच्या उलट ईसॉपला सुंदर म्हणूनहि म्हटलेलें आढळतें.
ईसॉप यानें आपल्या कथा बहुधा लिहून ठेवलेल्या नसून त्या परंपरेनें तोंडींच चालत आल्या असल्या पाहिजेत. “ईसॉपच्या कल्पित गोष्टी”(ईसॉप्स फेबल्स) हें पुस्तक अलीकडे रचण्यांत आलें. त्यांतील पौरस्त्य गोष्टी तर ईसापच्या नसून मागाहून त्या त्याच्या नांवावर पडल्या. प्लानुडीजनें आज आपणापुढें असलेल्या ‘ईसाप्स फेबल्स’ची प्रत तयार केली. या प्रतीच्या आधारें लोकांत रूढ असलेल्या अर्वाचीन यूरोपीय दंतकथा निघाल्या असें म्हणण्यास हरकत नाहीं.
ईसापच्या गोष्टींचा मूळ ग्रीक ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वीं शंभर गोष्टींचें लॅटिन भाषांतर रोम येथें १४७६ त प्रसिद्ध झालें. नंतर चार वर्षांनीं प्लानुडीजची संहिता मिळविण्यांत येऊन त्याच्या एकावर एक आवृत्त्या नवीन नवीन भर घालून काढण्यांत आल्या. विल्यम कॅक्सटननें १४८४ त प्रथमच ईसाप्स फेबल्स इंग्रजींत छापलें. कार्ल व्हॉन हाल्मनें सर्व उपलब्ध गोष्टी सटीक प्रसिद्ध केल्या. १८९४ मध्यें कॅको युनिव्हर्सिटीनें एका पॅरिस येथील हस्तलिखित प्रतीवरून स्टर्नबॅचच्या विवेचनात्मक टीपांसहित ईसापचा कथासंग्रह प्रसिद्ध केला.
[संदर्भग्रंथ – बेंटले – डिस्सर्टेशन ऑन दि फेबल्स ऑफ ईसाप. जेकब्स – दि फेबल्स ऑफ ईसॉप (१८८९). लेंप्रिरेक्लासिकल डिक्शनरी.]